मेरा कुछ सामान ...
बघता बघता ३ वर्षे झाली पण.. ७ डिसेंबर २०१०.. पहिली ब्लॉग पोस्ट.. आणि तेव्हापासून जवळपास ३०,००० pageviews, ३३०+  comments, ५९ followers आणि ७७ पोस्टस् चा हा प्रवास.. Feeling overwhelmed, blessed and loved.. No other words..
लिखाण चांगलं की वाईट, त्याचं साहित्यिक मूल्य या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या प्रवासात कोणती गोष्ट भिडली असेल, लक्षात राहिली असेल तर ती म्हणजे अनेकानेक वाचकांचे मिळालेले उत्कट प्रतिसाद. "उत्कट" हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे ज्या तीव्रतेतून एखादी गोष्ट लिहिली जाते तिला त्याच तोडीचा प्रतिसाद मिळणं कसं असतं हे पुरेपूर अनुभवलं मी या काळात.
"मलाही अगदी असंच वाटतं", "अगदी माझ्या मनातलं लिहिलत", "हे वाचून असं वाटलं की मी एकटाच/एकटीच नाही", "या ब्लॉगने एकटेपणात खूप सोबत केली", या आणि अशा असंख्य नाही पण अनेक मेलस् येत राहिल्या. या ब्लॉगमुळे कोणाला आधार वाटला, सोबत केली हे माझ्यापर्यंत पोहचलं खरं पण अश्या अनेक वाचकांच्या प्रतिक्रियांनी मला जी सोबत केलीये ती अनमोल आहे. हे मी आजवर कधी उघडपणे व्यक्त केलं नाही पण आजची ही संधी त्या सर्वांचे, आणि त्या सर्व शब्दांचे, क्षणांचे आभार मानण्यासाठी मी घेणार आहे. Thank you.. Thank you all.. Thanks a lot..
आणि त्यांच्या भावना लिहून पोहचवणार्‍या वाचकांप्रमाणेच, कधीही प्रत्यक्ष मेल न केलेले पण नियमितरित्या येऊन ब्लॉग वाचणारे वाचकही अनेक आहेत, त्या सर्वांचेच आभार.. अगदी प्रामाणिकपणे बदल सुचवणारे आणि "तुझं लिखाण पाहून तू फक्त स्वत:साठी लिहितेस असं वाटतं, तशीच लिहित रहा, बदलण्याची गरज नाही" असं म्हणणारेही वाचक भेटले. अगदी सुरुवातीला वर्ष, सव्वा वर्ष मी स्वतःची ओळख कुठीही उघड केली नव्हती तेव्हाही फक्त आणि फक्त लिखाणाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या वाचकांची तर मी कायमच आभारी राहिन.
आभार व्यक्त करणारा स्पॅनिशमधला gracias हा शब्द मला खूप आवडतो.. आभार आणि कृतज्ञता एकत्र व्यक्त करण्यासाठी अगदी समर्पक वाटतो हा शब्द. त्यामुळे आज तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी हेच म्हणेन.. Gracias... Gracias amigos...

- Shweta Patole.
मेरा कुछ सामान ...
वळणावळणावर चकवा देत चाललेल्या वाटेला,
भास होत रहातात..
तू सोबत असल्याचे..
आणि मला जाणिव, ते भासच असल्याची..
पण अपेक्षा नाही त्याचीही..

फुलून दरवळणार्‍या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही...

एका पारड्यात चूका
आणि एकात स्वप्न घेऊन
चालत रहाते..
आताशा बर्‍याच तटस्थपणे..

कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत..
आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच...
मेरा कुछ सामान ...
आता खरं नातं संपेल..
आता खरी सांगता होईल..

सहवास संपला,
सोबत सुटली,
गर्दीत दिसेनासेही झाले चेहरे..
तरी धुमसत राहिलोच आपण,
एकमेकांच्या मनात..
रंगवत राहिलो एकमेकांना,
आपापल्या शब्दांतून..
आपापल्या परिने..
किंवा रंगवत राहिलो
आपलेच समज गैरसमज..
(हे म्हणणं जास्त योग्य आहे ना?)

क्षणांच्या, स्वप्नांच्या, भावनांच्या आहुत्या स्विकारत,
प्रगल्भ होत गेलेला हा प्रवास,
येऊन ठेपलाय अश्या टप्प्यावर..
दुसर्‍याच्या शोधाचा हट्ट सोडून,
स्वतःला शोधू पहाणार्‍या रस्त्यावर..

आता माझ्या कवितेतून
तू उतरशील याची शक्यता कमीच..
मी ही जवळपास नाहीशीच झालेली,
तुझ्या गझलेतून..

आता खरं नातं संपलय..
आता खरी सांगता झालीये..

(एक शेवटचं,
याला सल म्हण किंवा साक्षात्कार म्हण..
आपण कितीही उत्कटतेने रंगवली असली,
आपली तात्कालिक दु:खं,
तरी आयुष्यभर पुरेल अशी जखम,
दिलीच नाहीये आपण एकमेकांना...)
मेरा कुछ सामान ...
सरगम अडली, त्या वळणावर..
वीणा रुसली, त्या वळणावर..

ओढ कशाची, ओढुन नेते?
स्वप्ने फुलली, त्या वळणावर..

मोहवणारी विषवेलींची
नक्षी सजली, त्या वळणावर..

तू ही गर्दीमधला झाला,
मैत्री हरली, त्या वळणावर..

तार्‍यांवाचुन कोरी रजनी,
हिरमुसलेली, त्या वळणावर..

तू जाताना वळला नाही,
वळणे चुकली, त्या वळणावर..
मेरा कुछ सामान ...
नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...
अवचित दाटलेल्या ढगांसोबत,
आपसूक प्रवासाला निघावं लागतं..
अज्ञात वाटेवर..
अनोळखी पक्ष्याचं विरहगीत ऐकताना,
माझ्या डोळ्यात जमलेले ढग,
नाहीसे व्हावे लागतात,
तुझ्या आश्वासक स्मितहास्याने...
तेव्हा पावसाळा होतो...
नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...

नुसती वीज चमकली म्हणून पावसाळा होत नसतो...
भन्नाट वादळाशी टक्कर घ्यावी लागते..
घाटमाथ्यावर नेमाने चक्कर टाकावी लागते..
वैतागवाण्या ट्रॅफिक जॅममध्ये गाणी म्हणावी लागतात..
दिवसभर पावसाच्या कौतुकानंतर पुन्हा रात्री गोंजाराव्या लागतात..
हातात हात घेताना तेव्हा,
उतरावी लागते माझी वीज तुझ्यात..
तेव्हा पावसाळा होतो..
नुसती वीज चमकली म्हणून पावसाळा होत नसतो...

नुसत्या सरी कोसळल्या म्हणून पावसाळा होत नसतो..
तुझी वाट बघताना डोळ्यातला पाऊस आभाळाला जड व्हावा लागतो..
तुला येताना पाहून वेडा, माझ्या नकळत झरावा लागतो..
प्रत्येक पावसाबरोबर नातं पुन्हा रुजून यावं लागतं..
जमलेल्या धुक्याचं अनाकलनीय कोडं पावसाच्या साक्षीने सोडवावं लागतं..
वार्‍याच्या अनाहत सूराशी मग आपली गाणी जुळावावी लागतात..
मिठीत विरुन जाताना तेव्हा दोघांच्या सरी एक व्हाव्या लागतात..
तेव्हा खरा पावसाळा होतो..

