मेरा कुछ सामान ...
Alejandro González Iñárritu ची ओळख २०१० मध्ये झाली तेव्हा त्याचे triology of death चे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याला पण ३ वर्षे उलटून गेलेली आणि 'Biutiful' अजून प्रदर्शनाच्या वाटेवर होता. म्हणजे त्याचे प्रदर्शित झालेले तिन्ही आणि लगेचच प्रदर्शित झालेला 'Biutiful' बघितल्याला ५ वर्षे झाली. आणि खरं सांगायचं तर आता ते चित्रपट नीटसे आठवतही नाहीत. नक्की काय संवाद होते, नक्की काय मांडणी होती, पार्श्वसंगीत कितपट प्रभावशाली होतं, कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग होता, खरंच नीटसं आठवत नाही. काही गोष्टी अंधुक आठवतात.. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे हावभाव, स्थळं, एकूणच कथा, चित्रपटाची संकल्पना.. पण काही गोष्टी खूप व्यवस्थित आठवतात.. Maya angelou चं एक वाक्य आहे..
"People will forget what you said..
People will forget what you did..
But people will never forget how you made them feel.."
And I remember that movies of Iñárritu made my heart feel so ached.. They had tremendous hold on my mind and heart. I remember that thing very clearly..  कोणतीही अस्सल कलाकृती माणसांइतकीच जिवंत असते.. चालत्याबोलत्या माणसांप्रमाणेच आपल्या आयुष्यावर परिणाम करते.. आणि कदाचित आपण विसरुन जाऊ, चित्रातली नेमकी रेषा, कॅनव्हासचा नेमका रंग, गाण्यातली नेमकी जागा, कवितेतला नेमका शब्द किंवा चित्रपटाची नेमकी मांडणी, पण त्या कलाकृतीने आपल्याला जी अनुभूती दिली, ती विसरणं शक्य नाही.. आणि म्हणूनच Iñárritu चे चित्रपट ऑल टाईम फेव्हरीट सदरात टाकता येतात.
त्याचा २००० साली आलेला पहिला चित्रपट 'amores perros', (Love's A bitch) माणसाच्या क्रौर्याची, एकनिष्ठेची आणि विश्वासघाताची गोष्ट.. चित्रपटाचं इंटरेस्टींग नाव हे चित्रपट बघण्याचं तात्कालिक कारण ठरलं असलं तरी Iñárritu च्या मांडणीने मनावर घेतलेली पकड त्याचे इतर चित्रपट शोधण्यास आणि बघण्यास कारणीभूत ठरली. एकमेकांत गुंतलेली कथानकं, वेगवेगळी माणसं, त्यांच्या वेगळ्या कथा, आणि कोणत्यातरी घटनेने, प्रसंगाने जोडली गेलेली त्यांची आयुष्य, जी कदाचित एरवी कधीच जोडली जाणं शक्य नाही. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांत घडलेले पुढे-मागे मांडणी असलेले प्रसंग.. आणि अतिशय प्रभावी मध्यवर्ती कल्पना. दिग्दर्शकाला काय पोहचवायचं आहे हे जेव्हा त्याला स्वतःला ५००% स्पष्टपणे माहित असतं तेव्हाच अशी मांडणी करण्याचं तो धाडस करु शकतो. नंतर आलेले triology of death मधले२००३ सालचा '21 gram' आणि २००६ मधला, 'Babel', हे चित्रपटही मांडणीच्या दृष्टीने 'amores perros' सारखे. अर्थात triology असल्यांमुळे मध्यवर्ती कल्पनेसोबतच मांडणीतील सारखेपणाही गरजेचा ठरला असावा. पण हे तिन्ही चित्रपट खिळवून ठेवणारे.. हृदयात काहीतरी दाटून आलंय असं वाटायला लावणारे ठरले हे निश्चित. 'amores perros' मधली डॉग फाइट, '21 gram' मधला गोळीबाराचा प्रसंग, 'Babel' मध्ये वाळवंटात अडकलेल्या नॅनीची घालमेल.. असे काही प्रसंग आहेत जे अजून मनात घर करुन आहेत.
