मेरा कुछ सामान ...
तुझ्याविषयी काहीही कलात्मक लिहावं असा तू नाहीस. म्हणजे अजिबातच नाहीस. तरीही तुझ्याविषयी लिहिताना दहादा अडखळतेय मी, कारण तुझ्याविषयी लिहायचं म्हणजे ते तुझ्यासारखंच हवं आणि ते खूप अवघड आहे. का म्हणजे काय? सोपं लिहिणंच तर सगळ्यात अवघड असतं ना... आणि तू खूप सोपा आहेस.. म्हणूनच खूप अवघडदेखिल.. माझ्या शब्दांत मावण्यापलीकडचा..
अगदी पहिल्याने तुला भेटले तेव्हा तुझ्याविषयी काही अंदाज बांधावा इतकाही विचार न करता, "चारचौघांसारखा" असं एक लेबल लावुन तुला मेमरीत ठेऊन टाकलेलं मी. पण तुझ्या सोपेपणाची खोली कळत गेली तसं हे लेबलही गळून गेलं तुझ्यावरुन (इतर अनेक लेबलांप्रमाणेच)
तुझ्यासमोर आयुष्याचं कोणतंही तत्वज्ञान पाजळताना मला खरंतर अतिशय अपराधी वाटत असतं. एखाद्या सुंदर काचेच्या भांड्यावर ओरखडे ओढल्यासारखं. हो.. काचेच्याच.. माणसं मातीचे गोळे असतात आणि मग त्यांचा मातीचा देह बनतो. तू मात्र काचेचाच.. काचेसारखाच.. आतबाहेर निर्मळ, नितळ, पारदर्शक..
"जाऊ दे ना गं.. सोड.. एवढा काय विचार करायचाय? आपणही वागतोच असे कधी कधी. कधी नकळत, कधी जाणूनबुजून. शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती." इतक्याशा एका वाक्यावर मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांपासून बॉसपर्यंत कोणाचीही कोणतीही गोष्ट पाठीवर टाकताना पाहिलय मी तुला. असं कसं जमू शकतं कोणाला? आणि तेही अपरिहार्यता म्हणून नव्हे तर समजून घेऊन? वास्तविक पहिल्यांदा तुला असं बोलताना/वागताना पाहिलं तेव्हा "समाजाची खूप गरज असणारा माणूस" हे ही लेबल बहाल केलेलं मी तुला. कदाचित दुबळा. प्रतिकार न करु शकणारा किंवा प्रवाहाविरुद्ध जायला घाबरणारा. पण असं म्हणायला जावं तर असंही नाही. स्वत:ला पटलेल्या मतांवर कोणाचाही विरोध पत्करुन ठाम रहाताना पाहिलय तुला मी.. समोर कितीही मोठा माणूस असला तरीही स्वतःच्या तत्वांवर कधीही तडजोड न करता राहताना पाहिलय. स्वत:च्या मतांवर ठाम रहायचं म्हणजे जगाशी पावलोपावली भांडावं लागतं या मताची पाईक मी. तुला हे असं पहाणं माझ्यासाठी साक्षात्कारापेक्षा कमी नव्हतं. (प्रवाहाच्या विरोधात जायला घाबरणारी आणि म्हणून प्रवाहासोबत असणारी माणसं खरंतर आतून धुमसत असतात आणि ते जाणवल्यावाचून राहत नाही. तुझ्या आतबाहेर भरुन राहिलेली शांतता मात्र नवख्या माणसालाही जाणवेल. हा समजूतदारपणा कुठून आणलास?)  स्वतःच्या मतांवर ठाम राहून आपल्याला विरोध करणार्‍यांवरदेखिल निखळ प्रेम करण्याची कला कुठून मिळालीये तुला? म्हणजे आपल्या विरोधकाचा न पटणारा भाग सोडून बाकी सगळं जाणून घ्यायचं. त्यात काहीतरी आवडण्यासारखं असतंच. पण विरोधकाला विरोधापलीकडे जाणून घेण्याचा विचारच आचरणात उतरवणं केवढं अवघड आहे. (हे असं वागणं किती पुस्तकी वाटतं ना, खासकरुन वाचताना?) पण तुझ्यासोबत राहताना जाणवतं ते किती खरं आहे, किती आतून आलेलं.. अगदी नैसर्गिक.
तुला सांगण्यासाठी प्रत्येकाजवळ काहीतरी असतं. लहानग्या पोरापासून म्हातार्‍यापर्यंत आणि रस्त्यावरच्या स्टॉलवाल्यापासून मॉलमध्ये भेटलेल्या गर्भश्रीमंतांपर्यंत. सगळेच तुला काही ना काही सांगतात. अगदी पहिल्या भेटीत. काही ओळखदेख नसताना. कसं काय? बरं, आता यासाठी लागणारं खूप भारी संभाषणचातुर्य तुझ्याकडे आहे म्हटलं तर असंही नाही. वाक्यात निम्म्या वेळेला तर 'हे','ते' असलं काहीतरी वापरुन वाक्य पूर्ण करावं लागतं तुला. मग ही मोहिनी कुठली होते लोकांवर? तुझ्या गूढ सावळ्या रंगाची की पांढर्‍याशुभ्र हास्याची? कधी कधी वाटतं हात उचलून स्पर्श करावा तुझ्या सावळ्या वर्णाला. चांदीचा वर्ख बोटाला लागतो तसा तुझ्या सावळेपणाही बोटांवर घेता येईल असं वाटतं कधी कधी. बोटांवर घेतलेला तुझा तो रंग बघता बघता अंगभर पसरत जावा, त्याहीपेक्षा खोल आत्म्यापर्यंत झिरपावा. आणि मग तुझ्याच हसण्याचं चांदणं पडून उजळून जावं अंतर्बाह्य. पण नाही. हात पुढे करायला भीती वाटते. आपले हात मातीचे असल्याची जाणिव कशी पुसून टाकायची?
किती किती सोपा समजत होते मी तुला. किती दिवस. हा सगळा चांगुलपणा समजूनही तो केवळ चांगुलपणापर्यंतच मर्यादित होता. इतक्या सरळ माणसांना कशी जाणवेल प्रेमाची खोली? काळजात कळ उठावी अशी तीव्रता? (हेही तुझ्याविषयीचं पुढचं गृहीतक) प्रेम करायला काहीतरी खूप कॉम्लेक्स असावं लागतं अशी काहीतरी धारणा. किंवा जितका माणून गुंतागुंतीचा तितकं प्रेम तीव्र, खोल असले काहीतरी विचार. पण एकही प्रश्न न विचारता इतकं खोल प्रेम कसं करता आलं तुला? कधीच कोणता प्रश्न नाही.. एकही नाही.. हा रुक्मिणीचा वसा कुठे लाभला तुला?
