मेरा कुछ सामान ...
हा एक तुकडा तुझा..
आणि हा तुझा..
हा माझा खूप आवडीचा आणि लखलखता,
हा तुझ्याचपाशी असला पाहिजे..
आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं..
नाही का?
.
.
.
.
आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,
गहाळ होऊन गेलय कदाचित ते कधीच,
आणि असेलच तर ते बाकी तुकड्याशिवाय पूर्ण होत नाही,
सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..
कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...
मेरा कुछ सामान ...
तुझ्याविषयी काहीही कलात्मक लिहावं असा तू नाहीस. म्हणजे अजिबातच नाहीस. तरीही तुझ्याविषयी लिहिताना दहादा अडखळतेय मी, कारण तुझ्याविषयी लिहायचं म्हणजे ते तुझ्यासारखंच हवं आणि ते खूप अवघड आहे. का म्हणजे काय? सोपं लिहिणंच तर सगळ्यात अवघड असतं ना... आणि तू खूप सोपा आहेस.. म्हणूनच खूप अवघडदेखिल.. माझ्या शब्दांत मावण्यापलीकडचा..
अगदी पहिल्याने तुला भेटले तेव्हा तुझ्याविषयी काही अंदाज बांधावा इतकाही विचार न करता, "चारचौघांसारखा" असं एक लेबल लावुन तुला मेमरीत ठेऊन टाकलेलं मी. पण तुझ्या सोपेपणाची खोली कळत गेली तसं हे लेबलही गळून गेलं तुझ्यावरुन (इतर अनेक लेबलांप्रमाणेच)
तुझ्यासमोर आयुष्याचं कोणतंही तत्वज्ञान पाजळताना मला खरंतर अतिशय अपराधी वाटत असतं. एखाद्या सुंदर काचेच्या भांड्यावर ओरखडे ओढल्यासारखं. हो.. काचेच्याच.. माणसं मातीचे गोळे असतात आणि मग त्यांचा मातीचा देह बनतो. तू मात्र काचेचाच.. काचेसारखाच.. आतबाहेर निर्मळ, नितळ, पारदर्शक..
"जाऊ दे ना गं.. सोड.. एवढा काय विचार करायचाय? आपणही वागतोच असे कधी कधी. कधी नकळत, कधी जाणूनबुजून. शेवटी आपलीच माणसं आहेत ना ती." इतक्याशा एका वाक्यावर मित्र, मैत्रीणी, नातेवाईकांपासून बॉसपर्यंत कोणाचीही कोणतीही गोष्ट पाठीवर टाकताना पाहिलय मी तुला. असं कसं जमू शकतं कोणाला? आणि तेही अपरिहार्यता म्हणून नव्हे तर समजून घेऊन? वास्तविक पहिल्यांदा तुला असं बोलताना/वागताना पाहिलं तेव्हा "समाजाची खूप गरज असणारा माणूस" हे ही लेबल बहाल केलेलं मी तुला. कदाचित दुबळा. प्रतिकार न करु शकणारा किंवा प्रवाहाविरुद्ध जायला घाबरणारा. पण असं म्हणायला जावं तर असंही नाही. स्वत:ला पटलेल्या मतांवर कोणाचाही विरोध पत्करुन ठाम रहाताना पाहिलय तुला मी.. समोर कितीही मोठा माणूस असला तरीही स्वतःच्या तत्वांवर कधीही तडजोड न करता राहताना पाहिलय. स्वत:च्या मतांवर ठाम रहायचं म्हणजे जगाशी पावलोपावली भांडावं लागतं या मताची पाईक मी. तुला हे असं पहाणं माझ्यासाठी साक्षात्कारापेक्षा कमी नव्हतं. (प्रवाहाच्या विरोधात जायला घाबरणारी आणि म्हणून प्रवाहासोबत असणारी माणसं खरंतर आतून धुमसत असतात आणि ते जाणवल्यावाचून राहत नाही. तुझ्या आतबाहेर भरुन राहिलेली शांतता मात्र नवख्या माणसालाही जाणवेल. हा समजूतदारपणा कुठून आणलास?)  स्वतःच्या मतांवर ठाम राहून आपल्याला विरोध करणार्‍यांवरदेखिल निखळ प्रेम करण्याची कला कुठून मिळालीये तुला? म्हणजे आपल्या विरोधकाचा न पटणारा भाग सोडून बाकी सगळं जाणून घ्यायचं. त्यात काहीतरी आवडण्यासारखं असतंच. पण विरोधकाला विरोधापलीकडे जाणून घेण्याचा विचारच आचरणात उतरवणं केवढं अवघड आहे. (हे असं वागणं किती पुस्तकी वाटतं ना, खासकरुन वाचताना?) पण तुझ्यासोबत राहताना जाणवतं ते किती खरं आहे, किती आतून आलेलं.. अगदी नैसर्गिक.
