मेरा कुछ सामान ...
इतरांची चंद्रांनी लगडलेली आभाळं कुतूहलाने, काहीशा असूयेनेच पहायचे ते दिवस..
माझं कोरं आभाळ टुकूटुकू बघत रहायचं सैरभैर होऊन, येऊ घातलेल्या चंद्रांच्या वाटेकडे..
एकेक चंद्र जमू लागला आभाळात तसं सजत गेलं आभाळ माझंही..
आता मी च माझ्या आभाळाकडे असूयेनं पहावं असंही वाटू लागलं..
निवडून निवडून आलेला एक एक चंद्र माझ्याकडे..
अगदी माझ्यासारखा.....
दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..
सूर्य आला की मावळायचं असतं हे गृहितच धरलेलं सगळ्यांनी..
वाट सोडून मन मानेल तसं धावावं असं कोणालाच वाटलं नाही,
अगदी हक्काचं आभाळ असूनदेखिल..
मग माझ्यासारखं कोण होतं?
माझ्यासारखं काय होतं?
कोणापाशीच मिळाला नाही चंद्राळण्याचा खुळा अट्टहास..
क्षितिजाकडे झुकता झुकता एकेक चंद्र दुसर्‍या आभाळाचा सूर्य होऊ लागला,
सहजपणे..
जितक्या उत्कटतेने आभाळभर चंद्र सजवलेले,
तितक्याच अलिप्तपणे निरोप देतेय आता एकेकाला...
चंद्र कधीच नाही, फक्त आभाळचं माझं होतं कदाचित..
वेड्या अट्टहासापायी प्रत्येक वेळी कोसळणारं..
प्रत्येक चंद्रासाठी नव्याने उंच उडणारं..
माझं आभाळ कोरंच बरं आहे..
आता चंद्राळण्याचं वजन परत नाही सहन होणार त्याला...