(मांडणीच्या दृष्टीने क्लिष्टता असणारे, किंवा सुरीअलिझम वाले चित्रपट खर्‍या अर्थाने दिग्दर्शकाचे चित्रपट ठरतात असं मला वाटतं. अशा चित्रपटांमध्ये शक्यतो कोणाची भूमिका वठली नाही असं होत नाही. म्हणजे अशा चित्रपटांचा कलाकारांविषयी दृष्टीकोन असा वाटतो की, तुम्ही वाईट अ‍ॅक्टींग करुच शकत नाही. तुम्ही भूमिका ही चांगलीच केली पाहिजे. दिग्दर्शक इतर कोणते एक्स्क्युजेस मान्यच नाही करणार..आणि Iñárrituचे सगळे चित्रपट "चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे" हे दाखवून देणारे आहेत.)
जरी त्याची triology of death २००६ सालच्या 'Babel' पर्यंतच असली तरी पुढच्या दोन्ही चित्रपटांमध्ये नायकाचा मृत्यू आणि दु:खाचे विभ्रम (की विभ्रमांचे दु:ख?) या दोन्ही कल्पना आहेतच. आणि त्याचा यंदा ऑस्कर च्या यादीत सर्वात आघाडीवर असलेला, "Birdman or (The Unexpected Virtue of Ignorance)" हा चित्रपट.. ज्या चित्रपटामुळे त्याच्याविषयी लिहिलंच पाहिजे यावर शिक्कामोर्तब झालं. Birdman ही कथा आहे एका सुपरहिरोची.. एकेकाळी सुपरहीरो असलेला नायक, कालांतराने कामाला पारखा होतो आणि एका नाटकाद्वारे स्वतःला अभिनेता-दिग्दर्शक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण तुलनेने साधी वाटणारी ही कथा प्रेक्षकांना पूर्णवेळ खिळवून ठेवते. मोजक्याच मोठ्याच्या मोठ्या शॉटस् मध्ये केलेलं चित्रिकरण, पार्श्वसंगीतात मुख्यत्वे ड्रमचा केलेला वापर, नायकाचं त्याच्या भोवतालच्या लोकांच्या नजरेतून जाणवणारं वास्तव आणि त्याच्या स्वतःच्या मनात असलेली त्याची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा, त्याची मुलगी, सहकारी, वेगळी झालेली बायको, अधूनमधून भेटणारे चाहते, बरे वाईट समिक्षक या सगळ्यांचीच गुंफण इतकी उत्तम झाली आहे की चित्रपटाला इतकी नामांकनं मिळाली नसती तरच नवल. आणि चित्रपटाचा सुरीअलिस्टीक शेवट हा माझा वैयक्तिक आवडता भाग. त्याविषयीची वेगवेगळी मतं नेटवर सर्वत्र वाचता येतीलच.
 जरी तो त्याच्या पहिल्या चित्रपटापासून (म्हणजे पहिल्या फुल्ल लेंग्थ चित्रपटापासून) 'बेस्ट फॉरेन लॅग्युअज फिल्म' च्या कॅटेगरीत नामांकन मिळवत असला तरी, यंदा त्यांचं नामांकन अमेरीकेतूनच असल्यामुळे त्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता वाढली आहे हे नक्की. (या आधीचे चित्रपट अमेरीकेत बनले असते तर एव्हाना नक्कीच त्याच्या नावावर ऑस्कर जमा झाला असता.) त्याच्या स्पर्धेत असणारा "The Grand Budapest Hotel" हा चित्रपटही काही कमी नाहिये. एखादी गोष्ट चांगली कशी सांगावी याचं उत्तम उदाहरण आहे. पण Iñárritu सोबत इतक्या वर्षांचं असलेलं प्रेक्षकाचं नातं, त्याच्या सर्वंच चित्रपटांमध्ये त्याने केलेली उत्तम कामगिरी, आणि एकूणच कॉमेडी पेक्षा माणसाच्या मनातल्या खेळांकडे असलेली ओढ यामुळे माझं पारडं तरी Iñárritu कडेच झुकतय..