हे एक बरं आहे की तुला जाणिव नाही तुझ्यातल्या नक्षत्रांची. वास्तविक त्यामुळे तू अजूनच उजळून निघतोस. (कधी कधी वाटतं की माणसाला आपल्या असण्याची माहिती नसली की आपण बदलत गेल्याची पण जाणिव होत नाही. आणि मग सगळंच हरवत जातं. पण नाही. हे असले विचार तुझ्यापुढे व्यर्थ आहेत. तुझ्याबाबत हे असं काहीही होणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला.) कारण तू नुसताच निरागस नाहीस. आणि सगळ्यांसोबत संबंध नीट ठेवणार नुसताच डिप्लोमॅटपण नाहीस. तू असा उमजत जाताना माझ्या मनाच्या किती बेड्या गळून गेल्यात हे मी नाही सांगू शकत. विश्वास गमावणं ही जगात सगळ्यात वाईट गोष्ट असेल कदाचित आणि विश्वास परत येणं ही तितकीच सुंदर.
नातं आणि त्यातली माणसं यांचं नातं काय असतं? कदाचित नातं जास्त महत्वाचं असतं माणसांपेक्षा. पण आपलं नातं तुझ्यापेक्षा महत्वाचं कधीच नाही होऊ शकणार. आपण असू नसू, हे नातं असेल नसेल, भेटी होतील, न होतील.. पण तू असला पाहिजेस. तू आहेस तस्साच तू असला पाहिजेस. तसाच तू राहिला पाहिजेस. मला माझ्याच बेड्यांतून मुक्त करुन तू दाखवलेलं नक्षत्रांनी भरलेलं आभाळ कायमच माझ्या सोबतीला राहिल. आणि तूही असाच रहा.. नक्षत्र फुलवत...
मेरा कुछ सामान ...
लावायचा होता ना तुला आपल्या नात्याचा थांग..
आणि माझ्या मते ते अथांग होतं..
कसे वेडे हट्ट तरी असतात..
कसले वेडे दिवस...
कशाला हवं असायचं तुला विश्लेषण करायला प्रत्येक गोष्टीचं?
पाण्यात उतरण्या आधीच तळाचा अंदाज घ्यायची तुझी घाई,
आणि ते छान उतरुन अनुभवायची माझी पद्धत..
कधी कधी विश्लेषण करण्याच्या नादात विसरुन जातो ना आपण अनुभवणं?
समजलं नाही का तुला हे?
की अनुभवण्याच्या नादात साध्या गोष्टीही लक्षात यायच्या राहून जातात,
हे मला समजलं नाही..
जे असेल ते..
थोडी वाट पहायला हवी होती का आपण?
उशीरा का होईना सापडला असताच की आपल्याला तळ, आपल्या नात्याचा..
फक्त पाणी गढूळायला नको होतं रे..!
मेरा कुछ सामान ...
या आयुष्याचं काय करायचं असतं? म्हणजे नेमका उद्देश काय असतो? मी खरच सांगते मी महत्वाकांक्षी नाही. low aim is crime वगैरे वाक्य ज्यांना आवडतात त्यांना आवडो आणि ज्यांना अशी महत्वाकांक्षा आहे त्यांना असो. पण सगळ्याच लोकांवर महत्वाकांक्षी असण्याचं आणि स्पर्धा करण्याचं बंधन का? कशासाठी? मला सामाजिक बांधिलकीची वगैरे फार चाड नाही. दुरुन तमाशा बघणार्‍यांतला पिंड म्हणा हवंतर. कारण सगळंच निरर्थक वाटतं. जन्म निरर्थक.. जगणं निरर्थक.. निरर्थकाचाच खेळ वाटतो सगळा मला तरी. महित नसलेल्या वाटेवरुन माहित नसलेल्या गावाकडे जाणारा हा प्रवास. गाव कुठलं आहे हे माहित नाही त्यामुळे कुठे थांबूही शकत नाही. हा प्रवास मुक्कामाला न पोहचताच संपणार आहे. हा प्रवास माझ्यासोबत संपणार आहे की प्रवासासोबत मी संपणार आहे. आणि मी च संपून गेले तर काय गाव आणि काय मुक्काम? मेल्यानंतरचं कोणी बघितलंय? मला नाही फरक पडत मी मेल्यावर कोण किती रडेल याचा? कोणी रडेल की नाही याचा तरी.. मला नाही वाटत फार लोकप्रियता असावी आयुष्यात.. किंवा पैसा, सुखं वगैरे... घर, गाडी, विमानप्रवास वगैरे नसतानाही सुख असतंच की. मेल्यावर घर कुठे नेणार आहे मी.? या इतक्या इतक्याश्या मुक्कामात टीचभर जागेसाठी नाही आटापिटा करावा वाटत मला तर माझं काय चुकलं? 