म्हणून म्हणते..
नुसते ढग दाटले,
वीज चमकली,
सरी कोसळल्या
म्हणून पावसाळा होत नसतो....
मेरा कुछ सामान ...
एक होतं अरण्य. त्या अरण्यात एक झाड होतं.. खरंतर फुलझाड... इतरांपेक्षा सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलं येणारं.. ऋतूचक्राच्या अखंड चाललेल्या प्रवासात टप्याटप्याला फुलांनी मोहरणारं.. बहराच्या ऋतूची वाट बघणारं.. बहराची कारणं शोधणारं.. आसुसून बहरणारं..
दरवर्षी पाऊस पडायचा.. मग शरदाचं चांदणं न्हाऊ घालायचं.. शिशिर यायचा पानगळ घेऊन.. आणि वसंताच्या चाहुलीबरोबरच झाड भरुन जायचं फुलांनी.. त्याच्या खास सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांनी.. हळू हळू गळून जायची सगळी पानं.. उरायची ती फक्त फुलंच.. अशा वेळी झाडाचा रुबाब बघण्यासारखा असायचा.. समाधानाने अजूनच फुलून यायचं झाडाचं मन अशा वेळी..
मग एकदा काय झालं, पानं नावालाही न उरलेलं आणि फुलांनी ओसंडून वाहणार्‍या त्या रुपाचं प्रतिबिंब त्या झाडाला पहायला मिळालं.. झाड थक्क... ते सुंदर होतं याची त्यालाही कल्पना होतीच, आजूबाजूच्या झाडांच्या डोळ्यात दिसायचं ते, पण त्याच्या नजरेला पडलेलं ते रुप कल्पनातीत होतं.. झालं.. खुळावलं.. वेडावलं ते झाड आपल्या रुपाला.. प्रेमात पडलं स्वतःच्याच त्या प्रतिबिंबाच्या.. बस्स.. त्याने ठरवून टाकलं की आता यातलं एकही फूल गळू द्यायचं नाही..झडू द्यायचं नाही.. बाकीच्या झाडांनी त्याला परोपरीने समजाऊन पाहिलं.. "बाबा रे.. असं नसतं करायचं.. ऋतूचक्रानुसार सुरुच राहणार, बहर पानगळ.. नुसत्या ऋतूंचं नाही तर जीवनाचं चक्र आहे हे.. मोडायचा प्रयत्न करु नकोस.. चालत रहा ठरलेल्या वाटेवरुन.. नाहीतर पस्तावशील.." पण नाही.. झाडाला कुठून पटायला हे तत्वज्ञान.. स्वतःच्या बहराच्या प्रेमात होतं ना ते!
फुलं जगवण्याच्या नादात मग नवी पालवी फुटूच दिली नाही त्याने. पानांअभावी जीवनरस बनायचा थांबला..तरी त्याला तमा नव्हती.. आपल्यात शिल्लक असलेल्या जीवनरसाच्या अखेरच्या थेंबापर्यंत फुलांना जपत राहिलं.. जगवत राहिलं.. आणि शेवटी एके दिवशी मरुन गेलं..

तरी मी कायम म्हणत असते, कितीही सुंदर दिसला तरी दु:खाचा हा असा जीवघेणा सोस बरा नव्हे...
मेरा कुछ सामान ...
पत्र १

समीर,

खरंच तुझं पत्र आलय... तुझ्या हस्ताक्षरातलं? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. चला, चांगलं झालं.. पहिल्या नाही तर किमान दुसर्‍या पुस्तकावर तरी तुझी प्रतिक्रिया मिळाली. अर्थात काही मुद्द्यांवर तू वाद उपस्थित केले असलेस तरी तुझं पत्र आलय.. माझ्यासाठी.. माझ्या नावे.. हा आनंदच खूप मोठा आहे माझ्यासाठी. त्यातूनही तू पत्र पाठवलस, मेल नाही केलास, याचा आनंद वेगळाच.. पुस्तकावर नंतर करु चर्चा. आधी सांग तू कसा आहेस.. ५ वर्षे झाली रे.. ढापणं लागली मला. तिशी ओलांडली मी.. आता मीही तुझ्या पंक्तीला. ही सगळी तू न विचारलेली माहिती.. कारण तू विचारली नाहीस तरी तुला ती हवी होती हे मला तुझ्या पत्रातून नीटच समजलेलं..
तू सांग, कसं चाललंय सगळं? रसिका कशी आहे? तिचे पेपर्स कशाकशात प्रकाशित होत असल्याचं समजत असतं अधून मधून कोणाकोणाकडून. एकूण तुझं छान चालल्यासारखं वाटतय..चाललय ना?
आणि ते शेवटचं वाक्य का होतं तुझ्या पत्रात? तू माझ्यासाठी थांबावस अशी माझी कधीच इच्छा नव्हती. त्यामुळे तू थांबला नाहीस याचं वैषम्यही नाही. कारण मुळात मी कोणासाठी थांबलेली नाही. किंबहुना मी कोणासाठी चाललेलीही नाही. मी फक्त स्वतःची वाट चालत होते आणि अजूनही तेच करतेय. पुढेही चालत राहिन. आणि जी गोष्ट आपण दुसर्‍यासाठी करत नाही, करु शकत नाही, ती आपल्या बाबतीत कोणी करावी अशी अपेक्षा करु नये हे शहाणपण नक्कीच आहे मला. त्यामुळे तुझ्याविषयी असला तर आनंदच आहे. तू नीट स्थिर झालायेस, तुला हवा तसा, हे पाहून.
आणि शेवटी माझ्या कथांबाबतच्या तुझ्या मुद्द्यांचं उत्तर, एका वाक्यात.. "माझ्या नायिका आता मॅच्युअर झाल्यात.."

- राधा.
                             *-*-*

पत्र २

सम्या,

माझ्या नायिका mature झाल्यात.. हा उपहास होता, टोमणा की खरंच कौतुक? काहीही असो.. पण वयाबरोबर येतं रे शहाणपण लोकांना. फक्त प्रत्येकाचं वय वेगळं असतं आणि त्यामुळेच प्रत्येकाचा पल्लाही.
आणि आता mature नायिकांचं म्हणशील तर, हो! आता त्यांना प्रत्येक वेळी लढा द्यायची आणि स्वतःचंच खरं करण्याची गरज वाटत नाही हे बाकी आहे. तुम्हाला मत आहे म्हणून प्रत्येक वेळी ते मांडलच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट समानतेच्या आणि तत्वाच्या तराजूत तोललीच पाहिजे असा आता त्यांचा आग्रह राहिला नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की त्या पारंपारिक व्यवस्थेला शरण गेल्यात. त्यांनी आणि त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्व आणि माणूसपण मान्य केलंय, त्यांच्यातल्या चांगल्या वाईटासह.. असा अर्थ आहे त्याचा. त्यांच्यावर त्याग लादला नाही गेला. त्यांनी त्याग केलाच पाहिजे, तडजोड ही कायम त्यांच्या बाजूनेच झाली पाहिजे असा काही त्यांच्या पार्ट्नर्सचा आग्रह नव्हता. Agrressive feminism चा टप्पा त्यांनी कधीच पार केलाय.
म्हणजे बघ, उद्या रसिकाने काही घरगुती कारणासाठी जॉब सोडला तर मी म्हणणार नाही की ती बाई आहे म्हणून तू तिला त्याग करायला लावलास. मला खात्री आहे की तो फक्त तुम्हा दोघांना सोयिस्कर वाटलेला निर्णय असेल. तुम्ही दोघांनी मिळून घेतलेला. या निर्णयात जर तुझं जॉब सोडणं सोयीचं ठरलं असतं तर तू सोडला असतास. As simple as that. पण हीच गोष्ट जर एखाद्या पारंपारिक जोडप्यामध्ये घडली असती तर मात्र मी स्त्री-मुक्तीची टिमकी वाजवली असती नक्कीच. पण तुमच्या बाबतीत नाही. बस्स.. हाच फरक तर समजाऊन घ्यायचाय. समजूतदारपणा लादलेला नसतो तेव्हा, तो आतून उमलून येतो तेव्हा त्यासारखी सुंदर आणि आश्वासक गोष्ट जगात कोणतीच नसते, नात्यातल्या दोन्ही बाजूंकरता.
त्या कथांत मला ज्या मानसिकतेविषयी बोलायचं आहे ती कदाचित सार्वत्रिक व्हायला अजून थोडा वेळ लागेल पण त्याची सुरुवात झालीये हे नक्की.. काय वाटतं तुला?
बाकी, तात्विक चर्चेखेरीज इतर काही लिहिताना तुझ्या पेनातली शाई संपते का रे? बाकी काहीच लिहित कसा नाहीस.. तुझ्या घराविषयी.. गॅलरीत येणार्‍या पक्ष्यांविषयी.. कुंडीतल्या शेवंतीविषयी? तेही लिही..

