मेरा कुछ सामान ...
तसा तू परकाच होतास...
आपल्या माणसाच्या डोळ्यांत भलत्याच कोणासाठी आलेल्या अश्रूंइतका...
मनाच्या खळबळीचा मागमूसच नसलेल्या चेहऱ्याइतका...
तू परकाच होतास..
अगदी अगदी परका...

मग कधी आपला झालास?
माझ्यातून उगवला असावास इतका आपला..
माझ्यात मावळू शकशील इतका आपला..
कधी आपला झालास?
अगदी अगदी आपला...

पण मला मात्र परकंच समजलास तू..
जेव्हा तुझ्या आतलं वादळ मला झेलू दिलं नाहीस तेव्हा..
जेव्हा तुझा हृदयस्थ उद्वेग माझ्या पापण्यांवर टिपण्याची स्पष्ट मनाई केलीस तेव्हा..
मला परकंच समजलास..
अगदी अगदी परकं...