मेरा कुछ सामान ...
तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब.. एकेक प्रवासी भेटत गेले तसं तिचं ते दु:खात विरघळून जाण्याचं वेड पण वाढत गेलं.. ती रंगीबेरंगी राजवर्खी, घनगूढ लोभसवाणी, बघता बघता मनाच्या आरपार जाणारी वेदना जगण्याचा तिने ध्यास घेतला. वेड्यासारखी ती शोधत राहिली ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दु:खाचे कवडसे, मागत राहिली आयुष्याकडे पंचप्राण आकर्षून घेणारं दु:ख.. किंवा असं दु:ख ओंजळीत घालू शकेल असा कोणीतरी..
कधीतरी एकदा जागी झाली या वेडातून तर ओंजळीत उरलेले फक्त ओबडधोबड, कुरुप दगड-गोटे..त्याक्षणी तिला जाणवलं, पदरी पडलेल्या या भयानक दु:खापासून आता सुटका नाही आणि या दगडांना तासून, घडवून सुबक मूर्ती बनवाव्या अशी आपली प्रतिभाही नाही...
"खोटे... खोटे... खोटे..." ती स्वतःशीच म्हणाली..
"खोटे असतात सगळेच कलाकार.. का?.. का म्हणून वेदना अशी सजवून, मढवून समोर ठेवतात आपल्या? आयुष्य आपल्याकडे जे उघडनागडं दु:ख फेकतं, ते कुठे असं सुंदर असतं? आणि शब्दांची वस्त्र चढवून, सुरांची झालर लाऊन समोर येणार्‍या दु:खाच्या या फसव्या सौंदर्याला बळी पडतो आपण मूर्खासारखे.. जितकी उंची वस्त्र, जितकी भरजरी झालर, तितके जास्त शरण जातो त्याला.. तितके जास्त ओढले जातो त्याच्या आकर्षणात... पण आता खूप झालं.. बास्स.. अजून नाही.. परत नाही.. आता साक्षात रतीमदनाचं रुप घेऊन जरी वेदना समोर उभी राहिली तरी तिला भुलायचं नाही.." ती मनोमन ठरवून टाकते..
इतक्यात ब्रह्मपुत्रेकाठच्या उत्कट स्वरात बांधलेला 'गुलजार', लताच्या आवाजात कानी येतो..
 "ओ मोरे चंद्रमा, तोरी चांदनी अंग जलायें..
तोरी उंची अटारी, मैने पंख लिये कटवायें.."
आणि स्वत:च्याही नकळत त्या जीवघेण्या वेदनेला ती पुन्हा शरण जाऊ लागते....
14 Responses

 1. Thanks a lot Indradhanu.. That realization also had the same effect of going speechless.. :-)


 2. Pradnya Says:

  khupach sundar... pratyek post manala art jaun bhidnaari aahe... aksharsha vachatana ashru yetat kadhi kadhi... too good


 3. Thanks Pradnya.. मनातलं बोलणं असं कोणाच्यातरी मनापर्यंत पोहचतय ही भावना खूप वेगळी आहे.. :-)


 4. Unsui Says:

  पोस्ट वाचल्यावर साहिरच्या "हर तरफ़ हुस्न और जवानी है" गाण्यातील ओळी आठवल्या
  किताबों में छपते है, चाहत के किस्से
  हक़ीकत की दुनिया में चाहत नहीं
  ज़माने के बाज़ार में, ये वो शह है
  के जिसकी किसीको, ज़रूरत नहीं है
  ये बेकार बेदाम की चीज़ है, नाम की चीज़ है

  प्रेमाऐवजी दुख: व्यथा वेदना वापरल्या तरी वरील गाण्यात चपखल बसतात. किंबहुना विचार केला तर लक्षात येते कि प्रेमावर गीत, काव्य, कथा कादंबरी आदी साहित्य निर्मितीची प्रेरणा जिथे खऱ्या भावना रसिकांपर्यंत पोहोचवणे हा असला तरी कुठेतरी सूक्ष्म पातळीवर जोडीने येणारा पैसा मान मरातब इ.इ. नसेलच हे कोणी सांगावे? त्या प्रमाणे ग्रीक रोमन काळा पासून कुठेतरी मानवी मनाला दुख: चे गोडवे गाणाऱ्या शोकांतिका रसिकमान्य होतात हि खुणगाठ कलाकारांनी मनाशी बांधल्या नसतीलच हे कुणी सांगावे?

  कलाकारच नव्हे तर तत्वेत्ते, योगी, ऋषीमुनी आदींनी पण चिंतन केले ते दुःखाचे मूळ , व त्यापासून मुक्ती याच विषयावर. हा एका दुःखाच्या शाश्वत स्वरूपाचा स्वीकारच केला. मजरूह साहेबांनी तर शेवटी सांगूनच टाकले "राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख ही इक छांव ढलती, आती है जातीं है."


 5. "ओ मोरे चंद्रमा, तोरी चांदनी अंग जलायें..
  तोरी उंची अटारी, मैने पंख लिये कटवायें.."