-राधा.
                              *-*-*

पत्र ३

समीर,

तुझ्यापासून वेगळं झाल्यानंतर दोनेक वर्षांनंतरची गोष्ट आहे. जेजे आणि मी सहज म्हणून भटकत होतो.. भर उन्हाळ्यात.. आता माझे डोहाळे तर तुला माहितीच आहेत. ऊन्हं तापायला लागली, पाऊस मी म्हणायला लागला आणि थंडी हाडांत शिरायला लागली की मला बाहेर भटकायची हुक्की येते. तर त्या दिवशी दुपारीही चांगलं सुखात घरी बसलेली असताना मला बाहेर जायची उबळ आली आणि मग घोड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने जेजेला पण ऊन्हात बाहेर पडावं लागलं.. अर्थातच त्याची इच्छा नसताना. त्यामुळे त्याची चिडचिड आणि त्यावर माझं सातमजली हसू अशी आमची वरात चाललेली. इतक्यात मला कुंपणाच्या भिंतीवर चढून काढता येईल असा बहावा दिसला. मग काय होतं, चढले की मी आणि हा भर रस्त्यात हताश होऊन उभा. ३-४ घोस काढल्यावर शेजारुन जाणार्‍या एक आजीबाई म्हटल्या मलाही दे दोन काढून. मग त्यांच्यासाठी अजून २ काढले. हा अवाक्.. खाली उतरल्यावर म्हटलं त्याला,
"तोंड बंद कर.."
तर म्हणे कसा,
" "Good God! You are impossible. You cant do this at the age of 30, you crazy woman.."
मी म्हटले,
"I will be doing this at the age of 60, you old man... Wait and watch.."
मग काही बोलला नाही तो. माझा स्क्रू अगदीच ढिला असल्याची खात्री पटली असावी त्याला. But he was a nice man. त्याच्याइतकी माझी काळजी कोणीच कधी घेतली नाही. आधीही, नंतरही.. पण मग कधी कधी माझं डोकं सटकायचं आणि मग मी त्याच्यावर प्रचंड वैतागायची, "God damn, I am not your responsibility dude.. Control.." हे माझं भरतवाक्य ऐकलं की मग मात्र खरच दुखावला जायचा तो. पण तो तसाच होता. माझीच नाही तर त्याच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाची अशीच काळजी घ्यायचा तो.
आजही अमलताश पाहिला की मला तो आठवतो. मोठ्ठाल्या स्वप्नाळू डोळ्यांचा, हडकुळ्या चित्रकारी हातांचा, ढगळे ढगळे रंगांचे डाग पडलेली टी-शर्ट घालणारा आणि विस्कटलेल्या केसांचा. माझं म्हणून एक चित्र काढून दिलेलं त्याने. नुसत्याच एका छोट्याश्या दाराला खूप मोठं कुलूप.
"त्यापलीकडच्या खोलीच्या आकाराची व्याप्ती, त्या खोलीतलं जग काहीच माहीत नाही. बाहेरुन बघणारा फक्त त्या मोठ्या कुलूपाकडे बघूनच दडपणार." त्याचं वाक्य.. ह्म्म्म...
तुझ्या पत्रातल्या तुझ्या अंगणातल्या अमलताशाच्या उल्लेखाने मला त्याचीच आठवण आली. बाकी तू नशीबवान आहेस. सध्याच्या जगात अंगण असलेल्या घरात राहतोस आणि अंगणात काय तर अमलताश... स्वर्गाची गरज काय आहे तुला? How I envy you Sam...

- राधा.

P.S. By the way Ananya is a nice girl. She and JJ shifted together about a year ago.
  
            *-*-*

पत्र ४

मीर,

मीर... मीर.... मीर..........

किती वर्षे झाली रे तुला या नावाने हाक मारुन.. थॅक्स.. मी तुला अजूनही मीर म्हणू शकते हे सांगितल्याबद्दल. पहिल्यांदा ही हाक मी तुला कधी मारलेली आठवतंय?
कोजागिरी होती. तुझ्याच फ्लॅटच्या गच्चीवर जमलेलो ना आपण! योगायोगाने शनीवार असल्यामुळे दुसर्‍या दिवशी लवकर कामाला पळायची पण घाई नव्हती कोणाला. अक्का कसला सुटलेला त्यादिवशी.. हसून हसून पुरेवाट झालेली सगळ्यांची. . पहाट होता होता सगळे पेंगुळले. आपणच जागे होतो दोघे. असं तास-दोन तास रात्रीच्या नीरव शांततेत तुझ्यासोबत बसून रहाण्याचा अनुभव वेगळाच होता आणि त्यात आपल्याला भेटूनही उणेपुरे सहाच महिने झालेले.. चांदण्या अंधुक व्हायला लागल्या तश्या निरोपाच्या स्वरात मी च म्हणाले तुला,
"अर्रे, सम्या..."
माझं वाक्या तोडत तू म्हटलास, "मीर...."
"..?"
"सम्या नाही.. मीर म्हण.."
"आणि ते का?"
"कृष्णाची जशी मीरा, तसा राधेचा मी मीर.."
सरसरुन काटा आलेला अंगावर त्या क्षणी. आणि तेव्हापासून तू माझ्यासाठी कायमचा माझा मीर झालास.. तसं पाहता कृष्णाने काय दिलं मीरेला. आपल्याला दिसेल असं काहीच नाही. मीरेचं खरं देणं तिच्या भक्तीचं, प्रेमाचंच होतं.. आणि तसं मी तरी काय दिलेलं तुला? माझं म्हणून जे देणं तू कायम मानत राहिलास, सांगत राहिलास ती खरंतर तुझ्याच प्रेमाची, तुझ्या विश्वासाची देण होती. नाही का?
मला वाटलेलं जे झालं त्यानंतर मी हरवून बसलेय तुला मीर म्हणायचा अधिकार. आणि किती सहजपणे आज पुन्हा तो अधिकार दिलास तू मला? खरंतर, आज हे श्रेय तुझ्यापेक्षा रसिकाचं जास्त आहे. कसं काय इतक्या सहजपणे मान्य केलं तिने तुझ्या मनातलं माझं अस्तित्व? खरच तुमच्या नात्यातला हा बंध कौतुक करण्याजोगा आहे. अशी एकरुप झालेली जोडपी बघताना वेगळंच वाटतं रे... ती भावना अजूनही शब्दांत नाही मांडू शकलेले मी. कोण म्हणतं तीन माणसांच्या कथेत एक माणूस असंवेदनशील असायलाच हवा किंवा व्हीलन हवा? त्याशिवाय गोष्टीत अनेकरंगी छटा येत नाहीत? आपली कथा आहेच की पुरेशी रंगीबेरंगी.. आपल्याच गुंतागुंतीने तयार झालेली.. मी कधी आपली कथा लिहिली तर तिला नाव देईन, 'तीन शहाण्या माणसांची गोष्ट'.

