मेरा कुछ सामान ...
किती किती हिरीरीने समर्थन केलं मी माझ्या लहान सहान दु:खांचं..
त्यांची बाजू मांडली.. त्यांच्यासाठी भांडले..
स्वीकार केला तरी आवाज उठवणं सोडलं नाही..
खुलेपणाने मान्य केलं त्यांचं अस्तित्व
आणि कुरवाळत राहिले त्यांना..
एकटेपणी..
सर्वांसमक्षही..
.
पण आता श्वासाश्वासात अलगद वाहत रहावं,
आयुष्यभर तळहातावर जपावं असं दु:ख समोर आलं असताना,
रात्रीच्या नीरव एकांतात
हुंदकाही न फुटू देता गाळलेल्या मूक अश्रुंशिवाय,
त्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे काहीच नाही..
काहीच नाही..
मेरा कुछ सामान ...
मला खात्री होती,
शरीरावरुन नाहीसे होतात स्पर्शांचे ठसे..
त्वचा कात टाकेल तसतसे...
सगळ्या नियमांना अपवाद करुन
मन जसं धरुन बसलय
तुझ्या प्रतिमा..
भरु देत नाहीये जुन्या जखमा..
तसं शरीर नाही करणार..
सृष्टीच्या नियमाप्रमाणे
ते टाकत राहिल कात..
आणि मग माझ्या नव्या त्वचेला नवा वाटेल
तुझ्या कातडीचा पोत..
तुझ्या स्पर्शातली आसोशी..
मला खात्री होती..
या काळात कितीदा कात टाकली असेल,
तुझ्या माझ्या शरीराने..
मोठ्या उत्सुकतेने हात पुढे केला मी,
तुझा अनोळखी स्पर्श अनुभवायला..
तेव्हा जाणवलं..
यावेळी शरीरानेही अपवाद केलाय नियमाला..
इतक्या काळानंतरही,
तुझे ठसे जिवंतच..
तुझा स्पर्श ओळखीचाच..
आता मलाच समजेनासं झालंय..
हा मोहोर,
तुझ्या ओळखीच्या स्पर्शाचा,
की माझं शरीर माझ्या मनाशी एकरुप झाल्याचा?
मेरा कुछ सामान ...
बघ ना कशी भेगाळून गेलीये माती सगळी पाण्याअभावी..
खोल खोल चरे गेलेत..
अगदी आत.. आतपर्यंत..
ओलावा नाही उरला.. नावालाही..
जमीनीपासून आभाळापर्यंत भरुन राहिलाय,
रखरखाट नुसता..
जसा दोष आभाळाचाच...
बरसलाच नसावा जणू तो पुरेसा कधी..
जसा दोष जमीनीचाच..
तिनेच कधी प्रयत्न केला नाही ओलावा धरुन ठेवण्याचा..
खरंतर दोष कोणाचाच नाही..
ना जमिनीचा.. ना आभाळाचा..
वैशाखच लांबला यंदा...
हो ना?
मग बरसून जावं ना आभाळाने आता,
दाटून आल्यासरशी...
उगा ते वादळाचं घोंघावणं नको..
आणि वीजेचं कडाडणं पण नको..
(शेवटी कारणांचे कडकडाट आणि
शब्दांची वादळं कधी सोडवतात कुठले प्रश्न?)
हिरवळ फुलायची ती मनसोक्त बरललेल्या सरींनीच..
भेगाळणं नाहीसं व्हायचं ते समजूतदारपणे कोसळलेल्या थेंबानीच..
मग हा वादळ-वीजांचा टप्पा आता गळूनच जाऊ दे..
या वैशाखाची सांगता थोडी वेगळी होऊ दे..
मेरा कुछ सामान ...
"कोमाचं काही खरं नसतं.. जिवंत मरण.. दिवसामागून दिवस.. वर्षामागून वर्षं ढकलत रहायची फक्त.. सगळं परत पहिल्यासारखं होईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही." सगळ्यांचं हेच मत पडलं.
'पण चमत्कार होतातच की.. आपल्या बघण्यात नसले म्हणून काय झालं.. वाचण्या-ऐकण्यात असतंच.. अगदी लाखात एक असेल, पण घडतचं की असंही.' तिच्या मनाच्या कोपर्‍यात अजूनही कुठेतरी आशा जागी होती.. का कोण जाणे पण तिला त्या आशेवर विश्वास ठेवायचा होता.
पण "बघ, तुला करायचा असेल तर पहा प्रयत्न करुन, मला तर काही खात्री वाटत नाही" तोही असं  म्हणाला तेव्हा मात्र तिचा धीर खचला.
असं कसं म्हणू शकतो तो? आणि का म्हणावं? जे काही झालं ती आपली जबाबदारी नाही का? आपली दोघांची.. कसे होतात अपघात? कशा होतात जखमा? आणि कोणता घाव निर्णायक असतो? कोण ठरवणार हे..? प्रश्न बरोबर- चूक चा नसतोच ना, दोन्ही बाजू हरतात अशा प्रसंगात..
पण आशेला तोड नसते.. कशीही.. कोणत्याही प्रसंगात चिवटपणे तग धरुन राहते.
"काहीही होवो, कोणी साथ देवो-न दोवो.. अगदी त्यानेही नाही दिली तरी मी प्रयत्न करत रहाणारच.." तिने मनाशी निर्धार केला.
"कोमा कोमा काय आहे, त्यात काहीतरी जिवंत असतंच की. जगाला कळत नसलं तरी मनाचं मनाला कळतंच की. ती भाषा का कुणाला सांगून कळते? पण त्याइतकी पक्की खूण कुठली असेल का? आणि तिचं मन तिला सांगत होतं. त्या मनाला कळतंय हे.. पोचतायेत तुझ्या भावना.. आणि त्या नक्की पूर्ण होणार. नक्की जिवंत होणार... पुन्हा हसू खेळू खळखळू लागणार ते पहिल्यासारखंच.. वेळ जावा लागेल, धीर धरावा लागेल, प्रयत्न करावे लागतील.. पण होईल.. आत्ता नसेना का त्याच्या मनात विश्वास उरला..आज ना उद्या तो ही साथ देईलच की माझी तळमळ बघून.." डोळे पुसत ती स्वतःशीच म्हणाली.." आणि एकदा का त्याची सोबत मिळाली की कोमा काय, मरणाच्या दारातूनही वाचवून परत आणता येईल हे नातं.. कोमात गेलेल्या असंख्य नात्यांची ओझी वाहणार्‍या जगात माझ्या वाट्याला हा चमत्कार नक्की येईल.."
मेरा कुछ सामान ...
"तुला काय वाटतं....?" त्याच्या पालथ्या पाठीवर बोटाने त्याचंच नाव कोरत तिने विचारलं..

