मेरा कुछ सामान ...
"छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..."

नेहमीप्रमाणे तो स्वतःशीच विचार करत बसलेला.. हे त्याचं नेहमीचंच होतं. जग जितकं दिसायचं तेवढीच त्यातली विषमता आणि विरोधाभास अस्वस्थ करत रहायचा त्याला. आणि मग आपल्या मनात आपल्याला हवी तशी सृष्टी निर्माण करत रहाणं छंद बनून गेलेला त्याचा.

"म्हणजे, माणसाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, राग-लोभ, आशा-निराशा सगळं काही हवं, पण इतकं एक्स्ट्रीम काही नको. इतकं पराकोटीचं दैन्य नको, इतका आंधळा सूड नको, ऐश्वर्याची पराकाष्ठा नको आणि असा दु:खाचा गर्ता पण नको.. थोडा फार बॅलन्स हवाच हवा. का म्हणून देवाला असं सुचलं असेल? का त्याला इतकी टोकाची विषमता निर्माण करावी वाटली असेल? आपण जग बनवलं असतं तर असं तरी नक्कीच बनवलं नसतं.."

त्याच्या विचारांची साखळी चालूच होती.

"मग तू बनवून पहा जग.."

कोणाच्यातरी आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.

"कोण ते.."

"तोच.. ज्याचा तू आत्ता विचार करत होतास.. देव.. सृष्टीचा निर्माता.."

"बरं झालं भेटलास. मला आधी सांग तू जग हे असं का बनवलंस? मला मान्य आहे माणसाच्या आयुष्याचं चित्र पूर्ण करायला सगळ्या चांगल्या वाईटाची गरज आहे पण इतकी पराकोटीची टोकं का बनवलीस तू? मध्यम मार्ग का नाही निवडलास?"

देव किंचितसा हसला, म्हणाला, "अर्रे म्हणून तर मी आलोय तुला भेटायला. बघावं तेव्हा तू हाच विचार करत असतोस की तू असं निर्माण केलं असतंस, तसं निर्माण केलं असतंस. तर आज म्हटलं तुला संधी देऊनच टाकावी. आता तूच निर्माण कर तुला हवं तसं जग."

देवाचं बोलणं ऐकतच राहिला तो. काही वेळ तर त्याचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. पण नक्की कळालं तेव्हा मात्र चांगलाच खूष झाला तो.

"हो तर.. नक्कीच.. का नाही. मी तुला बनवूनच दाखवतो समतोल अशी प्रतिसृष्टी."

देव पुन्हा हसला आणि मग गंभीरपण अर्घ्य त्याचा हातावर सोडून त्याने त्याची निर्मितीक्षमता त्याला दिली. अर्थात तो काही जगात दु:ख, राग, लोभ नसावेतच या मताचा नव्हता. आयुष्य पूर्ण व्हायला सगळं हवंच हे त्याला ही माहितीच होतं. त्याप्रमाणे त्याने माणूस बनवायला घेतला. सगळ्या चांगल्या गुणांसोबत त्याने वाईट गोष्टीही घातल्या. सर्व काही प्रमाणात. काही कमी नाही की जास्त नाही. आणि बघता बघता सगळ्या सृष्टीचा डोलारा उभा राहिला. माणसाला - त्याच्या निर्मितीला त्याच्या कर्मावर सोडून तो आणि देव दोघेही नवीन जगाच्या उलाढाली बघण्यात व्यस्त झाले. त्याला खात्री होती, सगळ्या गोष्टी प्रमाणात घातल्यामुळे अशा टोकाच्या गोष्टी घडणारच नाहीत त्याच्या जगात.

पण मग कळलंच नाही कुठे कसं आणि काय झालं? काही समजायच्या आत तो एका विरोधाभासाने भरलेल्या आणि टोकाच्या भावना आणि गुंतागुंत असलेल्या जगाचा निर्माता बनला होता. गोंधळून तो ईश्वराकडे पहातच राहिला. देवाच्या चेहर्‍यावर आताही तेच मंद स्मित होतं. तो निरखून निरखून पाहू लागला, पुन्हा पुन्हा आठवू लागला. पण सर्व काही प्रमाणातच घातलेलं त्याने. मग इतक्या एक्स्ट्रीमीटीज् कशा आल्या?

