मेरा कुछ सामान ...

माझ्या उदासीला 'तुझ्या नसण्याचं' लेबल लावण्याचे
सोयिस्कर दिवस केव्हाच मागे पडलेत..
अनादी अनंत पसरलेल्या अंधारात उगवावा प्रकाशाचा किरण,
आणि मग तो च काय ते सत्य बनून जावा..
तसा 'एकटेपणा' झळाळलाय,
कारणांच्या पसार्‍यातून..
कुठं काही खुट्ट् झालं की अंधारात लपायची सवय झालेली मनाला..
एखादं सोयिस्कर कारण गुरफटून घेऊन..
आता ह्या झळाळलेपणाला कुठं लपवावं?
'आणखी एक कारण' या कॅटेगिरीत ते बसत नाही..
आणि त्याला जिथे नेऊ तिथल्या कारणांचा फोलपणा याच्या प्रकाशात लपत नाही..
अंधारात लपता येत नाही म्हणून प्रकाशाची चाललेली ही धडपड,
आता असह्य झालीये..
मेरा कुछ सामान ...

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही आलेला स्पेशल वीक. थंडीसोबत लागणारे वेध आणि येणारं स्पेशल फिलींग. रोज सकाळी उठून उत्साहाने हव्याहव्याश्या काळोखात शिरायचं जिथे एक पूर्णतं अनोळखी जग माझ्यासाठी उभं असायचं.. दर वर्षी वाटतं की हे कधी संपूच नये आणि मग तरी ते एक दिवस संपतं.. ह्म्म.. असो..
नेहमीप्रमाणेच या वर्षीचे काही प्रयोग फसले काही यशस्वी झाले. त्या सगळ्याच म्हणजे या वर्षीच्या पिफमध्ये पाहिलेल्या चित्रपटांचा हा थोडक्यात रीव्हू..

Kamr Palm (kaf elqamar) - Egypt

चित्रपटाचं रेटींग खूप चांगलं होतं ते बघून म्हटलं महोत्सवाची सुरुवात यानेच करावी पर बात कुछ जमी नही. आपल्याकडे बॉलीवूडमध्ये असले खूप सिनेमे बघितल्यामुळे असेल. दिग्दर्शकाने कथा थोडी घुमवून सांगितल्यामुळे चित्रपट बघितला जातो कारण कथेमध्ये काहीच नवीन नाहीये. विधवा आई (आमिर), तिची ५ मुलं (मुलगे) एका खेड्यात रहात असतात. त्यांच्या वडिलांचं स्वप्न असतं की घर बांधावं. मग आईची फारशी इच्छा नसतानाही मुलांना शहरात पैसे कमवायला जायची परवानगी देते आणि मोठ्या भावावर सगळ्यांना एकत्र ठेवायची जबाबदारी. मग एक एक भाई का बिछडना और माँ के अंतिम समय मे पास आना.. भारी अभिनय आणि मांडणी पण मस्ट वॉच नाही.The last step (Pele Akher) - Iran


गेल्या वर्षी सेपरेशन आणि या वर्षी लास्ट स्टेप बघून इरानी चित्रपटांविषयी आणि खासकरुन इरानी दिग्दर्शकांच्या बुद्धीमत्तेविषयी कौतुक वाटायला लागलं आहे.. सुंदर चित्रपट. कथा, मांडणी, अभिनय.. सगळंच सुंदर. ज्या पद्धतीने कथा उलगडत जाते ते पहाणे तर फारच सुंदर. इथे कथेविषयी काहीही सांगुन मजा नको घालवायला.. मस्ट वॉच.


The tortoise, an incarnation (Kurmavatara) - India


या चित्रपटाविषयी काय बोलावं.? बोलू तेवढं कमीच. गांधी कोणाला किती आणि कसे समजले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण खरा प्रश्न आहे तो गांधी आचरणात आणण्याचा. वेगवेगळ्या विरोधाभासांनी भरलेल्या या काळात गांधीवादही कसा सोयीस्करपणे वापरला जातो त्यावर मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट. गांधींना TRP मध्ये मो़जणे, गांधी झालेल्या माणसाचे त्याच गेट अप मधले सामान्य वागणे. नक्की बघावा असा चित्रपट..


