मेरा कुछ सामान ...
एखादं छानसं चित्र काढायला घ्यावं, ते मनाप्रमाणे जमतही यावं पण मध्येच लहर फिरल्यासारखे त्यात गडद, उदासिन रंग भरावेत आणि मग असंच फाडून फेकून द्यावं असं काहीसं नियतीने गुरुदत्तच्या बाबतीत केल्यासारखं वाटतं कायम त्याचा विचार करताना. पण त्या चित्राच्या राहिलेच्या, अस्तित्वात असलेल्या खुणा इतक्या विलोभनीय आहेत की आयुष्याच्या या कुटील आणि जटील प्रक्रियांचा राग येतो पण गुरुदत्तच्या अलौकिक प्रतिभेची पाळंमुळंदेखिल अशाच कुठल्यातरी गुंतागुंतीच्या प्रक्रियेत असतील हे जाणवुन स्तब्ध व्हायला होतं.
वसंत कुमार शिवशंकर पडुकोण.. ९ जुलै १९२५ ला बेंगलोरमध्ये जन्माला आलेला हा मुलगा पुढे गुरुदत्त नावाने चित्रपट क्षेत्रातला महारथी ठरला.. १९४१-४६ त्याने उदयशंकर यांच्याकडे त्याने ५ वर्षे नृत्य, नाट्य प्रशिक्षण पण घेतलं. त्यावेळी त्याने सादर केलेलम सर्पनृत्य त्याच्या मृत्यूविषयी असलेल्य गूढ ओढीचं प्रतिक होतं का? खरा कलाकार हा नेहमी असमाधानी असतो म्हणतात. पण त्याचं असमाधानी असणं त्याला इतकं अस्वस्थ करुन गेलं का? किंवा का करुन गेलं?उण्यापुर्‍या ३९ वर्षांचं आयुष्य आणि त्यात सगळं मिळून २० वर्षांचं करीअर. त्यातही सुरुवातीची काही वर्षे किरकोळ भुमिका, सहाय्यक दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक अशी कामं करण्यात गेली.. आणि हा माणुस जगातला एक नामवंत दिग्दर्शक बनला. टाइम्स च्या १० रोमँटीक सिनेमांच्या यादीत त्याच प्यासा आहेच, झालच तर १०० बेस्ट चित्रपटांमध्ये पण त्याचा समावेश आहे आणि तो स्वतः सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक..
गुरुदत्त म्हटलं की खूप पूर्वी लहानपणी कधी बघितलेली त्याची पहिली झलक आजही नजरेसमोर जशीच्या तश्शी उभी रहाते. एक शांत, धीरगंभीर मूर्ती, ठसठशीत चेहरा, विशाल भालप्रदेश, त्याच्यावरच्या नाजुकशा आठ्यांचं जाळं आणि काळेभोर डोळे. त्या नजरेला नजर द्यायचं सामर्थ्य राहु नये, आपल्या आतलं काहीतरी शोषून घेतेय असं वाटायला लावणारी ती नजर. अशी काही वेदना त्याच्या नजरेत आहे की आपसूक नजर खाली तरी झुकावी नाहीतर त्याच्या नजरेतच गुंतून तरी पडावी. त्याच्या चेहर्‍यावरची ही वेदना कधीच पुर्णपणे नाहीशी झालेली मी तरी पाहिली नाही. अगदी मि. & मिसेस ५५ मध्ये मधुबालासोबतचे नटखट रुमानी प्रसंग करताना पण त्या आठ्या तशाच.. ( and again हे सांगितल्याशिवाय रहावत नाही की हा सिनेमा मधुबालासाठी पाहिलाच पाहिजे. तिने विशीतली अल्लड, लग्नाळलेली, अरागस यौवना अशी काही उभी केलिय की आह..! तिच्या त्यातल्या एका एका वाक्यावर, अदेवर मी हजार जन्म ओवाळायला तयार.. तिच्यावर परत कधीतरी..) पण तिच्यासमोरही हा पठ्ठ्या असा काही उभा राहिलाय की तिच्या त्या अलौकिक वावरापुढे तो अजिबात झाकोळला जात नाही. मोस्ट रोमँटीक जोड्यांमध्ये ही जोडी नक्की..!