एखादं माणूस फकिर असू नये का? असूच शकत नाही का? काही माणसं असतात ना (म्हणजे खरंतर पुरुष कारण माझ्यातरी बघण्यात आजवर एकही अशी बाई नाही..) बापजाद्यांनी कमवून ठेवलेल्या किंवा स्वत:च कमवलेल्या पैशावर मनमौजी रहाणारी.. त्यांना कुटुंबिय असतात किंवा नसतात. असले तरी ते त्यांना बांधून ठेवू शकत नाही कारण ते पुरुष असतात. नावं ठेवतील कदाचित पण फकिर आहे म्हणुन त्यांचा जगण्याच हक्क कोणी नाकारत बसत नाही. मग माझा पण नाकारला जाऊ नये असं मला वाटलं तर माझं काय चुकलं? मला माझं आयुष्य जगायला कोणाची परवानगी का लागावी? माझा जन्म होवुन अनेक वर्षे लोटली. मला एक हाडामांसाचं शरीर आहे आणि ते जगवायला जे जागतं ते मिळवायची, कमवायची ता़कद, कौशल्य, बुद्धी इ. गोष्टीही आहेत आणि ते मी कमवतेय देखिल. मग तरीही मला स्वत:वर अधिकार मिळवायला माझं अस्तित्व सिद्ध का करावं लागावं. 'मी आहे' एवढ्या गोष्टीने ते का सिद्ध होत नाही. माझं होत नाही तर मग पुरुषांचं कसं होतं? का होतं? आधी मला स्त्री मुक्ती फॅसिनेटींग वाटायची.. मग दांभिक वाटायला लागली. आता काहीच वाटत नाही. काही प्रश्न जेन्युइन आहेत पण मला फक्त माझ्यापुरतं उत्तर हवय. कोणी स्वार्थी म्हटलं तर म्हणो. स्वतः काहीतरी भव्यदिव्य मिळवा, काहीतरी करुन दाखवा (म्हणजे काय?) आणि मग तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल हे साटंलोटं का? अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा.. हे सगळं अधिक अधिक मिळवायच्या अपेक्षा का? सामान्यपणे लोकांना वाटतं तसं (लोक म्हणतेय मी बायका नाही) घर-संसार ही स्वप्न नाही आली कधी मनात पण मग म्हणून समाजप्रवर्तक, द्र्ष्टा नेता वगैरे होण्याची स्वप्न पाहिली पाहिजेत असं का? उदात्त हेतूला वाहिलेलं आयुष्य अर्थपूर्ण वगैरे असा काही समज असेल.. तर असू दे ना. मी कुठे नाही म्हटलं? पण तो समज मला पटलाच पाहिजे का?  नेतृत्वगुण, समजूतदारपणा, बाणेदार वृत्ती, सोशिकपणा, सात्विकता वगैरे वगैरे चं गुणगाण इतकं ऐकत आलेय मी की अशीच आहे असं मला वाटायला लागलेलं एके काळी. वास्तविक माझ्यात कोणतेही नेतृत्वगुण वगैरे नाहीत. मी कोणालाही दिशा वगैरे दाखवु शकत नाही, समजून घेऊ शकत नाही, ज्याला मी धडाडी, बाणेदारपणा समजत वगैरे समजत होते तो निव्वळ आक्रस्ताळेपणा आहे. आणि हे सगळं उमजलं तेव्हा निराशेच्या खोल गर्तेत जाण्याचा पण अनुभव घेवुन झालाय माझा. पण मी अशी आहे तर मी काय करु? आपल्या खर्‍या भावना दडपून उगीच सोशिकतेचा किंवा प्रेमळपणाचा आव मला नाही आणावासा वाटत. आणि मला महान महान स्वप्नही नाही पडत.. यात माझं काय चुकलं?
कुठलं बंधन नाही.. बेड्या नाहीत.. अपेक्षा नाही.. अपेक्षापूर्ती नाही. जगण्यापुरतं कमवावं..मनमोकळं हसावं. बोलावसं वाटेल त्याच्याशी बोलावं. कधी पंडीतजींच्या मियां मल्हारात तर कधी गुर्टूबाईंच्या ठुमरीत बुडून जावं... मोत्झार्ट चालू असताना व्हॅन गॉग अजून वेगळा समजतो का हे शोधण्यात तासन तास घालवावे.. बर्गमन पाहताना फुटून जावं.. पाठीवारच्या सॅकमध्ये २ कपडे आणि पायात चपला एवढ्या भांडवलावर वाट फुटेल तिकडे चालत रहावं. कुठल्यातरी गावात रात्र कुडकुडावी.. कुठल्यातरी पर्वतावर दिवस तळपावा.. माहित नसलेल्या तळ्यात सुर्य बुडावा.. हात लाऊन पाहता येईल एतका चंद्र जवळ भासावा... कुठल्या आडवाटेने न समजलेल्या भाषेतलं गाणं कानी यावं आणि सोबत रहाता येणार नाही हे माहित असूनही जीव ओवाळून टाकणारे प्रियजन भेटावेत.... बस्स.. जगणं जाणून घेत रहावं आणि जाणून घेत रहावं.. रोज कळतय वाटेपर्यंत नव्याने अडकावं.. अडकलय असं वाटेपर्यंत सुटून जावं.. मला असं जगावसं वाटलं तर काय चुकलं? आयुष्याचा प्रवास खर्‍या अर्थाने प्रवासच व्हावा.. आणि हिमालयाच्या किंवा आल्पस् च्या कुशीत किंवा अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यात, किंवा नाईल च्या काठी किंवा पॅसिफिकच्या मध्यावर.. कुठेही संपून जावं कसलाही मागमूस न ठेवता..मातीचा देह मातीत मिसळून जावा.. मला असं मरावसं वाटलं तर माझं काय चुकलं?
मेरा कुछ सामान ...
जन्माला येतो तेव्हाही वाहतच असतं रक्त शरीरात,
वाढत जातं दिसामासांनी..
आपल्याही नकळत अव्याहतपणे सुरु असते प्रक्रिया त्याच्या निर्माणाची..
शुद्धीकरणाची..
येणार्‍या प्रत्येक क्षणागणिक
आणि जाणार्‍या प्रत्येक श्वासागणिक
एकेका थेंबामागे घडत असतं महाभारत...
अखंडपणे..
अचानक वार होतो एखादा आणि भळभळायला लागतं..
.
.
.
.
.
.
कवितापण अशीच जन्माला येते....
मेरा कुछ सामान ...
Hii..!
प्रिय लिहिलं नाही कारण तू मला प्रिय आहेसच याची मला खात्री नाही. किंवा खूप जास्त प्रिय असावीस. Narcissist ना शेवटी.. ह्म्म्म.. कशी आहेस? म्हणजे आता मला खरच आठवत नाही की तू कशी आहेस. स्वतःविषयी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की, ' अर्रे मी अशीच तर आहे पहिल्यापासून, फक्त आता स्वतःविषयी अमुक अमुक गोष्ट शब्दांत मांडू शकते. (आणि गरज पडलीच तर त्यामागची कारणमीमांसादेखिल स्पष्ट करु शकते.)' असो, तर याप्रकारे तुझ्याविषयीदेखिल मला काही आठवत नाही, त्यामुळे काही नवीनही वाटत नाही.
हल्ली मी परत बोलायला लागलेय. म्हणजे खाई खाई सुटल्यावर माणसं जशी खात सुटतात तशी मी बोलत सुटलेय त्याच्याशी. त्यामुळेच मी त्याला माझी दर्दभरी दास्ताँ पण सांगितली. (वास्तविक, जे झालं त्याच्याविषयी मला दर्दच काय पण इतरही काही वाटत नाही.) पण बहुधा लोकांना दर्द वाटत असावा. म्हणून मग मी देखिल तो वाटू देते. म्हणजे मलाही कधी कधी रडायला हक्काचा खांदा मिळेल अशी आशा वाटते. खरंतर तो नाही मिळाला तरी हरकत नसते. मिळाल्याचा आनंदही नसतो, बरं, तो खांदा मी वापरेनच याचीही खात्री नसते. पण हा खांदा मिळण्याचा प्रकार भलताच रोमँटीक असतो. खांद्यावर रडून झाल्यावर जे काही होतं ते मात्र प्रॅक्टीकल असतं. (की नॅचरल?) पण खरी गंमत ही नाहीये. खरी गंमत ही आहे की, हे सगळं माहित असूनही असंच व्हावसं वाटतं. (व्हावसं वाटतच असंही नाही पण होऊ नये यासाठीही मी काही करत नाही.)
