मेरा कुछ सामान ...
कसं सहज जमतं तुला?

नेटक्या विणलेल्या वस्त्रासारख्या
तुझ्या आयुष्याकडे बघतेय मी,
हजारदा उसवूनही पुन्हा गुंतलेल्या अस्तित्वाला सावरत..

अट्टहासाने मी काढलेल्या शब्दांच्या रांगोळ्या,
विश्लेषणांची चित्रं..
फिकीच पडतात तुझ्या स्मितहास्यासमोर..

तर्कांचं जाळं पसरुन बसते मी,
तुला नेमकेपणे पकडण्यासाठी..
पण मुठीतून निसटावा सुगंध तसा,
दरवळत राहतोस तू, जाळ्यात बिलकुल न अडकता..

झाडाचं पानही गळताना पाहून
तुटत जातं माझ्यातलं सगळं..
आणि नातं पेलून नेतोस त्याच स्थितप्रज्ञतेनं,
सोसतोस तू सगळी वादळं..

मला जितकं सहज मरताही येत नाही,
तितकं सोपं, सरळ तुला जगता येतं..

इतकं सोपं, सरळ तुला कसं जगता येतं?