त्याला यंदाचा ऑस्कर मिळाला तर तो नक्कीच The Expected Virtue Of Excellence समजता येईल.. :-)

(With Iñárritu in leading race, the oscar ceremony this year is a must watch and with Neil Patrick Harris hosting the show, I wouldnt miss it for the world.. Countdown has already started.. fingers crossed.. Go Iñárritu...! Best Wishes...)
मेरा कुछ सामान ...
(Dedicated to the God of small things)

कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्‍यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात..
जातीपातीच्या.. परिस्थितीच्या.. पैशाच्या.. रंगाच्या..
अनेक भिंती आहेत इथे..
आणि काही लक्ष्मणरेषा..
कधीच ओलांडू नयेत अशा..
ओलांडल्या तर जगबुडी होईल अशा..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
प्रेम म्हणजे नक्की काय हे बहुतेकांना माहित नसलं तरीही..
स्वतःच्या स्वतःला लागलेल्या शोधाला कोणी प्रेम मानलं तरीही..
आणि कोणाला सगळ्या व्याख्यांपलीकडे जाऊन प्रेम करता आलं तरीही..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
स्पर्श न करता भेट द्यावी,
की निरागस उत्कटतेने मिठी मारावी...
कोणती माणसं उंबर्‍याबाहेर ठेवावी,
आणि स्वार्थासाठी कोणाची साथ द्यावी हे ठरलेलं आहे..
कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पण कोणाच्या आत्म्याला कोणाचा स्पर्श व्हावा याचे काही नियम नाहीत..
कोणाची आयुष्य किती गुंतावी एकमेकांच्यात याचे काही शास्त्र नाही..
किती भावविश्वं विरघळावी एकत्र यावर काही बंधनं नाहीत..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

ठरलेले आहेत जगाचे नियम..
प्रत्येकासाठी वेगवेगळे..
आणि तरी प्रत्येकालाच अपरिहार्यपणे सलणारे..
सुखासाठी हावरेपणा केला की दु:ख मिळतं..
पण सुखाच्या प्रतिक्षेत अबोल आयुष्य काढलं तरी कोणाला समजतं..?
जिथे वास्तवाच्या वाट्याला क्वचितच येणारी सुखं,
फक्त स्वप्नांतच भेटतात..
आणि स्वप्नांतली सुखं खर्‍या आयुष्यात मोजायची का हे कोणालाच माहीत नसतं..
काही चुका त्यांच्या शिक्षा घेऊनच येतात..
पण चुकीच्या प्रमाणातच शिक्षा व्हावी याचं उत्तरयायित्व कोणाचंच नसतं..
मग कधी मोजावं लागतं आयुष्य..
कधी अनेक आयुष्यं..
कधी अनेक पिढ्या..
तरी ठरलेले आहेत जगाचे नियम..
जगाच्या भल्यासाठी केलेले नियम..
अमानुष निर्दयतेने पाळले जाणारे नियम..
कोणी कोणावर कसं आणि किती प्रेम करावं याचे नियम..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
मेरा कुछ सामान ...
तू म्हणालास तू काही विसरत नाहीस..
काही विसरु शकत नाहीस..
माझ्या चुका.. माझा मूर्खपणा.. माझे खुळे हट्ट.. माझ्या अपेक्षा..
तू विसरु शकत नाहीस आपल्यातले बेसिक फरक..
आणि विसरु शकत नाहीस,
माझा त्रागा.. आपली भांडणं.. माझं रडणं...
पण तुला माहितेय का? तू समजतोस तसं नाहीये..
ठरवलंस तर तू विसरु शकतोस..
विसरलायेस तू...
तुझ्या येण्याने उगवणारी माझी सकाळ..
तुझ्या निद्राधीन चेहर्‍यावर रेंगाळणारी दुपार..
तुझ्या माझ्या गप्पांमध्ये रंगलेला सूर्यास्त..
आणि तुझ्या डोळ्यांत उतरलेली पौर्णिमेची रात्र..
विसरलायेस तू...
आपल्यासोबत प्रवासाला येणारा श्रावण
तुला माझ्यासाठी हळुवार करणारा शिशिर..
