मेरा कुछ सामान ...

(असं म्हणतात की, The best love stories in your life happen when you dont know anything about love. Well, I still dont think I know anything about love. पण नक्की आठवतय 'नंदा प्रधान' वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते.. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते.. त्या सर्वांसाठी..)
**************************************************
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...
जिग्-सॉ पझलसारखच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधुन जागच्या जागी बसवायच्या..
तसच काहीसं होतं का नात्यांचं?
आपल्या मनात सगळ्याच नात्यांची काही काही रुपं असतात,
आणि मग माणसं बघुन ती भरायची..
अपेक्षेपलीकडची नाती कधी असतात का?
घटना बदलतील कदाचित,
मतितार्थ मात्र तोच..!
आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा झालाय,
कसं रहायचं मर्यादित प्रेम करत?
प्रत्येक मित्रात सापडलेला थोडा थोडा प्रियकर
आणि प्रत्येक प्रियकरातला खूपसारा मित्र..
आणि काही काही तर अगदीच कधीही न भेटलेले पण..
कुणाचा धीरगंभीर स्वभाव आणि गाईचे डोळे,
कोणी उत्साहाचा झरा,
कोणाच्या कुंचल्यात जादू,
कोणाच्या गळ्यात..
कोणी प्रचंड आदराला पात्र,
आणि कोणासाठी उगीचच दाटुन आलेली माया..
कोणी नुसते निर्मळ..
कोणी समजुतदार आणि प्रेमळ..
कोणाचा निर्हेतुक खमकेपणा,
तर कोणाचा सहेतुक थंडपणा..
माझं मलाच कळतय आज प्रेम किती प्रकारे करता येवु शकतं..
आणि कदाचित पुढेही कळत राहिल अजून किती प्रकारे?
तुम्ही मला प्रिय होतात..
इतरांपेक्षा प्रिय झालात..
प्रियतम.. प्रियतर...!
'प्रियकर'???
हे लेबल लागलं की नाही,
याने खरच कितीसा फरक पडतो..
प्रत्येकासाठीचा माझा पदर वेगळा होता..
प्रत्येकासाठी माझ्यापाशी असलेलं दानही वेगळं होतं..
प्रश्न, उत्तरं, व्याख्या आणि बंधनं याच्या पार कधीच पोहचलेलं असतं मन...
आपण का व्याख्या मिळवायच्या नादात माणसं हरवुन बसायचं?
शेवटी व्याख्या आली म्हणजे तिचं अपूर्णत्वही आलं,
अपवादही आले..
त्यापेक्षा शब्दांपलीकडचं सगळच कसं पर्फेक्ट.. परिपूर्ण..
काय फरक पडला आपल्या नात्यात, कबुली दिली गेली किंवा नाही त्याचा..
काय फरक पडला, तुम्हाला माहिती होतं तरी की नाही त्याचा..
आणि काय फरक पडला असता,
अजून काही घोटवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती झाली असती तर त्याचाही?
खरंतर, नात्याच्या व्याख्येची खरी गरज तिसर्‍याच माणसाला असते..
कोणत्याही व्याख्येत न गुंतता प्रेम करु शकले,
म्हणुनच कदाचित तुम्हालाही खूप कौतुक वाटलं त्याचं..
पण तुमच्यापैकी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याबद्दल कधी कधी वाटतं,
कदाचित कोणीच सर्वांगाने जाणलं नाही मला..
त्याचं वैषम्य वाटावं असंही काही नाही म्हणा..
हत्ती आणि आयुष्याच्या रुपकाप्रमाणे
करतच रहातो आपण चूक
कोणत्याही माणसाला जोखण्याची..
कदाचित मला स्वतःचा थांग अजून लागला नाहीये
त्यामुळे मी शिकलेय कोणाला ओळखल्याचे दावे न करायला..
पण तुम्ही?
तुम्हाला तरी पटलीये का ओळख स्वतःची खरच..?
आणि माझीही? पूर्ण नाही पण पुरेशी तरी?
त्यामुळे, ज्यांनी मला एकाच कोनातून जोखलं,
त्यांच्या वाट्याला दु:ख आलंही असेल..
ह्म्म...
तुम्हाला समजलं की नाही हे मला माहित नाही,
पण तुम्ही कोणी कधीच नव्हतात एकमेकांच्या रीप्लेसमेंट्साठी..