"अं..?" कितीही शांत पडून राहिलो तरी आपल्याला जाग आल्याचं तिला नेमकं कसं कळतं या संभ्रमात तो हुंकारला..

"तुला काय वाटतं....? दु:खाविषयी?"

 "मला वाटतं तू ड्रामेबाज आहेस.."

"Say something you havent said before.. पण तुला जो ड्रामा वाटतो त्या गोष्टी, त्या भावना, तितक्या उत्कटतेने जगत असते मी, भोगत असते.. It's like schizophrenia. You might think its imaginary but its my reality."

आता मात्र कूस बदलून तिच्याकडे वळला तो. क्षणभर तिच्या डोळ्यात बघितलं, कावर्‍याबावर्‍या झालेल्या तिच्या नजरेला बांधून घेतलं स्वतःशी आणि म्हणाला,"बोल.."

"माणसाच्या चिरंतन दु:खाचं प्रतिक म्हणून अश्वत्थामा पटतो का तुला?"

"नाही.."

"का?"

"कारण माणसाचं दु:खच चिरंतन नसतं.. त्याच्यासारखंच तात्कालिक.. अख्खा मानववंश वगैरे सोडून दे. पण वैयक्तिकरित्या प्रत्येकाच्या दु:खाला मर्यादा आहेत. प्रत्येकाच्या जखमेवर धरतेच खपली कधी ना कधी. जखमा कुठे भळभळत राहतात आयुष्यभर? किती जणांच्या राहतात? किती जणं आहेत एक जखम अस्तित्व संपेपर्यंत सोबत वागवणारे?"