The delay  ( LaDemora) - Uruguay, Mexico, France


ठिक ठाक चित्रपट. साधीशीच कथा. तशीच मांडणी. उत्पन्न फारसे नसलेल्या एका मध्यमवयीन बाईवर ३ मुलांची आणि अल्झायमर्स झालेल्या म्हातार्‍या वडिलांची जबाबदारी. रोजच्या त्रासाला कंटाळून वडिलांना वृद्धाश्रमात सोडायला जाते पण तिथे निराधार नसल्यामुळे घेत नाहीत. बहिण वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार नसते. आणि विचारांच्या अशाच गोंधळात ती त्यांना अनोळखी रस्त्यावर सोडून येते. मग त्यांचं हट्टाने तिथेच तिची वाट पाहत थांबणं आणि तिनेही अस्वस्थ होऊन त्यांना न्यायला परत जाणं.. Thats all the movie is about.


Rose ( Roza) - Poland


दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला चित्रपट. महायुद्ध काळातील sexual atrocities and mental harassment  चं चित्रण अंगावर शहारे आणणारं. इतकी वर्षे उलटून पण ती जखम कायम का भळभळत राहते हे नव्याने जाणवतं असे चित्रपट बघताना. ऱोझ चा संघर्ष जितका वेदनादायक तितकाच खिळवून ठेवणाराही. वॉर फिल्म्स आवडत असतील तर मस्ट वॉच.


Material (Material) - South Africa


जड जड सिनेमे बघून झाल्यावर मूड हलका करणारा चित्रपट अनपेक्षितपणे मिळाला.  The movie gives some genuine laughter. The stand up comedy used is just awesome. फार ड्रामा नाही. क्लायमॅक्स मध्येही काही नौटंकी नाही असा सरळ साधा फॅमिली मूव्ही.  Too many references of bollywood, so its feels funny. कधी फॉर अ चेंज काही वेगळ्या प्रकारची कॉमेडी आणि हलका फुलका चित्रपट पहायचा असेल तर नक्की पहा..


The Parade (Parade) - Serbia


समलिंगी व्यक्ती समाजात खुल्या मनाने स्विकारल्या जाणार्‍या संघर्षाच्या काळातील सर्बिया इथला हा चित्रपट. विषय गंभीर असला तरी हलक्या फुलक्या सादरीकरणामुळे चित्रपट जड होत नाही. स्ट्रेट लोकांचा मुळातच समलिंगींकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन आणि एका घटनेच्या निमित्ताने (परेडच्या निमित्ताने) घडलेल्या सहवासाने त्यात होत गेलेला बदल हा कालखंड खूप सुरेख मांडलाय. फक्त असं वाटलं की सगळी कथा कदाचित साधारण १०० मिनिटात बसू शकली असती ती उगीच १२० मिनिटांची केलीये.


Barbara (Barbara) - Germany


दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील जर्मनीत घडलेली कथा. सुरेख अभिनय, सुंदर कथा. सुरेख मांडणी. बार्बरा च्या अभिनयाला विशेष दाद द्यावी लागेल.  शेवटपर्यंतची तिच्या निर्णयातली अनिश्चितता आणि मनातली अस्वस्थता खूपच छान व्यक्त केलीये तिने.  प्रत्येक प्रसंगात बार्बरा आणि आंद्रे यांची एकमेकांसोबतची कामाच्या वेळेची ट्युनिंग आणि वैयक्तिक पातळीवरचे संबंध या दोन्ही अवस्था खूपच चांगल्या मांडल्या आहेत. खूप चांगला चित्रपट.


Noor (Noor) - Pakistan


ट्रांसजेंडर व्यक्तींची होरपळ मांडणारा अजून एक चित्रपट. हा पूर्ण बघता नाही आला. पण बघताना सतत 'बोल' ची आठवण येत राहिली. आणि त्याचं दिग्दर्शन याच्यापेक्षा चांगलं होतं असं वाटलं. असो.. पूर्ण न पाहिल्यामुळे फार लिहिणं शक्य नाही.बालक-पालक,

खूप महत्वाच्या विषयावरचा चांगला चित्रपट. याविषयी फार लिहित नाही. ऑलरेडी सगळीकडेच खूप चर्चा चालू आहे.. :-)


