मेरा कुछ सामान ...
स्टॅटेस्टिक्स... स्टॅटेस्टिक्स... जगात रोज इतकी लोकं उपाशी झोपतात.. इतकी मुलं कुपोषित आहेत.. इतक्या स्त्रिया अन्यायाला बळी पडतात.. हे आकडे माहितीतले. रोजच्या वाचनातले. रोजच्या विचारातले. त्यासाठी कधी हळहळणे तर कधी पेटून उठणे आणि कधी त्यावरच्या उपायांत खारीचा वाटा उचलणे हे ही नित्याचे.
तसाच तो ही एक दिवस होता. नेहमीप्रमाणेच. सकाळची घाई. ठरलेली बस. बस मध्ये जागा मिळाली की पुढच्या तासाभराची निश्चिंती. भल्या गर्दीत सुखावणारं एकटेपण आणि अगदी स्वतःचा असा वेळ. कुठलाही विचार निवांतपणे करण्याची हक्काची संधी. वाटलं तर विचार करा नाहीतरे निरीक्षण करत बसा. त्यादिवशीही असंच लोकांकडे बघत बसलेले. चेहरा बघून त्या माणसाच्या आयुष्याचा, मानसिकतेचा अंदाज बांधत.. रस्त्यावरुन दिसणारी दृश्यही रोजचीच होती. काही गरीब माणसं, रस्त्यावर फिरणारी मुलं.. पण तो दिवस अगदीच काही रोजचा नसावा. त्या सगळ्यांकडे बघता बघता अशी काही तंद्री लागली त्या दिवशी की त्याचं नीटसं वर्णन आजही नाही करता यायचं मला. बघता बघता जाणवायला लागलं की ती 'मी'च आहे. आजूबाजूची प्रत्येक जिवंत गोष्ट 'मी' आहे. जी 'मी' आहे, तेच सगळीकडे आहे. सगळी माझीच रुपं आहेत. सगळ्यांत 'मी' आहे. आधी हे जाणवत होतं की यावर खूप विचार करुन झालाय. त्याचाच पुढचा भाग चालू झाला असेल डोक्यात. पण नंतर जाणवायला लागलं की डोकं बंद झालंय कधीच आणि आता जे दिसतय हे समोर घडतय. माझ्या डोळ्यांदेखत. हे विचार नाहीत. ही अनुभूती आहे.
दिव्य दृष्टी मिळूनही अर्जुनाला विश्वरुपदर्शन का झेपलं नसेल? उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांमधला हा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्या आयुष्यात. महाभारत वाचलं तेव्हा आणि भगवद्गीता वाचली तेव्हाही या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. म्हणजे अर्जुनाला कृष्णाने दिव्य दॄष्टी दिली आणि तरीही ते विश्वरुप सहन न झाल्याने अर्जुनाने त्याला विनंती केली की 'हे रुप आवरा' हे कायमच वाचत आलेय. पण अर्जुनाला नक्की काय वाटलं? त्याच्या मनात काय विचार आले? का सहन झालं नसावं त्याला? मनाच्या तळात पडून रहाणार्‍या आणि विचारांच्या भोवर्‍यात पुन्हा पुन्हा वर येणार्‍या प्रश्नांतला हा एक. असं वाटलं की त्या एका क्षणात या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सगळ्या जगाला व्यापून उरणारं एकच तत्व आहे हा विचार अध्यात्मिकदृष्ट्या कितीही उदात्त वाटत असला तरी त्याची प्रचिती सहन करण्याची ताकद निर्माण कशी करायची? ही 'मी' आहे.. ती ही 'मी' च.. तो ही 'मी' च.. चराचरात सर्वत्र 'मी' च.. प्रत्येक अन्याय करणार्‍यात 'मी', प्रत्येक अन्याय सहन करणार्‍यात 'मी', त्यासाठी लढणार्‍यांत 'मी', त्याला मारणार्‍यात 'मी'.. क्षुद्र, कातडीबचावू, कोत्या मानसिकतेचं रुप मी आणि महान, उदात्त विचारांचा उगमही 'मी' च.. पिढ्यांन् पिढ्या नासलेल्या अनेक आयुष्यांत 'मी' आणि त्यांना नासवणार्‍या कारणांतही 'मी' च.. प्रत्येक उपाशी झोपणार्‍यांत, औषधावाचून मरणार्‍यांत, कचरा वेचणार्‍यांत.. आणि ह्या सगळ्याला जबाबदार असणार्‍यांत.. हे सगळं बदलायची ताकद असूनही षंढपणे जगणार्‍यांत.. माझा घसा कोरडा पडला, क्षण भर काही जाणवेच ना. असं वाटलं की दु:ख दु:ख दु:ख भरुन आहे सगळीकडे, असं वाटलं की आता माझ्या सगळ्या शरीराचं पाणी होऊन हे सगळं दु:ख डोळ्यांवाटे वाहून जाणार आहे. एका क्षणाने भानावर आले. पाणी प्यायला गेले तर लक्षात आलं, डोळ्यांतून पाणी वाहत होतं. स्टॉप आलाच होता. कसबसं भान एकवटत खाली उतरले.
तो क्षण असह्य होता. माझा अहं कितीही मोठा असला तरी त्याचं असं व्यापक होणं नाहीच झेपलं. कदाचित त्यामुळेच नाही झेपलं. पण अहं मोठा नसता तरी झेपलं असतं की नाही शंकाच आहे. माझ्या लेखी 'मी' फक्त 'मी'च असू शकते. माझ्याइतकीच चांगली, माझ्याइतकीच वाईट. मी अजून कोणी कशी असू शकते? ना मी इतकी चांगली असू शकत, ना इतकी वाईट. आपण किती लक्ष देतो स्वतःकडे? मी किती लक्ष देते. मी अशी आहे, तशी नाही, हे आवडतं, अशी वागते.. पण शेवटी या सगळ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही? आयाम नाही? 'सोSहम्' या एका शब्दांत सगळी उत्तरं एकवटतात हे मान्य करणं अपेक्षेपेक्षा फारच जड होतं. लहानपणापासून जे ऐकत आले त्याची अनुभूती एक क्षणही सहन करु शकले नाही. स्वतःच्या मर्यादांची जाणिव होणं, आणि मुख्यतः त्या मर्यादा इत़क्यातच आल्या हे स्विकारणं अजूनही शक्य नाही झालं. एक क्षणही नाही टिकू शकले मी त्या अनुभूतीपुढे? इतकीही ताकद माझ्यात नाहीये?
आणि नंतर अशाच एका निवांत वेळी या गोष्टीचा विचार करताना आठवला बुद्ध.! बुद्धालाही दु:खाचा साक्षात्कार झाला होता. असं वाटलं की, साक्षात्काराला एक क्षण पुरतो. बाकीचा काळ लागतो तो साक्षात्कार पचवण्याची ताकद मिळवायला. त्यावेळेपर्यंत बुद्ध माहिती होता. आर्यसत्य.. सम्यक जीवन, अष्टांग मार्ग.. पण बुद्ध खरा महान या दु:खामुळे झाला असं वाटलं. या दु:खाची काळीज फाटून टाकणारी जाणिव प्रत्येक क्षणी सोबत घेऊन त्याचं जगणं त्याला बुद्ध बनवत गेलं.
मला बुद्ध होणं शक्य नाही. जे एक क्षण सहन नाही करु शकले त्यासोबत जन्म कसा काढायचा? माझ्या आयुष्यातली सत्य दोनच.. 'अर्जुन'पण असह्य आहे, पण त्यातून सुटका नाही.. आणि 'बुद्ध'पण तर अप्राप्य आहे..