मेरा कुछ सामान ...
(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------
1.JPG
निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वहातेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधारपण असा..
इतका रंगीत असेल?
खरच, ती कोणती वेळ होती,
जेव्हा तुझ्या मनातल्या अंधाराचं लखलखीत प्रतिबिंब पडलेलं आकाशात?
घनगर्द निळा आणि गूढ हिरवाईच्या छटा लेऊन आभाळ डोकावत राहिलं पाण्यात..
कोणालाही कळू न देता तूच रुजवलीस ना स्वप्नं त्यांच्या डोळ्यांत..
आणि मग त्यातली काही तूच उधळूनही लावलीस आभाळात
अंगभूत लहरीपणानुसार...
वेडे लोक त्यालाच चांदण्या म्हणतात अजूनही..
जग कधीच नव्हतं तुझ्यासाठी..
तुलाही सोसलच नसतं ते..
पण सारंकाही तसंच राहिलय तुझ्यानंतर..
अजूनही रात्री सगळं गाव शांत झोपलेलं असतं..
एखाद्या कॉफीशॉपमधली तुरळकशी वर्दळ सोडता,
जर्द पिवळ्या प्रकाशाला शोषत असतो गूढ अंबर..
परमेश्वरही दुसर्‍या दिवसापर्यंत निश्चिंत झालेला असतो..
पण त्या स्वप्नांचं काय?
तुला माहितेय?
अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतिक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?
3.JPG
2.JPG
4 Responses
  1. Unsui Says:

    आकाशात संधीकाळी किरीमजी, निळ्या जांभळ्या छटा, अद्भुत, गूढ तरंग मनात निर्माण, तरंग जे शब्दात पकडणे जमत नाही, स्टारी नाईट्स, नाईट ओव्हर ऱ्होन्स मध्ये किंवा व्हॅन गॉग च्या कोणत्याच चित्रात न उमटलेल्या छटा. व्हॅन गॉग ने दिवसाचा तो प्रहर कधीच पाहिला नसावा का? पहिला असल्यास तो चित्रात व्यक्त करावा असे त्याला का वाटले नसावे असे स्टारी नाईट्स, नाईट ओव्हर ऱ्होन्स पाहताना वाटल्या शिवाय रहात नाही.

    Vincent: The Life and Death of Vincent Van Gogh हि व्हॅन गॉग च्या जीवनावर त्याच्याच शब्दात टिपलेली डॉक्युमेंटरी पाहिली आहे का? जमल्यास नक्की पहा: ९२-९३ च्या दरम्यान स्टार मुव्हीज वर बऱ्याचदा दाखवत. हि डॉक्युमेंटरी पाहिल्यावर व्हॅन गॉग च्या पेंटींग्ज चे प्रदर्शन पाहणे म्हणजे एक शब्दातीत अनुभव आहे काहीसा त्या संधीकाळी रंगांच्या छटांसारखाच


  2. :-) Thanks Unsui. Will definitely watch that documentary..


  3. खूप वर्षांपूर्वी माधुरी पुरेंदरेंनी लिहिलेलं व्हनगॉगचं चरित्र वाचलं होतं.झपाटल्यासारखं! तुमची कविता आणि ही चित्र बघून तो अनुभव आठवला. :)


  4. Thanks a lot Vinayak.. To kasahi bhetala tari zapatatoch.. :-)