Frozen Silende (Silencio en la nieve) - Spain


खूप सार्‍या अप्रतिम वॉर फिल्म्स पाहण्याचा अनुभव असल्यामुळे की काय पण हा चित्रपट अगदीच सुमार वाटला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांमध्येच घडणार्‍या खूनांची रहस्यकथा आहे. But it neither feels mystery nor a war film. युद्धकाळातलं वातावरण वाटत नाही. म्हणजे पुरेसं वाटत नाही. आणि रहस्यकथा चालू आहे हा परिणाम पण मध्येच नाहीसा होऊन परत कधीतरी परत आल्यासारखा वाटतो. जर्मन सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याच्या हुकूमावरुन त्यांच्यातल्याच एका सैनिकाच्या बायकोचा बलात्कार केला जातो आणि त्यात गुंतलेल्या ४ सैनिकांना तिचा नवरा मारत असतो. आणि हा मारेकरी कोण हे शोधण्याचे काम एका माजी पोलिस आधिकारी असलेल्या सैनिकावर पडतं. त्याच्या शोधाची ही कथा.  Not so good.


Something in the air ( Apra s mai) - FranceIt is a really good script but director just wasted it. The people you have understanding (or at least idea) of the peculiar political situation and emotional trauma the europian youth was going through in 70's, could understand the script well. Unnecessary detailing ruined the pace of story. कम्युनिस्ट विचारांनी भारवलेला कॉलेजचा तरुण ते एक स्थिर जीवन जगू लागलेला माणूस हे एका विद्यार्थ्याचं रुपांतर अजून खूप चांगलं मांडता आलं असतं.  त्या नायकामध्ये काळानुसार होत जाणारे बदल स्क्रीन वर कुठे दिसतच नाहीत. एक ठराविक कालखंड दाखवायचा असतो अशा वेळी वेशभूषाकारांच्या कौशल्याला बराच वाव असतो. पण यात कुठे त्याचा वापर झालेला दिसत नाही. तरीपण कथेसाठी बघावा असा चित्रपट..

The fifth season of the year (Piata pora roku) - Poland


खूप गोड चित्रपट. हा चित्रपट बघताना गेल्या वर्षीच्या Las acasia ची आठवण झाली. पण ही कथा कितीतरी जास्त सुंदर आहे आणि तशीच मांडलीये. आपल्या नवर्‍याच्या अस्थी समुद्रात वाहण्यासाठी घेऊन चाललेली म्हातारी आणि तिच्यासोबत तिच्याच वयाचा ड्रायव्हर. दोन पूर्णतः भिन्न क्लासमधले लोकं. त्यांच्या सवयींमधला, वागण्या बोलण्यातला फरक पण एकाच पिढीचे असल्यामुळे येणारे काहीसे साधर्म्य याची त्यांची त्यांनाच होत जाणारी जाणिव, हा प्रवास त्यांच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही खूप खास बनवते. अप्रतिम अभिनय. सुंदर चित्रपट..


Araf - Somewhere in between - Turkey


दोन तासाच्या चित्रपटात सगळे मिळून अर्धा तासाचे संवाद आहेत.. बाकी वेळ काही होतच नाही. होतच नाही.. होतच नाही. मी वाट बघत बसलेले की कधी काही होईल चित्रपटात. पण शेवटपर्यंत काही खास होत नाही. नाही म्हणायला नायिकेच्या अ‍ॅबॉर्शन चा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. पण बाकी चांगलं किंवा वाईट काहीच नाही. एक तरुण मुलगी एका मध्यमवयीन ट्रकवाल्याच्या प्रेमात पडते. तिला प्रेग्नंट करुन तो गायब होतो. तिच्यावर प्रेम करणार्‍या मुलाचा प्रेमभंग. तिचं अ‍ॅबॉर्शन आणि मग तिचं त्या मुलाबरोबर लग्न अशी कथा आहे. कधीच बघितला नाही हा चित्रपट तरी काही बिघडणार नाही. अगदीच सुमार.


