मेरा कुछ सामान ...
किती किती हिरीरीने समर्थन केलं मी माझ्या लहान सहान दु:खांचं..
त्यांची बाजू मांडली.. त्यांच्यासाठी भांडले..
स्वीकार केला तरी आवाज उठवणं सोडलं नाही..
खुलेपणाने मान्य केलं त्यांचं अस्तित्व
आणि कुरवाळत राहिले त्यांना..
एकटेपणी..
सर्वांसमक्षही..
.
पण आता श्वासाश्वासात अलगद वाहत रहावं,
आयुष्यभर तळहातावर जपावं असं दु:ख समोर आलं असताना,
रात्रीच्या नीरव एकांतात
हुंदकाही न फुटू देता गाळलेल्या मूक अश्रुंशिवाय,
त्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे काहीच नाही..
काहीच नाही..