मेरा कुछ सामान ...
"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. स्मित तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."
बहिणीच्या या प्रश्नाने गौरी भेटल्याचा आनंद थोबाडात मारल्यासारखा खर्रकन द्रौपदीच्या चेहर्‍यावरुन उतरला.
"घेणं देणं असतं म्हणजे काय? फक्त घरातल्या लोकांनाच असतं का ते? आणि नक्की काय असतं? माझ्या आयुष्यात जे काही झालं त्याचा तुमच्या आयुष्यावर आणि इमेजवर काय परिणाम होईल याची चिंता. हेच ना?" अजून बरंच काही बोलावसं वाटत होतं पण ती गप्प बसली.
"याही पेक्षा बरंच काहीतरी असतं." रागारागाने एवढं बोलून बहिण निघून गेली मैत्रीणींसोबत सिनेमाला. हिला काही केल्या रडू आवरेना. रडून रडून गाल चिकट वाटायला लागले तशी द्रौपदी उठली. वॉश बेसिनकडे जाऊन चेहर्‍यावर पाणी मारताना सवयीने आरशात पाहिलं. "श्या! च्यायला इतकं रडूनही आपल्या चेहर्‍यात काहीच फरक दिसत नाही. ना डोळे सुजलेले, ना लाल झालेले.. चेहरा थोडासा ओढलेला दिसतोय. बस्स.. तेवढीच काय ती रडल्याची खूण. की आपण रडतच नाही इतके, डोळे सुजण्याइतके वगैरे? आपल्याला कशाचंच मनापासून दु:ख होत नाही का? इतके दगड आहे का आपण?" या विचारासरशी तिला अजून एक हुंदका फुटला. "मुली रडतानाही सुंदर वगैरे दिसतात. झोपल्यावरही. आपण काय्यच्या कायच दिसतो झोपेतून उठल्यावर.. भूतासारखे." या विचाराने अजून एक हुंदका. म्हणजे रडू यायला लागलं की कशावरही रडूच येतं तसं काहीसं झालेलं तिचं. मग तिला रडायचा कंटाळा आला. झोपही चांगलीच आलेली. दु:खी आहे म्हणून झोप नाही आली, रात्र जागून काढली असलं काही व्हायचं नाही तिच्याबाबतीत. सकाळी ऑफीसला जायचं होतंच. त्यामुळे मुकाट्याने अंथरुणावर जाऊन पडली. रडून मन हलकं झालं की सगळा हळवेपणा पण वाहून जायचा शक्यतो तिचा. मग नेहमीप्रमाणे तिने विचार केला, "बास्स. कशाचं एवढं रडू आलं तुला? हे तुझं आयुष्य आहे. तुझ्या मर्जीने. तू निवडलेलं आणि परिणामांची तयारी ठेवत. हे असंच होणार हे माहित नव्हतं का तुला? मग त्यात रडण्यासारखं काय आहे?" विचार करता करता डोळ्यांवर पेंग यायला लागली...
समोर घरचे बसलेत. आणि ही बोलत सुटलिये. म्हणजे अक्षरश: सुटलीये. "कोणत्या समाजाची गोष्ट करता तुम्ही? मी कोणत्याही समाजाचं उत्तरदायित्व नाकारतेय. मी फक्त माझ्या आयुष्याला जबाबदार आहे. मला प्लीज कसलंही लेबल लाऊ नका. मी माणूस म्हणून नाही का जगू शकत? फक्त माणूस म्हणून? आणि माझ्या सुखाच्या व्याख्या दुसर्‍या कोणी का ठरवाव्यात? मला जे वाटतं ते करायला मिळण्यातच माझं सुख आहे. मला मुखवट्यांचा तिरस्कार आहे. मुखवटा न वापरता जगायचं आहे मला. अ‍ॅट एनी कॉस्ट.! तुम्ही काय करताय? केलाच ना इतकी वर्षे संसार? आहात सुखी?" हे असलं काही पुस्तकी बोलतेय ती आणि घरचे ऐकून घेतायेत असं एक स्वप्न ती नेहमीच जागेपणी पहायची. गंगाधर गाडगीळांच्या कथेतली हरलेली माणसं बघतात तशी स्वप्नं. अर्धवट