गुलमोहराच्या झाडांतून तुझ्या सावळ्या चेहर्‍यावर वितळलेला अष्टमीचा चंद्र..
आणि आपल्या गप्पां ऐकण्याच्या नादात लाट चुकलेला भरतीचा समुद्र..
विसरलायेस तू...
माझी अठ्ठावीस युगांची प्रतिक्षा..
अनिश्चिततेवर झुलत राहिलेल्या माझ्या अपेक्षा..
तू एकदा दिसावास म्हणून केलेला आटापिटा..
तुझ्यासोबतच्या एका क्षणासाठी तासंतास तुडवलेल्या वाटा...
विसरलायेस तू
माझ्यावर प्रेम करणारा तू
तुझ्यावर प्रेम करणारी मी
आणि आपल्या नात्यावर प्रेम करणारे आपण..
तुझ्या क्षमतांविषयी कधीच शंका नव्हती मला..
माझं ऐक..
तूही नको शंका घेऊ स्वतःवर..
"विसरु शकत नाही" कशाला म्हणतोस
चुका, मूर्खपणा, अपेक्षा, फरक..
भलेही विसरु शकत नाहीस..
पण विसरतोच आहेस की मला आता..
मेरा कुछ सामान ...
They say movie is the most beautiful lie. Then why everyone including the director try so hard to make it realistic? Make it believable? Make it true? People are anyways paying to watch their lies. Then why not to give them the lie in such a way that they will know its a lie? They will know its not real.. Its surreal.. And there are not more surrealistic, more astoundingly amusing films than those of Luis Bunuel's..
काही माणसं पहिल्या भेटीतच आवडतात. बोलायला लागली की कळून जातं, ही "आपली माणसं". आणि Buñuelची पहिली फिल्म बघितली तेव्हाच जाणवलं हा "आपला". आपल्याच माळेतला.. आणि मग त्याच्याविषयी वाचताना जेव्हा त्याचं "Give me two hours a day of activity, and I'll take the other 22 in dreams -- provided I can remember them." हे वाक्य वाचनात आलं तेव्हा फक्त माझ्या त्या वाटण्यावर शिक्कामोर्तब झालं.
त्याचा The Exterminating Angel किती महिने माझ्या स्पॅनिश फिल्म्स च्या फोल्डर मध्ये पडून होता कोण जाणे. पण जेव्हा तो चित्रपट पाहिला तेव्हा मेंदूला झटका बसला. मनात म्हटलं कुठे होतास तू इतके दिवस? भेटला कसा नाहीस? कसं काही कळलं नाही तुझ्याविषयी? अशाप्रकारे बुनुएल, Director's special फोल्डर मध्ये त्याच्या सगळ्या फिल्म्ससह विराजमान झाला आणि माझा शोध सुरु झाला बुनुएल नावाच्या स्वप्नाचा.. स्वप्नच म्हटलं पाहिजे त्याला. कारण स्वप्नांइतक्याच त्याच्या फिल्म्स स्वप्नवत आहेत आणि त्याला स्वप्नं जितकी प्रिय होती तितक्याच त्याच्या फिल्म्स मला प्रिय आहेत.
चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात चांगले दिग्दर्शक खूप आहेत. त्यातले आवडीचेही अनेक. पण ज्यांच्यासाठी वेडं व्हावं असे किती? बर्गमननंतर मला भेटलेला Buñuel पहिलाच.
१९०० साली स्पेन मध्ये जन्मलेला आणि १६व्या वर्षापर्यंत अगदी धार्मिक वृत्तीच्या Luis Buñuel ला, चर्चच्या अतार्किक कृतींनी नास्तिक बनवलं आणि तो शेवटपर्यंत नास्तिक राहिला. त्याच्या उपसाहगर्भ विनोदी शैलीत त्याने म्हटलेलं "I’m still an atheist, thank God." हे वाक्य प्रसिद्ध आहे. बॉक्सिंग, व्हायोलिन आणि हिप्नॉटिझमनंतर सिनेमाचं त्याला लागलेलं वेड आयुष्यभर टिकलं. ५० वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत त्याने सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवले. पण त्याचं खरं कसब होतं surrealism.. आणि ते त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच स्पष्टपणे दिसतं.
