मेरा कुछ सामान ...
काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत..
पैशाने विकत घेता येत नाहीत,
जबरदस्तीने आपल्याशा करता येत नाहीत,
वाट पाहिली म्हणून नशिबी येत नाहीत,
मागून मिळत नाहीत..
तरीही मागितलं...
स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून,
निर्लज्ज ठरण्याची जोखिम पत्करत,
साद घातली तुला!
तुझं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून...!
जग जिंकण्याच्या व्यापात गुंतलेला तू...
कळवळून तुला मारलेल्या हाकेनंतर तुझी नजर वळली खरी,
पण गलिव्हरने पहावं बुटक्यांच्या समूहाकडे, तशी..
त्यात उमटली नाही साधी दखलपण माझ्या आकांताची!
आणि क्षणार्धात पुन्हा बुडून गेलास आपल्या व्यापात..
आता शब्द कायमचे मुके,
हाक कायमची कोंडलेली...
काही गोष्टी मिळत नाहीत!
त्या मिळत नाहीत हेच एकमेव सत्य असतं त्यांचं..
अशावेळी निघून जावं,
वेळ नसलेल्या प्रदेशात
न संपणारी प्रतिक्षा घेऊन
न सरणार्या आयुष्यासोबत...