मेरा कुछ सामान ...
१) जनरलायजेशन.. प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणं खूप बोजड होईल म्हणून साधारणपणे समान गुणधर्म असलेल्या गोष्टींचा एक गट करायचा.. मग त्यातूनही प्रत्येकाचे काही वेगळे गुणधर्म रहातातच, त्याचा वेगळ्याने अभ्यास करायचा..म्हणजे एकूण एकच. माझं जनरलायजेशन केलेलं मला आवडत नाही. चांगलं म्हटलेलंही आवडत नाही, वाईट म्हटलेलंही.. आवडत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही. मी चांगली किंवा वाईट कशी असू शकते? मी माझ्याइतकीच चांगली आणि वाईट आहे, कमी नाही जास्त नाही. पण आता कोणत्याही एका बाजूला जायचं म्हणजे परत जनरलायजेशन आलं. म्हणजे शेवटी सगळंच व्यर्थ.. चांगली, वाईट, स्त्री, पुरुष, हिंदु, मुस्लिम, गरीब, श्रीमंत.. सगळेजण सगळच काही.. शेवटी प्रत्येकाचा स्वतंत्र संच आलाच.. तरीही जनरलायजेशन होऊ शकतं. असं का?
------------------------------------------------------------------------------
२) मायकेल अँजेलो म्हणे वयाच्या ६५ व्या वर्षी प्रेमात पडलेला, त्या काळात त्याने कविता लिहिल्या आणि ती मेल्यावर कधीच नाही लिहिल्या. अमृता-इमरोज ने कधीच एकमेकांना I love you म्हटलं नाही.. हे प्रेम आहे तर मला वाटतं ते काय आहे? ते प्रेमच याची खात्री आहे मला पण मी आयुष्यात इतक्या वेळा पडलेय आणि एकाच वेळी अनेक व्यक्तिंच्या प्रेमात अजूनही असते, मग हे काय आहे? आपुलकी, आकर्षण, जवळिक, सख्य याच्या नक्की कोणत्या प्रमाणातल्या मिश्रणाला प्रेम म्हणतात? आणि कोणतंही प्रमाण असलं तरी प्रत्येकाला एकदातरी ते प्रेमासारखं वाटतं. मग नक्की 'ती' जी सो कॉल्ड उदात्त भावना आहे ती प्रत्येकाला स्पर्श करते का? करत नसेल तर मनात निर्माण झालेल्या कुठल्यातरी थातुरमातुर भावनेलाच मी प्रेम समजते की काय? मला 'तसं' प्रेम कधीच होणार नाही का?
--------------------------------------------------------------------------------
३) मी थर्ड क्लास लेखक आहे. अभिजात १स्ट क्लास, आपल्या पीढीपुरते तरी प्रभाव पाडणारे सेकंड आणि मग राहिलेली रद्दड.. मी.. अभिजातपणाचा दूरदूरपर्यंत पत्ता नाही. मी जो विचार करते तो, थोडाफार विचार करणार्‍या सगळ्यांनीच केलेला असतो, तो सगळ्यांनीच केलेला विचार असला तरी ज्यामुळे तो वाचनीय होतो ती मांडण्याची शैली वगैरे मुळातच नाही आहे. म्हणून मी लिहिलं नाही इतके दिवस. सर्जनशीलतेचा इतका कडकडीत दुष्काळ का?
---------------------------------------------------------------------------------
४) लढत-विव्हळत, प्रत्येक क्षणी नव्याने निराश करणार्‍या आयुष्यासोबत जे काहीतरी करतेय मी ते काय आहे? इतके पैलू की कशालाच न्याय देता येऊ नये. इतकी उत्तरं की कोणताच प्रश्न सुटू नये. इतके मार्ग तरी कोणताच सरळ वाटू नये. कशालाच काही अर्थ नाही असंही वाटावं. त्यात अर्थ भरावा हे ही पटावं. पटूनही काही नीट जमू नये. जमलं तरी समाधान वाट्याला येऊ नये. मरण्याच्या क्षणातच आयुष्य कळत असेल तर......?