झोपेत कूस बदलली तसे विचारही बदलले. "कसलं आयुष्य जगतोय हे आपण? कसला समाज आहे हा? माणसाला ना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. स्वातंत्र्य आणि संस्कार यांचा ३६ चा आकडा असलेला समाज कसा चालेल? पण म्हणून यातल्या कोणाचंच महत्व कमी होत नाही. स्वातंत्र्याचा संस्कार का नाही होत? आपल्याला कसा समाज हवाय नक्की? सर्वांच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण व्हायला हव्या. पण कम्युनिझम नको. समाजातली स्पर्धा संपून चालणार नाही. पण ही स्पर्धासुद्धा निकोप हवी. यासाठी सगळे स्पर्धक समजूतदार हवे. मग असा समजूतदार माणूस निर्माण कसा करायचा. आणि माणसाला समजूतदार बनवायचं असेल तर मग त्याच्यातल्या नैसर्गिक उर्मींचं काय? माणूस 'घडवण्याचे' प्रयत्न इतिहासात झालेच पण माणसाच्या माणूसपणाला जास्त किंमत आहे. शेवटी माणूस हे सत्य आहे, समाज ही संकल्पना. आणि माणसाच्या नैसर्गिक उर्मी बदलल्या नाहीच आहेत अनंत काळापासून. माणूस हा बुद्धीमान प्राणी आहे. किती सोयिस्कर वाक्य आहे. समूहात असतो तेव्हा बुद्धीमान आणि एकटा असतो तेव्हा प्राणी. माणूस हा फक्त सोयिस्कर जीव आहे.... विचार विचार.. कुठून कुठे. प्रश्नच नुसते. उत्तरं नाहीतच. कधीतरी एकदा सवडीने हे प्रश्न लिहून ठेवले पाहिजेत.. अर्रे... लाईटचं बिल भरायचं राहिलय. उद्या नक्की. ऑफिसचं काम कंटाळावाणं वाटतय हल्ली........"
झोप चढू लागली तसे विचार विस्कळीत होऊ लागले...
सकाळी ऑफिसला पोहचली तेव्हा शाल्मली फोनवरच होती नेहमीप्रमाणे. होणार्‍या नवर्‍याचा फोन. नाजूक आवाजात खुसूखुसू चाललेलं. तसं ते दिवसभरच चालू असतं म्हणा हल्ली.. "झालंय काय या बयेला? डोकं-बिकं गहाण टाकलं की काय हिने?" शाल्मली आणि द्रौपदी गेली ४-५ वर्षे सोबत होत्या. द्रौपदीला त्यांच्या टीममधली ती एकच पोरगी जरा सेंसिबल वाटायची. शाल्मली होतीही तशीच. दिसायला स्मार्ट.. हुशार, कष्टाळू.. उत्तम नृत्य करायची.. तिला स्वतःचा बिझनेस सुरु करायचा होता किंवा डान्स क्लास.. मुख्य म्हणजे तिला तिचे विचार होते. कंपनीत नविन जॉईन झाल्या तेव्हापासून त्यांचं चांगलच जमलं होतं. बराच वेळ गप्पा, चर्चा चालायच्या त्यांच्या. किंबहुना द्रौपदीच्या घटस्फोटानंतरच्या काळात "फार काही वेगळं झालं" अस न जाणवणारी शाल्मलीची एक नजर होती. पहिल्यासारखं सामावून घेणारी. नाहीतर प्रत्येक नजरेत प्रश्न.. आणि एक उपहास पण. हिचा स्वभाव आधीच रोखठोक. त्यामुळे हे व्हायचंच होतं अशा किंवा लव्ह मॅरेज होतं ना, तरी का? असल्या प्रश्नार्थक नजराच वाट्याला आल्या तिच्या. असो.. तर शाल्मली.. अनेक प्रोजेक्ट्स वर काम करताना त्यांनी रात्री जागवल्या होत्या. अनेक इव्हेंटस मध्ये शाल्मलीची हुशारी, समजूतदारपणा दिसला होता. अर्थातच अशा मुलीवर मुलं फिदा न होतील तरच नवल. एका मित्राला तिने हो म्हटलं. त्याच्या घरुन नकार होता. तोच सर्वसामान्य