माझ्या प्रिय प्रियकरांनो,
शेवटी आज मी जी काही आहे ती तुमच्यासकट आहे,
कोणाला.. अगदीच कोणालाही न वगळता...
माझ्या असण्यात जितकी मी आहे,
तितकेच तुम्हीही आहात...
शेवटी माझी तुमच्यापासून सुटका नाहीच..
जिथे स्वतःपासूनच सुटका नाही तिथे तुमच्यापासून कशी?
(तशी माझी सुटका तुमच्यापासून नव्हतीच कधी..
कारण मला बांधुन घालणारेही तुम्ही नव्हताच..
इथे स्वतःच्याच निर्दय तावडीत सापडलेय मी..)
असो.. तुम्ही भेटलात,
मी अजून भेटले स्वत:ला..
स्वतःच्या स्वतःकडे चाललेल्या प्रवासातल्या काही वाटा,
अधिक मोहरल्या असतील कदाचित,
सुकर वाटल्या असतील कदाचित,
उलट बर्‍याचदा तुमचा उत्प्रेरक म्हणुन फायदाच झाला
त्या वाटा जोखताना...
मला माझ्याच आयुष्यात असं मुरवत नेल्याबद्दल
तुमचे आभार..
**************************************************
मेरा कुछ सामान ...

अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्‍यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..
अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्‍यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला...
तुला खूप काही सांगायचं असताना,
न सुचलेले अर्धे-अधिक शब्द,
आपल्या त्या खळाळत्या हास्यात वळते करुन घेत होतास तू..
आणि तुला शहाणा म्हणू की वेडा ह्या संभ्रमात
मी अधिकाधिक रुतत चाललेली...
अजूनही आठवतात ते सगळे क्षण..
आणि मग माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन मग लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकंताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
हा तळ माझ्या एकटीचा..
ही वाटही माझ्या एकटीचीच..
पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण...
मेरा कुछ सामान ...
वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्‍यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही. पण ते काहीही असलं तरी तिच्याकडे वळून वळून पहावं असं काहीतरी त्या चेहर्‍यात नक्की होतं. काय ते अजूनही पुरेसं उलगडलय असं वाटत नाही पण एखाद्या गोष्टीविषयी गूढ आकर्षण वाटावं आणि मोठ्या माणसाच्या आड लपून लहान मुलं जशी भीतीदायक गोष्ट पहात रहातात तसं तिच्याकडे पाहत रहावं असं मात्र वाटलेलं.
आज वाटतं की तिच्या या संमोहीत करणार्‍या आकर्षणाचं मूळ आहे तिच्या डोळ्यात.. बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.
तसं त्यानंतर तिला पडद्यावर पाहिलेलं ते म्हणजे "पग घुंगरु बांध" आणि "आज रपट जाये" मध्ये. आणि ते पाहून कळलं नव्हतं की हिचा का एवढा बोलबाला आहे.
smita patil1.jpg
तिला खळखळून हसताना कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. अगदीच उमटलं तर एखादं तृप्ततेचं हसू वाटावं, समजतय- न समजतय तोवर नाहिसं होऊन जाणारं हसूच पाहिलय मी तिच्या चेहर्‍यावर. माणसाच्या नेणिवा त्याच्या जाणिवांवर सदैव कुरघोडी करत असतात असं वाटतं तिचं हसू पाहिलं की.. तिच्या नेणिवांमधली खोल दु:ख तिच्या चेहर्‍यावर नितळ हसू येऊच द्यायची नाहीत जणू. तशी हसली असेल तरी 'स्मिता पाटील' म्हटलं की तो चेहरा नजरेसमोर येत नाही. सगळ्यात असून नसल्यासारखा वाटावा असा तिचा वावर. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम. एक खूप गूढ वर्तुळ वावरतय भोवती आणि त्याच्या परिघात फार कमी लोकांना प्रवेश आहे असं वाटायचं.. कदाचित त्यामुळेच त्या परीघात जाणार्‍यांवर तिचं जे प्रेम असेल ते अजून जास्त उत्कट होत असेल..