"सगळे नाही, पण कोणीतरी असेलच की. आणि मग अहोरात्र त्या जखमेचं जाणवणारं अस्तिव घेऊन फिरत रहायचं अश्वत्थाम्यासारखं. विसावा शोधत.."

"Actually he should move on.."

"म्हणजे..."

"अश्वत्थाम्याने बंद केलं पाहिजे विसावा शोधणं. like John nash.. त्याला ती माणसं दिसत राहिलीच ना. ऐकू येत राहिली, जाणवत राहिली.. but he continued with his work.. मग अश्वत्थामा का नाही? खरंतर आभारच मानायला हवे आयुष्याचे अशी जखम दिल्याबद्दल.. सगळ्या भावभावना, सुखदु:खं इतकी तात्कालिक असणार्‍या या क्षणभंगुर जगात आपल्या सोबत सरणापर्यंत येणारं एक दु:ख मिळालं म्हणून..."

"ह्म्म.... तू कधी दूर गेलास तर तू सांगितलेलं हे दु:ख मिळेल मला..." त्याच्या नसण्याच्या कल्पनेनेचे डोळ्यांत आलेलं पाणी लपवत ती म्हणाली..

आणि मग तो समजूतदारपणे थोपटत राहिला तिचं वेड्या कल्पनांत हरवणारं डोकं..
मेरा कुछ सामान ...
मी चाललेय आपल्याच तंद्रीत..आपल्याच विचारात गुंग होऊन.. जग वाहतय आपल्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे.. मी ही वाहतेय.. माझ्याही नकळत.. अचानक कोणीतरी मागून येऊन खांद्यावर हात ठेवतं.. स्पर्श ओळखीचा असतो.. खूप जुना.. माझ्याशी कधीकाळी एकरुप झालेला.. एक क्षण थबकल्याशिवाय मागे वळलं पाहिजे हे ही लक्षात येत नाही. आणि मागे वळून पाहताक्षणी झप्पकन चेहर्‍यावर रंग कोसळतात.. नाका डोळ्यात जातात.. संवेदना बधीर होईपर्यंत.. स्थळाकाळाचं भान नाहीसं होईपर्यंत.. ठसका लावुन गुदमरुन टाकतात तुझी आठवण येईपर्यंत..

तू ही तू.. तू ही तू.. सतरंगी रे...
तू ही तू.. तू ही तू मनरंगी रे....

गवसत नाहीयेस तू मला अजूनही..
तुझं भुलावणारं सौदर्य अजूनही माझ्या आवाक्याबाहेर..
माझ्यासोबत तुझं असणं प्रत्येक क्षणी,
आणि तरीही मधलं अफाट अंतर..

दिल का साया, हमसाया सतरंगी रे, मनरंगी रे
कोई नूर हैं तू , क्यों दूर हैं तू
जब पास हैं तू , एहसास हैं तू
कोई ख्वाब हैं या परछाई है, सतरंगी रे
इस बार बता, मुजोर हवा, ठहरेगी कहाँ...?

As they say there is only one way to love.. Crazily..

इश्क पर ज़ोर नहीं है, ये वो आतिश ग़ालिब
जो लगाये ना लगे, जो बुझाये ना बने..

तुझी ती नजर.. सगळे तट भेदून जाणारी..
अहं उद्धस्त करुन, नवा जन्म देणारी..
आता तुझ्यामुळे मिळालेलं हे तुझं आयुष्य..
माझं काय आहे यात?
तुझा गंध.. तुझा स्पर्श..
तुझं प्रेम.. तुझीच वेदना...

आखों ने कुछ ऐसे छुआ,
हलका हलका उन्स हुआ..
दिल को महसूस हुआ
तू ही तू... तू ही तू... जीने की सारी खुशबू
तू ही तू... तू ही तू... आरजू आरजू
तेरी जिस्म की आँच को छूते ही,
मेरे साँस सुलगने लगते है..
मुझे इश्क दिलासे देता है..
मेरे दर्द बिलगने लगते है..