प्रॉब्लेम. इंटरकास्ट. हिच्या घरी कशाचीच कल्पना नव्हती पण ते विरोध करणार नाहीत याची खात्री होती हिला. त्यामुळे आधी तुझ्या घरुन परवानगी मिळव असं सांगितलेलं. पण त्याच्या घरचे ऐकेचनात तेव्हा एकमताने वेगळे झाले दोघे. "चला! ठिकच झालं. फार काही गुंतवणूक नव्हती तर प्रॅक्टिकल निर्णय घेणंच योग्य आहे." द्रौपदी म्हणालेली. कारण शाल्मलीच्या घरुनही वरसंशोधन चालूच होतं. पण आता जे काही चाललेलं तो म्हणजे पूर्णपणे धक्काच होता द्रौपदीसाठी. कालपर्यंत स्त्रियांच्या प्रश्नांवर हिरीरीने मतं मांडणारी, त्यांच्या स्वातंत्र्यावर बोलणारी शाल्मली लग्न ठरल्यावर इतकी बदलली..? तिचं डोकं वाजू लागलं..
"समर्पण हा स्त्रियांचा स्वभावच असतो. आणि आक्रमण पुरुषांचा.."
"आवरा...! असं काही नसतं. समर्पण आणि आक्रमण या भावना दोघांच्यातही असतात आणि सारख्याच असतात. फक्त त्याचं स्वरुप स्थळकाळानुसार बदलतं. तीव्रता कमी जास्त होते. पण भावना तिच. प्रत्येकालाच तीव्र समर्पणाची ओढ असते तशी आक्रमणाची पण. काहीतरी जिंकून घ्यावं आणि कुठेतरी हरुन जावं या भावना बेसिकच आहेत. गंमत म्हणजे या हरण्यामागेही जिंकण्याचा गनिमी कावा असतोच.."
"बरं मग तुला काय म्हणायचं आहे? कदाचित ही तिची जागा असेल समर्पणाची."
"कसं शक्य आहे? फक्त लग्न ठरलं म्हणून आपण कोणाशी नातं कसं निर्माण करु शकतो. कशी काळजी वाटून घेवु शकतो? कसं गोड बोलू शकतो? एखाद्याला न ओळखताच त्याच्यावर प्रेम कसं करणं शक्य आहे?"
"तू केलेलंस ना ओळखून प्रेम. काय झाल?"
"...."
"प्रेम आणि संसार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संसार करताना थोडं सांभाळून घ्यावच लागतं."
"अर्रे पण सांभाळून वगैरे घ्यायचा प्रश्न आलाच कुठे? साधी गोष्ट आहे. ज्याचा मुद्दा बरोबर असेल तो मान्य व्हायला हवा. त्यासाठी तो दोन्ही बाजूंनी नीट लॉजिकली मांडला जायला हवा. काही युक्त्या-प्रयुक्त्या वापरुन आपला मुद्दा मान्य करवुन घेणं यात स्वतःच्या स्वत्वाची हार नाही वाटत का माणसाला? आपण कोणालातरी आपल्या मताप्रमाणे चालायला लावतो हा अहं म्हणजे त्या नात्याची हार नाही का त्या? आणि ज्या नात्यांतला अहं नात्यांपेक्षा महत्वाचा असतो ती नाती बेगडी असतात."
"इतका आदर्शवाद फक्त कल्पनेत असतो. माणसाचा मूळ अहम् च काहीतरी जिंकून घेण्यात दडलेला आहे. तुला स्वतःला जिंकण्यात समाधान आहे. तिला दुसर्‍याला. पण मूळ भावना तिच. माणून बुद्धीमान आहे ना, मग तो बुद्धी वापरुन जिंकायला बघतो. आणि हा प्रकार जीवसाखळी टिकण्याच्या खेळाचा भाग आहे."
"श्शी.. नको असली नाती.."
"खरंच नको?"
"मी नाती नको म्हटलं नाहीये. असली नको म्हटलय."
"हे सगळ्याच नात्यांत होतं. तुझा तूच विचार कर. ज्याला तू सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल नातं वगैरे म्हणतेस त्यात हे नाही होत? इथे बोलणं वापरुन जिंकता, तिथे विचार वापरुन. काय फरक झाला? हे म्हणजे एखाद्या नोकरदाराने वारांगनेला नावं ठेवण्यासारखं झालं? पण दोघांच्यात फरक काय? ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी विकतो, त्या शरीर विकतात असं उत्तर देण्यातला प्रकार.."
