मेरा कुछ सामान ...
अ‍ॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अ‍ॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अ‍ॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. त्यामानाने अमेरीकन अ‍ॅनिमेशन अजून तरी 'फक्त प्रौढांसाठी' या विभागात तशी मोजकीच आहेत.
अर्थातच यात डिस्नेचा सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तो मान्य करुनही पिक्सरने बनवलेली अ‍ॅनिमेशन जास्त गोड, गोंडस, लोभसवाणी वाटतात हे मान्य करायलाच हवं. २००६ मध्ये डिस्नेने पिक्सर विकत घेतली खरी तरीही पिक्सर च्या नावाखाली बनणार्‍या चित्रपटांचं वलय काही कमी झालं नाही. या बॅनरखाली बनणारे चित्रपट आणि त्यातील पात्रं मनात घर करुन जातात हे नक्की. मग तो 'टॉय स्टोरी' मधला 'वूडी' असो की 'मॉन्स्टर्स' मधला 'सुली'. 'फायंडिंग निमो' मधला 'मार्लिन' असो की 'अप' मधला 'रसेल'.
फक्त एखाद्या ठराविक साच्यामधल्या नीतीकथा किंवा सुष्ट-दुष्ट संघर्ष दाखवण्यापलीकडे या चित्रपटांमध्ये बरंच काही दाखवलं गेलंय. माणसांचे राग, लोभ, प्रेम, माया, स्वार्थ, भीती, दुष्टपणा.. सगळंच... आणि फक्त इतक्यावरच न थांबता माणसाच्या अशा वर्तणूकीला त्याची परिस्थिती जबाबदार असते, असू शकते आणि प्रेमाचा, सहकार्याचा हात मिळाला तर माणूस कोणतीही, कितीही त्रासदायक परिस्थिती बदलू शकतो या सगळ्या गोष्टी कोणताही उपदेशाचा आव न आणता अतिशय मनोरंजक रीतीने आपल्यासमोर उलगडत जातात. आणि हे मनुष्यीकरण (humanization) ते कोणत्याही, अगदी कोणत्याही वस्तूला लागू करु शकतात. आणि ते ही इतक्या चपखल की आपण प्रेमातच पडावं त्यांच्या. 'कार्स' मधल्या गाड्या, 'वॉल-इ' मधले रोबोटस्, 'टॉय स्टोरी' मधली खेळणी, 'रॅटाटूई' मधला उंदिर या सगळ्या मनुष्येतर गोष्टींचं इतकं छान चित्रण केलंय की ही पात्रं माणसांइतकीच आपल्या जवळची होऊन जातात. रडत, धडपडत, थोडं घाबरत चाचरत आपल्या आतल्या भीतीवर मात करत नवा रस्ता शोधणारे हे सगळे जण मग आपलंच रुप वाटायला लागतात.
चित्रपटाचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं यश यातच सामावलेलं असतं की किती लोकं तिच्याशी नाळ जोडू शकतात, रिलेट करु शकतात. त्यामुळेच प्रत्येक काळाच्या मानसिकतेनुसार त्या त्या काळाचे नायक-नायिकांचे साचे बदलत गेलेले आपल्याला पहायला मिळतात. पण हे निर्जिव किंवा मनुष्येतर प्राण्यांच्या संदर्भात करणं किती जोखमीचं काम असेल याची कल्पना ते काम करणार्‍यांनाच असावी. आणि असं जोखमीचं काम असूनही पिक्सर त्यात दर वेळी उत्तमरित्या यशस्वी होत आलेत हे नक्की..
