मेरा कुछ सामान ...
कालच सर्फ ची एक जाहिरात बघण्यात आली. (जाहिरातीचे काही डिटेल्स चुकले असले तर सॉरी. नेट वर मिळत नाहीये मला ती अ‍ॅड..) दोन म्हातार्‍या बायका चहा घेत गप्पा मारत असतात, "आमच्यावेळी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा ६ रुपये पगार होता. आणि आज माझी सून माझ्या मुलापेक्षा जास्त कमवते. किसने सोचा था औरते इतना आगे चली जाएंगी? आजके जमानेमेंही औरत बनने का मजा है.." मागे सून लॅपटॉपवर काम करत असते. आणि इतक्यात तिचा नवरा खाली येतो आणि विचारतो "मेरी शर्ट धोयी नही क्या?" त्या बोलणार्‍या दोन्ही बायका चमकून बघतात आणि टॅग लाईन येते, "Is washing just a women's work/job?" आणि मी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला, म्हटलं, "Thank God! Finally... Something sensible.. at last.."
एकीकडे काही मूर्ख ढोंगी अभिनेत्रींचे बिनडोक व्हीडीओ व्हायरल होत असताना, ३० सेकंदांमध्ये सांगितलेली ही वस्तुस्थिती खूप मार्मिक आहेच पण जाहीरातींसारखी सेक्सिस्ट इन्डस्ट्री जेंडर रोल ब्रेक करताना दिसतेय ही सुद्धा एक समाधानाची बाब आहे.
मिडीया.. जाहिराती.. चित्रपट.. त्यातही मनोरंजन क्षेत्र आणि मार्केटींग क्षेत्र यांना बर्‍यापैकी मेडीऑकर रहावं लागतं, मध्यम आणि लोकप्रिय मार्ग स्विकारावे लागतात, किंवा या क्षेत्रातल्या बहुतेक स्ट्रॅटेजीज तरी तशा असतात. लोकांना पचेल रुचेल इतपतच फिलॉसॉफी ते मांडतात कारण कदाचित त्यांच्या पैशाचं गणित त्याच्यावर अवलंबून असतं. चित्रपटांमधल्या स्त्रियांच्या इमेजबद्दल जितकी चर्चा होताना दिसते तितकी जाहिरातीतल्या इमेजबद्दल होत नाही. झालीच तरी ती अंगप्रदर्शनाच्या पुढे जात नाही. पण अंगप्रदर्शनाच्याही पुढे रोजच्या जगण्यातल्या स्त्रीचं चित्रण या जाहिरातीत कसं होतं यावर खोलवर विचार कधी झालाय का? झालाच असेल तर तो जाहिर मांडला/चर्चिला गेलाय का?
जाहिरात या माध्यमाची ताकद तशी आता कोणाला नवीन नाही. कोणी कितीही नाकारायचं ठरवलं तरी त्यांचा प्रभाव आणि परीघ कोणी नाकारु शकत नाही. चित्रपट, मालिका, साहित्यं किंवा इतर कशाहीपेक्षा आपण जाहिरातींना जास्त एक्स्पोज होत असतो. त्यामुळे जाहिराती रोजच्या जगण्याबद्दल काय सांगतायेत हे खूप महत्वाचं ठरतं.