जगातील सगळ्यात प्रसिद्ध शॉर्ट फिल्म असा ज्याचा उल्लेख केला जातो ती Un Chien Andalou, ही त्याची पहिली फिल्म जी त्याने Salvador Dali सोबत बनवली. त्यांचं ध्येय्य नक्की होतं. "Our only rule was very simple: no idea or image that might lend itself to a rational explanation of any kind would be accepted. We had to open all doors to the irrational and keep only those images that surprised us, without trying to explain why". त्यांचा हा एकमेव नियम त्यांनी तंतोतंत पाळला आणि सिनेमाला काही अविस्मरणीय इमेजेस दिल्या. त्यांची दुसरी फिल्म L'Âge d'Or पण अशीच..कथा नसलेली घटनांची जंत्री.. त्यातही त्या घटना क्षणोक्षणी प्रेक्षकांना धक्का देत राहतील, त्यांच्या श्रद्धा-भावनांवर प्रश्न उपस्थित करतील, विचार करणार्यांना विचार करायला भाग पाडतील, तर इतरांना नुसत्याच दुखावतील अशा..
तो नास्तिक असला तरी त्याच्या चित्रपटांमध्ये त्याने कायम देवाचा शोध आणि देव शोधणार्यांच्या दांभिकतेचा माग घेतला. त्याच्या मते God and Country are an unbeatable team; they break all records for oppression and bloodshed, आणि नेमका हाच धागा त्याने चित्रपटांमध्ये पकडलाय. मग The Diary of a Chambermaid मधली rightist nationalist movement असो, की That Obscure Object of Desire मधली दहशतवादी हल्ल्यांची पार्श्वभूमी असो की The Discreet Charm of the Bourgeoisie मधली युद्धाची परिस्थिती असो. म्हणूनच त्याचे चित्रपट खूप खरे वाटतात पण त्याचवेळी चित्रपटातील घटना मात्र अतिशय surrealistic आणि पात्रं कमालीची दांभिक, बूर्झ्वा, बुद्धीजीवी, mediocre वगैरे.. एकूण काय, तर तोच त्याचा एकमेव नियम.
त्याची सुरुवात जरी त्याच्या मास्टर टेक्निकने झाली असली तरी त्याचे सर्वोत्तम समजले गेलेले चित्रपट त्याने पन्नाशीनंतरच बनवले. आणि उत्तरोत्तर त्याच्या चित्रपटांतील surrealistic content आणि मांडणीतील बांधणी अधिकच प्रभावी होत गेली.
देव-देवत्व-दांभिकता, माणसाच्या अतृप्त लैंगिक आकांक्षा आणि मध्यमवर्गीय बंदिस्त मानसिकता असे ढोबळमानाने त्याच्या चित्रपटांच्या विषयांचे वर्गीकरण करता येईल.
Viridiana, Simon of the Desert आणि The Milky Way मध्ये त्याने देव-देवत्व-दांभिकता यांचा मार्मिक वेध घेतला आहे. यात कोणत्याही पात्राच्या तोंडी भले मोठे तत्वज्ञानाचे डोस नाहीत की देवाचा पराभव दाखवण्याचा अट्टहास नाही पण साध्या साध्या प्रसंगातून, फ्रेम्समधून, जगाचं वास्तव समोर येतं.. जे कदाचित आपल्यालाही दिसत असतं पण आपणच बघण्याचं टाळत असतो. कारण काळं-पांढरं असं वर्गीकरण करणं आपल्याही सोयीचं असतं.