Everybody in our family (Toata lumea din famlia noastra) - Romania


एका साध्या कथेवरचा अप्रतिम चित्रपट. एका क्षणासाठीही लक्ष विचलित होणार नाही अशी खिळवून टाकणारी मांडणी आणि अप्रतिम अभिनय. एका घटस्फोटीत जोडप्यातील नवरा, आपल्या मुलीला सुट्टीसाठी घेऊन यायल्या तिच्या आईकडे जातो. Somehow the situation turns violent. आणि मग काय काय घडतं त्याची ही कथा. त्या लहान मुलीसकट सगळ्यांचा अप्रतिम अभिनय.. मस्ट वॉच.


Post tenebras lux - Mexico


Frankly speaking, मला या चित्रपटातलं फारसं काही कळलं नाही. या चित्रपटाला अ‍ॅवॉर्ड वगैरे आहेत म्हणे.. :-( असो.. चित्रपटातली सिनरी फक्त खूप खूप खूप भारीए होती. प्रमाणाबाहेर सुंदर.. आणि चित्रपटातला शेवटचा प्रसंग काहीच्या काही. डोक्यावरचा केस हाताने उपटावा तसा तो माणूस स्वतःच्या मानेपासून डोकं उपटतो आणि मरतो.. yuuuuuk... आत्महत्या करायचे बाकी काही मार्ग नाही मिळाले का. अशा कल्पना सुचत तरी कशा असतील..? :-|


Rust and bone (De rouille et d'os) - France


माशांच्या हल्ल्यांत आपले पाय गमावुन बसलेली डॉल्फिन प्रशिक्षक आणि illegal बॉक्सिंग करणारा नायक यांच्यातलं नातं आणि त्याच वेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या नात्याचा पडलेला परिणाम याची ही कथा. खूप छान चित्रपट. सुरेख अभिनय. का कोण जाणे पण शेवटी 21 grams ची आठवण झाली. मस्ट वॉच..


Hella W - Finland


पुन्हा एकदा WW2  चा काळ. पण ही Hella W ची सत्यकथा आहे. फिनलंड मधली एक यशस्वी व्यावसायिक, राजकारणी, कवयित्री आणि नाटककार.. चित्रपटात वातावरणनिर्मिती खूपच छान केलीये. पार्श्वसंगीत खूप खास. बाकी अभिनय आणि कथा यासाठी मस्ट वॉच आहेच. (सत्यकथा तशाही बर्‍याच प्रमाणात युनिक असतात.)


Laurence anyways - France

PIFF चा शेवट एका चांगल्या सिनेमाने झाल्याचं समाधान मिळालं हा सिनेमा पाहून.  168 min seems too long for any cinema but for the story spanning over 10 years, it was necessary. लॉरेन्स आणि त्याची बायको फ्रेड.. अनेक वर्षे सोबत राहिल्यावर आणि खूप चांगली केमिस्ट्री असतानादेखिल, लॉरेन्स एक दिवस फ्रेड ला सांगतो की त्याला स्त्री व्हायचंय. आणि त्याला हे गेली अनेक वर्षे वाटतय. या नंतरचा १० वर्षांचा काळ या चित्रपटात मांडलाय.. त्याचं आणि फ्रेड चं नातं, त्याचं आणि त्याच्या आईचं नातं, समाजातले संघर्ष अशा अनेक धाग्यांविषयी आहे हा चित्रपट. फ्रेडने त्याच्या बाजूने उभं राहणं आणि त्याच वेळी त्याला नाकारणं, दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम कायम रहाणं पण तरीही आपालल्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड खूप छान मांडलीये. मस्ट वॉच..
मेरा कुछ सामान ...

काय झालं..? ....... काही कळत नाहीये...
काही भांडण वगैरे?..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..
काही गैरसमज? .... गैरसमज.. आणि आपल्यात? शक्यच नाहीये..
मग आठवणच यायची बंद झाली का?.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..
मग इंटरेस्ट च कमी झाला नाही?... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती?
मग नक्की झालं तरी काय?
तेच तर कळत नाहीये ना..
आपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना?
कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."
दोघांनाही ही खात्री..
असा कितीतरी काळ लोटून गेलाय मध्ये..
न भेटता.. न बोलताच..
तुझ्या माझ्यातल्या या अमर्याद अंतरभर आता फक्त समजूतदारपणाच उरलाय..
आणि म्हणूनच कदाचित हे अंतर पार करणं अशक्य आहे आपल्याला..
मेरा कुछ सामान ...

पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...
मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...
छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...
सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...
कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...