जन्मापासून मरेपर्यंत लागणार्‍या प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जात असताना त्यात स्त्री ज्याप्रकारे उभी केली जाते ते खरच चिडचिड करणारं आहे. बाळाची काळजी फक्त आईलाच असते का? बापाला नसते? कुछ मांएं डॉक्टर होती है म्हणून त्यांना कळतं बाळासाठी कोणतं डायपर वापरायचं, कोणता साबण वापरायचा, कोणता टीश्यु वापरायचा.. एकाही डायपरच्या अ‍ॅडमध्ये बाप का असू नये? पुरुष जेव्हा डॉक्टर असतो तेव्हा तो लॅब मध्ये संशोधन करत असतो किंवा कुठेतरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये पेपर वाचत असतो पण बाई जेव्हा डॉक्टर असते तेव्हा ती मुलांच्या डायपरमध्ये, घराच्या निर्जंतुकीकरणात आणि हेल्थ ड्रिंकमध्येच गुंतलेली असते. एकही पुरुष असं म्हणताना दिसला नाहीये की "मै एक बाप भी हुं और डॉक्टर भी.." बाई जेव्हा इंजिनिअर असते तेव्हा तिला घरात कोणती गॅझेट्स वापरायची आणि ऑफिस आणि घर स्मार्टली कसं मॅनेज करायचं हे जास्त चांगलं कळतं. बाई बदाम खाते, स्वतःची काळजी घेते कारण तिला पुढे जाऊन मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो आणि त्यांच्या बसमागे धावुन डब्बा द्यायचा असतो. असं का? हे असं का दाखवलं जातं? काळजी घेणार्‍याच्या आणि सेवा देणार्‍या भूमिकेत कायम बायकाच का असतात? मग ती आई म्हणून केलेली दुधाची काळजी असो, बायको म्हणून गेलेली तेलाची काळजी असो की मुलगी म्हणून केलेली लग्नाची काळजी असो.. बायकांची शैक्षणिक गुणवत्ता ही त्यांच्या करीयरपेक्षा त्यांच्या संसाराला पोषक आणि पूरक ठरणारी आहे असं चित्र का आहे?
जास्त शिकलेली बाई = जास्त चांगला संसार, जास्त गृहकृत्यदक्ष वगैरे...
भिन्नलिंगी आकर्षण आणि लैंगिकता या गोष्टी जाहिरातीत येणं यात काही चुकीचं नाही? पण कुठवर बायका फक्त पर्फ्युमवर आणि गाड्यांवर जीव टाकत रहाणार. Why dont they choose someone with clean kitchen, organized bedroom and hygienic bathroom? कपडे, भांडी, घराची सफाई, टॉयलेट क्लीनर, मुलांच्या गोष्टी, जेवणातले पदार्थ या सगळ्या गोष्टी फक्त बायकांच्याच का? पुरुष फक्त दाढी करतात, पर्फ्युम लावतात, मस्तपैकी बियर किंवा स्कॉच पितात, गाड्यांतून फिरतात आणि त्यांच्या बायकांना डायमंडस गिफ्ट देतात. What the hell is that?
विमा.. पॉलिसी काढणारे पुरुषच दिसतात. बायकांच्या आयुष्याला तशी काही किंमत नाहीच का? एकतर आधीच भारतात विमा असलेले लोक कमी. त्यातही जे आहेत ते पुरुष. हे वास्तव जाहिरातींमधूनही बोलतं.
आणि कॉस्मेटीक्स च्या जाहिरातींविषयी तर न बोललेलच बरं. मूर्खांच्या लक्षणामध्ये यांचा उल्लेख व्हावा इतका मूर्खपणा या जाहिरातींमध्ये भरलेला असतो.
असो, मुद्दा हा आहे की काही जाहिराती तरी आता वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करतायेत.
एक जाहिरात पाहिलेली मागे. नवरा-बायको बोलतायेत आणि आज भांडी घासायचा नंबर कोणाचा यावर त्यांची मजा-मस्करी सुरु आहे. नीट आठवत नाही पण " बर्तन चमकायें.. और रिश्ते भी.." अशी टॅग लाईन होती बहुधा.  स्कॉच ब्राईट ची नवी जाहिरात पाहिलेली मध्यंतरी. की भांडी घासणं इतकं सोपं आहे की तो मुलगा पैसे नसताना हॉटेलमध्ये जेवत राहतो आणि भांडी घासतो. कालच्या जाहिरातीच्या निमित्ताने मनातली अनेक दिवसांची मळमळ बाहेर पडली.. अशा जेंडर रोल ब्रेक करणार्‍या अनेक जाहिराती येत्या काळात निघोत आणि त्या जनमानसावर खूप आणि खोलवर परिणाम करोत ही अपेक्षा..