तुझा गंध.. तुझा स्पर्श..
तुझं प्रेम.. तुझीच वेदना...
कानात रेंगाळणारे तुझे निरोप..
डोळ्यात उरलेली तुझी रुपं..
तुझ्या भासांत सरणारं माझं वास्तव..
की माझ्या वास्तवाला छळणारे माझेच भास?

तू ही तू.. तू ही तू...जीने की सारी खुशबू
तू ही तू... तू ही तू... आरजू आरजू
छूती मुझे सरगोशी से..
आँखो में घूली खामोशी से..
मैं फर्श पे सजदे करता हूँ ..
कुछ होश में कुछ बेहोशी से....

तुझ्याकडे जाणार्‍या वाटांवर हरवलेय मी आता..
इथे तू ही नाहीस आणि मी ही..
भोवंडून टाकणारा अंतराचा पसारा..
जगण्या- मरण्याचे असंख्य परीघ पचवून बसलेला...
मुक्कामी पोचण्याची सुतराम शक्यता नाही,
पण चालत राहिलं पाहिजे..
कारण वेडेपणा हाच इथे एकमेव न्याय..
अंतर तोडत रहाणं हा एकमेव पर्याय..

तेरी राहों में उलझा उलझा हूँ,
तेरी बाहों में उलझा उलझा..
सुलझाने दे होश मुझे,
तेरी चाहों में उलझा हूँ...
मेरा जीना जुनून, मेरा मरना जुनून...
अब इस के सीवा नहीं कोई सुकून...

इतर काही नाही तरी एक मुक्काम नक्की आहे..
एक शेवटची आशा..
शेवटचा धागा..
ती 'एक इजाजत'..
न मागता मिळू शकणारी..

मुझे मौत की गोद में सोने दे..
तेरी रूह में जिस्म डबो ने दे..
तेरी रूह में जिस्म डबो ने दे..
सतरंगी रे, मनरंगी रे....
---------------------------------------------------------------------------------------------------------------
रहमान-गुलजार जोडींचं सगळ्यात सुंदर गाणं कोणतं यावर मतभेद असतीलही पण सतरंगी रे त्यातल्या कोणत्याही टॉप लिस्ट मध्ये असेल हे नक्की.. शब्द.. सूर.. संगीत... कोणती गोष्ट आहे जी वेड लावत नाही? It literally haunts.. सुरुवातीचा आलाप ओळखीच्या स्पर्शासारखा.. आणि मग सुरु होणारं संगीत थेट ढकलून देतं मनाच्या खोळ तळाशी.. वेदनेचा सोहळा आहे ही रचना.. आर्त.. उत्कट.. वादळी... पुन्हा पुन्हा आणि परत पुन्हा वेडी होत आलेय मी या गाण्याने.. काय लिहिलय माहित नाही.. काय जाणवतय तेच अनुभवतेय फक्त...
मेरा कुछ सामान ...
इतरांच्या मनाचा विचारच न करणारी
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो  तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..
मेरा कुछ सामान ...
कसं सहज जमतं तुला?

नेटक्या विणलेल्या वस्त्रासारख्या
तुझ्या आयुष्याकडे बघतेय मी,
हजारदा उसवूनही पुन्हा गुंतलेल्या अस्तित्वाला सावरत..

अट्टहासाने मी काढलेल्या शब्दांच्या रांगोळ्या,
विश्लेषणांची चित्रं..
फिकीच पडतात तुझ्या स्मितहास्यासमोर..

तर्कांचं जाळं पसरुन बसते मी,
तुला नेमकेपणे पकडण्यासाठी..
पण मुठीतून निसटावा सुगंध तसा,
दरवळत राहतोस तू, जाळ्यात बिलकुल न अडकता..

झाडाचं पानही गळताना पाहून
तुटत जातं माझ्यातलं सगळं..
आणि नातं पेलून नेतोस त्याच स्थितप्रज्ञतेनं,
सोसतोस तू सगळी वादळं..

मला जितकं सहज मरताही येत नाही,
तितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..

इतकं सोपं, सरळ तुला कसं जगता येतं?