"..."
"कामाला लागा.."
"हं..."
काही दिवसांनी शाल्मलीचं लग्न झालं. अर्थात अतिशय धुमधडाक्यातच. द्रौपदीने तिचा विषय काढूनच टाकला डोक्यातून. शाल्मलीने कंपनीपण सोडली आणि अगदी स्वखुशीने मोठ्या पगारच्या नवर्‍याच्या घरची हाऊसमेकर झाली.
"माणसं जितक्या सहजतेने आयुष्यातून निघून जातात तशाच आठवणीपण गेल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण असं होत नाही. दिवस-महिने-वर्षे.. काळ कसा भराभर पुढे जातो. हे असं सगळं चालू असताना अचानक "आपण होतो त्याच जागी आहोत" याची जाणिव होणं फार भयानक असतं.. बघता बघता २ वर्षे निघून गेली. आणि कंपनीतलं डेजिग्नेशन सोडता काहीच बदललं नाही आपल्या आयुष्यात." भर दुपारी लंच च्या वेळेला खिडकीतून बाहेर बघताना असले विचार द्रौपदीच्या डोक्यात पिंगा घालत होते. "किती काय काय बदललं या दोन वर्षांत. बहिणींचं लग्न झालं. सुपरवूमन चा रोल करायला सुरुवातही केली तिने. घरचे आता आपल्यापाशी लग्नाचा विषय काढत नाहीत. शाल्मली ६ महिन्याच्या गोड बाळाची आई झाली. बाळ थोडं मोठं झालं की जॉब करायचा म्हणतेय. गौरी मात्र अजूनही लग्न टाळतेय. कधीतरी कॉलेजमध्ये असताना तिला आवडणार्‍या मुलाने नकार दिला म्हणून अजून एकटी आहे ती? कसं शक्य आहे हे? इतकं प्रेम वगैरे खरंच काही असतं का? पोस्ट ग्रॅज्युअशन, पीएचडी आणि आता नोकरी करायला लागूनही ३ वर्षं झाली तिला. ह्म्म.. परवा वाचलेल्या लेखाविषयी तिच्याशी बोललंच पाहिजे. आई बाळाला दूध पाजताना आणि स्त्री कोणाविषयी तरी रोमँटीक विचार करताना स्त्रवणारा हार्मोन एकच असतो म्हणे. किती वेगळ्या भावना आहेत दोन्ही. आणि जगाच्या दृष्टीने एक अतिशय उदात्त तर दुसरी अजूनही चोरटीच.. पण दोघांमागची प्रेरणा एकच? गौरीसोबत चर्चा करायला खरी मजा येईल. तसंही खूप दिवसात काही भेट नाही." गौरी ला मेसेज टाकायला म्हणून द्रौपदीने फोन हातात घेतला. आणि तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झाली.
"मे आय कम इन?"
दारात सुहास उभा होता. सुहास तिचा कलीग. वर्षच झालेलं कंपनी जॉईन करुन पण प्रोफेशनली जितका चांगला त्याच्यापेक्षा कणभर अधिकच चांगला मित्र झालेला तिचा. तिच्या विचारांची गुंतागुंत शांतपणे ऐकून घेणारा आणि बर्‍याचदा एका झटक्यातच सगळ्या गुंतागुंतीच्या मुळावर घाव घालणारा.
"ओह.. सुहास.. ये ना.. बस..! बोला.. झालं का जेवण?"
"हो.. तू आली नाहीस."
"अं.. हं.. मूड नव्हता.."
"नेहमीप्रमाणेच.."
"..."
"असो.. ऐक.. आज संध्याकाळी क्लायंटला फायनल ड्राफ्ट द्यायचा आहे. आपण परवाचीच आयडीया फायनल करतोय. द्रौपदी यक्षाच्या प्रश्रांना उत्तरं देऊन सगळ्यांची सुटका करते."
"ओके.."
"चल मग.. तुला तर माहिती आहेच बाकी. प्रेझेंटेशन च्या तयारीला लाग.."
