मेरा कुछ सामान ...
आयुष्यात काही क्षण सुखाचे असतात, काही दु:खाचे, काही रागाचे, लोभाचे.. पण काही क्षण मात्र असे येतात की त्यावेळी त्या भावनेपेक्षा काळिज हलवुन टाकणारी त्या भावनेची तीव्रताच मनात घर करुन रहाते.. अगदी कित्येक वर्षांनी जरी आठवले ते क्षण तरी ते तितकेच तीव्र असतात. असं म्हणतात की काळाबरोबर सगळे रंग फिकट होत जातात. पण काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात....
--------------------------------------------------------------------------------
३रीत असताना शहिद भगतसिंग चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या फाशीच्या वेळेस अक्षरशः धाय मोकलुन रडलेली ती. आणि आईने कितीही समजावलं तरी इंग्रज हा देश सोडुन गेलेत आता यावर कितीतरी दिवस तिचा विश्वास बसत नव्हता.
-------------------------------------------------------------------------------
ती बाबांची वाट बघत शाळेबाहेर उभी होती. समोरुन एक गाडी चाललेली. त्यावरचं बाळ तिच्याकडे आणि ती त्या बाळाकडे बराच वेळची पहात होते. आणि नजरेआड जायची वेळ आली तेव्हा अचानकच ते बाळ खूप गोड हसलं आणि तिला बाय्-बाय करायला हात हलवले त्याने. आज इतक्या वर्षांनंतरही ते बाळ जसंच्या तसं नजरेसमोर येतं तिच्या.
--------------------------------------------------------------------------------
१३-१४ वर्षांची असताना कधीतरी एका हिवाळी रात्री कोणत्यातरी नातेवाइकाकडे सुट्टी घालवताना "दिल ढूंढता है फिर वोही.." ऐकलं होतं. काय समजलं त्यातलं? माहित नाही. पण एक प्रश्नही न विचारता ती आता आयुष्यभरासाठी ते लिहिणार्‍या माणसाच्या प्रेमात पडली होती.
---------------------------------------------------------------------------------
८-९ त असताना तिच्या बिल्डींगमधल्या बांधकामाच्या इथे मांजरीची २ पिल्लं आलेली. ती तासन् तास त्यांच्याशी बोलत बसायची. त्यांना तिची भाषा सगळीच्या सगळी समजते यावर विश्वास होता तिचा. खरतर, त्यावेळेला सगळं जगच गप्पा मारायचं तिच्याशी. हल्ली खूप शांतता असते. तिनेच ऐकायचं बंद केलय का?
---------------------------------------------------------------------------------
हॉस्टेलवर तशी शांतताच होती सेमिस्टर संपल्यामुळे. तिला अजुन घरी जायला २ दिवस होते.
रात्री वळवाचा पाऊस आला. आता असह्य होतं हे म्हणजे. रात्री २ ला पावसात चिंब चिंब भिजत उभी होती ती. आणि त्या धुवांधार पावसात तिला स्पष्ट ऐकु आले सूर. आये ना बालम, का करु सजनी..
----------------------------------------------------------------------------------
फुलवेडीच ती.. सह्याद्रीच्या कुठल्यातरी घाटात हुंदडताना तिने अशीच खूप सारी फुलं गोळा केली होती. त्या गुच्छावर एक फुलपाखरु येवुन बसलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तरी स्तब्धपणे बघत राहिली त्याच्याकडे ते उडुन जाईपर्यंत..
----------------------------------------------------------------------------------
त्यांच्या दाटलेल्या आठवणीने कित्येकदा ती उशीत तोंड खूपसुन रडली होती. आज खूप वर्षांनी ते सगळे चॅटवर एकत्र भेटले. तिला खूप काही बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही सगळे खूप खूप काही आहात माझ्यासाठी. मी कधीही व्यक्त करु शकेन त्याहीपेक्षा जास्त. पण नाही बोलु शकली काहीच. त्या रात्री रडताना पहिल्यांदा परकेपणा दाटलेला.
-----------------------------------------------------------------------------------
रोज संध्याकाळी ऑफिसमधुन घरी येताना त्या फुलवालीकडुन २ रु. ची फुलं घ्यायची ती देवपुजेला. फुलवाली एकदा म्हणाली, "बाई गं, मी कदी कोनालाच २ रु. ची फुलं देत नाही. पन तुला न्हायी म्हनायला जमतच नाही बघ." कशानेतरी हवेवर तरंगल्यासरखं झालं तिला काही काळ नक्कीच...
मेरा कुछ सामान ...
घालोत वाद नेते, आपण चिडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये..