- राधा.
                     *-*-*

पत्र ५

मीर,

अनोळखी शहर ओळख कसं दाखवायला लागलं? ओळखीच्या पाऊलखुणा दाखवत मनात कसं भरत जातं? आणि पानगळीसारखं गळून जात मनातून संपून कसं जातं? शहरात नवीन आलेल्या, बावरलेल्या, भेदरलेल्या पोरीला त्या शहराने मैत्र दिलं, विश्वास दिला, प्रेम दिलं आणि मग अश्रु दिले, विश्वासघात दिला, तिरस्कारही दिला.. त्याही पुढे जाऊन तुटलेलं सगळं कणाकणाने जोडलं. एक काळ होता, लहानपणीचा.. आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला घडवण्याचा. मग तो काळ आला. मनावरची सगळी पुटं गळून जाऊन आपल्या आतला लसलसता गाभा स्विकारण्याचा. मोडण्याचा.. कोसळण्याचा आणि मग नव्याने रुजून येण्याचाही.. या सगळ्याचं साक्षीदार म्हणून ते शहरही मला प्रिय. माझा पैलू. माझ्या असण्याचा भाग.
पण त्यादिवशी मनातून पूर्णपणे तुटलं त्या शहराशी असलेलं नातं. एक शेवटचा हळवा कोपरा त्यादिवशी बंद झाला. नंतर शहर सोडेपर्यंतचा काळ फक्त शरीराने वावरत राहिले मी तिथे.
खूप विचार करुनही मला आजवर कळलं नाहीये की नक्की काय चुकलं माझं? म्हणजे इतरही गोष्टी आहेत, घटना आहेत. ज्यांत चूका झाल्या. पण नंतर विचार करताना कळत गेलं नक्की कुठे, कसं, काय चुकलं.. त्यामुळे ते सुधारताही आलं.थोडक्यात काय तर Peace was successfully established with most of the past.पण या बाबतीत तसं झालंच नाही. म्हणून हे कुरतडत रहातं आजही अधूनमधून.
वास्तविक पाहता मैत्री करताना मी काही अटी घातल्या नव्हत्याकी फक्त समानतावादी आणि फेमिनिस्ट लोकांशीच मैत्री केली जाईल म्हणून. मग मी कोण होते चिडचिड वाटून घेणारी सगळ्यांनी आपापल्या वाटा निर्माण केल्या नाहीत म्हणून, मुलींनी, मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला नाही आणि मुलांनी हुंडा नाकारला नाही म्हणून तरी? ही गोष्ट जाणवली तेव्हा वास्तविक हुश्शच वाटलं होतं मला. शेवटी नियम पाळणे आणि न पाळणे दोन्हीही आपल्या सोयीचाच भाग.पण त्यांनी तरी माझ्याविषयी काय विचार केला?
आयुष्यात खूप वाईट काळ चालू होता तेव्हा मी कायम सिद्धार्थचं बोलणं आठवायची मी. एकदा-दोनदा नाही तर शंभरदा त्याने स्वतःहून मला सांगितलं होतं की तोच माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. तसा तो बर्‍यापैकी होताही. पण तुला माहितीये ना, तू येण्याआधी आणि तू आल्यानंतरही तुझ्या जवळपास पोहचू शकेल असंही कोणी नव्हतं कधी. आणि हे मी त्याला स्पष्टच सांगितलं एकदा. ते ही त्याने आग्रह केला म्हणून. तेव्हापासूनच कदाचित सगळं बदलत गेलं असावं. पण तरी तो सांगायला विसरायचा नाही की त्याच्या नजरेत मला वेगळं स्थान होतं, आहे आणि तोच माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. तर, त्या वाईट काळात कायम स्वत:ला हे म्हणत राहिले, "चला, at least सिद्धार्थ तरी आहे सोबत. तो तरी आपल्यावर शिक्के मारायची घाई नाही करणार. After all, life is not that bad. या शहरात जतन करण्यासारखं काही तरी आहे माझ्याकडे. आणि मग तो दिवस आला. ती भेट झाली. काही काळापासून मला जाणवत आलेलं सगळं त्याच्या नजरेत उतरलं होतं आणि मग त्याच्या शब्दांतूनही आलं. माझं हे असं उत्कट असणं, माझे खूप जीवलग असणं या सगळ्याकडे सिद्धार्थनेही तसंच पाहिलं होतं. ती संध्याकाळ मी कधीच विसरु शकणार नाही. त्या दिवशी त्याला भेटून आल्यावर वेड्यासारखी रडले होते मी. सिद्धार्थ शेवटचा धागा होता त्या शहराशी मला जोडणारा. त्या दिवशी तो तुटला. त्यानंतर बदलीची पहिली संधी येईपर्यंत निर्जिव शरीरासारखी वावरत राहिले तिथे. आता पुन्हा त्या शहराकडे कधी पावलं वळतील याची शक्यता कमीच आहे.

- राधा.