तुला सांगण्यासाठी प्रत्येकाजवळ काहीतरी असतं. लहानग्या पोरापासून म्हातार्‍यापर्यंत आणि रस्त्यावरच्या स्टॉलवाल्यापासून मॉलमध्ये भेटलेल्या गर्भश्रीमंतांपर्यंत. सगळेच तुला काही ना काही सांगतात. अगदी पहिल्या भेटीत. काही ओळखदेख नसताना. कसं काय? बरं, आता यासाठी लागणारं खूप भारी संभाषणचातुर्य तुझ्याकडे आहे म्हटलं तर असंही नाही. वाक्यात निम्म्या वेळेला तर 'हे','ते' असलं काहीतरी वापरुन वाक्य पूर्ण करावं लागतं तुला. मग ही मोहिनी कुठली होते लोकांवर? तुझ्या गूढ सावळ्या रंगाची की पांढर्‍याशुभ्र हास्याची? कधी कधी वाटतं हात उचलून स्पर्श करावा तुझ्या सावळ्या वर्णाला. चांदीचा वर्ख बोटाला लागतो तसा तुझ्या सावळेपणाही बोटांवर घेता येईल असं वाटतं कधी कधी. बोटांवर घेतलेला तुझा तो रंग बघता बघता अंगभर पसरत जावा, त्याहीपेक्षा खोल आत्म्यापर्यंत झिरपावा. आणि मग तुझ्याच हसण्याचं चांदणं पडून उजळून जावं अंतर्बाह्य. पण नाही. हात पुढे करायला भीती वाटते. आपले हात मातीचे असल्याची जाणिव कशी पुसून टाकायची?
किती किती सोपा समजत होते मी तुला. किती दिवस. हा सगळा चांगुलपणा समजूनही तो केवळ चांगुलपणापर्यंतच मर्यादित होता. इतक्या सरळ माणसांना कशी जाणवेल प्रेमाची खोली? काळजात कळ उठावी अशी तीव्रता? (हेही तुझ्याविषयीचं पुढचं गृहीतक) प्रेम करायला काहीतरी खूप कॉम्लेक्स असावं लागतं अशी काहीतरी धारणा. किंवा जितका माणून गुंतागुंतीचा तितकं प्रेम तीव्र, खोल असले काहीतरी विचार. पण एकही प्रश्न न विचारता इतकं खोल प्रेम कसं करता आलं तुला? कधीच कोणता प्रश्न नाही.. एकही नाही.. हा रुक्मिणीचा वसा कुठे लाभला तुला?
हे एक बरं आहे की तुला जाणिव नाही तुझ्यातल्या नक्षत्रांची. वास्तविक त्यामुळे तू अजूनच उजळून निघतोस. (कधी कधी वाटतं की माणसाला आपल्या असण्याची माहिती नसली की आपण बदलत गेल्याची पण जाणिव होत नाही. आणि मग सगळंच हरवत जातं. पण नाही. हे असले विचार तुझ्यापुढे व्यर्थ आहेत. तुझ्याबाबत हे असं काहीही होणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला.) कारण तू नुसताच निरागस नाहीस. आणि सगळ्यांसोबत संबंध नीट ठेवणार नुसताच डिप्लोमॅटपण नाहीस. तू असा उमजत जाताना माझ्या मनाच्या किती बेड्या गळून गेल्यात हे मी नाही सांगू शकत. विश्वास गमावणं ही जगात सगळ्यात वाईट गोष्ट असेल कदाचित आणि विश्वास परत येणं ही तितकीच सुंदर.
नातं आणि त्यातली माणसं यांचं नातं काय असतं? कदाचित नातं जास्त महत्वाचं असतं माणसांपेक्षा. पण आपलं नातं तुझ्यापेक्षा महत्वाचं कधीच नाही होऊ शकणार. आपण असू नसू, हे नातं असेल नसेल, भेटी होतील, न होतील.. पण तू असला पाहिजेस. तू आहेस तस्साच तू असला पाहिजेस. तसाच तू राहिला पाहिजेस. मला माझ्याच बेड्यांतून मुक्त करुन तू दाखवलेलं नक्षत्रांनी भरलेलं आभाळ कायमच माझ्या सोबतीला राहिल. आणि तूही असाच रहा.. नक्षत्र फुलवत...