असतात भास सारे, काही खरे नव्हे
येता सुगी जराशी, कोणी उडू नये..

येईल दु:ख आता, जळता उगाच का?
पण तोवरी सुखाचा, डंका झडू नये..

आहेच अंत याला, सोसायचे किती
रामायणे पुन्हा रे, असली घडू नये..

का आज टोचली रे, मजला मिठी तुझी
पैलूस रे हिर्‍याचे, कोंदण नडू नये..

तो देश चांदण्यांचा अन् वाट दूरची
घालेल घाव नियती, आपण अडू नये..

करुया करार आता नात्यात आपल्या,
तू बोलवू नये अन् मी तडफडू नये..
मेरा कुछ सामान ...
खूप छान धुकं असायचं तेव्हा आपल्यामध्ये..
नाव, गाव, रंग, रुप यातल्या कशाचाच परिचय नसताना
फक्त एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं..
आश्वासक.. हवहवसं.. गुलाबी..
गहिरं, अधीरं.. लोभस..
तुझेपणाच्या, माझेपणाच्या
सगळ्या कक्षा सामावुन घेणारं..
ओळखीचे चकवे दाखवत हळुच,
अनोळखी होवुन जाणारं..
समजतयं असं वाटेपर्यंत,
अवघड होवुन बसणारं..
अज्ञाताच्या सोबतीने सुरु केलेला स्वतःचा शोध,
स्वतःची होत जाणारी नविनच ओळख..
तू त्या शोधात फक्त सोबत होतास..
किंवा निव्वळ तू अस्तित्वात असल्याची जाणिव..
तुही कदाचित नव्याने पाहिलंस स्वतःला
माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेची सोबत घेवुन..
मग कोणत्या क्षणी महत्वाचा झाला तुझा परिचय स्वतःच्या ओळखीपेक्षा?
का जंग जंग पछाडले त्या परिचयासाठी?
ह्म्म...
शेवटी एकदाचा झाला
तुझा माझा परिचय..
पण त्याच क्षणी वितळुन गेलं ते धुकं..
नविन सापडु शकले असते असे काही चेहरे,
पुन्हा हरवुन गेले त्या धुक्यासोबत..
अजुनही वाट चालतोय आपण एकमेकांच्या सोबतीने..
पण आता काही हुरहुर नाही..
कसलंही काहुर नाही..
स्वतःविषयी काही नविन शोधही लागत नाही आताशा..
फक्त तुझ्याकडे बघताना कधी कधी वाटतं,
खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये.....
मेरा कुछ सामान ...
सावित्री.. पु.शि.रेगेंची एक सुंदर कलाकृती.. ३-४ वर्षांपुर्वी मी पहिल्यांदा वाचलं हे पुस्तक आणि मग वाचतच राहिले अनेकदा. कधी उत्कट प्रीतीभावना मनात असताना, कधी विरहाचं दु:ख गोंजारताना तर कधी सन्यस्त, उन्मन अवस्थेत.. प्रत्येक वेळेस मला नवीच साऊ भेटली. नव्याने कळली. तरी प्रत्येक वेळी तितकीच भावली. कधी माझंच एक रूप माझ्यासमोर बसुन माझ्याशी बोलतंय असं वाटलं तर कधी आकाशाएवढी मोठी साऊ माझ्याचसाठी म्हणुन शब्दातुन बरसतेय असं वाटलं.
आज साऊची आठवण येण्याचं तसं काही कारण नाही. खरं पहाता ती सततच माझ्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी असते, तिची वेगळ्याने काय आठवण काढणार म्हणा.. पण आयुष्यात अगदी सहजच कधीतरी भेटलेली माणसं, कविता, पुस्तकं किंवा काही व्यक्तिरेखा इतक्या आपल्या बनुन जातात आणि आपण कधी फारसं बोलतही नाही त्यांविषयी. पण आज असं वाटतय की सांगावं साऊला.. कदाचित तिला सांगता सांगता ती मला आणि मी पण स्वतःला अधिक उमगुन जाईन.