सगळं काही प्रमाणात घालूनही आलेली गुंतागुंत पाहून पुरता वैतागून गेला तो. आणि तोच त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याला बोलावतंय. तो लक्ष देवून पाहू लागला. त्याचीच निर्मिती असलेला एक माणूस त्याला आळवत होता. विचार करत होता, "छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..., माणसाच्या आयुष्यात आनंद-दु:ख, राग-लोभ, आशा-निराशा सगळं काही हवं, पण इतकं एक्स्ट्रीम काही नको. इतकं पराकोटीचं दैन्य नको, इतका आंधळा सूड नको, ऐश्वर्याची पराकाष्ठा नको आणि असा दु:खाचा गर्ता पण नको.. थोडा फार बॅलन्स हवाच हवा. का म्हणून देवाला असं सुचलं असेल? का त्याला इतकी टोकाची विषमता निर्माण करावी वाटली असेल? आपण जग बनवलं असतं तर असं तरी नक्कीच बनवलं नसतं.."
मेरा कुछ सामान ...
हडप्पन, मेसोपोटॅमिअन, सुमेरिअन, मायन..
सिव्हिलायजेशन्स... संस्कृती....
अवशेष गाडले जातात जमिनीत..
काहीच राहत नाही कालातीत...
सगळे जीव भाग बनून राहतात एका संस्कृतीचा..
स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी धडपडणारे,
संस्कृतीचा भाग म्हणून अस्तित्व जपणारे,
काहीच न जाणता जगत जाणारे...
जाणिवपूर्वक संस्कृती जोपासणारे,
आणि तितक्याच जाणिवपूर्वक ती नाकारणारे..
संस्कृतीने पोळलेली आयुष्यं..
संस्कृतीने उजळलेली आयुष्यं..
सगळी तोलली जातात एकाच तराजूत..
तिला नाकारणारे,
झिडकारणारे..
विद्रोही,
त्रासलेले..
अट्टहासाने स्वतःला वेगळे केलेले..
सगळेच नष्ट होतात काळासोबत..
आणि आपण सगळ्यांना ओळखतो
त्या एका संस्कृतीचा भाग म्हणूनच...
मेरा कुछ सामान ...
१) जनरलायजेशन.. प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणं खूप बोजड होईल म्हणून साधारणपणे समान गुणधर्म असलेल्या गोष्टींचा एक गट करायचा.. मग त्यातूनही प्रत्येकाचे काही वेगळे गुणधर्म रहातातच, त्याचा वेगळ्याने अभ्यास करायचा..म्हणजे एकूण एकच. माझं जनरलायजेशन केलेलं मला आवडत नाही. चांगलं म्हटलेलंही आवडत नाही, वाईट म्हटलेलंही.. आवडत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही. मी चांगली किंवा वाईट कशी असू शकते? मी माझ्याइतकीच चांगली आणि वाईट आहे, कमी नाही जास्त नाही. पण आता कोणत्याही एका बाजूला जायचं म्हणजे परत जनरलायजेशन आलं. म्हणजे शेवटी सगळंच व्यर्थ.. चांगली, वाईट, स्त्री, पुरुष, हिंदु, मुस्लिम, गरीब, श्रीमंत.. सगळेजण सगळच काही.. शेवटी प्रत्येकाचा स्वतंत्र संच आलाच.. तरीही जनरलायजेशन होऊ शकतं. असं का?
------------------------------------------------------------------------------
२) मायकेल अँजेलो म्हणे वयाच्या ६५ व्या वर्षी प्रेमात पडलेला, त्या काळात त्याने कविता लिहिल्या आणि ती मेल्यावर कधीच नाही लिहिल्या. अमृता-इमरोज ने कधीच एकमेकांना I love you म्हटलं नाही.. हे प्रेम आहे तर मला वाटतं ते काय आहे? ते प्रेमच याची खात्री आहे मला पण मी आयुष्यात इतक्या वेळा पडलेय आणि एकाच वेळी अनेक व्यक्तिंच्या प्रेमात अजूनही असते, मग हे काय आहे? आपुलकी, आकर्षण, जवळिक, सख्य याच्या नक्की कोणत्या प्रमाणातल्या मिश्रणाला प्रेम म्हणतात? आणि कोणतंही प्रमाण असलं तरी प्रत्येकाला एकदातरी ते प्रेमासारखं वाटतं. मग नक्की 'ती' जी सो कॉल्ड उदात्त भावना आहे ती प्रत्येकाला स्पर्श करते का? करत नसेल तर मनात निर्माण झालेल्या कुठल्यातरी थातुरमातुर भावनेलाच मी प्रेम समजते की काय? मला 'तसं' प्रेम कधीच होणार नाही का?
--------------------------------------------------------------------------------
३) मी थर्ड क्लास लेखक आहे. अभिजात १स्ट क्लास, आपल्या पीढीपुरते तरी प्रभाव पाडणारे सेकंड आणि मग राहिलेली रद्दड.. मी.. अभिजातपणाचा दूरदूरपर्यंत पत्ता नाही. मी जो विचार करते तो, थोडाफार विचार करणार्‍या सगळ्यांनीच केलेला असतो, तो सगळ्यांनीच केलेला विचार असला तरी ज्यामुळे तो वाचनीय होतो ती मांडण्याची शैली वगैरे मुळातच नाही आहे. म्हणून मी लिहिलं नाही इतके दिवस. सर्जनशीलतेचा इतका कडकडीत दुष्काळ का?
---------------------------------------------------------------------------------
४) लढत-विव्हळत, प्रत्येक क्षणी नव्याने निराश करणार्‍या आयुष्यासोबत जे काहीतरी करतेय मी ते काय आहे? इतके पैलू की कशालाच न्याय देता येऊ नये. इतकी उत्तरं की कोणताच प्रश्न सुटू नये. इतके मार्ग तरी कोणताच सरळ वाटू नये. कशालाच काही अर्थ नाही असंही वाटावं. त्यात अर्थ भरावा हे ही पटावं. पटूनही काही नीट जमू नये. जमलं तरी समाधान वाट्याला येऊ नये. मरण्याच्या क्षणातच आयुष्य कळत असेल तर......?