मी फार मी मी करते. कदाचित मला दुसरं काहीच करता येत नसावं. हे जाणवलं की मी विचार करते. shame based conscience आणि guilt based conscience यातला कुठला मला जास्त सूट होईल याचा. कुठलाच नाही असं उत्तर मिळालं की मला विकृत असल्यासारखं वाटतं. आत्महत्या करणे हा चांगला मार्ग असू शकतो पण ते फारचं रोमँटीक वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात मी भलतीच प्रॅक्टीकल असल्यामुळे मला ते जमणार नाही हे ही जाणवतं. स्वतःला नाकारण्यात काही हशील नाही कारण मग माझं नसलेलं conscience कुठूनसं "खोटारडी! खोटारडी" म्हणून ओरडू लागतं. स्वतःला स्विकारणं हा रोमँटीसिजम आहे. त्यामुळे तो ठराविक काळानंतर संपतो. माझ्याबाबतीत तो संपला आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना अर्थ नाही.
मिळवायचंय ते मिळत नाही ही समस्या नाहीच आहे. काय मिळवायचं तेच समजत नाही ही समस्या आहे. बरं ते समजलं आणि काही मिळालं तरी मग त्यानंतर इतर काही हवसं वाटणारच नाही याची काय खात्री? किंबहुना असं वाटेल याचीच शक्यता जास्त. मग मला काहीच मिळवावसं वाटत नाही. तरी पण मी उत्तरं मिळवते. मिळवायला, गमवायला किंवा बदलायला ती माणसांपेक्षा कमी हानिकारक असतात.  बायका कन्फ्युज असतात असं पुरुषांचं मत असतं हे मला हल्लीच कळलं. आपल्यात बाईपणाचा अवशेष सापडला याचा आनंद मानून घ्यावा असा माझा विचार होता पण मग मला इतर बर्‍याच गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचा बाईपणाची स्पेसिफिक संबंध लावता येत नाही असं कळलं.
मला पाऊस पडताना परत परत का रोमँटीक वाटत रहातं याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न चालुये सध्या. असं वाटणं हा मी स्वतःशी केलेला अजून एक खोटारडेपण आहे असा निष्कर्ष निघाल्यास मला खूप काळाने परत एकदा वाईट वाटू शकतं.
असो. आजच्याला इतकच. काळजी घे म्हणत नाही मी तुला. कारण ते खोटं वाटतं. You are sane (selfish?) enough to take care of yourself. जाते.
Bye..!
मेरा कुछ सामान ...
कविता कोणाला काय देते याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असले तरी कवितेचं हे देणं तिच्यासारखंच उत्कट व भरभरून असतं. आपण कधी नकळत, कधी जाणूनबुजून, कधी वेळ काढून हक्काने तिच्याकडे जात राहतो ही गोष्ट सगळ्यांतला समान दुवा आहे.
कवितासंग्रह हा काही एका बैठकीत वाचून काढायचा साहित्यप्रकार नाही. आस्वाद घेत चवीचवीने, रेंगाळत, एकेका कवितेला मुरवून घेत पुढे जाण्यात खरी मजा असते. खासकरुन कवितेच्या बाबतीत असं तेव्हा होतं, जेव्हा कविता आपल्याला, मग ती कळत असो वा नसो, चटकन आपलीशी वाटते. आणि असं रेंगाळावंसं वाटत असतानाही वाहवा देत देतच आपल्याला पुढच्या कवितेकडे अधाशीपणे वळावसं वाटणं यांत कवितेचं यश असतं.
'कविता' या साहित्यप्रकाराच्या सामान्य माणसांतील लोकप्रियतेबद्दल मतंमतांतरे असू शकतात. पण प्रत्येक लेखकाच्या- अगदी थोडं फार लिहू शकणार्‍याच्याही मनात कवितेविषयी एक विशिष्ट जागा असतेच. कदाचित त्यामुळेच एखाद्या कथा-कादंबर्‍या लिहिणार्‍या लेखकाच्या कवितासंग्रहाविषयीदेखिल रसिकांना तेवढीच उत्सुकता असते.
कविता महाजन यांचा "मृगजळीचा मासा" हा काव्यसंग्रह अशाच उत्सुकतेने वाचून काढला. 'ब्र' आणि 'भिन्न' सारख्या सामाजिक विषयांवरच्या कादंबर्‍या वाचल्यानंतर जेव्हा त्यांचं 'ग्राफिटी वॉल' वाचलं तेव्हा त्या कादंबर्‍या जणू नव्याने वाचल्यासारखं वाटलं. सगळी पार्श्वभूमी एका वेगळ्या कोनातून समजली आणि त्याचवेळी त्यांची कवितेविषयीची मतंसुद्धा समजली. त्या म्हणतात - "वास्तवाने निबर झालेल्या त्वचेवर एखाद्या कोवळ्या स्पर्शाने उगवलेली शिरशिरी म्हणजे कविता." आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे, कविता हा आयुष्याच्या सगळ्या धबडग्यातून मिळालेला मोकळा श्वास आहे हे सांगणारं त्यांचं हे वाक्य - "कविता! बाकी गोष्टी कृत्रिम श्वासोच्छवासासारख्या! प्रेम-प्रतिष्ठा- प्रसिद्धी- पैसा- इत्यादी काहीही कवितेमुळे मिळत नसलं तरी मी तिच्या ऑक्सिजनमुळेच तर जिवंत आहे. "
त्यांच्या या मतांमुळे तर पुस्तक वाचायला घेताना प्रचंड उत्सुकता होती. आणि त्यांचं कादंबरीकारापेक्षा एक खूप वेगळं रुप पहायला मिळेल याची खात्रीही. अर्थातच हा संग्रह अपेक्षा पूर्ण करणाराच ठरला. त्यांनी दिवास्वप्नांना हे पुस्तक अर्पण केलंय! "त्यांनीच जणू बळ दिलं खरी स्वप्नं पहायला आणि ती प्रत्यक्षात उतरवायला." आणि अनुक्रमात दिलेल्या कविता सुरु होण्याआधी एक अजून अर्पणपत्रिका दिसते जी उखडलेल्या हातांविषयी बोलते, कारण पंख तर तसेही काल्पनिक असतात. पुस्तक आपली पकड घेतं ते इथपासून!