एक म्हातारी आणि तिची एक छोटी नात- लच्छी गावाबाहेर दूर रानापाशी रहात होती. एकदा म्हातारीच्या झोपडीपाशी एक मोर आला. मोराला पाहुन लच्छी नाचु लागली. मोरही नाचु लागला.. लच्छीने हट्ट घेतला की मोराला अंगणातच बांधुन ठेवावं. म्हातारी म्हणाली, "ते कसं होणार? आपल्यापाशी त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठे आहे?" दोघींचा काही निर्णय होईना. तेव्हा मोरच म्हणाला, "मी इथेच जवळपास राहीन. मला दाणागोटा काही नको. रान तर सारं भोवतालीच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हा लच्छीनं आधी नाचलं पाहिजे. ती जेव्हा नाचायची थांबेल तेव्हापासुन मीहि येणार नाही. अट साधी होती. लच्छी लगेच कबुल झाली. म्हातारीचंहि काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं तर मनहि तसंच हवं. लच्छी तेव्हापासुन सतत आनंदीच राहु लागली. मोर कधी, केव्हा येईल याचा काही नेम नसे. पुढं पुढं मोर येवुन गेला की काय याचंही तिला भान रहात नसे.
पहिल्या पानावरच्या या पहिल्या कथेपासुन हे पुस्तक सरळ काळजाला भिडतं ते थेट शेवटच्या ओळीपर्यंत.. किती किती आणि कसं सांगायचं? साऊविषयी लिहायचं तर तेही तिच्यासारखंच सुरेख आणि सुरेल हवं ना. मनात फुटणार्‍या उत्कटतेच्या अनिवार लाटांना आवर घालत संयतपणे उभ्या असलेल्या तिच्या मनाच्या किनार्‍यासारखं.. पण त्याचवेळी त्या लाटांचा पुर्णपणे आदर करणारं.. त्यांच्या सामर्थ्याची जाणिव असणारं.. उत्कट पण संयत.. उत्तुंग पण अलवार.. कणखर पण लोभस असं काहीतरी..
हे पुस्तक तसं अगदीच छोटं. शंभर एक पानांचं. ग्रीटिंगच्या आकाराचं आणि त्यातल्या संदेशाइतकाच मजकुर प्रत्येक पानावर असलेलं. पण माझ्यासाठी एखाद्या अखंड कवितेसारखंच आहे ते.. एखाद्या मुक्तकासारखं.. साऊ ने लिहिलेल्या प्रेमपत्रांचा (नुसतं पत्रांचा म्हणु वाटल्यास) हा प्रवास.. दुसर्‍या महायुद्धातल्या काळातला.. त्या पार्श्वभुमीवर तिची आणि त्याची पत्रातुनच उलगडत जाणारी ही कथा. तीसुद्धा फक्त सावित्रीच्याच पत्रातुन मांडलेली.
तिचं माणुस म्हणुन हळु हळु प्रकट होत जाणारं रुप जितकं लोभस, तितकाच खिळवुन ठेवणारा तिचा प्रवास.. या काळात तिला आलेले अनुभव, भेटलेली माणसं हे सगळं तिच्या नजरेतुन पहाताना आपण आपल्याही नकळत अंतर्मुख होवुन जातो. पण तरिही तिच्याविषयी उत्सुकता रहातेच. हा प्रवास फार फार सुरेख मांडलाय पु.शि. रेगेंनी. तात्विक गोष्टी पण अशा काही खुबीने पेरल्यात की जणु एखाद्या भावगीतात लागलेला लखलखता शुद्ध पंचम.
साऊचं आपल्याला भेटणारं हे रूप म्हणजे एखाद्या सुंदर चित्राच्या एखाद्या भागासारखं आहे.. जे दिसलेलं असतं ते सुंदर असतच पण जे दिसु शकत नाही ते किती रंगीबेरंगी असेल हे कुतुहल दाटतंच मनात आणि तरिही हे अपुर्णत्व टोचत रहात नाही. एखादा सुखावणारा सल असावा तशी ही कळ!
