मेरा कुछ सामान ...
रागावलेल्या माणसाने
बुद्धाला दिलेल्या शिव्या,
बुद्धाने स्विकारल्या नाहीत..
आणि कोणतीही न स्विकारलेली भेट
राहते देणार्‍याजवळ...
तसा त्या माणसाचा रागही त्याच्याच जवळ राहिला..
बुद्ध निघून गेला,
नेहमीच्या अफाट स्थितप्रज्ञतेने..
पण त्या माणसाचं काय झालं?
तो कुठे गेला त्याचा राग घेऊन?
त्याच्या मनात केवळ बुद्धासाठी जन्मलेला राग घेऊन?
पुढे जाऊन तो राग त्याने आणखी कोणावर काढला का?
दिल्या का आणखी कोणाला शिव्या?
जे कोणी स्विकारेल त्याला?
पण केवळ बुद्धासाठीच जाणवलेला राग..
आणखी कोणाला देणार तरी कसा?
मग परत कोणावर रागावलाच नाही का तो आयुष्यात कधी?
त्या माणसाचा आणि त्या कथेचा ,
खरा शेवट कळलाच नाहीये मला कधी..
आणि स्वतःचाही..
तू न स्विकारलेलं माझं प्रेम घेऊन आता मी कुठे जायचंय?