This Strange Passion, The Diary of a Chambermaid, Belle de jour, Tristana आणि That Obscure Object of Desire मध्ये त्याने माणसाच्या अतृप्त लैंगिक आकांक्षांचा अवकाश मांडला आहे. मग त्या वेडाकडे झुकणार्‍या संशयाच्या रुपात असोत की फ्रॉईडच्या संकल्प्नांवर बेतलेल्या माणसाच्या अदृश्य वासनांच्या रुपात असोत. 'असं का?' याचा प्रवास दाखवण्यापेक्षा, 'असं आहे', 'असं असतं' हे दाखवणं तसं धाडसाचं समजलं पाहिजे. कारण 'असं का?' याचं स्पष्टिकरण प्रेक्षकांना मिळालं की लगेच प्रेक्षक स्वतःला त्यापासून अलग करु शकतात. पण 'असं असतं' हे दाखवलं की मग सुटका नाही. असं असतं, ते कोणाच्याही बाबतीत असू शकतं. कारण ती माणसंही आपल्यासारखीच आहेत.  Well behaved, well mannered, well settled.. आणि तरीही त्यांच्या अतिशय योग्य दिसणार्या बाह्यरुपात काही 'अयोग्य' इच्छांचे दमन केलेलं आहे.
The Exterminating Angel, The Discreet Charm of the Bourgeoisie आणि The Phantom of Liberty या चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय बुद्धीजीवी, तथाकथित पापभीरु पण मुळात सामर्थ्यहीन समाजाचं पितळ जसं उघडं पाडलं आहे तसं क्वचितच कोणाला जमलं असेल. आणि surrealist मांडणी असूनसुद्धा ते सोडून देता येत नाही हे विशेष. ते तुम्हाला झपाटतं, तुमच्यात भिनतं आणि तुमच्यातल्या mediocrityला अपमानित करुनच राहतं.
The Exterminating Angel विषयी वाचताना वारंवार एकच गोष्ट मला आढळली, ती म्हणजे तथाकथित सुसंस्कृत समजल्या गेलेल्या रितीरिवाजांतील फोलपणा, तरीही त्यांना चिकटून राहण्याची मानवी वृत्ती, थोड्याशाही धक्क्याने गळून पडणारे माणसाचे मुखवटे यांच्यावर दिलेला भर. पण एका बंदिस्त समाजासाठी ही कथा जितकी लागू होते तितकीच एका स्वतंत्र माणसासाठी पण लागू होते असं मला वाटलं. आपलंही असंच झालेलं असतं. कोणती अदृश्य रेषा असते जी आपण ओलांडू शकत नाही? का ओलांडू शकत नाही? आपल्याला इतकं सामर्थ्यहीन का समजतो आपण? आणि मग कोणत्या तरी एका क्षणी आपण बळ एकवटून बाहेर पडतो. आणि कळतं किती सोपं होतं ते.. पण तरीही तिथून बाहेर पडल्यावर नवीन चौकटीत अडकण्याची शक्यता राहतेच..
आपण बुद्धीजीवी माणसं. स्वतःला लॉजिकल समजतो.. रॅशनल समजतो. एकूणच अॅटिट्युड असा की, 'Talk some sense and you have my attention.’ Then how long can someone hold your attention without making any sense? Without any logic? Perfectly irrational but you just cant escape the truth in the images. You don’t dare to ask for logic because what you see is the sheer brilliance.
माणसांच्या भावना, वासना, नाती, भीती यांचा उल्लेख जिथे येतो तिथे बर्गमन ला वगळणं अशक्य आहे. आणि तो तर माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे बुनुएल आणि बर्गमन ची तुलना होणं स्वाभाविक होतं. त्या दोघांच्याही चित्रपटांमध्ये आशयाच्या सारखेपणासोबत अभिव्यक्तीतील खरेपणाही आढळतो. पण बर्गमनच्या चित्रपटांत जसे आपण क्षण गोठवून टाकणार्‍या क्षणांनी आपण घायाळ होऊन जातो तसे बुनुएलच्या फिल्म्स बघताना होत नाही. बर्गमनचे अनेक संवाद, त्याच्या चित्रपटातील अनेक वाक्यं फ्रेम करुन ठेवावीत अशी आहेत पण बुनुएल या बाबतीत कितीतरी वेगळा. एखादा झटका लागून वास्तवात यावं असे संवाद नसल्यामुळेच कदाचित बुनुएलच्या स्वप्नामधून आपण बाहेरच येत नाही. चित्रपट संपेपर्यंत गुंतवून ठेवण्याचं अचाट सामर्थ्य त्याच्या प्रत्येक दृश्यात, प्रत्येक रचनेत आहे. आणि अशी शक्ती फक्त खरेपणाचीच असू शकते. त्याच्या डोक्यात त्याला हवी असलेली दृश्यं इतकी पक्की असायची की तो सहसा एडिटींगमध्ये काहीच टाकून द्यायचा नाही. स्वतःच्या कामाविषयी इतकी खात्री किती जणांना असते? (अमृता प्रीतम तिने लिहिलेलं कधी खोडायची नाही म्हणे.. डोक्यात येईल ते अथपासून इतिपर्यंत लिहून काढायची..) स्वतःच्या कामावर निष्ठा आणि जे वाटतं ते निर्भिडपणे मांडण्याचं धैर्य यातूनच त्याच्या कलाकृती घडल्या. तो स्वतःही म्हणाला, "I never made a single scene that compromised my convictions or my personal morality." आणि यासाठी त्याला अनेकदा चर्चचा आणि गव्हर्नमेंटचाही रोष पत्करावा लागला. अनेक वर्षे त्याला मातृभूमीपासून दूर मेक्सिको मध्ये काढावी लागेली, शेवटी तो तिथलाच नागरीक झाला.