मेरा कुछ सामान ...
स्टॅटेस्टिक्स... स्टॅटेस्टिक्स... जगात रोज इतकी लोकं उपाशी झोपतात.. इतकी मुलं कुपोषित आहेत.. इतक्या स्त्रिया अन्यायाला बळी पडतात.. हे आकडे माहितीतले. रोजच्या वाचनातले. रोजच्या विचारातले. त्यासाठी कधी हळहळणे तर कधी पेटून उठणे आणि कधी त्यावरच्या उपायांत खारीचा वाटा उचलणे हे ही नित्याचे.
तसाच तो ही एक दिवस होता. नेहमीप्रमाणेच. सकाळची घाई. ठरलेली बस. बस मध्ये जागा मिळाली की पुढच्या तासाभराची निश्चिंती. भल्या गर्दीत सुखावणारं एकटेपण आणि अगदी स्वतःचा असा वेळ. कुठलाही विचार निवांतपणे करण्याची हक्काची संधी. वाटलं तर विचार करा नाहीतरे निरीक्षण करत बसा. त्यादिवशीही असंच लोकांकडे बघत बसलेले. चेहरा बघून त्या माणसाच्या आयुष्याचा, मानसिकतेचा अंदाज बांधत.. रस्त्यावरुन दिसणारी दृश्यही रोजचीच होती. काही गरीब माणसं, रस्त्यावर फिरणारी मुलं.. पण तो दिवस अगदीच काही रोजचा नसावा. त्या सगळ्यांकडे बघता बघता अशी काही तंद्री लागली त्या दिवशी की त्याचं नीटसं वर्णन आजही नाही करता यायचं मला. बघता बघता जाणवायला लागलं की ती 'मी'च आहे. आजूबाजूची प्रत्येक जिवंत गोष्ट 'मी' आहे. जी 'मी' आहे, तेच सगळीकडे आहे. सगळी माझीच रुपं आहेत. सगळ्यांत 'मी' आहे. आधी हे जाणवत होतं की यावर खूप विचार करुन झालाय. त्याचाच पुढचा भाग चालू झाला असेल डोक्यात. पण नंतर जाणवायला लागलं की डोकं बंद झालंय कधीच आणि आता जे दिसतय हे समोर घडतय. माझ्या डोळ्यांदेखत. हे विचार नाहीत. ही अनुभूती आहे.
दिव्य दृष्टी मिळूनही अर्जुनाला विश्वरुपदर्शन का झेपलं नसेल? उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांमधला हा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्या आयुष्यात. महाभारत वाचलं तेव्हा आणि भगवद्गीता वाचली तेव्हाही या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. म्हणजे अर्जुनाला कृष्णाने दिव्य दॄष्टी दिली आणि तरीही ते विश्वरुप सहन न झाल्याने अर्जुनाने त्याला विनंती केली की 'हे रुप आवरा' हे कायमच वाचत आलेय. पण अर्जुनाला नक्की काय वाटलं? त्याच्या मनात काय विचार आले? का सहन झालं नसावं त्याला? मनाच्या तळात पडून रहाणार्‍या आणि विचारांच्या भोवर्‍यात पुन्हा पुन्हा वर येणार्‍या प्रश्नांतला हा एक. असं वाटलं की त्या एका क्षणात या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सगळ्या जगाला व्यापून उरणारं एकच तत्व आहे हा विचार अध्यात्मिकदृष्ट्या कितीही उदात्त वाटत असला तरी त्याची प्रचिती सहन करण्याची ताकद निर्माण कशी करायची? ही 'मी' आहे.. ती ही 'मी' च.. तो ही 'मी' च.. चराचरात सर्वत्र 'मी' च.. प्रत्येक अन्याय करणार्‍यात 'मी', प्रत्येक अन्याय सहन करणार्‍यात 'मी', त्यासाठी लढणार्‍यांत 'मी', त्याला मारणार्‍यात 'मी'.. क्षुद्र, कातडीबचावू, कोत्या मानसिकतेचं रुप मी आणि महान, उदात्त विचारांचा उगमही 'मी' च.. पिढ्यांन् पिढ्या नासलेल्या अनेक आयुष्यांत 'मी' आणि त्यांना नासवणार्‍या कारणांतही 'मी' च.. प्रत्येक उपाशी झोपणार्‍यांत, औषधावाचून मरणार्‍यांत, कचरा वेचणार्‍यांत.. आणि ह्या सगळ्याला जबाबदार असणार्‍यांत.. हे सगळं बदलायची ताकद असूनही षंढपणे जगणार्‍यांत.. माझा घसा कोरडा पडला, क्षण भर काही जाणवेच ना. असं वाटलं की दु:ख दु:ख दु:ख भरुन आहे सगळीकडे, असं वाटलं की आता माझ्या सगळ्या शरीराचं पाणी होऊन हे सगळं दु:ख डोळ्यांवाटे वाहून जाणार आहे. एका क्षणाने भानावर आले. पाणी प्यायला गेले तर लक्षात आलं, डोळ्यांतून पाणी वाहत होतं. स्टॉप आलाच होता. कसबसं भान एकवटत खाली उतरले.
तो क्षण असह्य होता. माझा अहं कितीही मोठा असला तरी त्याचं असं व्यापक होणं नाहीच झेपलं. कदाचित त्यामुळेच नाही झेपलं. पण अहं मोठा नसता तरी झेपलं असतं की नाही शंकाच आहे. माझ्या लेखी 'मी' फक्त 'मी'च असू शकते. माझ्याइतकीच चांगली, माझ्याइतकीच वाईट. मी अजून कोणी कशी असू शकते? ना मी इतकी चांगली असू शकत, ना इतकी वाईट. आपण किती लक्ष देतो स्वतःकडे? मी किती लक्ष देते. मी अशी आहे, तशी नाही, हे आवडतं, अशी वागते.. पण शेवटी या सगळ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही? आयाम नाही? 'सोSहम्' या एका शब्दांत सगळी उत्तरं एकवटतात हे मान्य करणं अपेक्षेपेक्षा फारच जड होतं. लहानपणापासून जे ऐकत आले त्याची अनुभूती एक क्षणही सहन करु शकले नाही. स्वतःच्या मर्यादांची जाणिव होणं, आणि मुख्यतः त्या मर्यादा इत़क्यातच आल्या हे स्विकारणं अजूनही शक्य नाही झालं. एक क्षणही नाही टिकू शकले मी त्या अनुभूतीपुढे? इतकीही ताकद माझ्यात नाहीये?