"येप.."
---------------------------------------------------------------------------------
"प्रेझेंटेशन भारीच झालं. काय बोललीस तू. अर्थात हे होणारच होतं म्हणा. तुझी द्रौपदी खर्‍या अर्थाने आजच्या स्त्रीला रीप्रेझेंट करते. कॉन्ग्रॅट्स मॅडम.." सुहास अखंड बडबडत होता गाडीत बसल्या बसल्या.
"पण तो यक्ष मूर्ख होता."
"म्हणजे?"
"फिलॉसॉफिकल प्रश्न कायमच सोपे असतात रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांपेक्षा. फिलॉसॉफिकल प्रश्न आणि त्यांची फिलॉसॉफिकल उत्तरं. फारच सोपा मामला आहे हे. रोजच्या जगण्यात यातलं काहीच अ‍ॅप्लिकेबल नसतं."
"तुला याचं कारण माहितेय?"
"तुला माहितेय?"
"हो.. असं होतं कारण प्रश्नांना उत्तरंच नसतात."
"?"
"माणूस प्रश्न कधी सोडवतच नाही. फक्त स्वत:ला सोडवून घेतो त्या प्रश्नांतून. पण आपल्या नशीबाला आलेला यक्षही इतका मूर्ख नसतो. तुझ्या डोक्याला कायम भुंगा लावणारं तुझं मन. त्यातून तुझी सुटका नाही. कोणाचीच नाही. आपण उत्तरं मिळवल्यासारखं करतो. प्रश्न सोडवल्यासारखं करतो पण वास्तविक पाहता यातलं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे त्या यक्षाचं कधी समाधानही होत नाही आणि तो आपली कधी पाठही सोडत नाही."
"खरंय तुझं. आणि आपल्या सगळ्यांची द्रौपदी झालीये. सगळ्यांचच लग्न लागलंय.. घर, संसार, नोकरी, संस्कार आणि आपली स्वप्नं. या सगळ्यांत मात्र आपलं माणूसपण, स्वातंत्र्य लांब राहिलय. कर्णासारखं. आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा व्याभिचार ठरतो मग."
"वाहवा.. आता कसं अगदी क्रिअटीव्ह हेड सारखं बोललात मॅडम.."
"बर्र.. असू द्या.."
सुहासशी बोलणं तिथेच थांबलं तरी हीचे विचार थांबेनात. घरापाशी सोडून सुहास गेला. फ्लॅटच्या काळोखात पुन्हा तिचा यक्ष तिला छळू लागला. "शेवटी गौरी काय, मी काय, शाल्मली काय किंवा माझी बहिण काय. येनकेनप्रकारेण सगळ्या द्रौपदीच. पावलोपावली छळणार्‍या यक्षासोबतच आपलं जगणं. प्रश्न सोडवण्याचा रामबाण भारतीय उपाय म्हणजे प्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा करणे. कुपोषणाने मुलं मरतायेत तर कुपोषण नाहीच असं म्हणायचं. वाघांची शिकार होतच नाही असा दावा करायचा. हे म्हणजे सगळ्यात सोयिस्कर. बहिणीसारखं किंवा शाल्मलीसारखं. यांना प्रश्न पडतच नाहीत का? आपल्या आयुष्यासोबत जे काही घडतय, घडत आलय ती सगळी व्यवस्था कधी मान्य केली यांनी काहीच विरोध न करता? कसं जमलं यांना? यांचा हेवा करावा की किव करावी हेच कळत नाही कधी कधी. पण ओढाताण होतेच की यांची पण. गौरीची पण.. सपशेल हरुन जातोय आपण या यक्षापुढे."
विचार करुन संपेनात. उत्तरंही मिळेना आणि शांतताही वाटेना. द्रौपदीने टेबल लँप लावला. कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली, "अदृश्य यक्ष आणि हरलेली द्रौपदी.."
9 Responses
 1. Anonymous Says:

  स्वैर मुक्ताशैली..!! कथेत मांडलेले विचार तर अतिशयच आवडले.

  हॅट्स ऑफ.


 2. "आपल्या सगळ्यांची द्रौपदी झालीये. सगळ्यांचच लग्न लागलंय.. घर, संसार, नोकरी, संस्कार आणि आपली स्वप्नं. या सगळ्यांत मात्र आपलं माणूसपण, स्वातंत्र्य लांब राहिलय. कर्णासारखं. आणि त्याच्या प्राप्तीची इच्छा व्याभिचार ठरतो मग."हॅट्स ऑफ....... :)
  ग्रेट यु आर!!
  प्रत्येक विचार पटला....


 3. खूप सुंदर लिहिलंय. आणि अगदी खरं. स्वत:ची स्पष्ट मत असलेल्या शाल्मलीसारख्या मुली नंतर टिपिकल होताना मीही पहिल्या आहेत, आणि हेच सगळे प्रश्न पडले होते तेव्हा. एकदा वाचायला सुरुवात केल्यावर वाचतच रहावसं वाटलं.


 4. Anonymous,
  Thank you.. :-)

  थँक्स सुप्रिया... :-)

  इंद्रधनू...
  ह्म्म.. असे प्रश्न पडतात खरे.. त्यांना जाणवत कसं नाही हा सगळ्यात महत्वाचा... :-?

  प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. :-)


 5. हम्म्म.... प्रयत्न आवडला..
  पुढील लिखाणासाठी शुभेच्छा... 6. Anil Says:

  खूप वर्षांपासूनची इच्छा माझी, कि कुणाकडून या गोष्टींबद्दल असं काहीतरी ऐकावं. आणि हे विचार अशा पद्धतीने मांडले जाऊन त्यातून वाचकाला आत्मपरीक्षणाचेही काही संकेत मिळावेत असंही बर्‍याच लोकांना वाटत असेल, अशी माझी आजच्या वाचकवर्गाबद्दल एक समजूत आहे. असो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे या विचारांमधे असं काही तारतम्य आलंय कि ते कुठल्या एकाच बाजूला झुकले जात नाहीत. तसे या कथेत मांडलेले विषय संपणारे नसले तरीही, तुझ्या लिखाणाचा परीघ बराच व्यापक वाटला मला.