त्या पुस्तकाची कथा सांगणं हा काही उद्देश नाहीये इथे. कारण हे पुस्तक अनुभवायचं पुस्तक आहे. कवितेविषयी प्रेम असणार्‍यांनी तर आवर्जुन वाचावं असं. तिच्या लिखाणातली आर्तता जशी जाणवते तसं आपणही उत्कट होत जातो. "पण तिला सोसत नाहीत शब्दांच्या बंदिषी" असं ती म्हणते तेव्हा तिच्याइतकेच हळवे होतो. बालपणातील कोमलता, हळवेपणा आपल्याच नकळत हळुच निसटुन जाऊन जेव्हा बोथट झालेल्या भावना 'स्थितप्रज्ञ'तेच्या नावाने आयुष्यात आल्याची जाणिव होते तेव्हा काळजात येणारी कळ ही ज्याची त्यानेच अनुभवुन बघायला हवी. एखाद्याच्या समर्पणाची जाणिव, त्याची तीव्रता आपल्या डोळ्यात जे अश्रु आणते त्याची चव आपणच चाखायला हवी. "मला माझं मन समजुन घ्यायचं आहे. माझं समजलं की मग तुमचं पण समजेल.." हे वाक्य वाचुन यातल्या आपल्याला भावलेल्या सगळ्या छटा आपणच निरखुन पहायला हव्या. पण तिच्या सुख-दु:खांशी एकरुप होत चाललेला आपला हा प्रवास आपल्याला खूप काही देवुन जातो हे मात्र नक्की.
शेवटी विश्लेषणात अडकुन तरी काय मिळणार आहे? साऊ म्हणते त्याप्रमाणे,"विश्लेषणाने काहीच साध्य होत नाही. आपण आपल्यालाच पारखे होतो." साऊ ही अशीच विश्लेषण न करता अनुभवणार्‍याला भेटु शकते.. म्हणुनच पुस्तकाचं 'साहित्यिक रसग्रहण' किंवा 'परिक्षण' वगैरे न करता आज मीही तुमच्यासमोर ठेवलिये मला भेटलेली, भावलेली साऊ.
मेरा कुछ सामान ...
बस्स...!
आज मला तुला सांगायचचं आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे..
अगदी सोबत वाढलो आपण आजवर,
पण हे सांगायची संधीच कधी मिळाली नाही..
किंवा प्रत्येक वेळी तुला समोर पाहिल्यावर तुझ्या रुपात इतकं हरवायला व्हायचं की,
हे सांगायचं भानच राहिलं नाही कधी..
मला तुला सांगायचय की,
उमलणारी कळी बघुन तुझ्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद
किंवा चुकलेलं पाखरु पाहुन तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू पाहिले नसते तर,
कित्येक क्षणांमधून आयुष्य असच निसटुन गेलं असतं..
अन्याय बघुन चिडलेलं आणि दुसर्‍याच्या दु:खाने पोळलेलं तुझं मन
तू माझ्यासमोर व्यक्त केलं नसतस, तर कदाचित मलाही कधीच समजलं नसतं
आयुष्याचं मर्म..
तू सतत माझ्या सोबतच होतिस,
पण मध्येच कधीतरी जाणवलं गं..
खूप खूप मोठी झालीस तू...
कसं जमवलस हे..?
कधी माझ्या नकळत आकशाएवढा समजुतदारपणा,
सागराएवढं दु:ख आणि
धरणीची सहनशीलता ल्यायलीस तू?
बरं ते नको सांगुस..
पण मी खूप लहान आहे तुझ्यापुढे म्हणुन मला सोडुन जाऊ नकोस गं..
अगदी 'अडगुलं मडगुलं' पासुन
'संधीप्रकाशात अजुन जो सोने' पर्यंतचा आपला प्रवास..
तू या प्रवासाची सच्ची साथीदार आहेस...
माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.!
कविते,
तू माझी व्हेलेंटाईन आहेस...!!!
मेरा कुछ सामान ...
जीवनावर संधिछाया लागल्या पसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..

