मेरा कुछ सामान ...
तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब.. एकेक प्रवासी भेटत गेले तसं तिचं ते दु:खात विरघळून जाण्याचं वेड पण वाढत गेलं.. ती रंगीबेरंगी राजवर्खी, घनगूढ लोभसवाणी, बघता बघता मनाच्या आरपार जाणारी वेदना जगण्याचा तिने ध्यास घेतला. वेड्यासारखी ती शोधत राहिली ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दु:खाचे कवडसे, मागत राहिली आयुष्याकडे पंचप्राण आकर्षून घेणारं दु:ख.. किंवा असं दु:ख ओंजळीत घालू शकेल असा कोणीतरी..
कधीतरी एकदा जागी झाली या वेडातून तर ओंजळीत उरलेले फक्त ओबडधोबड, कुरुप दगड-गोटे..त्याक्षणी तिला जाणवलं, पदरी पडलेल्या या भयानक दु:खापासून आता सुटका नाही आणि या दगडांना तासून, घडवून सुबक मूर्ती बनवाव्या अशी आपली प्रतिभाही नाही...
"खोटे... खोटे... खोटे..." ती स्वतःशीच म्हणाली..
"खोटे असतात सगळेच कलाकार.. का?.. का म्हणून वेदना अशी सजवून, मढवून समोर ठेवतात आपल्या? आयुष्य आपल्याकडे जे उघडनागडं दु:ख फेकतं, ते कुठे असं सुंदर असतं? आणि शब्दांची वस्त्र चढवून, सुरांची झालर लाऊन समोर येणार्‍या दु:खाच्या या फसव्या सौंदर्याला बळी पडतो आपण मूर्खासारखे.. जितकी उंची वस्त्र, जितकी भरजरी झालर, तितके जास्त शरण जातो त्याला.. तितके जास्त ओढले जातो त्याच्या आकर्षणात... पण आता खूप झालं.. बास्स.. अजून नाही.. परत नाही.. आता साक्षात रतीमदनाचं रुप घेऊन जरी वेदना समोर उभी राहिली तरी तिला भुलायचं नाही.." ती मनोमन ठरवून टाकते..
इतक्यात ब्रह्मपुत्रेकाठच्या उत्कट स्वरात बांधलेला 'गुलजार', लताच्या आवाजात कानी येतो..
 "ओ मोरे चंद्रमा, तोरी चांदनी अंग जलायें..
तोरी उंची अटारी, मैने पंख लिये कटवायें.."
आणि स्वत:च्याही नकळत त्या जीवघेण्या वेदनेला ती पुन्हा शरण जाऊ लागते....
मेरा कुछ सामान ...
तुझ्यापासून वेगळं झाल्यावर,
या अनंत असीम अवकाशात,
आत्ता कुठे मला मिळू लागलाय,
माझा वेग, माझा केंद्रबिंदू, माझी कक्षा...
आता एक ठरवून घेऊ,
तू तुझ्या केंद्रकाभोवती आणि मी माझ्या केंद्रकाभोवती,
आपापल्या कक्षेत फिरत राहू,
एकमेकांचे मार्ग न छेदता..
तरच माझं भ्रमण पूर्ण होऊ शकेल,
कसंय ना,
तुझं गुरुत्वाकर्षण आहेच इतकं जबरदस्त की,
माझी कक्षा मी जरा जरी सोडली,
तर पुन्हा तुझ्यात कोसळण्याखेरीज,
पर्याय नाही राहणार मला....
मेरा कुछ सामान ...
ते दोघे खू..प्प काळाने भेटतात..
अमका तमका, अमकी तमकीच्या गप्पा होतात..
जुन्या कविता, जुनेच किस्से..
मग काय काय नवीन चाललयं याची उजळणी करतात..
नव्या कविता, नवे किस्से...
बोलता बोलता, 'everything changes'
आणि 'some things never change' या जुन्याच वादालाही पोचतात..
विषय कुठे चाललाय हे कळून मग शांत होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
समोरचा नक्की किती बदललाय,
हे शब्दांशब्दांतून चाचपडत राहतात..
आपण कितीही बदललो तरी आपल्या आतल्या,
कधीच न बदलणार्‍या कशापर्यंत तरी उतरतात..
मग ओरखडे इतक्या आतही उमटल्याचं पाहून खिन्नपण होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
एकमेकांच्या हातावर कोरलेल्या रेषा अजून तशाच आहेत,
हे माहिती असलेलं सत्य अनुभवण्यासाठी..
एकमेकांच्या मनात रंगवलेल्या प्रतिमांचे,
नवे संदर्भ सांगण्यासाठी..
सोबत नसतानाही एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणा
एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
रोजच भेटत असल्यासारखे..
ते दोघे खू....प काळाने भेटतात..
पुन्हा खू......प काळ न भेटण्यासाठी...