आणि नंतर अशाच एका निवांत वेळी या गोष्टीचा विचार करताना आठवला बुद्ध.! बुद्धालाही दु:खाचा साक्षात्कार झाला होता. असं वाटलं की, साक्षात्काराला एक क्षण पुरतो. बाकीचा काळ लागतो तो साक्षात्कार पचवण्याची ताकद मिळवायला. त्यावेळेपर्यंत बुद्ध माहिती होता. आर्यसत्य.. सम्यक जीवन, अष्टांग मार्ग.. पण बुद्ध खरा महान या दु:खामुळे झाला असं वाटलं. या दु:खाची काळीज फाटून टाकणारी जाणिव प्रत्येक क्षणी सोबत घेऊन त्याचं जगणं त्याला बुद्ध बनवत गेलं.
मला बुद्ध होणं शक्य नाही. जे एक क्षण सहन नाही करु शकले त्यासोबत जन्म कसा काढायचा? माझ्या आयुष्यातली सत्य दोनच.. 'अर्जुन'पण असह्य आहे, पण त्यातून सुटका नाही.. आणि 'बुद्ध'पण तर अप्राप्य आहे..
मेरा कुछ सामान ...
इतरांची चंद्रांनी लगडलेली आभाळं कुतूहलाने, काहीशा असूयेनेच पहायचे ते दिवस..
माझं कोरं आभाळ टुकूटुकू बघत रहायचं सैरभैर होऊन, येऊ घातलेल्या चंद्रांच्या वाटेकडे..
एकेक चंद्र जमू लागला आभाळात तसं सजत गेलं आभाळ माझंही..
आता मी च माझ्या आभाळाकडे असूयेनं पहावं असंही वाटू लागलं..
निवडून निवडून आलेला एक एक चंद्र माझ्याकडे..
अगदी माझ्यासारखा.....
दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..
सूर्य आला की मावळायचं असतं हे गृहितच धरलेलं सगळ्यांनी..
वाट सोडून मन मानेल तसं धावावं असं कोणालाच वाटलं नाही,
अगदी हक्काचं आभाळ असूनदेखिल..
मग माझ्यासारखं कोण होतं?
माझ्यासारखं काय होतं?
कोणापाशीच मिळाला नाही चंद्राळण्याचा खुळा अट्टहास..
क्षितिजाकडे झुकता झुकता एकेक चंद्र दुसर्‍या आभाळाचा सूर्य होऊ लागला,
सहजपणे..
जितक्या उत्कटतेने आभाळभर चंद्र सजवलेले,
तितक्याच अलिप्तपणे निरोप देतेय आता एकेकाला...
चंद्र कधीच नाही, फक्त आभाळचं माझं होतं कदाचित..
वेड्या अट्टहासापायी प्रत्येक वेळी कोसळणारं..
प्रत्येक चंद्रासाठी नव्याने उंच उडणारं..
माझं आभाळ कोरंच बरं आहे..
आता चंद्राळण्याचं वजन परत नाही सहन होणार त्याला...
मेरा कुछ सामान ...
एक पल तुम मिलें
एक पल जिंदगी...
एक पल तुम नहीं,
फिरभी एक पल यह जिंदगी..
एक जिंदगी गुजार दूं तुम्हारे होने की खुशीमें..
एक उम्र निकल जाये गम्-ए-इंतजार में..
खुशी ऐसी मिले के गम का एहसास ना हो..
गम ऐसा मिले के फिर कभी खुशी की तलाश ना हो..
एक जिंदगी अगर मिलें एक जिंदगी जितनी..
एक उम्र मुझें नसीब हो एक उम्र जितनी...
एक पल तुम मिलें
एक पल जिंदगी...
एक पल तुम नहीं,
फिरभी एक पल जिंदगी..
यह मिलने बिछडनें का सिलसिला टूंटता कहाँ है?
जिंदगी तो किश्तोंमें मिलती है...!!
मेरा कुछ सामान ...
Las acasias - Spain - 85 min - 2010
खरं सांगायचं तर हा चित्रपट मी स्पॅनिश मनसोक्त ऐकता यावी म्हणून गेलेले. ती भाषा एक मला उगीचच आवडते. पण या पातळीवर साफ अपेक्षाभंग झाला माझा. ५ मि. झाली, १० झाली, १५ झाली.. कोणी काही बोलायलाच तयार नाही. आणि नंतर जे काही संवाद झाले त्यावरुन या चित्रपटात संवाद नाममात्रच असणार आहेत याची जाणिव झाली. पण थिअटर खचाखच भरलं होतं, लोकं बाजूने उभे होते त्यामुळे चित्रपट नक्कीच चांगला असणार हे मी ताडलं आणि बसून राहिले. बसले ते बरंच केलं असं वाटलं सिनेमा पाहिल्यावर. भारी सिनेमा आहे. एक ट्रकड्रायव्हर, त्याच्या ट्रकमधून प्रवास करणारी एक बाई आणि तिची ५ महिन्याची मुलगी. एक मूल सोबत प्रवास करणार म्हटल्यावर काहीश्या त्रासानेच या प्रवासाला सुरुवात होते. अनोळखी माणसांत होईल तेवढंच जुजबी बोलणं. आणि मग अख्ख्या प्रवासात फार काही न बोलताही होत राहिलेला त्यांचा संवाद. तिघांचीही अप्रतिम एक्स्प्रेशनस्.. अगदी त्या ५ महिन्यांच्या बाळाचीसुद्धा..! चित्रपटाची मुख्य गरज, चित्रपटाचा गाभाच त्यांच्या एक्स्प्रेशनस् चा आहे. फार बोलणं होतच नाही दोघांत. अगदी त्यांच्या पूर्वायुष्याची पण जुजबीच माहिती घेटलिये. पण म्हणून कुठे काही कमी वाटत नाही. जी कथा आहे ती अगदी नीट पोहचलिये. छान सिनेमा.!