या संग्रहाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एक स्त्री आहे म्हणून त्यांच्यातला माणूस मागे पडत नाही आणि माणूसपणाला जागत स्त्रीत्व नाकारण्याचा वेडेपणाही त्या करत नाहीत. कदाचित म्हणूनच कवयित्रींच्या लिखाणाविषयीच्या सगळ्या पारंपारिक गृहितकांना मोडीत काढत या संग्रहातली त्यांची कविता आयुष्याच्या अनेक अंगाना सहज स्पर्श करुन जाते, वाचकाला अंतर्मुख बनवते.
कवितेत वापरलेल्या नवनवीन प्रतिमा महानगरीय जाणिवांतून आल्याच कळतं, पण त्यातूनही भेटणारा महानगरांतला असा एक वेगळा निसर्ग त्या प्रतिमांतून आपल्यासाठी तरी (शहरांतील लोकांसाठी) अधिक दृश्यमान आणि परिचित वाटतो.प्रतिमांचा वेगळेपणा नजरेत भरणारा असला तरी तो केवळ वेगळेपणाच्या हेतूने आलेला नाही. कवितेइतक्याच प्रतिमाही सहज आहेत.
नात्यांत एकाकडून दुसर्‍यावर होणार्‍या अन्यायाविषयी किंवा झालेल्या चुकांविषयी बोलण्याच्या पारंपारिक मानसिकतेपेक्षा नात्यांत अपरिहार्यपणे होत जाणारे बदल - ज्यात खरंतर कोणीच दोषी नसतं - आणि त्यातूनही जिवंत राहणारी नात्यांची मुळं ही कवितेला प्रगल्भ तर बनवतातच पण वाचकाला जास्त भिडतातसुद्धा. खूप जवळच्या नात्यांतले गुंते जगताना मनाच्या आंतरिक पातळीवर चाललेला कोलाहल, ज्यातला कुठलाच एक धागा स्वतंत्रपणे बाजूला करता येत नाही पण त्यांची स्वतंत्र व सगळी मिळून असणारी उत्कटता शब्दातीत असते, अशा भावना खूप सुट्या, स्वतंत्र मांडण्यात आणि तरीही त्यांतील उत्कटता अबाधित ठेवत मांडण्यात त्या कमालीच्या यशस्वी झाल्यात.
बाहेरच्या वर्णनातून सुरु झालेली कविता मग हळू हळू 'त्याच्या'वर येते.. त्याच्यावर थबकल्यासारखी वाटतेय तोवरच हे सगळे भ्रम आहेत हे जाणवून अधिक आत्ममग्न होते. कवितेचा हा शोधाचा प्रवास चालू राहतो, कधी मनाच्या कडेने तर कधी मनाच्या प्रवाहात झोकून देऊन! हा शोध मग येऊन थांबतो मरणापाशी आणि त्यातूनही बाकी राहतं कवितेचं देणं! सगळ्या कवितासंग्रहाचा आकृतीबंध मांडायचा झाला तर असा मांडता येईल. पण मुक्तछंदाच्या कोणत्यातरी ४ ओळी काढून त्यांचा दाखला देणं हा कवितांवर शुद्ध अन्याय होईल. या कविता अनुभवायच्या आहेत आपल्या आपणच.
अतिशय सुरेख लयीत चाललेल्या कविता समेवर शेवट कराव्या अशा संपतात.. एक अख्खं आवर्तन घेऊन. पण ही लय त्यातल्या सुरांची नसते तर विचारांची असते, कविता वाचताना डोळ्यांसमोर उभ्या रहाणार्‍या दृश्यांची असते, कधी कल्पनेची असते.
स्वतःविषयी निर्विकार होत जातानाच्या, स्वत:च्याच विस्मरणात जातानाच्या अनाहत भावनेतून स्वतःच्या घराकडे आणि घरातील लोकांकडे पहाण्याची दृष्टी बदलते आणि त्यातूनच कधी एका क्षणी फुलून येते प्रतिकाराची ठिणगी.. हा क्षण कसा असतो? कायमच इतरांना समजेल अशा भाषेत बोलणं आपल्यालाही टोचतंच की कधी कधी. असह्य होतं मग अशावेळी आणि कंठातून फुटतो आपल्या सूरांतला आपला शब्द. कदाचित हा आवाज ब्र असतो.. आणि ब्र उच्चारल्यावर पुढचं बोलू लागतो आपण. पण हा 'ब्र' फुटण्याचा एक क्षण कसा असतो? हे असे अनेक पकडायला अवघड क्षण नेमकेपणाने समोर येत जातात आणि आपल्या मनाचा तळ ढवळून येताना रोखणं मग आपल्याही हातात रहात नाही.
कविता क्लिष्ट आणि दुर्बोध नसल्या तरी त्यांनी विलक्षण खोली आहे. पूर्वार्धात लिहिलेल्या काही कविता स्वतःबाहेर फारशा जात नाहीत पण तरीही त्या बंदिस्त वाटत नाहीत. स्वतःतच एक आसमंत मोकळा झालाय त्यांच्यासाठी.. एक जग आहे.. खूप एकटं तरी खूप परिचित .. अशा जगाची सफर करुन येतो आपण. अर्थात स्वतःच्याच आत एक फेरी मारुन येतो. त्यात प्रत्येकाला काही ना काही समान सापडेल हे नक्की.
इंदिरा संत किंवा शांताबाईंच्या कवितांमधला स्त्रीत्वाचा तरल आणि अतिशय गाभ्यातून यावा असा आविष्कार घडतोच यात पण काळानुरुप बदलून आल्याने जास्त आपलासा वाटतो, प्रामाणिक वाटतो. वास्तवाच्या जवळ जातानादेखील या कविता आपल्यातली तरलता हरवू देत नाहीत हे विशेष. आत्यंतिक निराशेच्या आणि एकाकीपणाच्या अनुभूतीदेखील रोजच्या जगण्यातील साध्या वर्णनातून त्या अशा समोर उभ्या करतात की पुस्तक मिटल्यावरही त्या अनुभूती मनभर व्यापून रहातात. मरणाविषयी त्यांनी अखेरी ज्या बर्‍याच कविता लिहिल्यात त्यात मरणाविषयीची कुतूहल, कधी दाटलेल्या शिणवट्यातून त्याची वाटणारी गरज तर कधी भीती, कधी त्याची केलेली आळवणी, कधी चपखल शब्द वापरणार्‍या कवीनेप्रमाणे चपखलपणे माणसं निवडणारं मरण तर कधी प्रियकरासारखी त्याच्या मिलनाची पाहिलेली स्वप्नं अशा अनेकानेक अंगांनी त्या भावना मांडल्यात. आणि त्यातूनही राखेतल्या कोंबासारखा आशावाद डोकावत असतो. कवयित्रीच्या मनातील कवितेविषयीच्या भावना, 'कवितेविषयी चार पत्रं' यात समोर येतात आणि मग लेखकाच्या नजरेतून दिसणारी कविता वाचता वाचता, वाचणार्‍या प्रत्येकाच्याच आयुष्यात कविता किती रुजून गेली आहे, आपल्यासोबत आपल्या तळहातावरच्या रेषांसारखी जन्माला आली आहे हे जाणवतं.
