मेरा कुछ सामान ...
कृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व! कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.
अनय होणं अवघड आहे. कारण अनय होण्याची वाट कोणी आपणहून निवडत नाही. अनय होण्याची ओढ वाटणं नैसर्गिक नाही. त्याच्या दु:खाचं आकर्षण वाटेल कदाचित पण अनय होण्याचा प्रवास कोणी स्वतःहून निवडणं अशक्यच! आणि लादल्या गेलेल्या गोष्टीइतका त्याचा संघर्षही त्रासदायकच. रोज उठून स्वतःमध्ये ती शक्ती, ते धैर्य निर्माण करणं - समोरच्याच्या डोळ्यात दुसर्‍याच कोणाचंतरी विश्व पहायची.. ज्याचं विश्व आपल्या डोळ्यांत आहे.. ज्याच्या स्वप्नांनी आपले डोळे भरुन गेलेत. हे तो करु शकला म्हणून अनय चं कौतुक. त्याने रोज अंत पाहणार्‍या गोष्टीला सामोरं जाण्याची शक्ती रोज विनातक्रार निर्माण केली म्हणून. पण तो पुरुष होता हे ही त्याच्या कौतुकाचं कारण आहे. बाई करत राहिलीच असती तिच्या नवर्‍यावर प्रेम, त्याच्या डोळ्यात तिच्या स्वप्नांना जागा नसती तरी. रोज मरायची शक्ती गोळा करुनच रोज स्वतःला जन्माला घालणं अपेक्षितच असतं बायकांकडून. अनय चं अनय होणं म्हणूनच वेगळं. कारण ते अनपेक्षितच होतं.
सगळ्यांनाच आपलंसं वाटून शेवटी त्याचं कोणाचंच नसणं राधेला उशीरा का होईना समजलं असावं. पण तोवर तरी तिला मिळालेले आयुष्य उधळून टाकावेत असे त्याच्यासोबतचे क्षण. आपल्या डोळ्यांत जसं त्याचं विश्व आहे तसंच त्याच्याही डोळ्यांत आपलंच विश्व आहे असं वाटण्याचे भाबडे क्षण. तेवढ्या संचितावर काढता येत असावं आयुष्य बहुधा. पण अनयाच्या वाट्याला तर ते खोटे भाबडे क्षण पण नव्हते, तरी त्याच्या नजरेत कायम तीच राहिली. तिचंच विश्व. तिचीच स्वप्न. 'ती'च बनून राहिला तो तिच्या अस्तित्वाभोवती. तिच्या अस्तित्वात कोणतीही भेसळ करण्याचा प्रयत्न न करता तिला ती राहू दिलं आणि स्वतः बनून गेला तिच्या रंगाचा. जसं प्रेम तिने केलेलं कृष्णावर तसंच अनय ने राधेवर आणि मग राधेला जितका कृष्ण मिळाला तितकीही ती त्याला न मिळाल्याने तिच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अनय झाला तो.
अनयच्या दु:खाचं आकर्षण वाटणारा तू एकटा नाहीस. पण तू कधीच अनय होऊ शकणार नाहीस. होणारच नाहीस. कारण राधा बनता येण्याची पूर्वअट आहे त्यासाठी. तू अनय होऊ शकत नाहीस कारण तुला कृष्ण मिळाला तरी तू कधीच राधा होऊ शकत नाहीस.
7 Responses
 1. Kp Says:

  खूप जास्त खरयं... 2. Anonymous Says:

  tyala radhecha akarshan jast ki radhechya krushnawarchya premacha jast he kasa samajnar? premawar prem karnara manus dukkhi hou shakato...nivval prem karnara manus dukkhi hou shakato?


 3. Nivval prem karatana nahi honar dukkhi pan nivval prem karata yeta?


 4. Ajit Says:

  हे मागे फेसबुकवर लिहीले होते अनय वाचून परत आठवले
  तुमच्या परीचयातील व्यक्ती पण तेव्हा अनोळखी वाटू लागते जेव्हा ती प्रेमाच्या तुलनेत सुरक्षितता निवडते....
  हे बघून तुमची आख्खी संध्याकाळ कुरतडली जाते.....
  मग मित्राने दिलेले बाळकडू आठवते "प्रेमबिम सगळे झूठ हाय रे आज्या.... रिझ्युम स्ट्रॉंग पाहिजे, विशय कट्......."
  निराश होऊन मी घरी येऊन अंग टाकतो तर पुस्तकाच्या कपाटाच्या काचेच्या आतन बघून कोणीतरी मिश्किलपणे हसत असते. मी वैतागून कूस बदलतो तर समोरच्या आरशात ते हास्य जास्तच मिश्किल भासते.... मी ऊठून पुस्तक हाती घेतो तर तो इमरोझ असतो....
  हळूच कानात सांगतो "अम्रुताला वारा घालता घालता मला पण हवा लागतच होती ना...."
  मी पुस्तक छातीशी धरुन वाचत वाचत तसाच झोपी जातो.
  सकाळी उठून पाहिले तर इमरोझ तसाच उशाला बसून असतो मला नवे धाडस देत "सुरक्षिततेएेवजी प्रेम निवडण्याचे.............."


 5. Your comment is worth an independent post.. Loved it.. Just loved it a lot... I also look at that couple when its tough to get going.. :-)