                           *-*-*

पत्र ६

प्रिय मीर,

तुला कायमच कळत आलंय मला काय वाटतं, मला काय म्हणायचं असतं. कधी कधी तर मी बोलण्याआधी आणि मला वाटण्याआधी तुला कल्पना यायची त्याची. पण त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त काहीतरी आहे जे कदाचित अजून तुझ्यापर्यंत पोचलं नाहीये. तसा आता हे सगळं तुला सांगण्याचा काही उद्देश नाही. नुसतच पानांचा आणि शाईचा अपव्यय पण तरी तुला हे सांगावसं वाटतंय मला. गेल्या ५ वर्षांत मला माझ्याविषयी झालेले साक्षात्कार म्हण हवं तर.. पण नंतर जाणवत गेल्या त्या गोष्टी अशा होत्या. आणि तू सोबत होतास तेव्हा त्या तुझ्यापर्यंत पोचवायला मी च कमी पडले कदाचित कारण मलाच हे सगळं उमजून आलं नव्हतं.
तुला माहितेय, ५ वर्षांची असताना आई-बाबा गेले तेव्हापासून मोठ्या काकांकडेच राहिले मी. तसा काही त्रास नव्हता पण प्रेमही नाही मिळालं कधी. त्यांची मुलं माझ्यापेक्षा खूप मोठी. त्यामुळे मी खिजगणतीतही नाही त्यांच्या. पुस्तकांमध्ये रमायचे आणि मग तशी माणसं बाहेरच्या जगात शोधायला धडपडायचे. या अशा जगण्यातल्या आणि कल्पनेतल्या अंतरामुळे मित्र-मैत्रीणीही नाही मिळाल्या. ग्रुप असा झाला तो अगदी कॉलेजला आल्यावरच. ते ही तिसर्‍या वर्षाला आल्यावर. तोवर आम्ही छोट्या-मोठ्या नोकर्‍या करुन शिकण्यातच बेजार. १२ वी आणि १८ वर्षे पूर्ण झाली तेव्हाच काकांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की आता ग्रॅज्युएशन करायचं असेल तर स्वत: कमवा आणि शिका. नाहीतर जे स्थळ येईल त्याच्यासोबत अक्षता टाकून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करतो.
त्यामुळे निकाल लागल्यावर जी मी बॅग घेऊन बाहेर पडले ते आजतागायत कधी गेले नाहीये परत आणि त्यांनीही कधी चौकशी करायचा प्रयत्न केला नाही. तर मग ही अशी जगण्याची भ्रांत असल्यावर कसला ग्रुप आणि कसलं काय. पण तिसर्‍या वर्षाला येईपर्यंत स्कॉलरशिप मिळाल्यामुळे जरा निवांत झालेले तेव्हा. त्यावेळी खरच काही आपली म्हणावी अशी माणसं भेटली. तोवर प्रेम आणि सुरक्षितता अशी कोणाच्या सहवासात वाटलीच नव्हती. आणि या भावना बाहेर शोधता शोधता स्वतःच्या आतच एक जग बनवून घेतलं मी. तू त्या जगात येणारा पहिला होतास, आणि आजवर तरी एकमेव... कदाचित म्हणूनच तुझ्यानंतर भेटलेल्या सगळ्यांची, माझ्या बाकीच्या सर्व मित्रांची, अगदी मैत्रीणींचीही तुलना मी कायम तुझ्याशी करत राहिले. गंमत म्हणजे या सगळ्यांची मी आंपसांत कधीच तुलना केली नाही. तुझ्याशी मात्र सगळ्यांची केली. आणि अजूनही तूच सरस वाटतोस. सगळ्यांपेक्षा कणभर जास्त जवळचा.
पण तू विचारलंस तेव्हा हे सगळं जाणवण्या पलीकडे गोंधळले होते मी. माझं तुझ्यावर प्रेम होतं, तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं यापलीकडे कधी काही विचार करण्याची गरजच वाटली नाही मला. नाव देण्याचीही गरज वाटली नाही आणि सोबत रहाण्याचीही गरज वाटली नाही. तू होतास, मी होते आणि का कोण जाणे पण तेवढंच पुरेसं होतं मला. अरे तुला भेटले तेव्हाच २५ वर्षांची होते मी. एक तृतीयांश आयुष्य तर नक्कीच सरलं होत माझं. एकटी रहायला लागूनच ७ वर्षे झालेली. माझं व्यक्तिमत्व, धारणा, कल्पना, सगळ्या तयार झालेल्या. पण तरीही तू त्या सगळ्याला हादरा दिलास. तोवर काही मित्र-मैत्रीणी झाल्या असल्या तरी मनाचं दार काही कोणापुढे उघडू शकले नव्हते कधी कोणापुढे. बाकी सगळ्यांचा कंटाळा यायचा तसं त्यांच्यासोबत काही वाटायचं नाही आणि चांगल्या गप्पा वगैरे व्हायच्या वेगवेगळ्या विषयांवर, बाकी माझ्या एकटेपणाचा आणि फकिरीचा त्यांनी कधी बाऊ नाही केला म्हणून हे मैत्र निर्माण झालं. पण माझ्याही नकळत माझ्या मनाच्या इतक्या आत प्रवेश करणारा, माझे विचार उघड्या पुस्तकासारखे वाचणारा , माझ्यातलं चांगलं वाईट मला माझ्या तोंडावर सांगणारा आणि तरी त्या सगळ्यासकट माझ्यावर असा जीवापाड प्रेम करणारा असा तू पहिला आणि एकमेवच. तुझ्या सहवासात अनुभवलं मी, प्रेम काय असतं.. सुरक्षित वाटणं किती छान असतं... स्वतःची काळजी न घेता काही काळ कोणासोबत राहता येणं किती लोभस असतं..
पण तुझ्याही काही अपेक्षा होत्या आणि तू विचारल्यानंतर त्या मला जाणवल्या. माझा त्या अपेक्षांवर आक्षेप नव्हता, शंका होती.. स्वतःवर... .
तुझ्यासोबत घालवलेली ३ वर्षे खरच असा काळ आहे ज्यासाठी २५ वर्षे वाट बघणं वाजवी होतं. पण त्या ३ वर्षांनंतरही मी काही पुरेशी बदलले नव्हते असं आता वाटतय. म्हणजे बदल नक्कीच झालेला पण कदाचित सगळं जगणंच बदलण्याइतका नाही.
मीर, अर्रे तू पहिल्यापासूनच असा.. कुटुंबवत्सल गृहस्थासारखा.. तरी माझ्यासारख्या बाईवर प्रेम करणारा. तुझी भेट होण्या आधी काही गोष्टी ठरवूनच टाकेलेल्या मी स्वतःशी. त्यातल्या काही तुला भेटूनही बदलल्या नाहीत. स्वतःच्या एकटेपणाला इतकी सरावलेले तोवर मी. चटावलेले म्हण हवं तर, की थोडा वेळ लोकांच्यात गेला की परत मला स्वतःच्या एकटेपणात परतावसं वाटतं.. तेव्हाही वाटायचं. आपल्या आजूबाजूला २४ तास माणसांचं अस्तित्व असणार आहे आणि ते ही अनोळखी व्यक्तींचं नाही तर मला ओळखणार्‍या लोकांचं.. नातलगांचं.. हा विचारच मला भोवळ आणायला पुरेसा होता.
शिक्षण पूर्ण करुन स्थिर होण्याचा संघर्षाचा काळ मोठा होता माझ्यासाठी. आणि खूप कठीणही. या सगळ्या काळात मी खूप एकटी होते रे मी. त्यामुळे संघर्ष करताना कोणाची सोबत असते तेव्हा भावना काही वेगळ्या असतात का याची मला कल्पना नव्हती.. नाहिये.. वास्तविक पाहता आयुष्यातल्या संघर्षाच्या काळाबद्दल लोकं खूप आसूसुन बोलतात. भावुक होतात, प्रसंगी त्या काळातून निभावून नेल्याचा अभिमानही बाळगतात. पण माझ्या आयुष्यातल्या या संघर्षमय भूतकाळाकडे बघताना मला कधीच अभिमान वगैरे वाटला नाही रे. खूप दु:ख आणि वेदनाच होत्या त्यात आणि त्या सगळ्याचा त्रासच झाला मला. बरं पुन्हा त्या सगळ्यांत एकटी होते मी. अनेक दिवस, रात्री, आठवडे, महिने, वर्षे.. कणाकणाने तुटत आणि पुन्हा जुळवत सावरलय स्वतःला. त्यामुळे संघर्षमय काळात सोबत करणे किंवा सोबत येण्यासाठी संघर्ष करणे या गोष्टी तरी मला माझ्यापुरत्या फॅन्टसीज वाटतात.आणि तुझ्या सोबत येण्यासाठी आणि कधीही न अनुभवलेल्या कुटुंबव्यवस्थेत सामावण्यासाठी लागणारा संघर्ष करायची माझी तयारी नव्हती. त्या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या कधीच तयार करु शकले नाही मी स्वतःला.
एखादी गोष्ट माहिती असणे, ती समजणे आणि ती आत्मसात होणं या तीन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं, आपल्याला राग येतो आणि रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे हे आपल्याला माहिती असतंच. राग येण्याच्या आणि शांत राहण्याच्या क्रियांचे विश्लेषण करता येतं, त्याविषयी मतं तयार होतात तेव्हा आपल्याला ते समजलेलं असतं. पण हीच गोष्ट जेव्हा आपण आचरणात आणायला जातो तेव्हा तो एक सर्वस्वी वेगळा आणि विचारांच्या पलीकडचा अनुभव ठरतो. आपण वर्षभर विचार करुन, विश्लेषण करुन जे मांडू शकणार नाही, ज्यापर्यंत पोहचू शकणार नाही, तिथवर पोहचवण्याची क्षमता एका दिवसाच्या अनुभूतीत असते. आणि गीता असो, सूफी तत्वज्ञान असो की झेन कथा, या सगळ्या ज्ञानाचा गाभा, ह्या आत्मसात करण्याच्या प्रवासात आहे.
आणि ही गोष्ट जेव्हापासून जाणवलिये ना, तेव्हापासून स्वतःच्या विचारांचं आणि विश्लेषणांचं कौतुक वाटणं बंद झालय बघ. मला भलेही लाख गोष्टी माहिती असतील. त्यातल्या हजारो समजत असतील, पण जोवर त्यातली एखादीतरी मी आत्मसात करु शकत नाही तोवर माणूस म्हणून मी तितकीच अपूर्ण असते.. अगदी माझ्या सगळ्या विचारांसह मी अपूर्ण असते...
हेच तर झालं ना... लहानपणापासून कुटुंबाला, प्रेमाला पारखी झालेली मी, वाचून, विचार करुन हे सगळं हवं असणं पटत होतं पण आत्मसात झालं नव्हतं म्हणूनच प्रत्यक्ष असं काही घडण्याची शक्यता दिसली तेव्हा पळ काढला मी.. मला हवी तशी माणसं मिळत नाहीत म्हणून खूप त्रागा केला कधी एके काळी. मग माणसं आहेत तशी स्विकारायलाही शिकले. पण माझ्या मनाचा कुठला एक हट्टी कोपरा अजूनही जिवंत आहे आणि अजूनही नकार देतोय वास्तव स्विकारायला. माझ्या मनासारखी माणसं भेटणार नाहीत हे वास्तव नव्हे.. अशी माणसं भेटली तरी सांभाळून हे घ्यावच लागतं, कारण ती ही शेवटी माणसंच आहेत, हे वास्तव...
तुझ्या कुटुंबात नसतेच सामावले गेले रे मी. आणि त्यासाठी लागणारा त्रास उचलण्याची माझी तयारी नव्हती, तुझी असली तरी. एकंदर २८ वर्षे आयुष्याचे रंग पाहिल्यानंतर मी अशा स्थितीला आलेले की आयुष्यात आनंद नसला तरी चालेल पण दु:ख नको..त्रास नको, संघर्ष नको.. अगदी सोबतीला तू असलास तरी.. आणि तुझ्याबाबतीतली कोणतीही गोष्ट मी औपचारिकता म्हणून करु शकले नसते हा मुद्दा तर आहेच. आणि माझं सर्वस्व ओतूनही ते जिथे कमी पडण्याची शक्यता आहे त्या वाटेवर मला जायचा धीर झाला नाही. आठवतंय तुला? तू विचारल्यानंतरच्या काळात माझी चिडचिड, माझा हेकेखोरपणा वाढला तो अगदी तू दूर जाईपर्यंत... तुला कळतच नव्हतं काय बिनसतय.. आणि तेव्ह कदाचित मलाही कळत नव्हतं ते. पण त्यात तुझी काही चूक नव्हती रे.. तू तसाच होतास.. आधीसारखा.. मी च माझ्या मनातल्या भीतीला घाबरुन दूर पळाले.. तुझ्यापासून.. आपल्यापासून.. पळून गेले रे मी मीर.. पळपुट्यासारखी...
आणि आज पुन्हा मी तेच करणार आहे..होय मीर.. आज पुन्हा मी तुझ्यापासून दूर जाणार आहे. कारण मी अशीच बोलत राहिले तुझ्याशी तर मला नाही सहन होणार. पुन्हा कशी आणि किती निखळेन माहिती नाही आणि आता निखळले तर पुन्हा जुळू शकेन याची खात्री नाही.
करु शकलासच कधी तरी माफ करुन टाक मला.. बाकी तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला सापडत राहिनच मी थोडी थोडी तुझ्यात कायम.. Bye Meer...!

