मेरा कुछ सामान ...
तू म्हणालास तू काही विसरत नाहीस..
काही विसरु शकत नाहीस..
माझ्या चुका.. माझा मूर्खपणा.. माझे खुळे हट्ट.. माझ्या अपेक्षा..
तू विसरु शकत नाहीस आपल्यातले बेसिक फरक..
आणि विसरु शकत नाहीस,
माझा त्रागा.. आपली भांडणं.. माझं रडणं...
पण तुला माहितेय का? तू समजतोस तसं नाहीये..
ठरवलंस तर तू विसरु शकतोस..
विसरलायेस तू...
तुझ्या येण्याने उगवणारी माझी सकाळ..
तुझ्या निद्राधीन चेहर्‍यावर रेंगाळणारी दुपार..
तुझ्या माझ्या गप्पांमध्ये रंगलेला सूर्यास्त..
आणि तुझ्या डोळ्यांत उतरलेली पौर्णिमेची रात्र..
विसरलायेस तू...
आपल्यासोबत प्रवासाला येणारा श्रावण
तुला माझ्यासाठी हळुवार करणारा शिशिर..
गुलमोहराच्या झाडांतून तुझ्या सावळ्या चेहर्‍यावर वितळलेला अष्टमीचा चंद्र..
आणि आपल्या गप्पां ऐकण्याच्या नादात लाट चुकलेला भरतीचा समुद्र..
विसरलायेस तू...
माझी अठ्ठावीस युगांची प्रतिक्षा..
अनिश्चिततेवर झुलत राहिलेल्या माझ्या अपेक्षा..
तू एकदा दिसावास म्हणून केलेला आटापिटा..
तुझ्यासोबतच्या एका क्षणासाठी तासंतास तुडवलेल्या वाटा...
विसरलायेस तू
माझ्यावर प्रेम करणारा तू
तुझ्यावर प्रेम करणारी मी
आणि आपल्या नात्यावर प्रेम करणारे आपण..
तुझ्या क्षमतांविषयी कधीच शंका नव्हती मला..
माझं ऐक..
तूही नको शंका घेऊ स्वतःवर..
"विसरु शकत नाही" कशाला म्हणतोस
चुका, मूर्खपणा, अपेक्षा, फरक..
भलेही विसरु शकत नाहीस..
पण विसरतोच आहेस की मला आता..
4 Responses
  1. एक जादूची छडी हवी होती हवं तेव्हा नको ती गोष्ट विसरता येण्यासाठी :)


  2. Indradhanu,
    You said it...! अगदी माझ्या मनातलं.. :-)


  3. मेरा कुछ सामान,, गाण आठवल... सुंदर. .. लिखते रहिये. ..


  4. रोहन,
    remembering that song is a very special compliment.. Thanks a lot.. :-)