हा कवितासंग्रह मला तरी एखाद्या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी वाटला. प्रत्येक कविता म्हणजे रंगाचा सुरेख, घाटदार फटकारा आहे. घोटवलेल्या तानेसारखा, अस्सल, लखलखीत! स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व जपणारा. आणि हे सगळं मिळून तयार होणारं जे चित्रं असतं ते आपलंच असतं. आपलीच प्रतिमा. किंवा आपल्या मनाची. म्हणूनच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट तरीही खूप समजणारी.
मेरा कुछ सामान ...
स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता..

परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता..

बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..

एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..

भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
मेरा कुछ सामान ...
(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------
1.JPG
निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वहातेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधारपण असा..
इतका रंगीत असेल?
खरच, ती कोणती वेळ होती,
जेव्हा तुझ्या मनातल्या अंधाराचं लखलखीत प्रतिबिंब पडलेलं आकाशात?
घनगर्द निळा आणि गूढ हिरवाईच्या छटा लेऊन आभाळ डोकावत राहिलं पाण्यात..
कोणालाही कळू न देता तूच रुजवलीस ना स्वप्नं त्यांच्या डोळ्यांत..
आणि मग त्यातली काही तूच उधळूनही लावलीस आभाळात
अंगभूत लहरीपणानुसार...
वेडे लोक त्यालाच चांदण्या म्हणतात अजूनही..
जग कधीच नव्हतं तुझ्यासाठी..
तुलाही सोसलच नसतं ते..
पण सारंकाही तसंच राहिलय तुझ्यानंतर..
अजूनही रात्री सगळं गाव शांत झोपलेलं असतं..
एखाद्या कॉफीशॉपमधली तुरळकशी वर्दळ सोडता,
जर्द पिवळ्या प्रकाशाला शोषत असतो गूढ अंबर..
परमेश्वरही दुसर्‍या दिवसापर्यंत निश्चिंत झालेला असतो..
पण त्या स्वप्नांचं काय?
तुला माहितेय?
अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतिक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?
3.JPG
2.JPG
मेरा कुछ सामान ...

(असं म्हणतात की, The best love stories in your life happen when you dont know anything about love. Well, I still dont think I know anything about love. पण नक्की आठवतय 'नंदा प्रधान' वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते.. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते.. त्या सर्वांसाठी..)
**************************************************
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...
जिग्-सॉ पझलसारखच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधुन जागच्या जागी बसवायच्या..
तसच काहीसं होतं का नात्यांचं?
आपल्या मनात सगळ्याच नात्यांची काही काही रुपं असतात,
आणि मग माणसं बघुन ती भरायची..
अपेक्षेपलीकडची नाती कधी असतात का?
घटना बदलतील कदाचित,
मतितार्थ मात्र तोच..!
आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा झालाय,
कसं रहायचं मर्यादित प्रेम करत?
प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर
आणि प्रत्येक प्रियकरातला खूपसारा मित्र..
आणि काही काही तर अगदीच कधीही न भेटलेले पण..
कुणाचा धीरगंभीर स्वभाव आणि गाईचे डोळे,
कोणी उत्साहाचा झरा,
कोणाच्या कुंचल्यात जादू,
कोणाच्या गळ्यात..
कोणी प्रचंड आदराला पात्र,
आणि कोणासाठी उगीचच दाटुन आलेली माया..
कोणी नुसते निर्मळ..
कोणी समजुतदार आणि प्रेमळ..
कोणाचा निर्हेतुक खमकेपणा,
तर कोणाचा सहेतुक थंडपणा..
माझं मलाच कळतय आज प्रेम किती प्रकारे करता येवु शकतं..
आणि कदाचित पुढेही कळत राहिल अजून किती प्रकारे?
तुम्ही मला प्रिय होतात..
इतरांपेक्षा प्रिय झालात..
प्रियतम.. प्रियतर...!
'प्रियकर'???
हे लेबल लागलं की नाही,
याने खरच कितीसा फरक पडतो..
प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
प्रश्न, उत्तरं, व्याख्या आणि बंधनं याच्या पार कधीच पोहचलेलं असतं मन...
आपण का व्याख्या मिळवायच्या नादात माणसं हरवुन बसायचं?
शेवटी व्याख्या आली म्हणजे तिचं अपूर्णत्वही आलं,
अपवादही आले..
त्यापेक्षा शब्दांपलीकडचं सगळच कसं पर्फेक्ट.. परिपूर्ण..
काय फरक पडला आपल्या नात्यात, कबुली दिली गेली किंवा नाही त्याचा..
काय फरक पडला, तुम्हाला माहिती होतं तरी की नाही त्याचा..
आणि काय फरक पडला असता,
अजून काही घोटवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली असती तर त्याचाही?
खरंतर, नात्याच्या व्याख्येची खरी गरज तिसर्‍याच माणसाला असते..
कोणत्याही व्याख्येत न गुंतता प्रेम करु शकले,
म्हणुनच कदाचित तुम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं..
पण तुमच्यापैकी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याबद्दल कधी कधी वाटतं,
कदाचित कोणीच सर्वांगाने जाणलं नाही मला..
त्याचं वैषम्य वाटावं असंही काही नाही म्हणा..
हत्ती आणि आयुष्याच्या रुपकाप्रमाणे
करतच रहातो आपण चूक
कोणत्याही माणसाला जोखण्याची..
कदाचित मला स्वतःचा थांग अजून लागला नाहीये
त्यामुळे मी शिकलेय कोणाला ओळखल्याचे दावे न करायला..
पण तुम्ही?
तुम्हाला तरी पटलीये का ओळख स्वतःची खरच..?
आणि माझीही? पूर्ण नाही पण पुरेशी तरी?