  समाज, संस्कार आणि नात्यागोत्यांच्या संकल्पना कशा बनत आल्या असतील याचा विचार केला तर त्यातलं बरंचसं एकतर सोईंसाठी किंवा भितीपोटी जन्माला आल्याचं जाणवतं. पण कुणाच्या सोई आणि कुणाच्या insecurities? समाजातला एक तुलनेने खूप मोठा गट ज्यांच्या गरजा साधारणता एकसारख्या आहेत त्यांच्याच ना. आणि मग जी माणसं त्या चौकटींमधे बसत नाहीत आणि ती खूप वेगवेगळी असल्याने त्यांचा गटही बनू शकत नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळे संस्कार असे बनलेच नाहीत. आणि मुलभूत स्वातंत्र्याचा संस्कार रुजला नसावा कारण मोठ्या गटाला अशा स्वातंत्र्याची गरज नाहीये, उलट असलं स्वातंत्र्य हे त्यांच्या प्रस्थापित समाजाला आणि संस्कारांना धोक्याचंच आहे. आणि जे काही आहे त्यात ते सगळे बर्‍यापैकी समाधानी असावेत, नाहीतर हे बदललं असतं आत्तापर्यंत. आपलं बाकी काय, जीवाची चार-दोन माणसं असली तरी तेवढं देणं आयुष्याला पुरून उरेल. त्यामुळे समाज आणि संस्कार यावर फक्त अशा comments मारू शकतो मी, नाहीतर त्यांचं तसं फारसं काही घेणं-देणं नाहीये. वेळेला विरोधात जायची आणि त्यांना पटवून नाही देता आलं तर सोडून द्यायची ताकतही आता सरावाने आलेलीच आहे. शेवटी ही मीही स्वतःचीच केलेली एक सोयच आहे म्हणा, पण कमीतकमी दुसर्‍यांनी फक्त आपल्या सोईसाठी असंच जगावं असा आततायी हट्ट तरी नाहीये यात असं समजून बरं वाटून घ्यायचं.

  आणि खरंच, या अगणित गरजांच्या गोंधळात किती मुखवट्यांचा बाजार मांडलायं सगळ्यांनी. कधीतरी गरजेपुरता कुणी नकळत चढवलेला एखादा सोयिस्कर मुखवटा हाच त्या व्यक्तीचा खरा चेहरा आहे असं वाटावं इतकी सहजता असते त्यात. आणि मग गरज संपली कि तितकाच नकळतपणे तो उतरवून नवीन मुखवट्यासाठी त्यांचं ते जागा करून देणं. त्यात आपण किती बदलतोय याची काहीच जाणीव होऊ नये? म्हणून मग असलं काही झेपतच नाही आपल्या तर्काला. बाकी, मुखवट्यांच्या या खेळात प्रेम, भावना, समर्पण, आयुष्य आणि अस्तित्व हे सोईचं पडेल तसं 'वाटून घेणं' हाच सर्वात महत्वाचा भाग आहे. इतकं कि, जणू तेच त्यांच्यासाठी पूर्णसत्य होऊन जावं. आणि मग तसल्या नात्यांमधे अडकलेल्या सगळ्यांनीच मिळून असं जग उभं केलं कि तेच त्यांचं खरं जगणं होऊन बसतं, नाही का? .. बाकी त्यातल्या काहींच्या बाबतीत, दरवेळी असे गरजेनुसार सोयिस्कर मुखवटे बदलणं तितकं सोपही नसावं.. पण खरा चेहरा घेऊन जगण्यातला जो अजाब, जी तडफड आहे ती तितकी त्यात कधी दिसत नाही आणि म्हणूनच खूप आश्चर्य वाटतं त्यांचं कधी कधी. प्रेमाच्या आणि नात्यांच्या अशा ज्याच्या-त्याच्या वेगवेगळ्या व्याख्ख्या जरी बनत असल्या तरिही, त्यात उथळपणा, युक्त्या-प्रयुक्त्या, पटवून देण्याची कपट-कारस्थानं आणि गरजेनुसार मुखवटे बदलणं असल्या गोष्टी आल्या कि मग काही अर्थच राहत नाही त्या संकल्पनांना.. सगळा फक्त गरजा भागवण्यासाठी चाललेला कपटी खेळ वाटतो.