-राधा.
मेरा कुछ सामान ...
तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब.. एकेक प्रवासी भेटत गेले तसं तिचं ते दु:खात विरघळून जाण्याचं वेड पण वाढत गेलं.. ती रंगीबेरंगी राजवर्खी, घनगूढ लोभसवाणी, बघता बघता मनाच्या आरपार जाणारी वेदना जगण्याचा तिने ध्यास घेतला. वेड्यासारखी ती शोधत राहिली ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दु:खाचे कवडसे, मागत राहिली आयुष्याकडे पंचप्राण आकर्षून घेणारं दु:ख.. किंवा असं दु:ख ओंजळीत घालू शकेल असा कोणीतरी..
कधीतरी एकदा जागी झाली या वेडातून तर ओंजळीत उरलेले फक्त ओबडधोबड, कुरुप दगड-गोटे..त्याक्षणी तिला जाणवलं, पदरी पडलेल्या या भयानक दु:खापासून आता सुटका नाही आणि या दगडांना तासून, घडवून सुबक मूर्ती बनवाव्या अशी आपली प्रतिभाही नाही...
"खोटे... खोटे... खोटे..." ती स्वतःशीच म्हणाली..
"खोटे असतात सगळेच कलाकार.. का?.. का म्हणून वेदना अशी सजवून, मढवून समोर ठेवतात आपल्या? आयुष्य आपल्याकडे जे उघडनागडं दु:ख फेकतं, ते कुठे असं सुंदर असतं? आणि शब्दांची वस्त्र चढवून, सुरांची झालर लाऊन समोर येणार्‍या दु:खाच्या या फसव्या सौंदर्याला बळी पडतो आपण मूर्खासारखे.. जितकी उंची वस्त्र, जितकी भरजरी झालर, तितके जास्त शरण जातो त्याला.. तितके जास्त ओढले जातो त्याच्या आकर्षणात... पण आता खूप झालं.. बास्स.. अजून नाही.. परत नाही.. आता साक्षात रतीमदनाचं रुप घेऊन जरी वेदना समोर उभी राहिली तरी तिला भुलायचं नाही.." ती मनोमन ठरवून टाकते..
इतक्यात ब्रह्मपुत्रेकाठच्या उत्कट स्वरात बांधलेला 'गुलजार', लताच्या आवाजात कानी येतो..
 "ओ मोरे चंद्रमा, तोरी चांदनी अंग जलायें..
तोरी उंची अटारी, मैने पंख लिये कटवायें.."
आणि स्वत:च्याही नकळत त्या जीवघेण्या वेदनेला ती पुन्हा शरण जाऊ लागते....
मेरा कुछ सामान ...
तुझ्यापासून वेगळं झाल्यावर,
या अनंत असीम अवकाशात,
आत्ता कुठे मला मिळू लागलाय,
माझा वेग, माझा केंद्रबिंदू, माझी कक्षा...
आता एक ठरवून घेऊ,
तू तुझ्या केंद्रकाभोवती आणि मी माझ्या केंद्रकाभोवती,
आपापल्या कक्षेत फिरत राहू,
एकमेकांचे मार्ग न छेदता..
तरच माझं भ्रमण पूर्ण होऊ शकेल,
कसंय ना,
तुझं गुरुत्वाकर्षण आहेच इतकं जबरदस्त की,
माझी कक्षा मी जरा जरी सोडली,
तर पुन्हा तुझ्यात कोसळण्याखेरीज,
पर्याय नाही राहणार मला....
मेरा कुछ सामान ...
ते दोघे खू..प्प काळाने भेटतात..
अमका तमका, अमकी तमकीच्या गप्पा होतात..
जुन्या कविता, जुनेच किस्से..
मग काय काय नवीन चाललयं याची उजळणी करतात..
नव्या कविता, नवे किस्से...
बोलता बोलता, 'everything changes'
आणि 'some things never change' या जुन्याच वादालाही पोचतात..
विषय कुठे चाललाय हे कळून मग शांत होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
समोरचा नक्की किती बदललाय,
हे शब्दांशब्दांतून चाचपडत राहतात..
आपण कितीही बदललो तरी आपल्या आतल्या,
कधीच न बदलणार्‍या कशापर्यंत तरी उतरतात..
मग ओरखडे इतक्या आतही उमटल्याचं पाहून खिन्नपण होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
एकमेकांच्या हातावर कोरलेल्या रेषा अजून तशाच आहेत,
हे माहिती असलेलं सत्य अनुभवण्यासाठी..
एकमेकांच्या मनात रंगवलेल्या प्रतिमांचे,
नवे संदर्भ सांगण्यासाठी..
सोबत नसतानाही एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणा
एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
रोजच भेटत असल्यासारखे..
ते दोघे खू....प काळाने भेटतात..
पुन्हा खू......प काळ न भेटण्यासाठी...
मेरा कुछ सामान ...

माझ्या उदासीला 'तुझ्या नसण्याचं' लेबल लावण्याचे
सोयिस्कर दिवस केव्हाच मागे पडलेत..
अनादी अनंत पसरलेल्या अंधारात उगवावा प्रकाशाचा किरण,
आणि मग तो च काय ते सत्य बनून जावा..
तसा 'एकटेपणा' झळाळलाय,
कारणांच्या पसार्‍यातून..
कुठं काही खुट्ट् झालं की अंधारात लपायची सवय झालेली मनाला..
एखादं सोयिस्कर कारण गुरफटून घेऊन..
आता ह्या झळाळलेपणाला कुठं लपवावं?
'आणखी एक कारण' या कॅटेगिरीत ते बसत नाही..
आणि त्याला जिथे नेऊ तिथल्या कारणांचा फोलपणा याच्या प्रकाशात लपत नाही..
अंधारात लपता येत नाही म्हणून प्रकाशाची चाललेली ही धडपड,
आता असह्य झालीये..
मेरा कुछ सामान ...