फ्रेंच न्यु वेव्ह ची चळवळ अजून व्याख्येत बसायची होती, आकाराला यायचे होती त्यावेळी गुरुदत्तने त्याचा प्यासा बनवला होता. किंबहुना Francois Truffaut चा 400 blows (१९५९), जो खर्‍या अर्थाने इटालियन निओरीअ‍ॅलिझम सिनेमामध्ये प्रयत्नपूर्वक आणणारा प्रयोग म्हणून पाहिला जातो त्याच्या २ वर्षे आधी प्यासा (१९५७) प्रदर्शित झाला होता. 400 blows मधली एका किशोरवयीन मुलाची कथा आणि प्यासामधल्या युवकाची व्यथा ही एकाच पातळीवरची आहे. गुरुदत्त हा खर्‍या अर्थाने चित्रपटाच्या क्षेत्रातील एक दूरदृष्टी असलेला, स्वतःची प्रतिभा, विचार असलेला, वेगळ्या वाटा चोखाळणारा एक बुद्धीमान दिग्दर्शक होता. आशियाई सिनेमा त्यावेळी जगात एवढा प्रभावी नसल्यामुळे कदाचित गुरुदत्तचे प्रयत्न व जागतिक पातळीवरील मान्यता मर्यादित राहिली पण त्याहीवेळी त्याचे चित्रपट जर्मनी, फ्रांस आणि जपान मध्ये हाऊसफुल चालत होते हे विशेष.!
'कागज के फूल' हा त्याचा त्याच्या अपेक्षेबाहेर फ्लॉप झालेला एकमेव चित्रपट पण आज हा सिनेमा गुरुदत्तची अजोड कलाकृती म्हणुन पाहिला जातो आणि अर्थातच तो आहे. सिनेमास्कोप चे तंत्रज्ञान पहिल्यांदा हिंदी सिनेमात वापरले गेले ते याच चित्रपटाच्या निमित्ताने. झाली गंमत अशी की त्यावेळी २० सेंच्युरी फॉक्स ही चित्रपटातली प्रसिद्ध कंपनी भारतात काही चित्रिकरण करत होती आणि परत जाताना त्यांच्या लेन्सेस इथेच राहुन गेल्या. त्याचदरम्यान गुरुदत्त 'कागज़ के फूल' साठी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ही बातमी कळाल्याबरोबर लगेच तो आपले सिनेमॅटोग्राफर मुर्थींना घेवुन तिथे पोहचला आणि त्या लेन्सेस त्याने मिळवल्या. त्या चित्रपटात त्याने केलेल्या कॅमेर्‍याच्या करामती आणि छायाप्रकाशाचा वापर हे कायमच चर्चेत राहिलेले आहेत पण 'वक्तने किया क्या हंसी सितम'च्या वेळी गुरुदत्त विचार करत असताना अचानक सूर्यप्रकाशाची एक तिरीप त्याला दिसली आणि त्याने ठरवलं की असं काहीतरी आपल्याला करायचय आणि मग त्याच्या इच्छेनुसार सेटच्या छतावर सूर्यप्रकाशाचा आणि आरशांचा वापर करुन प्रकाशाचा तो झोत निर्माण केला ज्यात एक झालेल्या गुरुदत्त आणि वहिदाच्या प्रतिमांनी त्यांच्या आत्म्याच्या मिलनाची कल्पना त्याला हवी तशी साकारली पडद्यावर. गीता दत्तच्या जादुई आवाज आणि बर्मनदाच्या सूरांच्या पार्श्वभूमीवर कैफी आझमींच शब्द आणि हा छायाप्रकाशाचा केलेला खेळ बघणार्‍याच्या मनावर कायमचा ठसा उमटवुन जातो हे मात्र खरं..! 'कागज़ के फूल' मधल्या अशा अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल.या चित्रपटात प्रथमच कथा पुढे नेण्यासाठी गाण्यांचा वापर करण्यात आला. ही कथा त्याच्या स्वतःच्या आयुष्याची कथा होती आणि ती स्वत:ची वाटू नये म्हणुन त्याने त्यात अनेक वेळ बदलही केले. त्यातल्या त्याचा आणि वहिदाच्या भेटीचा प्रसंग, वहिदाला पार्टीत पाहिल्यानंतर झालेला त्याचा-तिचा संवाद, त्याचं आणि त्याच्या मुलीचं नातं अशा अनेकानेक गोष्टी माझ्यातरी कायमच्या स्मरणात राहिल्यात.