त्याच्या प्रत्येक चित्रपटावर अनेकानेक लेख लिहावेत, कित्येक अंगांनी चर्चा व्हावी इतकी गहनता त्यात नक्कीच आहे. एका लेखात त्याने मांडलेल्या विषयांचा आढावा घेणं तसं अवघडच.. पण त्याच्याविषयी काही लिहिल्याशिवाय त्याने डोक्यात भरवुन दिलेली वादळं काही कमी होणार नाहीत हे माहिती असल्यामुळेच हा खटाटोप.
बुनुएलने त्याच्या चित्रपटांत surrealism मोठ्या प्रमाणावर हाताळला. पण पुन्हा पुन्हा पाहूनही त्यात तोचतोचपणा येत नाही हेच त्याचं यश आहे. त्याच्याकडू इतर काही करण्याची अपेक्षाही नाही. त्याला जे सर्वोत्तम जमतय तेच त्याने द्यावं आणि कितीदा देऊनही प्रत्येक वेळी आधीपेक्षा सरस काहीतरी निर्माण व्हावं असं झालं त्याच्याबाबतीत. किती किती प्रकारच्या प्रतिमा.. डिनर पार्टीसाठी म्हणून जमलेली आणि एका अदृश्य रेषेच्या आत अडकलेली माणसं, वास्तविक जेवणाची संधी कधीही न मिळूनदेखिल पुन्हा पुन्हा त्यासाठी एकत्र जमणारी माणसं, कोणत्याही कारणशिवाय एकच व्यक्तिरेखा साकारायला दोन नायिका, मुलगी समोरच असून तिच्या अपहरणाची नोंद करण्याचे सोपस्कार, एकाच वेळी, एकाच प्रवासात, दोन वेगळ्या कालखंडातले अनुभव, नायिकेच्या तिच्या तिलाच न उमगलेल्या तृष्णा, वासनांतून जन्माला आलेले क्रुर खेळ आणि सूड, माणसाच्या स्वार्थीपणाने होणारा ईश्वरी दयेचा अपमान..पुन्हापुन्हा पाहूनही पुन्हा पहावासा वाटणारा, कितीही विचार केला तरी न संपणारा, प्रत्येक वेळी नव्याने गवसणारा बुनुएल..त्याच्याविषयी नव्याने काही लिहिण्याचं सामर्थ्य माझ्या लेखणीत येईपर्यंत तूर्तास त्याचाच एक विचार जो त्याच्या निर्मितीचं सार सांगतो आणि आपल्या जगाचं वास्तव.. "...since we are all apt to believe in the reality of our fantasies, we end up transforming our lies into truths."
त्याची स्वप्नांची यात्रा जरी १९८३ मध्ये संपली असली तरी त्याने निर्माण करुन ठेवलेलं स्वप्नांचं जग कायमच नव्या स्वप्नभरल्या नजरांना आकर्षित करत राहिल हे नक्की.

---------------------------------------------------------------------------------------
माझा बर्गमन..
http://merakuchhsaman.blogspot.in/2011/04/blog-post_16.html