त्यामुळे, ज्यांनी मला एकाच कोनातून जोखलं,
त्यांच्या वाट्याला दु:ख आलंही असेल..
ह्म्म...
तुम्हाला समजलं की नाही हे मला माहित नाही,
पण तुम्ही कोणी कधीच नव्हतात एकमेकांच्या रीप्लेसमेंट्साठी..
माझ्या प्रिय प्रियकरांनो,
शेवटी आज मी जी काही आहे ती तुमच्यासकट आहे,
कोणाला.. अगदीच कोणालाही न वगळता...
माझ्या असण्यात जितकी मी आहे,
तितकेच तुम्हीही आहात...
शेवटी माझी तुमच्यापासून सुटका नाहीच..
जिथे स्वतःपासूनच सुटका नाही तिथे तुमच्यापासून कशी?
(तशी माझी सुटका तुमच्यापासून नव्हतीच कधी..
कारण मला बांधुन घालणारेही तुम्ही नव्हताच..
इथे स्वतःच्याच निर्दय तावडीत सापडलेय मी..)
असो.. तुम्ही भेटलात,
मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,
सुकर वाटल्या असतील कदाचित,
उलट बर्‍याचदा तुमचा उत्प्रेरक म्हणुन फायदाच झाला
त्या वाटा जोखताना...
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार..
**************************************************
मेरा कुछ सामान ...

अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्‍यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..
अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्‍यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला...
तुला खूप काही सांगायचं असताना,
न सुचलेले अर्धे-अधिक शब्द,
आपल्या त्या खळाळत्या हास्यात वळते करुन घेत होतास तू..
आणि तुला शहाणा म्हणू की वेडा ह्या संभ्रमात
मी अधिकाधिक रुतत चाललेली...
अजूनही आठवतात ते सगळे क्षण..
आणि मग माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन मग लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकंताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
हा तळ माझ्या एकटीचा..
ही वाटही माझ्या एकटीचीच..
पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण...
मेरा कुछ सामान ...
वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्‍यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही. पण ते काहीही असलं तरी तिच्याकडे वळून वळून पहावं असं काहीतरी त्या चेहर्‍यात नक्की होतं. काय ते अजूनही पुरेसं उलगडलय असं वाटत नाही पण एखाद्या गोष्टीविषयी गूढ आकर्षण वाटावं आणि मोठ्या माणसाच्या आड लपून लहान मुलं जशी भीतीदायक गोष्ट पहात रहातात तसं तिच्याकडे पाहत रहावं असं मात्र वाटलेलं.
आज वाटतं की तिच्या या संमोहीत करणार्‍या आकर्षणाचं मूळ आहे तिच्या डोळ्यात.. बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.
तसं त्यानंतर तिला पडद्यावर पाहिलेलं ते म्हणजे "पग घुंगरु बांध" आणि "आज रपट जाये" मध्ये. आणि ते पाहून कळलं नव्हतं की हिचा का एवढा बोलबाला आहे.
smita patil1.jpg
तिला खळखळून हसताना कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. अगदीच उमटलं तर एखादं तृप्ततेचं हसू वाटावं, समजतय- न समजतय तोवर नाहिसं होऊन जाणारं हसूच पाहिलय मी तिच्या चेहर्‍यावर. माणसाच्या नेणिवा त्याच्या जाणिवांवर सदैव कुरघोडी करत असतात असं वाटतं तिचं हसू पाहिलं की.. तिच्या नेणिवांमधली खोल दु:ख तिच्या चेहर्‍यावर नितळ हसू येऊच द्यायची नाहीत जणू. तशी हसली असेल तरी 'स्मिता पाटील' म्हटलं की तो चेहरा नजरेसमोर येत नाही. सगळ्यात असून नसल्यासारखा वाटावा असा तिचा वावर. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम. एक खूप गूढ वर्तुळ वावरतय भोवती आणि त्याच्या परिघात फार कमी लोकांना प्रवेश आहे असं वाटायचं.. कदाचित त्यामुळेच त्या परीघात जाणार्‍यांवर तिचं जे प्रेम असेल ते अजून जास्त उत्कट होत असेल..
स्वतःचे स्वतंत्र विचार असलेली, आपलं डोकं वापरणारी, आपली मतं मांडणारी आणि वाटा चोखाळणारी होती ती. मेंढरांच्या कळपातलं तिचं वेगळेपण चटकन नजरेत भरेल कोणाच्याही अशी. तिचं समर्पण आणि निष्ठा तिच्याकडे बघताच कळुन येते नाही? ८ महिन्यांचे गरोदर असताना चित्रपटसृष्टीसाठी निघालेल्या मोर्चात भर उन्हात अन्यथा कोण कशाला चालेल? तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली म्हणा. प्रसिद्ध अमेरिकन समिक्षक Elliott Stein म्हणालेला "At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen." एकाच काळात "उंबरठा" आणि "अर्धसत्य" सारख्या परस्परविरोधी भूमिका स्मिताच साकारु जाणे.
तिचा ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला अभ्यास होता म्हणे. राज बब्बरशी लग्न झाल्यावर ती त्याला म्हणायची "आपलं लग्न तर झालं, पण मी तुझी फार काळ साथ नाही देऊ शकणार." हल्लीच बच्चनने कुठेतरी स्मिताच्या अशा गूढ स्वभावाविषयी सांगितलं. त्याचा तो 'कुली' चा जगप्रसिद्ध अपघात होण्याच्या आदल्या रात्री १ ला स्मिताचा कॉल आलेला त्याला. तिने विचारलं, "आप ठिक तो है. मुझे बहुत बुरा सपना आया आपके बारे में" आणि दुसर्‍या दिवशी हा अपघात झाला त्याला. ती खरच गूढ होती का?
तब्बल ७ वर्ष ती समांतर चित्रपटांशीच सलग्न राहिली. "आज रपट जाये" गाण्याच्या चित्रिकरणानंतर ती घरी येऊन रडलेली ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते. आणि तिची वृत्ती बघता ते खरंही वाटतं. कमर्शिअल सिनेमातली स्पर्धा आणि वेळा सांभाळताना माझ्यातल्या माणसाचा मी अपमान करतेय असं मला वाटतं हे तिचं वाक्यच खूप काही सांगुन जातं.
