मेरा कुछ सामान ...
सरगम अडली, त्या वळणावर..
वीणा रुसली, त्या वळणावर..

ओढ कशाची, ओढुन नेते?
स्वप्ने फुलली, त्या वळणावर..

मोहवणारी विषवेलींची
नक्षी सजली, त्या वळणावर..

तू ही गर्दीमधला झाला,
मैत्री हरली, त्या वळणावर..

तार्‍यांवाचुन कोरी रजनी,
हिरमुसलेली, त्या वळणावर..

तू जाताना वळला नाही,
वळणे चुकली, त्या वळणावर..
मेरा कुछ सामान ...
नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...
अवचित दाटलेल्या ढगांसोबत,
आपसूक प्रवासाला निघावं लागतं..
अज्ञात वाटेवर..
अनोळखी पक्ष्याचं विरहगीत ऐकताना,
माझ्या डोळ्यात जमलेले ढग,
नाहीसे व्हावे लागतात,
तुझ्या आश्वासक स्मितहास्याने...
तेव्हा पावसाळा होतो...
नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...

नुसती वीज चमकली म्हणून पावसाळा होत नसतो...
भन्नाट वादळाशी टक्कर घ्यावी लागते..
घाटमाथ्यावर नेमाने चक्कर टाकावी लागते..
वैतागवाण्या ट्रॅफिक जॅममध्ये गाणी म्हणावी लागतात..
दिवसभर पावसाच्या कौतुकानंतर पुन्हा रात्री गोंजाराव्या लागतात..
हातात हात घेताना तेव्हा,
उतरावी लागते माझी वीज तुझ्यात..
तेव्हा पावसाळा होतो..
नुसती वीज चमकली म्हणून पावसाळा होत नसतो...

नुसत्या सरी कोसळल्या म्हणून पावसाळा होत नसतो..
तुझी वाट बघताना डोळ्यातला पाऊस आभाळाला जड व्हावा लागतो..
तुला येताना पाहून वेडा, माझ्या नकळत झरावा लागतो..
प्रत्येक पावसाबरोबर नातं पुन्हा रुजून यावं लागतं..
जमलेल्या धुक्याचं अनाकलनीय कोडं पावसाच्या साक्षीने सोडवावं लागतं..
वार्‍याच्या अनाहत सूराशी मग आपली गाणी जुळावावी लागतात..
मिठीत विरुन जाताना तेव्हा दोघांच्या सरी एक व्हाव्या लागतात..
तेव्हा खरा पावसाळा होतो..

म्हणून म्हणते..
नुसते ढग दाटले,
वीज चमकली,
सरी कोसळल्या
म्हणून पावसाळा होत नसतो....