मेरा कुछ सामान ...
मला खात्री होती,
शरीरावरुन नाहीसे होतात स्पर्शांचे ठसे..
त्वचा कात टाकेल तसतसे...
सगळ्या नियमांना अपवाद करुन
मन जसं धरुन बसलय
तुझ्या प्रतिमा..
भरु देत नाहीये जुन्या जखमा..
तसं शरीर नाही करणार..
सृष्टीच्या नियमाप्रमाणे
ते टाकत राहिल कात..
आणि मग माझ्या नव्या त्वचेला नवा वाटेल
तुझ्या कातडीचा पोत..
तुझ्या स्पर्शातली आसोशी..
मला खात्री होती..
या काळात कितीदा कात टाकली असेल,
तुझ्या माझ्या शरीराने..
मोठ्या उत्सुकतेने हात पुढे केला मी,
तुझा अनोळखी स्पर्श अनुभवायला..
तेव्हा जाणवलं..
यावेळी शरीरानेही अपवाद केलाय नियमाला..
इतक्या काळानंतरही,
तुझे ठसे जिवंतच..
तुझा स्पर्श ओळखीचाच..
आता मलाच समजेनासं झालंय..
हा मोहोर,
तुझ्या ओळखीच्या स्पर्शाचा,
की माझं शरीर माझ्या मनाशी एकरुप झाल्याचा?
मेरा कुछ सामान ...
बघ ना कशी भेगाळून गेलीये माती सगळी पाण्याअभावी..
खोल खोल चरे गेलेत..
अगदी आत.. आतपर्यंत..
ओलावा नाही उरला.. नावालाही..
जमीनीपासून आभाळापर्यंत भरुन राहिलाय,
रखरखाट नुसता..
जसा दोष आभाळाचाच...
बरसलाच नसावा जणू तो पुरेसा कधी..
जसा दोष जमीनीचाच..
तिनेच कधी प्रयत्न केला नाही ओलावा धरुन ठेवण्याचा..
खरंतर दोष कोणाचाच नाही..
ना जमिनीचा.. ना आभाळाचा..
वैशाखच लांबला यंदा...
हो ना?
मग बरसून जावं ना आभाळाने आता,
दाटून आल्यासरशी...
उगा ते वादळाचं घोंघावणं नको..
आणि वीजेचं कडाडणं पण नको..
(शेवटी कारणांचे कडकडाट आणि
शब्दांची वादळं कधी सोडवतात कुठले प्रश्न?)
हिरवळ फुलायची ती मनसोक्त बरललेल्या सरींनीच..
भेगाळणं नाहीसं व्हायचं ते समजूतदारपणे कोसळलेल्या थेंबानीच..
मग हा वादळ-वीजांचा टप्पा आता गळूनच जाऊ दे..
या वैशाखाची सांगता थोडी वेगळी होऊ दे..
मेरा कुछ सामान ...
"कोमाचं काही खरं नसतं.. जिवंत मरण.. दिवसामागून दिवस.. वर्षामागून वर्षं ढकलत रहायची फक्त.. सगळं परत पहिल्यासारखं होईल याची खात्री कोणी देऊ शकत नाही." सगळ्यांचं हेच मत पडलं.
'पण चमत्कार होतातच की.. आपल्या बघण्यात नसले म्हणून काय झालं.. वाचण्या-ऐकण्यात असतंच.. अगदी लाखात एक असेल, पण घडतचं की असंही.' तिच्या मनाच्या कोपर्‍यात अजूनही कुठेतरी आशा जागी होती.. का कोण जाणे पण तिला त्या आशेवर विश्वास ठेवायचा होता.
पण "बघ, तुला करायचा असेल तर पहा प्रयत्न करुन, मला तर काही खात्री वाटत नाही" तोही असं  म्हणाला तेव्हा मात्र तिचा धीर खचला.
असं कसं म्हणू शकतो तो? आणि का म्हणावं? जे काही झालं ती आपली जबाबदारी नाही का? आपली दोघांची.. कसे होतात अपघात? कशा होतात जखमा? आणि कोणता घाव निर्णायक असतो? कोण ठरवणार हे..? प्रश्न बरोबर- चूक चा नसतोच ना, दोन्ही बाजू हरतात अशा प्रसंगात..
पण आशेला तोड नसते.. कशीही.. कोणत्याही प्रसंगात चिवटपणे तग धरुन राहते.
"काहीही होवो, कोणी साथ देवो-न दोवो.. अगदी त्यानेही नाही दिली तरी मी प्रयत्न करत रहाणारच.." तिने मनाशी निर्धार केला.
"कोमा कोमा काय आहे, त्यात काहीतरी जिवंत असतंच की. जगाला कळत नसलं तरी मनाचं मनाला कळतंच की. ती भाषा का कुणाला सांगून कळते? पण त्याइतकी पक्की खूण कुठली असेल का? आणि तिचं मन तिला सांगत होतं. त्या मनाला कळतंय हे.. पोचतायेत तुझ्या भावना.. आणि त्या नक्की पूर्ण होणार. नक्की जिवंत होणार... पुन्हा हसू खेळू खळखळू लागणार ते पहिल्यासारखंच.. वेळ जावा लागेल, धीर धरावा लागेल, प्रयत्न करावे लागतील.. पण होईल.. आत्ता नसेना का त्याच्या मनात विश्वास उरला..आज ना उद्या तो ही साथ देईलच की माझी तळमळ बघून.." डोळे पुसत ती स्वतःशीच म्हणाली.." आणि एकदा का त्याची सोबत मिळाली की कोमा काय, मरणाच्या दारातूनही वाचवून परत आणता येईल हे नातं.. कोमात गेलेल्या असंख्य नात्यांची ओझी वाहणार्‍या जगात माझ्या वाट्याला हा चमत्कार नक्की येईल.."
मेरा कुछ सामान ...
"तुला काय वाटतं....?" त्याच्या पालथ्या पाठीवर बोटाने त्याचंच नाव कोरत तिने विचारलं..