Voice Over (Zad kadar) - Bulgeria - 2010 - 107 min
विघटनपूर्व सोव्हियतच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना असेल तर हा चित्रपट मस्ट वॉच आहे. त्या एका कालखंडात माणसांच्या वैयक्तिक आयुष्यात चाललेली सरकारची पराकोटीची ढवळाढवळ, व्यक्तिस्वातंत्र्यावरची बंधनं आणि त्यांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम यांचं दर्शन घडवणारा हा चित्रपट. एक कॅमेरामॅन, ज्याचं त्याच्या प्रोफेशन वर प्रचंड प्रेम आहे. त्याच्या मुलाला तिथल्या हवामानाचा त्रास होतोय म्हणून त्याची बायको मुलाला घेऊन बर्लिन ला जाऊन राहते. आणि त्यांच्या संवादातून चित्रपट पुढे सरकत जातो. त्यांची पत्र ज्यांत तिने त्याला बर्लिनला येण्याविषयी लिहिलेलं असतं, त्यांचे फोनवरचे संवाद या सगळ्यांचं इंटर्प्रिटेशन ते हेर कसे करतात आणि त्यातून त्यांचं नातं कसं अफेक्ट होत जातं हे बघणेबल आहे. भारी सिनेमा..

All that remains - Switzerland - 2010 - 92 min
दोन रस्ते.. महासागरांच्या टोकांकडे जाणारे.. दोन वेगळी शहरं.. भिन्न संस्कृती.. या रस्त्यांवरुन चाललेला ४ माणसांचा प्रवास. एकमेकांच्या दिशेला चाललेला पण एकत्र न येणारा.. मध्ये पसरलेल्या समुद्रामुळे. छान संवाद. दोन्ही जोड्यांचं निर्माण होत जाणारं नातं. नकोसं असलं तरी टाकून देता न येणारं आणि त्यातच कधीतरी मग क्म्फर्टेबल होत जाणारं. मस्त सिनेमा.

