मेरा कुछ सामान ...
वळणावळणावर चकवा देत चाललेल्या वाटेला,
भास होत रहातात..
तू सोबत असल्याचे..
आणि मला जाणिव, ते भासच असल्याची..
पण अपेक्षा नाही त्याचीही..

फुलून दरवळणार्‍या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही...

एका पारड्यात चूका
आणि एकात स्वप्न घेऊन
चालत रहाते..
आताशा बर्‍याच तटस्थपणे..

कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत..
आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच...