मेरा कुछ सामान ...
वेदनेतलं सौंदर्य अजून कळायचं होतं आणि वेदनेतही कला असते हे गावी नव्हतं त्या वयातली ही गोष्ट.. इतर कोणत्याही मराठी घराप्रमाणे आमच्याही घरात "स्मिता पाटील" हे नाव कौतुकाने, आदराने घेतलं जायचं. त्याबरोबरच व्यक्त व्हायची तिच्या अकाली निधनाची हळहळ आणि तिच्या सौंदर्याचा आवर्जून केलेला उल्लेख. तिला बघायची प्रचंड उत्सुकता तेव्हापासूनची. मग तिचा फोटो असाच कधीतरी कुठेतरी पाहिला तेव्हा मात्र ग्रेसची संध्याकाळ चेहर्‍यावर उतरल्यासारखे भाव आणि २८ युगांची वेदना साठवणारे ते डोळे बघून जे काही वाटलं त्यात 'सुंदर आहे' हा विचार अजिबातच नव्हता. आणि तिथून पुढे अनेक वर्ष हे मत काही बदललं नाही. पण ते काहीही असलं तरी तिच्याकडे वळून वळून पहावं असं काहीतरी त्या चेहर्‍यात नक्की होतं. काय ते अजूनही पुरेसं उलगडलय असं वाटत नाही पण एखाद्या गोष्टीविषयी गूढ आकर्षण वाटावं आणि मोठ्या माणसाच्या आड लपून लहान मुलं जशी भीतीदायक गोष्ट पहात रहातात तसं तिच्याकडे पाहत रहावं असं मात्र वाटलेलं.
आज वाटतं की तिच्या या संमोहीत करणार्‍या आकर्षणाचं मूळ आहे तिच्या डोळ्यात.. बॉलीवूडमध्ये सुंदर सुंदर डोळ्यांवर सगळं मिळून जेवढं लिहिलं असेल कदाचित तेवढंच एकट्या स्मिताच्या डोळ्यांवर लिहिलं गेलं असेल. तिच्याविषयीचा कोणताही संदर्भ तिच्या डोळ्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही.
तसं त्यानंतर तिला पडद्यावर पाहिलेलं ते म्हणजे "पग घुंगरु बांध" आणि "आज रपट जाये" मध्ये. आणि ते पाहून कळलं नव्हतं की हिचा का एवढा बोलबाला आहे.
smita patil1.jpg
तिला खळखळून हसताना कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. अगदीच उमटलं तर एखादं तृप्ततेचं हसू वाटावं, समजतय- न समजतय तोवर नाहिसं होऊन जाणारं हसूच पाहिलय मी तिच्या चेहर्‍यावर. माणसाच्या नेणिवा त्याच्या जाणिवांवर सदैव कुरघोडी करत असतात असं वाटतं तिचं हसू पाहिलं की.. तिच्या नेणिवांमधली खोल दु:ख तिच्या चेहर्‍यावर नितळ हसू येऊच द्यायची नाहीत जणू. तशी हसली असेल तरी 'स्मिता पाटील' म्हटलं की तो चेहरा नजरेसमोर येत नाही. सगळ्यात असून नसल्यासारखा वाटावा असा तिचा वावर. अतिशय निर्विकारपणे एखादा योगी संसारात वावरावा तशीच भासायची ती कायम. एक खूप गूढ वर्तुळ वावरतय भोवती आणि त्याच्या परिघात फार कमी लोकांना प्रवेश आहे असं वाटायचं.. कदाचित त्यामुळेच त्या परीघात जाणार्‍यांवर तिचं जे प्रेम असेल ते अजून जास्त उत्कट होत असेल..
स्वतःचे स्वतंत्र विचार असलेली, आपलं डोकं वापरणारी, आपली मतं मांडणारी आणि वाटा चोखाळणारी होती ती. मेंढरांच्या कळपातलं तिचं वेगळेपण चटकन नजरेत भरेल कोणाच्याही अशी. तिचं समर्पण आणि निष्ठा तिच्याकडे बघताच कळुन येते नाही? ८ महिन्यांचे गरोदर असताना चित्रपटसृष्टीसाठी निघालेल्या मोर्चात भर उन्हात अन्यथा कोण कशाला चालेल? तिची बंडखोर वृत्ती तिच्या कामातूनही व्यक्त झालीच पण दुर्दैव असं की तिच्या बोल्डपणाची चर्चा प्रमाणापेक्षा जास्त झाली. 'चक्र'मधलं तिचं अफाट काम त्या अंघोळीच्या प्रसंगाने झाकोळलं गेलं जणू. तसं तिच्या नितळ, मोहमयी सौदर्य आणि झळाळत्या कलागुणांची दखल अगदी हॉलीवूडकडूनही घेतली गेली म्हणा. प्रसिद्ध अमेरिकन समिक्षक Elliott Stein म्हणालेला "At 25 Smita is clearly the queen of Indian parallel cinema, as much an icon for film-makers of the milieu as was Anna Karenina for young directors in France at the outset of their new wave. Patil is not a classic beauty but the lady glows. She never makes a false move on screen." एकाच काळात "उंबरठा" आणि "अर्धसत्य" सारख्या परस्परविरोधी भूमिका स्मिताच साकारु जाणे.
तिचा ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला अभ्यास होता म्हणे. राज बब्बरशी लग्न झाल्यावर ती त्याला म्हणायची "आपलं लग्न तर झालं, पण मी तुझी फार काळ साथ नाही देऊ शकणार." हल्लीच बच्चनने कुठेतरी स्मिताच्या अशा गूढ स्वभावाविषयी सांगितलं. त्याचा तो 'कुली' चा जगप्रसिद्ध अपघात होण्याच्या आदल्या रात्री १ ला स्मिताचा कॉल आलेला त्याला. तिने विचारलं, "आप ठिक तो है. मुझे बहुत बुरा सपना आया आपके बारे में" आणि दुसर्‍या दिवशी हा अपघात झाला त्याला. ती खरच गूढ होती का?
तब्बल ७ वर्ष ती समांतर चित्रपटांशीच सलग्न राहिली. "आज रपट जाये" गाण्याच्या चित्रिकरणानंतर ती घरी येऊन रडलेली ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असते. आणि तिची वृत्ती बघता ते खरंही वाटतं. कमर्शिअल सिनेमातली स्पर्धा आणि वेळा सांभाळताना माझ्यातल्या माणसाचा मी अपमान करतेय असं मला वाटतं हे तिचं वाक्यच खूप काही सांगुन जातं.
स्मिता-नसीरुद्दीन्-गिरीश कर्नाड यांची जुगलबंदी बघणं हा कायमच एक भारी अनुभव असतो. स्मिता-नसीर चा बाजार मधला प्रसंग, ज्यात स्त्री-मुक्तीवर भाष्य केलय. इतक्या सहज साध्या प्रसंगात ते जे सांगून जातात- खरं तर स्त्रीला स्वत:पासूनच मुक्त व्हायची गरज आहे. आज ह्याचा आधार, हा नाही म्हणून त्याला सोडून दुसर्‍याकडे जाणे ही मुक्ती नव्हे. असं कोणाकडे जावसं वाटणंच थांबायची क्रिया म्हणजे मुक्ती आहे. आणि अगदी हेच मला आठवलं गौरीचं "कारागृहातून पत्रे" वाचताना. त्या कथेची नायिका पण अशाच काही विचारांची. अर्थात ती कथा असल्याने त्यात अजून बरच काही मांडलय ते तिथेच वाचण्यासारखं..(गौरीच्या कथा कधी मोठ्या पडद्यावर मांडता आल्या असत्या तर स्मिताला नक्की कालिंदीची भूमिका करायला आवडली पण असती. आणि तिला तीच मिळाली असती कदाचित.)