या व्यतिरिक्त, Moneyball, Anytime anywhere, Palwan fate हे चित्रपटही पाहिले. Moneyball चं दिग्दर्शन भारी आहे. चित्रपटच भारी. पण विंग्रजी सिनेमाविषयी काही खास वाटू नये असाच मोसम होता. Anytime anywhere हा एक तामिळ चित्रपट पाहिला. नेहमीच्या साऊथ इंडियन सिनेमापेक्षा काहीतरी वेगळा, थोडा फार लाईट पण गंभीर शेवटाचा. Palwan fate चा कॉन्सेप्ट तर भारी होता पण सिनेमा बघताना मला झोप लागलेली.. अरेरे पहिली २० मि. पाहिला मग २० मि. झोपले मग परत १० मि. पाहिला आणि बाहेर पडले..

नॉन सिनेमॅटीक हायलाईट म्हणजे, बिग बी ला एका फुटावरुन पाहिलं. त्याच्या मागोमाग रानीला कोणी भाव देत नसताना पाहिलं. पहिल्या दिवशीच्या गोंधळात कोणीही कोणाशी आपणहोऊन बोलताना अनुभवलं (जे कोथरुडात नॉर्मली होत नाही.. डोळा मारा ) मध्येच कधीतरी महेश भट्ट फिरत होता.
याखेरीज, या वर्षांतल्या ठळक घडामोडी..

१) पुने युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनि. चा टाय अप. (२०११)
२) मॅक्सम्युलर आणि FTII च्या सोबत जर्मनीच्या सहकार्याने NFAI मध्ये ३ दिवसांचा जर्मन चित्रपट महोत्सव. (गेल्या १-२ महिन्यांत)
३) पिफ च्या कंट्री फोकस मध्ये जर्मन सिनेमा.
४) बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे जर्मन एन्व्हॉय.
५) बेस्ट सिनेमा, इफ नॉट अस, हु? (जर्मन) डोळा मारा हाहा

असो... तर अशी ही १०व्या पिफची कहाणी सुफळ संपूर्ण.. स्मित
मेरा कुछ सामान ...
Times and winds (Bes vakit) - Turkey - 2006 - 111 min
३ लहान मुलं. एकाला आपल्या वडिलांचा खून करायचाय कारण ते त्याच्यापेक्षा त्याच्या लहान भावावर जास्त प्रेम करतात, दुसर्‍याला आपल्या शाळेतल्या बाई खूप खूप आवडत असतात आणि एक मुलगी, जिच्या घरात नुकतच एक बाळ आलेलं असतं. पौगंडावस्थेत असताना मुलांची मानसिक स्थिती कशी अस्थिर आणि अनप्रेडिक्टेबल असते याचं चित्रण करणारा हा चित्रपट. यांचा सोबती एक अनाथ मुलगा. एका डोंगरावरच्या खेड्यात चाललेलं यांचं आयुष्य, नव्यानेच कळू लागलेल्या काही गोष्टी, भावना.. बदलत जाणार्‍या ॠतूंसोबत त्यांचं बदलत जाणारं विश्व यांची ही कथा. तीन वेगळी आयुष्यं, म्हटलं तर वेगळी म्हटलं तर जोडलेली, या सगळ्यांच्या आतील भावना आणि वरची वागणूक हे सर्वच पहाण्यासारखं. सगळ्यांचा उत्तम अभिनय. उत्तम सिनेमॅटोग्राफी.