दात माझे, ओठ माझे, दोष कोणाचा असे
चेहरे माझेच होते, मजसवे भांडायला...

मांडला बाजार ज्यांनी ते पुजारी थोर रे
देव आता मंदिरातुन लागला निसटायला..

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...

उदर भरता छान होती दशदिशा स्वर्गापरी,
लागते पण भाकरी असली क्षुधा शमवायला..
मेरा कुछ सामान ...
सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...
मेरा कुछ सामान ...
असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...

कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...

नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...

नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्‍यात मिसळून जावे...

नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...

नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...

अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...

पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे...
मेरा कुछ सामान ...
मुन्ना:- बिहारमधून वयाच्या ८व्या वर्षी या मायानगरीत आलेला, दिवसा धोबी आणि रात्री उंदीर मारायचा काम करणारा.. bollywood  मध्ये स्टार व्हायची स्वप्न बघणारा..एक धोबी म्हणूनच शायला भेटलेला आणि मग तिच्या फोटोग्राफीसाठी तिला मदत करणारा आणि त्याबदल्यात स्वत:चा पोर्ट-फ़ोलिओ बनवून घेणारा.. A character full of life, hope, sensitivity...
शाय:- investment  banker  from  Newyork .. हौशी फोटोग्राफर..एका प्रदर्शनात अरुण ला भेटलेली... अरुणकडे आकर्षित झालेली..
अरुण:- मनस्वी, चाळीशीतला चित्रकार.. divorced ... नवीन घरात shift  झाल्यावर तिथे त्याला काही video tapes  सापडतात.. यास्मिन नूर च्या...
चित्रपटाला तिचंच narration  आहे फक्त.. तिने तिच्या भावाला पत्र पाठवण्याऐवजी त्याच्यासाठी बनवलेल्या tapes ... कळत नकळत अरुण पण तिच्या विचारांकडे ओढला जातो..तिच्या भावनांत गुंतत जातो... तिला शोधायचा प्रयत्न पण करतो...
 कोणत्या न कोणत्या धाग्याने एकमेकांशी बांधली गेलेली चार माणसं आणि त्यांचा एका कालखंडातला प्रवास..प्रत्येकाच्या कथेची गुंफण सुंदर प्रकारे केली आहे आणि शेवटाकडे जाताना व्यक्तिरेखा पण अशाच स्पष्ट होत जातात... एक चित्र पुरं व्हायला लागणाऱ्या काळातला प्रवास.. म्हटल तर धोबी घाट कथा आहे या काळाची..अरुणच्या त्या चित्राची..  मुन्नाच्या स्वप्नांची... शायच्या शोधाची... यास्मिन च्या जगण्याची... मुंबई डायरिज हे चित्रपटाचे नाव अगदी सार्थ ठरवलंय या चित्रपटाने... एखाद्या डायरी मधल्याच एका काळाची कथा, एक भाग वाटतो हा.. यातल्या प्रत्येकानेच आपलं काम इतक सुंदर केलंय की कोणाला कमी म्हणावं आणि कोणाला सरस म्हणावं.. चित्रपटाचा अजून एक plus point  किव्वा किरणचा strong  point  म्हणू आपण हवं तर...पण हा चित्रपट बननेला नाहीये.. हा तिने बनवलाय.. आणि हा बनण्यापूर्वी जसाच्या तसा तिच्या डोक्यात होता आणि त्याचप्रमाणे बनवला तिने तो.. Its a perfectly planned and imiplemented work...
आमीर खान सारखा गुणी कलाकार पुरेपूर वापरला गेला नाहीये हे कुठेतरी खटकत रहात.. इतर सगळ्या व्यक्तिरेखा जितक्या स्पष्टपणे व्यक्त झाल्यात, रंगल्यात तितका 'अरुण' रंगला नाहीये.. त्याचा मनस्वीपणा, विचार, भावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगांची कमतरता जाणवत रहाते.. चित्रपटात आमीरला कमी वाव मिळाल्याची भर climax त्याच्यावर चित्रित करून भरून काढली आहे.. अर्थात त्याच्या अभिनयाची वेगळ्याने प्रसंशा करण्याची गरजच नाही इथे..
लिहायचं म्हटलं तर direction मधल्या बारकाव्यांविषयी, कथेतील बारीक सारीक जागांविषयी बरंच लिहिता येईल.. पण ते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणं आणि अनुभवणच असत छान आहे.. जाता जाता इथे चित्रपटाच्या पार्श्वसंगीताविषयी उल्लेख न करणं म्हणजे विषय अर्धवट सोडणं आहे.. Gustavo Santaololla च्या संगीतासोबतच पावसाच्या वेळी, चित्र काढतानाच्या वेळी ठुमरीचा वापर प्रसंगांना खूपच उठाव आणणारा आहे..
हा चित्रपट निश्चितच हिंदी चित्रपटाची समीकरणं बदलणारा आहे.. या आधी असे प्रयोग झाले नाहीत असं नाही..पण ते प्रयोग प्रायोगिक किव्वा class फिल्म म्हणूनच मर्यादित राहिले...रजत कपूर, विनय पाठक आणि त्यांच्या टीम ने खरच काही सुंदर कलाकृती दिल्या आहेत... मला सध्या आठवतोय तो त्यांचा मिथ्या चित्रपट... त्याच्या विषयी बोलायचं तर सगळं तेच लिहावं लागेल.. पण सांगायचं यासाठी की हे असे काही चित्रपट art  फिल्म म्हणूनच बघितले गेले...
किरण ने कुठेतरी स्वत:च्याच मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तिचा world सिनेमा च्या मार्केट मध्ये उभा राहू शकेल, पसंतीस उतरू शकेल असा सिनेमा बनवण्यात इंटरेस्ट आहे.. पण माझ्या मते तिचा सिनेमा आर्ट फिल्म च्या नावाखाली अडकून पडलेला उत्तम सिनेमा प्रेक्षकांपर्यंत एक दर्जेदार commercial सिनेमा म्हणून पोहचवू शकेल.. माझा एक खूप आवडता mexican director आहे, Alejandro inarittu..  त्याच्या पद्धतीचा एक खूप हलकासा प्रभाव जाणवला मला आणि जो बॉलीवूड साठी खरच वेगळा आणि स्तुत्य आहे.. बॉलीवूड मध्ये ज्या प्रकारच्या चित्रपटाची मी इतके वर्षे वाट पहात होते ते समोर आल्याचं बघून खरच आनंद होतोय आज.. इथम पुढे Indian cinema म्हणजे फक्त नाच, गाणी, कॉमेडी न रहाता एक दर्जेदार कलाकृती म्हणून समोर येतील अशी इच्छा करते...
मेरा कुछ सामान ...
हा पहा हा चाललेला थोर मेळा
पाप स्वप्नी पण असे तोरा निराळा..