  हीच तर शोकांतिका आहे या ओढीची…. हि वेदना एक नशा आहे जी गात्रा-गात्रांत अशी काही उतरत जाते की एकदा या झाकोळात आलात की फक्त भिरभिरत राहण्याचं प्राक्तन टाळू म्हणता टाळता येत नाही.

  अप्रतिम लिहिलं आहेस. शब्दांचा असा तरल अनुभव खूप दिवसांनी अनुभवयास मिळाला.


 6. Unsui,
  पैसा, मान मरातब ही प्रेरणा असू शकेल का, आणि ती असलीच तरी ओरिजिनल निर्मितीसाठी ती कारण ठरेल का? हा खूपच वेगळा विषय आहे.. शोकांतिका रसिकमान्य होतात म्हणून शोकांतिका लिहिल्या जाणं यापेक्षा त्या रसिकमान्य होतात याचा अर्थ त्या जास्त लोकांना भिडतात, आणि भिडतात तर का? असं काहीसं डोक्यात होतं माझ्या..
  मुळात कलाकार, तत्त्वज्ञांना दु:खाचा उहापोह करावासा का वाटावं? दु:ख हा माणसाचा स्थायीभाव असावा का? आणि असेलच तर त्याला एवढं सजवण्याची सुरुवात नक्की कधी झाली? अश्या अनेक न संपणार्‍या प्रश्नांची मालिका अजूनही शिल्लक आहेच.. :-)
  प्रतिसादासाठी धन्यवाद...


 7. श्रद्धा,
  हि वेदना एक नशा आहे जी गात्रा-गात्रांत अशी काही उतरत जाते की एकदा या झाकोळात आलात की फक्त भिरभिरत राहण्याचं प्राक्तन टाळू म्हणता टाळता येत नाही.>> चपखल लिहिलस अगदी... :-)
  प्रतिसादासाठी धन्यवाद.


 8. Anil Says:

  ..this is amazing! ..दुःखाच्या अशा निळाईत कधी बुडून जाऊन मग आपल्या आयुष्याच्या भकास वाटेवर कधी परत येणं .. कि, या वाटेवर भेटलेल्या आपल्या अजाण दुःखाला घेऊन मग त्या निळाईत समर्पित होण्यासाठी जाणं.. यातलं नक्की कधी काय होतं त्याचा काही पत्ताच लागत नसावा. .. आणि मग त्यात मधुनच कधीतरी गळणारे प्रकाशाचे किरणंही जीवाला भूल पाडून जातातच..

  मंदीर-मंदीर पाणी-पाणी.. शिल्प कुठे वितळे~
  दुःखाच्या तंद्रीतून जैसे.. अमृत ठिबकत निळे~

  ..and then the ever striking thought that you expressed here is this deadly play of emotions and rationalism.. here such enigmatic fabrics of pain and then the naked truth on other side. ..मला मग उगाचच परत Wild Strawberries आठवला, आणि Sylvia Plath-ची ती ओळ-ही.. which says that.. one can be constantly active and happy or introspectively passive and sad, Or one can go mad by ricocheting in between! ;-)

  हुश्श्.. मग वाटतं कि, बस्स् आता.. नाहीतर घेरी यायला लागेल. .. आणि तरीही मनात असं काहूर माजलंच कि मग शेवटी अशा एखाद्या सुफ़ी प्रार्थणेलाच शरण जावंसं वाटतं..

  मोहब्बत में खयांल-ए-साहिंलों-मंजिल हैं नादानी..
  इन राहों में जो लुट जायें.. वहीं तकदीर वाला हैं..

  हाह्, बाकी.. ये मोहब्बत और इश्क़ को कब का ‘he and she’ के चुंगुल से निकालकर सुफ़िजम ने उस मकाम पर जाके रख दिया हैं के वहां अब इसमें सारी दुनियां समां जायें.. खुदाई भी!

  ..see, how i remember these long forgotten gardens when i read your posts.. again and again. ..असे रेशमाचे धागेदोरे हाताला लागून परत निसटल्यासारखे. ..i'm thankful! :-)


 9. Wowwww I never realised this while listening to all these artists in all these years. But yes, you are SOOO Right !!! Apratim ! And Speechless.
  Vidya. 10. Vidya,
  You might not have realized because your nature may be about looking for art more than imagining yourself in it.. :-) म्हणजे कसंय ना, काही लोकं चित्रपट पाहताना तो कसा बनवलाय याकडे लक्ष देतात.. चित्रपट आवडला, नाही आवडला तरी ते स्वतःला त्यात बघत नाहीत. आणि काही लोकं चित्रपट किंवा कथेच्या नायक नायिकेच्या जागी स्वतःला इमॅजिन करतात. त्यांच्या तश्या फॅन्टसीज् असतात.. यात खरतर बरोबर-चूक, चांगलं वाईट काही नाही, फक्त स्वभावविशेष म्हणू शकतो.. :-) Thanks you..


 11. Anonymous Says:

  he tar manala khupach bhavlay.. shabdach nahit.. Its just awesome..