 7. Anil Says:

  आता मुखवट्यांशिवाय जगणं काय असतं हे तसं बर्‍यापैकी ओळखीचं आणि रोजच्या जगण्यातलंही आहे. पण तरिही किंवा म्हणूनही, मुखवटे घालून जगणार्‍या किंवा योग्य मुखवट्याच्या शोधात भटकणार्‍यांबद्दल जास्त काही पुर्वानुमान लावणं खरंच अवघड जातं. इथे मला खर्‍या चेहर्‍याची व्यक्ती शोधणार्‍या एका माणसाची गोष्ट आठवतेय. मुखवट्यांमधे रमलेल्या एकाने त्याची अशी समजूत काढलेली कि,

  "मुखवटाच इतका सुखाचा असताना खरा चेहरा शोधण्याची यातायात करणार तरी कोण? आणि प्रत्येकाला एकच मुखवटा आहे याची तरी काय खात्री? किती मुखवटे सोलत बसणार मग तू? आणि स्वतःचाही विसर पाडण्याचं सामर्थ्य जर मुखवट्यांत असेल तर खरा चेहरा हवा तरी कशाला?"

  मग नंतर, मुखवट्याशिवायच्या अतिशय विद्रुप अशा खर्‍या चेहर्‍याची एक व्यक्ती त्याला सापडते. आणि तिच्यापुढे नम्र होऊन तो म्हणतो,

  "या सार्‍या मुखवट्यांच्या गर्दीत स्वतःच्या चेहर्‍याने जगायला फार धैर्य लागते!"

  पण त्यावर त्या व्यक्तीची अशी काहीशी प्रतिक्रिया येते कि,

  "मला नसते गुण चिकटवू नकोस. मला मुखवटा नाही हे खरे, पण ते काही माझी इच्छा, माझी निवड म्हणून नव्हे. मला मुखवटाच मिळाला नाही. कोणताही मुखवटा मी घातला तर तो जळूनच जातो. येथील पुष्कळ माणसे माझ्यापेक्षाही भेसूर आहेत, पण त्या प्रत्येकाला आपापला मुखवटा मिळाला आहे. मला एक तरी तसा मिळावा म्हणून मी रात्रंदिवस झिजत आहे. सगळे पापुद्रे उलगडत आतल्या गाभ्याचा, खर्‍या चेहर्‍याचा शोध घेत जाणार्‍यांचे तुम्ही गोडवे गाता. परंतु त्याच अमर्याद ओढीने, त्याचप्रमाणे राजत्याग करून, वनवास स्वीकारून, खरा चेहरा झाकत एक योग्य बसणारा मुखवटा शोधत देखील अनेक व्यक्ती जीवन उधळून देतात हे तुम्हाला कधी जाणवतच नाही, इतके तुम्ही अज्ञ आहात."

  ह्म्म.. एकीकडे गरजेपोटी कधी स्वतःच्याही नकळत किंवा कधी प्रयत्नपुर्वक मुखवटे बदलणारे आणि दुसरीकडे खर्‍या चेहर्‍याच्या शोधात भटकणारे किंवा तो जगणारे. यांच्यापलिकडे, असे योग्य मुखवटा शोधण्यासाठी आयुष्य उधळून देणारेही असतील असा विचार नव्हता केला कधी. आणि केला असता तरी माझी वाट आहे तीच राहीली असती म्हणा.. पण तेवढाच एक विचारांचा आवाका वाढतो, बाकी काय! ;-) .. बाकी, तू म्हटल्याप्रमाणे यक्षप्रश्नांचे भुंगे डोकं पोखरत राहणारच, पण परत परत त्यात उत्तरांचा भुसा भरण्याचाही कंटाळा येतो कधी कधी. त्यापेक्षा हे सगळे प्रश्नच मुळातून आणखी समृद्ध होत जावेत.. आणि नुसतीच उत्तरं शोधण्यापेक्षा ती जगता यावीत, जगण्यात आपसूक उतरत जावीत.

  बघ आता, द्रौपदीच्या या कथेत एकंदरीतच काही खूपच महत्त्वाच्या विचारांची मांडणी तू अशी केलीयेस कि त्याचा वाचकावर अगदी ठळक परीणाम होऊन त्याची विचारचक्रं पुन्हा अशी वेगाने फिरू लागतात. म्हणून मग मला इतकी लांबलचक प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावलं नाही. आणि एकदा बोलायला लागलं कि फुल स्टॉप लागणं तसं अवघडच. तरीही, थांबतो आता.. प्रयत्नपुर्वक! :-)