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही आलेला स्पेशल वीक. थंडीसोबत लागणारे वेध आणि येणारं स्पेशल फिलींग. रोज सकाळी उठून उत्साहाने हव्याहव्याश्या काळोखात शिरायचं जिथे एक पूर्णतं अनोळखी जग माझ्यासाठी उभं असायचं.. दर वर्षी वाटतं की हे कधी संपूच नये आणि मग तरी ते एक दिवस संपतं.. ह्म्म.. असो..
नेहमीप्रमाणेच या वर्षीचे काही प्रयोग फसले काही यशस्वी झाले. त्या सगळ्याच म्हणजे या वर्षीच्या पिफमध्ये पाहिलेल्या चित्रपटांचा हा थोडक्यात रीव्हू..

Kamr Palm (kaf elqamar) - Egypt

चित्रपटाचं रेटींग खूप चांगलं होतं ते बघून म्हटलं महोत्सवाची सुरुवात यानेच करावी पर बात कुछ जमी नही. आपल्याकडे बॉलीवूडमध्ये असले खूप सिनेमे बघितल्यामुळे असेल. दिग्दर्शकाने कथा थोडी घुमवून सांगितल्यामुळे चित्रपट बघितला जातो कारण कथेमध्ये काहीच नवीन नाहीये. विधवा आई (आमिर), तिची ५ मुलं (मुलगे) एका खेड्यात रहात असतात. त्यांच्या वडिलांचं स्वप्न असतं की घर बांधावं. मग आईची फारशी इच्छा नसतानाही मुलांना शहरात पैसे कमवायला जायची परवानगी देते आणि मोठ्या भावावर सगळ्यांना एकत्र ठेवायची जबाबदारी. मग एक एक भाई का बिछडना और माँ के अंतिम समय मे पास आना.. भारी अभिनय आणि मांडणी पण मस्ट वॉच नाही.The last step (Pele Akher) - Iran


गेल्या वर्षी सेपरेशन आणि या वर्षी लास्ट स्टेप बघून इरानी चित्रपटांविषयी आणि खासकरुन इरानी दिग्दर्शकांच्या बुद्धीमत्तेविषयी कौतुक वाटायला लागलं आहे.. सुंदर चित्रपट. कथा, मांडणी, अभिनय.. सगळंच सुंदर. ज्या पद्धतीने कथा उलगडत जाते ते पहाणे तर फारच सुंदर. इथे कथेविषयी काहीही सांगुन मजा नको घालवायला.. मस्ट वॉच.


The tortoise, an incarnation (Kurmavatara) - India


या चित्रपटाविषयी काय बोलावं.? बोलू तेवढं कमीच. गांधी कोणाला किती आणि कसे समजले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खरा प्रश्न आहे तो गांधी आचरणात आणण्याचा. वेगवेगळ्या विरोधाभासांनी भरलेल्या या काळात गांधीवादही कसा सोयीस्करपणे वापरला जातो त्यावर मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट. गांधींना TRP मध्ये मो़जणे, गांधी झालेल्या माणसाचे त्याच गेट अप मधले सामान्य वागणे. नक्की बघावा असा चित्रपट..


The delay  ( LaDemora) - Uruguay, Mexico, France


ठिक ठाक चित्रपट. साधीशीच कथा. तशीच मांडणी. उत्पन्न फारसे नसलेल्या एका मध्यमवयीन बाईवर ३ मुलांची आणि अल्झायमर्स झालेल्या म्हातार्‍या वडिलांची जबाबदारी. रोजच्या त्रासाला कंटाळून वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला जाते पण तिथे निराधार नसल्यामुळे घेत नाहीत. बहिण वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार नसते. आणि विचारांच्या अशाच गोंधळात ती त्यांना अनोळखी रस्त्यावर सोडून येते. मग त्यांचं हट्टाने तिथेच तिची वाट पाहत थांबणं आणि तिनेही अस्वस्थ होऊन त्यांना न्यायला परत जाणं.. Thats all the movie is about.


Rose ( Roza) - Poland


दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला चित्रपट. महायुद्ध काळातील sexual atrocities and mental harassment  चं चित्रण अंगावर शहारे आणणारं. इतकी वर्षे उलटून पण ती जखम कायम का भळभळत राहते हे नव्याने जाणवतं असे चित्रपट बघताना. ऱोझ चा संघर्ष जितका वेदनादायक तितकाच खिळवून ठेवणाराही. वॉर फिल्म्स आवडत असतील तर मस्ट वॉच.


Material (Material) - South Africa


जड जड सिनेमे बघून झाल्यावर मूड हलका करणारा चित्रपट अनपेक्षितपणे मिळाला.  The movie gives some genuine laughter. The stand up comedy used is just awesome. फार ड्रामा नाही. क्लायमॅक्स मध्येही काही नौटंकी नाही असा सरळ साधा फॅमिली मूव्ही.  Too many references of bollywood, so its feels funny. कधी फॉर अ चेंज काही वेगळ्या प्रकारची कॉमेडी आणि हलका फुलका चित्रपट पहायचा असेल तर नक्की पहा..


The Parade (Parade) - Serbia


समलिंगी व्यक्ती समाजात खुल्या मनाने स्विकारल्या जाणार्‍या संघर्षाच्या काळातील सर्बिया इथला हा चित्रपट. विषय गंभीर असला तरी हलक्या फुलक्या सादरीकरणामुळे चित्रपट जड होत नाही. स्ट्रेट लोकांचा मुळातच समलिंगींकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आणि एका घटनेच्या निमित्ताने (परेडच्या निमित्ताने) घडलेल्या सहवासाने त्यात होत गेलेला बदल हा कालखंड खूप सुरेख मांडलाय. फक्त असं वाटलं की सगळी कथा कदाचित साधारण १०० मिनिटात बसू शकली असती ती उगीच १२० मिनिटांची केलीये.


Barbara (Barbara) - Germany


दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील जर्मनीत घडलेली कथा. सुरेख अभिनय, सुंदर कथा. सुरेख मांडणी. बार्बरा च्या अभिनयाला विशेष दाद द्यावी लागेल.  शेवटपर्यंतची तिच्या निर्णयातली अनिश्चितता आणि मनातली अस्वस्थता खूपच छान व्यक्त केलीये तिने.  प्रत्येक प्रसंगात बार्बरा आणि आंद्रे यांची एकमेकांसोबतची कामाच्या वेळेची ट्युनिंग आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध या दोन्ही अवस्था खूपच चांगल्या मांडल्या आहेत. खूप चांगला चित्रपट.


Noor (Noor) - Pakistan


ट्रांसजेंडर व्यक्तींची होरपळ मांडणारा अजून एक चित्रपट. हा पूर्ण बघता नाही आला. पण बघताना सतत 'बोल' ची आठवण येत राहिली. आणि त्याचं दिग्दर्शन याच्यापेक्षा चांगलं होतं असं वाटलं. असो.. पूर्ण न पाहिल्यामुळे फार लिहिणं शक्य नाही.बालक-पालक,

खूप महत्वाच्या विषयावरचा चांगला चित्रपट. याविषयी फार लिहित नाही. ऑलरेडी सगळीकडेच खूप चर्चा चालू आहे.. :-)


Frozen Silende (Silencio en la nieve) - Spain


खूप सार्‍या अप्रतिम वॉर फिल्म्स पाहण्याचा अनुभव असल्यामुळे की काय पण हा चित्रपट अगदीच सुमार वाटला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांमध्येच घडणार्‍या खूनांची रहस्यकथा आहे. But it neither feels mystery nor a war film. युद्धकाळातलं वातावरण वाटत नाही. म्हणजे पुरेसं वाटत नाही. आणि रहस्यकथा चालू आहे हा परिणाम पण मध्येच नाहीसा होऊन परत कधीतरी परत आल्यासारखा वाटतो. जर्मन सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याच्या हुकूमावरुन त्यांच्यातल्याच एका सैनिकाच्या बायकोचा बलात्कार केला जातो आणि त्यात गुंतलेल्या ४ सैनिकांना तिचा नवरा मारत असतो. आणि हा मारेकरी कोण हे शोधण्याचे काम एका माजी पोलिस आधिकारी असलेल्या सैनिकावर पडतं. त्याच्या शोधाची ही कथा.  Not so good.