स्मिता-नसीरुद्दीन्-गिरीश कर्नाड यांची जुगलबंदी बघणं हा कायमच एक भारी अनुभव असतो. स्मिता-नसीर चा बाजार मधला प्रसंग, ज्यात स्त्री-मुक्तीवर भाष्य केलय. इतक्या सहज साध्या प्रसंगात ते जे सांगून जातात- खरं तर स्त्रीला स्वत:पासूनच मुक्त व्हायची गरज आहे. आज ह्याचा आधार, हा नाही म्हणून त्याला सोडून दुसर्‍याकडे जाणे ही मुक्ती नव्हे. असं कोणाकडे जावसं वाटणंच थांबायची क्रिया म्हणजे मुक्ती आहे. आणि अगदी हेच मला आठवलं गौरीचं "कारागृहातून पत्रे" वाचताना. त्या कथेची नायिका पण अशाच काही विचारांची. अर्थात ती कथा असल्याने त्यात अजून बरच काही मांडलय ते तिथेच वाचण्यासारखं..(गौरीच्या कथा कधी मोठ्या पडद्यावर मांडता आल्या असत्या तर स्मिताला नक्की कालिंदीची भूमिका करायला आवडली पण असती. आणि तिला तीच मिळाली असती कदाचित.)
मंथन मध्ये स्मिता-गिरीशची दृश्य आवर्जून पहावी अशी. खासकरुन तिची म्हैस मेल्यावर ती त्याच्याकडे जाते आणि तो तिला पैसे देऊ करतो. ती घेत नाही. बाहेर पळत सुटते रडत रडत. तिला खरी अपेक्षा असते त्याच्या सहानुभूतीची. त्यालाही हे माहित असून त्याच्या स्वतःच्या मर्यादांमध्ये तो अडकलेला असतो. त्याचाही मुद्राभिनय लाजवाब आणि स्मिताची तर सगळीच देहबोली.. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून.
तिला तिच्या जवळच्या मैत्रिणी 'स्मि' म्हणायच्या म्हणे. ती एक उत्कृष्ट फोटोग्राफरही होती. तिने अगदी व्यावसायिक वाटावेत असे फोटो काढले आहेत. हेमामालिनीचं देखिल फोटोशूट केलेला तिने. आणि "अगदी प्रोफेशनल वाटतात फोटो" अशी दाद पण मिळवलेली.
खरंतर राज बब्बरशी तिने लग्न करायचा घेतलेला निर्णय अर्थातच धक्कादायक होता सगळ्यांना. रातोरात तिची प्रतिमा खराब झाली. पण असल्या गोष्टींची पर्वा करणार्‍यांतली ती कधीच नव्हती. खरतर लग्नही केलंच पाहिजे असाही तिचा आग्रह नव्हता. समाजाला दाखवायला म्हणुन काही करायला कायमच तिचा विरोध. म्हणुनच कदाचित "जैत रे जैत" ची नायिका खर्‍या स्मिताच्या जवळ जाणारी वाटते. म्हणजे स्मिता प्रेम करेल तर ते तिच्यासारखच करेल. तिचं ते बाजिंदी असणारं मनमानी रुप, तिचं ढोलियावरचं प्रेम. आणि ते मिळवण्यासाठी तिने केलेलं सगळंकाही हे केवळ शब्दातीत. नुसत्या "जैत रे जैत" वर पानंच्या पानं लिहावीत असं.
१७ ऑक्टोंबर १९५५ ला एका मंत्री आणि समाजसेविका दांपत्याच्या पोटाला जन्माला आलेली ही मुलगी. मराठी शाळेत शिकलेली. अस्सल मराठी वातावरणात वाढलेली स्मिता. पहिल्यांद कॅमेरासमोर आली ती बातम्या द्यायला म्हणुन.. घाईघाईत तिने जीन्सवर गुंडाळलेल्या साडीत लोक तिला "साडीत खूप सुंदर दिसतेस" अशी प्रतिक्रिया द्यायचे तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचं खट्याळ हसू कसं असेल याची कल्पनापण अभावानेच करवते. बुद्धाच्या बंद डोळ्यांआड जे अफाट दु;ख होतं तसच काहीसं स्मिताच्या उघड्या, टपोर्‍या डोळ्यांबाबत. तिथेच श्याम बेनेगलनी स्मिताला टिपलं. "चरनदास चोर" हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी 'स्मिता पाटील' आणि 'श्याम बेनेगल' ही दोन नावं चित्रपटसृष्टीला दिल्यावबद्दल तो कायम लक्षात राहिल.
आयुष्य हा शेवटी एक निर्दयी, विरोधाभासात्मक खेळ आहे याची परत जाणिव व्हावी अशा घटनांतील एक घटना म्हणजे स्मिताचा शेवट आहे. स्त्री-सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टी ज्यात तिने पुढाकार घेतला त्यात मातामृत्यूप्रमाण रोखण्याच्या बाबींचाही समावेश होता. आणि तिच्या मृत्यूनंतर आता इतक्या वर्षांनी मृणाल सेन म्हणाले की निष्काळजीपणामुळेच स्मिताचा मृत्यू झाला. प्रतिकच्य जन्मानंतर १३ अवघ्या काही दिवसांनी, १३ डिसेंबर १९८६ ला स्मिताचं असं निघुन जाणं हा चित्रपटसृष्टीला बसलेला नक्कीच मोठा धक्का होता. कारण चित्रपटसृष्टीची गणितं बदलण्याचं सामर्थ्य ती बाळगुन होती. आपल्या पदार्पणातच शबानाला टक्कर दिली होती तिने आपसुकच. लोकांच्या मनात कायमच त्यांची स्पर्धा राहिली. पहिल्या दोन चित्रपटांनंतरच तिची तुलना शबानाशी होवु लागली होती. स्मिताला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मात्र शबानाच्या आधी मिळाला. आणि मग शबानाला तीन सलग ८३ (अर्थ), ८४ (खंडहर), ८५ (पार). आणि हे शेवटपर्यंत चालुच राहिलं.
उण्यापुर्‍या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि ला रोशलमध्ये व्यक्तिविशेष म्हणुन प्रदर्शित केले गेले. शेवटी 'स्मिता' विषयी काहीही विचार करताना ना.धो. महानोरच जास्त योग्य वाटतात. "या पंखावरती, मी नभ पांघरती, मी भिंगरभिवरी बाई चांदन्यात न्हाती" असो किंवा "असं एखादं पाखरु वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ" असो. माझ्यासाठी तरी अशीच आहे स्मिता..
-----------------------------------------------------------------------------
(गौरी न वाचलेल्यांसाठी: कालिंदी ही गौरीच्या "थांग" आणि "मुक्काम" ची नायिका. थोडी थोडी उंबरठा मधल्या स्मितासारखी. पण कालिंदीला पार्टनर पण सापडतो.)
मेरा कुछ सामान ...
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्‍याखोर्‍यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..