The day I was not born (Das lied in mir) German - 2010 - 92 min
एका लहानश्या मुलीचे आई-वडील हिटलरच्या सैनिकांनी उचलून नेल्यावर, त्या कुटुंबाचे मित्र तिला स्वत:कडेच ठेवून घेतात. तिच्या नातेवाईकांपासून लपवून. अर्थात त्यांचं तिच्यावर खूप प्रेम असतं. हीच मोठेपणी स्विमर होते. एकदा स्पर्धेसाठी जात असताना एका एयरपोर्टवर स्पॅनिश बालगीत ऐकून आपल्याला ते गाणं माहिती असल्याचं तिला जाणवतं. आणि इथून चित्रपटाला सुरुवात होते. तिला सत्य समजण्याची वेळ जवळ आलीये कदाचित, हे जाणवून तिचे वडीलही तिथे येतात आणि मग त्यांच्याकडून जेव्हा कळतं की ती त्यांची खरी मुलगी नाही तेव्हा सुरुवात होते तिच्या स्वत:च्या शोधाची. अर्थातच वडिलांचं सहकार्य नाममात्रच लाभतं. त्यांचा जीव तिच्यात खूप गुंतलाय हे जाणवतय पण आपल्या परिवारापासून त्यांनी आपल्याला वेगळं केलय याचा प्रचंड रागही आहे. नवीन भेटलेल्या माणसांवर प्रेम वाटतय पण तितकाच अनोळखीपणाही आहे. या सगळ्या मानसिक स्थित्यंतरांमधून जाणारा तिचा प्रवास छानच मांडलाय.

Belvedere - Bosnian- Herzegovian - 2010 - 90 min
शरीरावरच्या जखमा किती काळ राहतात? आणि भीतीच्या? Belvedere ही अशीच एक महायुद्धातून वाचलेल्या ज्यूंची छावणी. त्यातल्या एका कुटूंबाची कथा. कुटुंबातल्या ३ पीढ्यांची कथा. ज्यातली एक अख्खी पीढी नाहीशी झालिये पण तिचं अस्तित्व कायम जाणवत राहतं. प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात झालेल्या जखमांच्या खुणा वावरतायेत पण पुढची पीढी अगदीच अनभिज्ञ. कधी कधी या खुणा स्विकारायलादेखिल नाकारणारी तर कधी काहीच न समजून गोंढळून जाणारी. अफाट अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन. आजोबा आणि त्यांचा लहानगा नातू. आजोबांच्या २ बहिणी. एकीने अख्खं कुटुंब गमावलय आणि त्यांना कुठे पुरलय याची जागा तरी कळावी यासाठी तिची चाललेली ओढाताण. दुसरीचा फक्त मुलगा वाचलाय, जो अमेरीकन रीअ‍ॅलीटी शो मध्ये जायचं स्वप्न पाहतोय. या सगळ्यांची ही कथा. प्रत्येकाच्या वेगळ्या मनःस्थितीची, सहनशीलतेची, भीतीची.. युद्धातल्या छळाइतक्याच भयानक त्याच्या आफ्टरइफेक्टची.. भीतीच्या जखमा कदाचित माणसाबरोबरच संपत असाव्यात. मस्ट वॉच.

Black Thursday (czarny czwartek) - Poland - 2011 - 105 min
७० च्या सुमारास पोलंड सरकारने अचानक केलेल्या अन्नधान्याच्या भाववाढीबद्दल कामगारांनी दिलेला लढा कसा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला याची ही कथा. ७० चा काळ असल्यामुळे त्या प्रसंगांच्या मूळ चित्रफीती उपलब्ध होत्या. त्यातल्या घटनांची पार्श्वभूमी रंगीत चित्रपट म्हणून दाखवून, ती घटना ओरिजिनल कृष्णधवल स्वरुपातली, अशी या चित्रपटाची मांडणी केलेली आहे. घडणार्‍या घटना इतक्या त्रासदायक आहेत की या मांडणीचं कौतूक चित्रपट सुरु असताना मनात येत नाहीच. संपल्यावरच जाणवतं. मस्ट वॉच यादीतला अजून एक सिनेमा.
मेरा कुछ सामान ...
दर वर्षी नवीन वर्षाच्या चाहुलीसोबतच चित्रपटरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) १२ ते १९ जानेवारीत पार पडला. यात पहायला मिळालेल्या काही चांगल्या सिनेमांविषयी थोडसं....

