मेरा कुछ सामान ...
तू जाताना वाटलं नव्हतं
इतकी अवाढव्य बनेल तुझ्या नसण्याची पोकळी
माझं सगळं अस्तित्वच मुळापासून ओढून घेऊ पहाणारी..
माझ्या जगण्याच्या सगळ्या वाटा उद्ध्वस्त करणारी..
सगळी स्वप्नं संदर्भहीन झालियेत आता,
वाक्यातून काढून टाकलेल्या अक्षरासारखी..

उरलाय फक्त शक्यतेचा टीचभर परीघ..
आणि त्याबाहेर पसरलेलं अशक्यतेचं अफाट विश्व..
परीघाच्या आत आहे फक्त तुझ्या नसण्याचं सत्यं आणि
माझं केविलवाणं अस्तित्वं..
पोकळीच्या काठाशी कसंबसं तग धरुन उभं राहू पहाणारं..
आणि परीघाबाहेर नजर जाईल तिथवर विखुरलेत,
तुझ्या असण्याचे आभास..
तुझ्या चाहुली, तुझे शब्द
तुझं हास्य, तुझे स्पर्श..

दिवसभर निकराची लढाई चालू असते मनाची
त्या पो़कळीत पडण्यापासून स्वतःला वाचवण्याची..
ती पोकळी भरावी म्हणून
सतत त्यात टाकत राहते मी काही ना काही..
पण ती भरतचं नाही..
ब्लॅकहोलसारखी सगळं काही पचवून पुन्हा आ वासून समोरच..
तुझ्या नसण्याची साक्ष देत..

असं धडपडून धडपडून थकलं मन
की वाटतं आता तरी थकून झोप येईल आपल्याला..
या जीवघेण्या धडपडीतून काही तासाचं मरणं तात्पुरती सुटका करेल आपली..
पण ते ही होत नाही..
दिवसभर मनाला सावरण्यासाठी घातलेले पाश हळूच ढिले पडतात,
आणि निद्रा घेऊन जाते मनाला
अशक्यतेच्या अफाट प्रदेशात..
मग अगदी स्पष्ट कानावर येतो तुझा आवाज.. (दिवसभर ऐकायचा टाळलेला..)
अगदी स्पष्ट दिसतं तुझं रुप (दिवसभर पहायचं टाळलेलं..)
अगदी स्पष्ट जाणवतो तुझा स्पर्श.. (दिवसभर दूर ठेवलेला..)
आणि तुझ्या नेहमीच्या दिलखुलास हसण्याला घाबरतं मग मन..
नक्की मनात काय आहे तुझ्या..?
गेलायेस ना तू? की नाही?
तू आहेस की नाही?

भोवळ आणणार्‍या या गोंधळाने मनाचा बांध फुटतो..
आणि वाहणारे डोळे स्वप्नातून सत्यात घेऊन येतात..
मग पुन्हा एका जीवघेण्या धडपडीची सुरुवात..
तुझ्या नसण्याच्या पो़कळीत पडण्यापासून,
माझ्या थकलेल्या अस्तित्वाला वाचवण्याची..

कधी संपणार ही तगमग?
की आता अनंत काळापर्यंत असाच चालणार,
हा स्वप्नं-सत्याचा खेळ..?
वास्तव आणि आभासांचा लपंडाव?

थकून थकून गेलंय मन आता..
जागं रहाण्याचं त्राण नाही उरलं..
आणि निद्राधीन होण्याचीही भीती वाटतेय..
या स्वप्नबंबाळ मनाला...