जपानी अ‍ॅनिमे मात्र जरा गंभीर मामला आहे. त्यात हलकेफुलके चित्रपट नाहीतच असं नाही पण त्यातल्या गंभीर विषयांचं प्रमाण आणि प्रत बघता त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. पहिल्यांदा असा गंभीर चित्रपट पाहिला तेव्हा अ‍ॅनिमे ही काय भानगड असते हे मला माहिती नव्हतं. आणि चित्रपट होता, 'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या एका बहिण-भावाभोवती फिरते. हल्लीच माझ्या वाचनात आलं की ही अकियुकी नोसाका यांच्या खर्‍या आयुष्यातली घटना आहे. हा चित्रपट पाहिला तेव्हा रडू आवरेचना. अर्थात चित्रपट फार सुंदर आहे आणि माणसाचं माणसाशी वेदनेच्या पातळीवर असं जोडलं जाणंही तितकच खरं. पण चित्रपट झाल्यावर, रडून झाल्यावर विचार आला की काय म्हणून लहान मुलांनी असे चित्रपट पहावेत? आणि मग त्यावेळी मला भावाकडून कळालं की हा लहान मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. अ‍ॅनिमे वगैरे वेगळा प्रकार असतो. मग मात्र वेड्यासारखी या चित्रपटांच्या पाठी लागले मी. किती किती विषय आणि किती भावगर्भ चित्रपट. आणि काही तर इतके गुंतागुंतीची की त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी हॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर 'घोस्ट इन द शेल' वर बेतलेला 'मॅट्रिक्स' किंवा 'पॅपरिका' वरुन नोलान ला सुचलेला 'इनसेप्शन'. या चित्रपटांच्या विषय वैविध्यामुळे आणि गुंतागुंतीमुळे जसं थक्का व्हायला होतं तसंच त्यात जाणवणार्‍या तीव्र जपानी संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या दर्शनानेदेखिल.बर्‍याचदा विदेशी चित्रपट म्हटले की त्यात अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांचाच भरणा असतो. अर्थात त्यांचं श्रेय तेवढं आहेच या उद्योगाला पण ते सगळे चित्रपट थोड्या फार फरकाने एकाच मातीतले, एकच संस्कृतीचे वाटतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर इराणी किंवा जपानी चित्रपट नजरेला, मनाला आणि बुद्धीलाही सुखावणारे, वेगळं काहीतरी बघितल्याचं समाधान देणारे वाटतात. पाश्चिमात्यांच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती पण त्याच वेळी जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीची मर्मस्थानं ज्या कसोशीने जपली आहेत किंवा त्यात काळानुरुप बदल केले आहेत ते बघून कौतुक वाटायला लागतं. Spirited away, Howl’s moving castle, Secret world of arrietty, princess mononake.. स्वप्नकथेपासून अगदी ग्लोबलायझेशन, क्लायमेट चेंजपर्यंत कोणत्याही विषयावर आणि साध्या कौटुंबिक, आत्मचरीत्रात्मक ते sci-fi पर्यंत सगळ्या प्रकारात जपानी अ‍ॅनिमेशनने बाजी मारली आहे. पण हे असं ग्लोबल आणि प्रगत होत असतानाही चित्रपटभर तीव्रतेने जाणवणारा जपान फॅक्टर अनुभवायला भारी वाटतो. जणू काही दोन तास दुसर्‍या जगाची सफर करुन आलो आपण.
असाच काहीसा अनुभव 'पर्सेपॉलिस' आणि 'वॉल्ट्ज विथ बशीर' बघताना आला. 'पर्सेपॉलिस' हा चित्रपट त्याच नावाच्या आत्मचरीत्रात्मक चित्र-पुस्तकावर (कॉमिक बुक) बेतलेला आहे. ज्यात लेखिकेने इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या आधीच्या आणि नंतरच्या आयुष्याचं चित्रण केलं आहे. तसंच 'वॉल्ट्ज विथ बशीर' या इस्त्रायली चित्रपटामध्ये अंशतः स्मृती हरवलेला एक सैनिक लेबॅनॉन युद्धातल्या त्याच्या भूतकाळाचा शोध घेताना दाखवलाय. हाही चित्रपट खर्‍या घटनांवर बेतलेला आहे. पण हे असे चित्रपट विरळाच. मक्तेदारी म्हणावी अशी अमेरीकन आणि जपानी चित्रपटांचीच.
हे सगळं आठवण्याचं कारण? उगाच विचार करताना वाटलं बिम्मच थोडा मोठा होऊन रसेल बनतो आणि तोच पुढे जाऊन लंपन होतो. (जी.ए.कुलकर्णींच्या धीरगंभीर आणि गूढ व्यक्तिमत्वाशी विसंगत असे लहान मुलांसाठी 'बखर बिम्म ची' नावाचे एक भन्नाट पुस्तक त्यांनी लिहिलय. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं असंच पुस्तक आहे ते.) आणि मग विचार आला की आपल्याकडे को बिम्म आणि लंपनच्या रुपाने आनंदाचा खजिना आहे तो कधी असा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून जगासमोर येणार?
वास्तविक या सर्व चित्रपटांवर स्वतंत्र लेख होतील इतके भारी चित्रपट आहेत हे, पण त्यावर नंतर कधीतरी.. सवडीने. तूर्तास मात्र बिम्म आणि लंपनच्या संदर्भात पडलेले अनुत्तरीत प्रश्न घेऊनच थांबते.