मंथन मध्ये स्मिता-गिरीशची दृश्य आवर्जून पहावी अशी. खासकरुन तिची म्हैस मेल्यावर ती त्याच्याकडे जाते आणि तो तिला पैसे देऊ करतो. ती घेत नाही. बाहेर पळत सुटते रडत रडत. तिला खरी अपेक्षा असते त्याच्या सहानुभूतीची. त्यालाही हे माहित असून त्याच्या स्वतःच्या मर्यादांमध्ये तो अडकलेला असतो. त्याचाही मुद्राभिनय लाजवाब आणि स्मिताची तर सगळीच देहबोली.. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून.
तिला तिच्या जवळच्या मैत्रिणी 'स्मि' म्हणायच्या म्हणे. ती एक उत्कृष्ट फोटोग्राफरही होती. तिने अगदी व्यावसायिक वाटावेत असे फोटो काढले आहेत. हेमामालिनीचं देखिल फोटोशूट केलेला तिने. आणि "अगदी प्रोफेशनल वाटतात फोटो" अशी दाद पण मिळवलेली.
खरंतर राज बब्बरशी तिने लग्न करायचा घेतलेला निर्णय अर्थातच धक्कादायक होता सगळ्यांना. रातोरात तिची प्रतिमा खराब झाली. पण असल्या गोष्टींची पर्वा करणार्‍यांतली ती कधीच नव्हती. खरतर लग्नही केलंच पाहिजे असाही तिचा आग्रह नव्हता. समाजाला दाखवायला म्हणुन काही करायला कायमच तिचा विरोध. म्हणुनच कदाचित "जैत रे जैत" ची नायिका खर्‍या स्मिताच्या जवळ जाणारी वाटते. म्हणजे स्मिता प्रेम करेल तर ते तिच्यासारखच करेल. तिचं ते बाजिंदी असणारं मनमानी रुप, तिचं ढोलियावरचं प्रेम. आणि ते मिळवण्यासाठी तिने केलेलं सगळंकाही हे केवळ शब्दातीत. नुसत्या "जैत रे जैत" वर पानंच्या पानं लिहावीत असं.
१७ ऑक्टोंबर १९५५ ला एका मंत्री आणि समाजसेविका दांपत्याच्या पोटाला जन्माला आलेली ही मुलगी. मराठी शाळेत शिकलेली. अस्सल मराठी वातावरणात वाढलेली स्मिता. पहिल्यांद कॅमेरासमोर आली ती बातम्या द्यायला म्हणुन.. घाईघाईत तिने जीन्सवर गुंडाळलेल्या साडीत लोक तिला "साडीत खूप सुंदर दिसतेस" अशी प्रतिक्रिया द्यायचे तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचं खट्याळ हसू कसं असेल याची कल्पनापण अभावानेच करवते. बुद्धाच्या बंद डोळ्यांआड जे अफाट दु;ख होतं तसच काहीसं स्मिताच्या उघड्या, टपोर्‍या डोळ्यांबाबत. तिथेच श्याम बेनेगलनी स्मिताला टिपलं. "चरनदास चोर" हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी 'स्मिता पाटील' आणि 'श्याम बेनेगल' ही दोन नावं चित्रपटसृष्टीला दिल्यावबद्दल तो कायम लक्षात राहिल.
आयुष्य हा शेवटी एक निर्दयी, विरोधाभासात्मक खेळ आहे याची परत जाणिव व्हावी अशा घटनांतील एक घटना म्हणजे स्मिताचा शेवट आहे. स्त्री-सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टी ज्यात तिने पुढाकार घेतला त्यात मातामृत्यूप्रमाण रोखण्याच्या बाबींचाही समावेश होता. आणि तिच्या मृत्यूनंतर आता इतक्या वर्षांनी मृणाल सेन म्हणाले की निष्काळजीपणामुळेच स्मिताचा मृत्यू झाला. प्रतिकच्य जन्मानंतर १३ अवघ्या काही दिवसांनी, १३ डिसेंबर १९८६ ला स्मिताचं असं निघुन जाणं हा चित्रपटसृष्टीला बसलेला नक्कीच मोठा धक्का होता. कारण चित्रपटसृष्टीची गणितं बदलण्याचं सामर्थ्य ती बाळगुन होती. आपल्या पदार्पणातच शबानाला टक्कर दिली होती तिने आपसुकच. लोकांच्या मनात कायमच त्यांची स्पर्धा राहिली. पहिल्या दोन चित्रपटांनंतरच तिची तुलना शबानाशी होवु लागली होती. स्मिताला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मात्र शबानाच्या आधी मिळाला. आणि मग शबानाला तीन सलग ८३ (अर्थ), ८४ (खंडहर), ८५ (पार). आणि हे शेवटपर्यंत चालुच राहिलं.
