मेरा कुछ सामान ...
जग चालतंच असतं
मागील पानावरुन पुढे...
चांदणीला फुलपाखरं पहिल्यांदा दिसतात तेव्हा...
पण चांदणीचं मात्र विश्व बदलून जातं..
हसत राहते लुकलुकत,
फुलपाखरं पाहता पाहता...
कोवळ्या फुलांत भिरभिरणारी फुलपाखरं..
निश्राप मनस्वीपणे लळा लावणारी फुलपाखरं...
नियती ठाऊक असतेच चांदणीला,
अगदी पहिल्यापासून...
अन् म्हणूनच फुलपाखरांचं तिला अप्रूपही जास्त..
फुलांनाही नसेल एवढं...
चांदणी निरखत राहते फुलपाखरांना कौतुकाने..
तो असह्य पण अटळ क्षण येईपर्यंत..
जग चालत राहतं..
काळाच्या ओघात फुलं प्रौढ बनतात... पोक्त नजरेसारखी..
आणि फुलपाखरं उडून जातात.. नजरेतल्या सुगंधासारखी...
फुलपाखरं उडून जातात तेव्हाही,
जग चालत राहतं..
मागील पानावरुन पुढे..
फुलंही गुंतून जातात त्यांच्या पोक्त व्यवहारात..
ती चांदणी मात्र विझून जाते गर्द काळोखात,
कायमची...
फुलपाखरं उडून जातात तेव्हा...
मेरा कुछ सामान ...
तसा तू परकाच होतास...
आपल्या माणसाच्या डोळ्यांत भलत्याच कोणासाठी आलेल्या अश्रूंइतका...
मनाच्या खळबळीचा मागमूसच नसलेल्या चेहऱ्याइतका...
तू परकाच होतास..
अगदी अगदी परका...

मग कधी आपला झालास?
माझ्यातून उगवला असावास इतका आपला..
माझ्यात मावळू शकशील इतका आपला..
कधी आपला झालास?
अगदी अगदी आपला...

पण मला मात्र परकंच समजलास तू..
जेव्हा तुझ्या आतलं वादळ मला झेलू दिलं नाहीस तेव्हा..
जेव्हा तुझा हृदयस्थ उद्वेग माझ्या पापण्यांवर टिपण्याची स्पष्ट मनाई केलीस तेव्हा..
मला परकंच समजलास..
अगदी अगदी परकं...

मेरा कुछ सामान ...
तरीही कोणाचंतरी निर्व्याज हसू
मनात घर करेल..
कोणापासून दूर होताना
उगाच पोटात तुटेल...
तरीही कोणासाठी काळजात
दाटेलच माया...
तासन् तास आठवणींत
जातीलच वाया...
तरीही जीव धडपडेलच,
कोणाच्यातरी आनंदासाठी..
पुन्हा पुन्हा पुसली तरी
गजबजेलच पाटी..
तरीही होईलच डोळ्यांचं
एकांतात झुरणं..
अवघड जाईल कोणालातरी
नजरेआड करण..
तसं सोपंच झालेलं असतं जगणं..
कोणी कोणाचं नाही समजलं की..
एकटेपणाचं अंतिमत्व मान्य केलं की..
तरीही...