स्वतःचे स्वतंत्र विचार असलेली, आपलं डोकं वापरणारी, आपली मतं मांडणारी आणि वाटा चोखाळणारी होती ती. मेंढरांच्या कळपातलं तिचं वेगळेपण चटकन नजरेत भरेल कोणाच्याही अशी. तिचं समर्पण आणि निष्ठा तिच्याकडे बघताच कळुन येते नाही? ८ महिन्यांचे गरोदर असताना चित्रपटसृष्टीसाठी निघालेल्या मोर्चात भर उन्हात अन्यथा कोण कशाला चालेल? तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली म्हणा. प्रसिद्ध अमेरिकन समिक्षक Elliott Stein म्हणालेला "At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen." एकाच काळात "उंबरठा" आणि "अर्धसत्य" सारख्या परस्परविरोधी भूमिका स्मिताच साकारु जाणे.
तिचा ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला अभ्यास होता म्हणे. राज बब्बरशी लग्न झाल्यावर ती त्याला म्हणायची "आपलं लग्न तर झालं, पण मी तुझी फार काळ साथ नाही देऊ शकणार." हल्लीच बच्चनने कुठेतरी स्मिताच्या अशा गूढ स्वभावाविषयी सांगितलं. त्याचा तो 'कुली' चा जगप्रसिद्ध अपघात होण्याच्या आदल्या रात्री १ ला स्मिताचा कॉल आलेला त्याला. तिने विचारलं, "आप ठिक तो है. मुझे बहुत बुरा सपना आया आपके बारे में" आणि दुसर्‍या दिवशी हा अपघात झाला त्याला. ती खरच गूढ होती का?
तब्बल ७ वर्ष ती समांतर चित्रपटांशीच सलग्न राहिली. "आज रपट जाये" गाण्याच्या चित्रिकरणानंतर ती घरी येऊन रडलेली ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते. आणि तिची वृत्ती बघता ते खरंही वाटतं. कमर्शिअल सिनेमातली स्पर्धा आणि वेळा सांभाळताना माझ्यातल्या माणसाचा मी अपमान करतेय असं मला वाटतं हे तिचं वाक्यच खूप काही सांगुन जातं.
स्मिता-नसीरुद्दीन्-गिरीश कर्नाड यांची जुगलबंदी बघणं हा कायमच एक भारी अनुभव असतो. स्मिता-नसीर चा बाजार मधला प्रसंग, ज्यात स्त्री-मुक्तीवर भाष्य केलय. इतक्या सहज साध्या प्रसंगात ते जे सांगून जातात- खरं तर स्त्रीला स्वत:पासूनच मुक्त व्हायची गरज आहे. आज ह्याचा आधार, हा नाही म्हणून त्याला सोडून दुसर्‍याकडे जाणे ही मुक्ती नव्हे. असं कोणाकडे जावसं वाटणंच थांबायची क्रिया म्हणजे मुक्ती आहे. आणि अगदी हेच मला आठवलं गौरीचं "कारागृहातून पत्रे" वाचताना. त्या कथेची नायिका पण अशाच काही विचारांची. अर्थात ती कथा असल्याने त्यात अजून बरच काही मांडलय ते तिथेच वाचण्यासारखं..(गौरीच्या कथा कधी मोठ्या पडद्यावर मांडता आल्या असत्या तर स्मिताला नक्की कालिंदीची भूमिका करायला आवडली पण असती. आणि तिला तीच मिळाली असती कदाचित.)
मंथन मध्ये स्मिता-गिरीशची दृश्य आवर्जून पहावी अशी. खासकरुन तिची म्हैस मेल्यावर ती त्याच्याकडे जाते आणि तो तिला पैसे देऊ करतो. ती घेत नाही. बाहेर पळत सुटते रडत रडत. तिला खरी अपेक्षा असते त्याच्या सहानुभूतीची. त्यालाही हे माहित असून त्याच्या स्वतःच्या मर्यादांमध्ये तो अडकलेला असतो. त्याचाही मुद्राभिनय लाजवाब आणि स्मिताची तर सगळीच देहबोली.. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून.
तिला तिच्या जवळच्या मैत्रिणी 'स्मि' म्हणायच्या म्हणे. ती एक उत्कृष्ट फोटोग्राफरही होती. तिने अगदी व्यावसायिक वाटावेत असे फोटो काढले आहेत. हेमामालिनीचं देखिल फोटोशूट केलेला तिने. आणि "अगदी प्रोफेशनल वाटतात फोटो" अशी दाद पण मिळवलेली.