उण्यापुर्‍या १० वर्षांची कारकीर्द. सगळे मिळून ८० चित्रपट. २ राष्ट्रीय आणि १ फिल्मफेअर आणि पद्मश्री विजेती. ती एकमेव आशियाई चित्रपट कलाकार आहे जिचे चित्रपट पॅरिस आणि ला रोशलमध्ये व्यक्तिविशेष म्हणुन प्रदर्शित केले गेले. शेवटी 'स्मिता' विषयी काहीही विचार करताना ना.धो. महानोरच जास्त योग्य वाटतात. "या पंखावरती, मी नभ पांघरती, मी भिंगरभिवरी बाई चांदन्यात न्हाती" असो किंवा "असं एखादं पाखरु वेल्हाळ, त्याला सामोरं येतया आभाळ" असो. माझ्यासाठी तरी अशीच आहे स्मिता..
-----------------------------------------------------------------------------
(गौरी न वाचलेल्यांसाठी: कालिंदी ही गौरीच्या "थांग" आणि "मुक्काम" ची नायिका. थोडी थोडी उंबरठा मधल्या स्मितासारखी. पण कालिंदीला पार्टनर पण सापडतो.)
8 Responses
 1. Unsui Says:

  स्मिता पाटील बद्दल लिहायचे तर प्रत्येक भूमिकेत तिला पाहताना नेहमी त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा तेवढीच लक्षात राहते व्यक्तिरेखा रंगवणारी नटी/अभिनेत्री कधीच डोळ्या समोर येत नाही.
  केवळ अभिनयाच्या जोरावर लक्षात राहणाऱ्या मोजक्या नायक नायिकांमध्ये अव्वल क्रमांक. आणि स्मिताबद्दल हि चित्रपटात काम करणाऱ्या व्यक्ती बद्दल असणारे वलय तिच्या बद्दल कधीच जाणवले नाही.
  कधी कधी दूरदर्शन वर दाखवल्या जाणाऱ्या तिच्या चित्रपटा मध्ये बातम्या द्यायला तीच निवेदिका असायची, त्यामुळे देखील असेल कदाचित. लहानपणी नकळत्या वयात तिचे सिनेमे (सर्व समांतर सिनेमे) वेगळे आहेत विशेष आहेत हे जाणवायचे. ह्या चित्रपटांची उजळणी करताना, चित्रपटांची आशयसंपन्नता लक्षात येऊ लागली (अजून देखील पूर्ण समजलेत असे वाटत नाही).

  स्मिता चे चित्रपट पाहताना अभिनेत्री/नायिकेचा विचार करावा लागत नसे यातच तिच्या अभिनयाचे मोठेपण कळून येते. आणि कदाचित त्या मुळेच तिचा वाढदिवस, वैयक्तिक माहिती चा शोध घ्यावासा वाटला नाही (अर्थात राजकारणी घरातला जन्म, राज बब्बरशी लग्न हे सर्वत्र लिहिले गेलेले तपशील), या लेखा मुळे स्मिता बद्दल अधिक माहिती मिळाली, अधिक माहिती शोधावीशी वाटली, म्हणून लेख बद्दल आभार...


 2. Talking about Smita with so intemacy itself shows how she has taken over her every fan.. :-) Thanks a lot for your precious comment..


 3. tejali Says:

  wow!!...m stunned... u really gv wonderful information yaar:)thanks 4 bringing it here.