Something in the air ( Apra s mai) - FranceIt is a really good script but director just wasted it. The people you have understanding (or at least idea) of the peculiar political situation and emotional trauma the europian youth was going through in 70's, could understand the script well. Unnecessary detailing ruined the pace of story. कम्युनिस्ट विचारांनी भारवलेला कॉलेजचा तरुण ते एक स्थिर जीवन जगू लागलेला माणूस हे एका विद्यार्थ्याचं रुपांतर अजून खूप चांगलं मांडता आलं असतं.  त्या नायकामध्ये काळानुसार होत जाणारे बदल स्क्रीन वर कुठे दिसतच नाहीत. एक ठराविक कालखंड दाखवायचा असतो अशा वेळी वेशभूषाकारांच्या कौशल्याला बराच वाव असतो. पण यात कुठे त्याचा वापर झालेला दिसत नाही. तरीपण कथेसाठी बघावा असा चित्रपट..

The fifth season of the year (Piata pora roku) - Poland


खूप गोड चित्रपट. हा चित्रपट बघताना गेल्या वर्षीच्या Las acasia ची आठवण झाली. पण ही कथा कितीतरी जास्त सुंदर आहे आणि तशीच मांडलीये. आपल्या नवर्‍याच्या अस्थी समुद्रात वाहण्यासाठी घेऊन चाललेली म्हातारी आणि तिच्यासोबत तिच्याच वयाचा ड्रायव्हर. दोन पूर्णतः भिन्न क्लासमधले लोकं. त्यांच्या सवयींमधला, वागण्या बोलण्यातला फरक पण एकाच पिढीचे असल्यामुळे येणारे काहीसे साधर्म्य याची त्यांची त्यांनाच होत जाणारी जाणिव, हा प्रवास त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही खूप खास बनवते. अप्रतिम अभिनय. सुंदर चित्रपट..


Araf - Somewhere in between - Turkey


दोन तासाच्या चित्रपटात सगळे मिळून अर्धा तासाचे संवाद आहेत.. बाकी वेळ काही होतच नाही. होतच नाही.. होतच नाही. मी वाट बघत बसलेले की कधी काही होईल चित्रपटात. पण शेवटपर्यंत काही खास होत नाही. नाही म्हणायला नायिकेच्या अ‍ॅबॉर्शन चा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. पण बाकी चांगलं किंवा वाईट काहीच नाही. एक तरुण मुलगी एका मध्यमवयीन ट्रकवाल्याच्या प्रेमात पडते. तिला प्रेग्नंट करुन तो गायब होतो. तिच्यावर प्रेम करणार्‍या मुलाचा प्रेमभंग. तिचं अ‍ॅबॉर्शन आणि मग तिचं त्या मुलाबरोबर लग्न अशी कथा आहे. कधीच बघितला नाही हा चित्रपट तरी काही बिघडणार नाही. अगदीच सुमार.


Everybody in our family (Toata lumea din famlia noastra) - Romania


एका साध्या कथेवरचा अप्रतिम चित्रपट. एका क्षणासाठीही लक्ष विचलित होणार नाही अशी खिळवून टाकणारी मांडणी आणि अप्रतिम अभिनय. एका घटस्फोटीत जोडप्यातील नवरा, आपल्या मुलीला सुट्टीसाठी घेऊन यायल्या तिच्या आईकडे जातो. Somehow the situation turns violent. आणि मग काय काय घडतं त्याची ही कथा. त्या लहान मुलीसकट सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.. मस्ट वॉच.


Post tenebras lux - Mexico


Frankly speaking, मला या चित्रपटातलं फारसं काही कळलं नाही. या चित्रपटाला अ‍ॅवॉर्ड वगैरे आहेत म्हणे.. :-( असो.. चित्रपटातली सिनरी फक्त खूप खूप खूप भारीए होती. प्रमाणाबाहेर सुंदर.. आणि चित्रपटातला शेवटचा प्रसंग काहीच्या काही. डोक्यावरचा केस हाताने उपटावा तसा तो माणूस स्वतःच्या मानेपासून डोकं उपटतो आणि मरतो.. yuuuuuk... आत्महत्या करायचे बाकी काही मार्ग नाही मिळाले का. अशा कल्पना सुचत तरी कशा असतील..? :-|


Rust and bone (De rouille et d'os) - France


माशांच्या हल्ल्यांत आपले पाय गमावुन बसलेली डॉल्फिन प्रशिक्षक आणि illegal बॉक्सिंग करणारा नायक यांच्यातलं नातं आणि त्याच वेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या नात्याचा पडलेला परिणाम याची ही कथा. खूप छान चित्रपट. सुरेख अभिनय. का कोण जाणे पण शेवटी 21 grams ची आठवण झाली. मस्ट वॉच..


Hella W - Finland


पुन्हा एकदा WW2  चा काळ. पण ही Hella W ची सत्यकथा आहे. फिनलंड मधली एक यशस्वी व्यावसायिक, राजकारणी, कवयित्री आणि नाटककार.. चित्रपटात वातावरणनिर्मिती खूपच छान केलीये. पार्श्वसंगीत खूप खास. बाकी अभिनय आणि कथा यासाठी मस्ट वॉच आहेच. (सत्यकथा तशाही बर्‍याच प्रमाणात युनिक असतात.)


Laurence anyways - France

PIFF चा शेवट एका चांगल्या सिनेमाने झाल्याचं समाधान मिळालं हा सिनेमा पाहून.  168 min seems too long for any cinema but for the story spanning over 10 years, it was necessary. लॉरेन्स आणि त्याची बायको फ्रेड.. अनेक वर्षे सोबत राहिल्यावर आणि खूप चांगली केमिस्ट्री असतानादेखिल, लॉरेन्स एक दिवस फ्रेड ला सांगतो की त्याला स्त्री व्हायचंय. आणि त्याला हे गेली अनेक वर्षे वाटतय. या नंतरचा १० वर्षांचा काळ या चित्रपटात मांडलाय.. त्याचं आणि फ्रेड चं नातं, त्याचं आणि त्याच्या आईचं नातं, समाजातले संघर्ष अशा अनेक धाग्यांविषयी आहे हा चित्रपट. फ्रेडने त्याच्या बाजूने उभं राहणं आणि त्याच वेळी त्याला नाकारणं, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम कायम रहाणं पण तरीही आपालल्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड खूप छान मांडलीये. मस्ट वॉच..
मेरा कुछ सामान ...

काय झालं..? ....... काही कळत नाहीये...
काही भांडण वगैरे?..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..
काही गैरसमज? .... गैरसमज.. आणि आपल्यात? शक्यच नाहीये..
मग आठवणच यायची बंद झाली का?.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..
मग इंटरेस्ट च कमी झाला नाही?... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती?
मग नक्की झालं तरी काय?
तेच तर कळत नाहीये ना..
आपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना?
कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."
दोघांनाही ही खात्री..
असा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..
न भेटता.. न बोलताच..
तुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..
आणि म्हणूनच कदाचित हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला..
मेरा कुछ सामान ...

पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...
मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...
छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...
सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...
कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...