आज संधी लाभली अन बोलला तो
पापण्यांच्याही पहार्‍यातून डोळा..

राजहंसा ना तमा ह्या कावळ्यांची
होऊ दे वाटेल तितकी फौज गोळा...

गे, बटा का परत आणे चेहर्‍यावर
का हवा वार्‍यास वेडा हाच चाळा..

बोलती रागावल्या गोपी कुणाला
जा.. नको ना माठ फोडू खोडसाळा..

रंग माझा वेगळा हे जाणते मी
पांढरा वाटो कुणा वाटेल काळा..
मेरा कुछ सामान ...
जिथे तिथे का दिसशी मजला, तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..
 
भिनून जावा नसानसातून, दंश असा दे, मला नव्याने
नको म्हणाले किती तरीही, मनात त्याला रुकार आहे..
 
खुणावणारे क्षितीज आता, कथे मला हे असे तराणे,
तिथे नवे ने सुरेल जगणे, जिथे आता अंध:कार आहे..
 
झुलायला मी दु:ख-सुखाचे, अविरत येथे झुलले झोके,
इथून पुढचा हरेक क्षण जीवना तुझ्यावर उधार आहे..
मेरा कुछ सामान ...
खोटे तुझे उमाळे, भुलण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही...

माझे म्हणू असे मी, कोणी न राहिलेले
गणती फुका सुखाची, करण्यात अर्थ नाही...

झाले कुठे जरासे आसू स्वतंत्र माझे
झाले हसेच त्यांचे, रडण्यात अर्थ नाही..

सांभाळले जरी मी, विरलेच व्योम अंती,
आता तयात तारे, विणण्यात अर्थ नाही..

उरली न ती खुमारी, स्वप्नातल्या क्षणांना
रात्रीवरी उगाचच, रुसण्यात अर्थ नाही..

सांगू कसे कुणाला, आले कुठून कोठे
खोट्या दिशा कि भाग्यच्?, पुसण्यात अर्थ नाही...

मृत्यू दिला तुम्ही जो, स्वीकारला सुखाने
आता दुवा जिण्याची, देण्यात अर्थ नाही..