"अं..?" कितीही शांत पडून राहिलो तरी आपल्याला जाग आल्याचं तिला नेमकं कसं कळतं या संभ्रमात तो हुंकारला..

"तुला काय वाटतं....? दु:खाविषयी?"

 "मला वाटतं तू ड्रामेबाज आहेस.."

"Say something you havent said before.. पण तुला जो ड्रामा वाटतो त्या गोष्टी, त्या भावना, तितक्या उत्कटतेने जगत असते मी, भोगत असते.. It's like schizophrenia. You might think its imaginary but its my reality."

आता मात्र कूस बदलून तिच्याकडे वळला तो. क्षणभर तिच्या डोळ्यात बघितलं, कावर्‍याबावर्‍या झालेल्या तिच्या नजरेला बांधून घेतलं स्वतःशी आणि म्हणाला,"बोल.."

"माणसाच्या चिरंतन दु:खाचं प्रतिक म्हणून अश्वत्थामा पटतो का तुला?"

"नाही.."

"का?"

"कारण माणसाचं दु:खच चिरंतन नसतं.. त्याच्यासारखंच तात्कालिक.. अख्खा मानववंश वगैरे सोडून दे. पण वैयक्तिकरित्या प्रत्येकाच्या दु:खाला मर्यादा आहेत. प्रत्येकाच्या जखमेवर धरतेच खपली कधी ना कधी. जखमा कुठे भळभळत राहतात आयुष्यभर? किती जणांच्या राहतात? किती जणं आहेत एक जखम अस्तित्व संपेपर्यंत सोबत वागवणारे?"

"सगळे नाही, पण कोणीतरी असेलच की. आणि मग अहोरात्र त्या जखमेचं जाणवणारं अस्तिव घेऊन फिरत रहायचं अश्वत्थाम्यासारखं. विसावा शोधत.."

"Actually he should move on.."

"म्हणजे..."

"अश्वत्थाम्याने बंद केलं पाहिजे विसावा शोधणं. like John nash.. त्याला ती माणसं दिसत राहिलीच ना. ऐकू येत राहिली, जाणवत राहिली.. but he continued with his work.. मग अश्वत्थामा का नाही? खरंतर आभारच मानायला हवे आयुष्याचे अशी जखम दिल्याबद्दल.. सगळ्या भावभावना, सुखदु:खं इतकी तात्कालिक असणार्‍या या क्षणभंगुर जगात आपल्या सोबत सरणापर्यंत येणारं एक दु:ख मिळालं म्हणून..."

"ह्म्म.... तू कधी दूर गेलास तर तू सांगितलेलं हे दु:ख मिळेल मला..." त्याच्या नसण्याच्या कल्पनेनेचे डोळ्यांत आलेलं पाणी लपवत ती म्हणाली..

आणि मग तो समजूतदारपणे थोपटत राहिला तिचं वेड्या कल्पनांत हरवणारं डोकं..