Here without me (inja bedoone mah) - Iran - 2011 - 100 min
एक इरानची लाईफस्टाईल सोडता हा चित्रपट बघताना काहीच अनोळखी वाटलं नाही. प्रत्येक पात्राच्या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या होत्या की जगातल्या कोणत्याही भागातील माणूस त्या कुठे ना कुठे रीलेट करु शकेल. चित्रपटात तीनच मुख्य पात्र. आई आणि तिची २ मुलं. लग्नाला आलेली अपंग मुलगी जिला अपंगपणामुळे काँम्लेक्स आहे, चित्रपट कथा लिहिण्याची स्वप्न पहाणारा पण परिस्थितीमुळे कारखान्यात काम करणारा तिचा भाऊ आणि या सगळ्यात, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांमध्ये अडकलेली या मुलांची आई. सगळ्याच्या सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या सुंदर व्यक्त होत जातात. त्यांच्या सगळ्या भावना अतिशय पर्सनल असूनही त्यांची तगमग सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात त्या यशस्वी झाल्यात. मुलीचं लग्न तिच्या आवडत्या मुलाशी व्हावं म्हणून चाललेली तिची धडपड पाहताना 'बातो बातो में' मधल्या रोझी ची आठवण आली मला तरी. अर्थात हा सिनेमा गंभीर पण तरीही अंगावर येणारा नाही. काही कथा हॅपी एंडिंग केल्या की फारच फिल्मी वाटतात पण याचं तसं झालं नाही. शेवटाकडे चित्रपट निघाला तेव्हा मी खरच इच्छा करत होते हॅपी एंडिंग हवम आणि ते तसच होतं. अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि उत्कृष्ट अभिनयाचा हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे.

Red heart (Dli sur) - Iraq - 2011 - 78 min
एकमेकांच्या प्रेमात पडलेलं एक किशोरवयीन जोडपं. मुलीची आई नुकतीच वारलेली. घर, भावंडांना सांभाळून शाळा करणारी ती. आणि आपलं दुसरं लग्न व्हावं म्हणून तिला एका वेडगळ मुलाशी लग्नाची सक्ती करणारा तिचा बाप. त्याच्या तावडीतून पळून गेल्यावर त्या जोडप्यावर काय काय प्रसंग येतात याची ही कथा. ऐकिव किंवा वाचून कितीही माहिती असली तरी तिथली परिस्थिती पडद्यावर पाहताना कायमच अंगावर येते.. ह्म्म...

Return Ticket (Dao fu yan liu bai li) - Taiwan - 2011 - 88 min
नवीन वर्षासाठी गावी जाणार्‍या बसेस च्या कमतरतेतून फायद्याच्या उद्देशाने एका बसची एक ट्रिप अ‍ॅरेंज करुन काही कमाई करु पहाणारा एक ग्रुप. त्यांची तिकीटं विकणारी एक बाई आणि तीची घरमालकीण. या ना तय निमित्ताने शांघायमध्ये येऊन राहिलेल्या दोघींची ही कथा. अगदी डायरेक्टली काही गोष्टी न सांगता, दाखवताही दोघींची आयुष्य आपपल्या पद्धतीने बदलत जातात हे चांगलच दाखवलय. शेवटी जिला जायचं नसतम ती घरी जाते आणि जी जायचा विचार करत असते ती जाणं रहित करते. यु नेव्हर नो.. असं काहीसं.. छान चित्रपट..!

Nader and simin: A seperation (Jodaeiye Nadar az simin) - Iran - 2011 - 123 min
Brilliant direction.. हा एकच शब्द सुचतोय मला तरी. अतिशय देखणा अभिनय आणि उत्कृष्ट कथा. चित्रपट बघताना इतकं गुंतायला होतं की डोक्यात इतर काही विचारांना जागाच राहत नाही. चित्रपटाच्या बर्‍याच गोष्टींचे निर्णय प्रेक्षकांवरच सोपवलेत त्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागते. एक घटना, २ कुटुंब. प्रत्येक माणूस आपल्या फायद्यासाठी त्या घटनेचे कसं इंटरप्रीटेशन आणि मॅनिप्युलेशन करतो ते बघताना डायरेक्टर्ला सलाम करावा वाटतो. या घटनेच्या निमित्ताने उच्च आणि कनिष्ट वर्गातली परिस्थिती आणि मानसिकता यांचंही यथार्थ दर्शन होतं. घटना संपून जाते पण आयुष्य चालूच राहतं. आणि हे उर्वरीत सगळं घेऊनच आपण बाहेर पडतो. हॅट्स ऑफ...

Pina - German - 2011 - 100 min
Pina Bousch.. ७०, ८० ची प्रसिद्ध जर्मन नृत्यांगणा. तिच्याच कोरीओग्राफिज वापरुन तिच्या सहकलाकारांनी तिला केलेला हा सलाम. तिच्या सहकलाकारांची तिच्याविषयीची मतं, तिच्या सांगितलेल्या आठवणी आणि डान्सेस यांचं कोलाज म्हणजे हा चित्रपट. डान्सची विशेष आवड असेल तर नक्की पहावा असा..