खरंतर राज बब्बरशी तिने लग्न करायचा घेतलेला निर्णय अर्थातच धक्कादायक होता सगळ्यांना. रातोरात तिची प्रतिमा खराब झाली. पण असल्या गोष्टींची पर्वा करणार्‍यांतली ती कधीच नव्हती. खरतर लग्नही केलंच पाहिजे असाही तिचा आग्रह नव्हता. समाजाला दाखवायला म्हणुन काही करायला कायमच तिचा विरोध. म्हणुनच कदाचित "जैत रे जैत" ची नायिका खर्‍या स्मिताच्या जवळ जाणारी वाटते. म्हणजे स्मिता प्रेम करेल तर ते तिच्यासारखच करेल. तिचं ते बाजिंदी असणारं मनमानी रुप, तिचं ढोलियावरचं प्रेम. आणि ते मिळवण्यासाठी तिने केलेलं सगळंकाही हे केवळ शब्दातीत. नुसत्या "जैत रे जैत" वर पानंच्या पानं लिहावीत असं.
१७ ऑक्टोंबर १९५५ ला एका मंत्री आणि समाजसेविका दांपत्याच्या पोटाला जन्माला आलेली ही मुलगी. मराठी शाळेत शिकलेली. अस्सल मराठी वातावरणात वाढलेली स्मिता. पहिल्यांद कॅमेरासमोर आली ती बातम्या द्यायला म्हणुन.. घाईघाईत तिने जीन्सवर गुंडाळलेल्या साडीत लोक तिला "साडीत खूप सुंदर दिसतेस" अशी प्रतिक्रिया द्यायचे तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचं खट्याळ हसू कसं असेल याची कल्पनापण अभावानेच करवते. बुद्धाच्या बंद डोळ्यांआड जे अफाट दु;ख होतं तसच काहीसं स्मिताच्या उघड्या, टपोर्‍या डोळ्यांबाबत. तिथेच श्याम बेनेगलनी स्मिताला टिपलं. "चरनदास चोर" हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी 'स्मिता पाटील' आणि 'श्याम बेनेगल' ही दोन नावं चित्रपटसृष्टीला दिल्यावबद्दल तो कायम लक्षात राहिल.
आयुष्य हा शेवटी एक निर्दयी, विरोधाभासात्मक खेळ आहे याची परत जाणिव व्हावी अशा घटनांतील एक घटना म्हणजे स्मिताचा शेवट आहे. स्त्री-सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टी ज्यात तिने पुढाकार घेतला त्यात मातामृत्यूप्रमाण रोखण्याच्या बाबींचाही समावेश होता. आणि तिच्या मृत्यूनंतर आता इतक्या वर्षांनी मृणाल सेन म्हणाले की निष्काळजीपणामुळेच स्मिताचा मृत्यू झाला. प्रतिकच्य जन्मानंतर १३ अवघ्या काही दिवसांनी, १३ डिसेंबर १९८६ ला स्मिताचं असं निघुन जाणं हा चित्रपटसृष्टीला बसलेला नक्कीच मोठा धक्का होता. कारण चित्रपटसृष्टीची गणितं बदलण्याचं सामर्थ्य ती बाळगुन होती. आपल्या पदार्पणातच शबानाला टक्कर दिली होती तिने आपसुकच. लोकांच्या मनात कायमच त्यांची स्पर्धा राहिली. पहिल्या दोन चित्रपटांनंतरच तिची तुलना शबानाशी होवु लागली होती. स्मिताला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मात्र शबानाच्या आधी मिळाला. आणि मग शबानाला तीन सलग ८३ (अर्थ), ८४ (खंडहर), ८५ (पार). आणि हे शेवटपर्यंत चालुच राहिलं.
उण्यापुर्‍या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि ला रोशलमध्ये व्यक्तिविशेष म्हणुन प्रदर्शित केले गेले. शेवटी 'स्मिता' विषयी काहीही विचार करताना ना.धो. महानोरच जास्त योग्य वाटतात. "या पंखावरती, मी नभ पांघरती, मी भिंगरभिवरी बाई चांदन्यात न्हाती" असो किंवा "असं एखादं पाखरु वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ" असो. माझ्यासाठी तरी अशीच आहे स्मिता..
-----------------------------------------------------------------------------
(गौरी न वाचलेल्यांसाठी: कालिंदी ही गौरीच्या "थांग" आणि "मुक्काम" ची नायिका. थोडी थोडी उंबरठा मधल्या स्मितासारखी. पण कालिंदीला पार्टनर पण सापडतो.)
मेरा कुछ सामान ...
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्‍याखोर्‍यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..