त्याच्या प्यासाच्या निर्मितीवर एक स्वतंत्र कथा होईल एतक्या गोष्टी त्या चित्रपटाशी निगडीत आहेत. अबरार अल्वीच्या या मूळ कथेचं नाव होतं 'कश्मकश', मूळ नायक होता 'चित्रकार किंवा लेखक', गुलाबोचं पात्र नव्हतंच. अबरार ला माटुंग्याला भेटलेली खरीखुरी गुलाबो गुरुदत्तसमोर त्यांनी मांडली आणि प्यासाची कथा त्याच्या मनात पुर्ण झाली. उच्चभ्रु, पांढरपेशा समाजाच्या तकलादु भावना मांडायला सोन्यासारख्या झळझळीत मनाच्या पण परिस्थितीने वेश्या बनवलेल्या गुलाबोपेक्षा बळकट विरोधी बाजू अजून काय असू शकते? प्यासाचे पहिले काही प्रसंग चित्रित झाल्यावर ते जेव्हा पाहिले गेले तेव्हा सगळ्या लोकांचं मत पडलं की गुलाबोच्या भुमिकेसाठी वहिदा योग्य नाही. तिला बदलण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव पण आला पण त्याने ऐकलं नाही. पुढ कलकत्त्याला जाऊन जेव्हा 'जाने क्या तुने कही' चित्रित झालं, ते पाहिल्यावर मात्र सगळ्यांनी एकमताने निर्वाळा दिल की हीच गुलाबो. बाकी त्या गाण्यात वहिदाने जो काही अभिनय केलाय त्यावर फिदा आपण..! (त्यातली तिची अदाकारी बघून 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल' हे गाणं वहिदा-गुरुदत्त जोडीवर चित्रित झालेलं पहायला काय मजा आली असती राव.! असा विचार कायम मनात येऊन जातो)
'ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या है' म्हणणारा त्याच्यातला नायक आयुष्याकडून बर्‍याच अपेक्षा करत असावा. त्याची polyamorous relationship ची ओढ मात्र ना गीता दत्त समजू शकली ना वहिदा. काळाच्या पुढे दृष्टी असलेल्या या कलाकाराच्या अपेक्षाही काळाच्या पुढच्या असाव्यात. गुणी आणि सुंदर स्त्रीयांविषयी त्याला कायमच आकर्षण राहिलं त्याच्या आयुष्यभर. विजया-गीता-वहिदा.. आणि यातल्या कोणा एकीला निवडायची त्याची इच्छा नव्हती. खासकरुन गीता-वहिदा मध्ये. एकदा गुरुदत्त म्हणालेला, "लाइफ में यार क्या है। दो ही तो चीज है, कामयाबी और फेल्युअर। इन दोनों के बीच कुछ भी नहीं है। देखो ना, मुझे डायरेक्टर बनना था, बन गया, एक्टर बनना था बन गया, पिक्चर अच्छी बनानी थी, अच्छी बनी। पैसा है सबकुछ है, पर कुछ भी नहीं रहा।"
त्याच्या आयुष्यात त्याने ज्या लोकांना चित्रपटांसाठी निवडलं ते मात्र शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिले. जॉनी वॉकर, अबरार अल्वी, व्ही.के.मुर्ती.. चित्रपटाच्या यशापयशाचा त्याच्या या नात्यांवर काही परिणाम नाही होऊ दिला त्याने. पण अबरार अल्वीने प्रसिद्ध केलेल्या गुरुदत्तच्या आठवणींत त्याने स्वत:विषयीच जास्त लिहिल्याचं ऐकलं तेव्हा परत एकदा या क्षेत्रातल्या मुखवट्यांची चीड आल्यावाचून राहिली नाही. आणि गुरुदत्तच्या जाण्यानंतर त्यांच्या हातून कोणतीही खास कलाकृती निर्माण झालेली नाही हे विशेष.. असो..
'चौदहवी का चांद' आणि 'साहब, बीबी और गुलाम' हे चित्रपट गुरुदत्तने दिग्दर्शित केले नसले तरी त्यांच्यावर गुरुदत्तची छाप स्पष्ट जाणवते. आणि या चित्रपटांशी कायम त्याचं नाव जोडलेलंच रहाणार आहे. त्याने अभिनेता व्हावं अशी काही त्याची खास इच्छा नव्हती. किंबहुना प्यासासाठी त्याने दिलीपकुमारची निवड केलेली (थँक गॉड तो आला नाही आणि गुरुदत्तने तो रोल केला.)
फ्रेंच न्यू वेव्ह ची जी auteur theory होती ती गुरुदत्तला अगदी तंतोतंत लागू होते. सिनेमा बनवण्यात तंत्रज्ञान असलं तरी त्याची सर्जनशीलता सगळ्या प्रकारचे तांत्रिक अडथळे पार करुन झळाळुन उठायला समर्थ होती.
गुरुदत्तने त्याच्या आयुष्यातलं पहिलं स्वतंत्र दिग्दर्शन वयाच्या २६व्या वर्षी केलं. देव आनंदच्या बाझी चित्रपटाचं. तिथुन पुढे १३ वर्षांचा काळ फक्त.. यानंतरही त्याने काही थ्रिलर चित्रपट बनवले. सी.आय्.डी, आरपार, जाल वगैरे. पण गुरुदत्त म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्याने येणारी नावं म्हणजे, प्यासा, कागज़ के फूल, साहिब, बीबी और गुलाम आणि चौदहवी का चांद..!
त्याच्या या वैयक्तिक आयुष्यातल्या अपयशाने पोखरलेला हा प्यासा मि. ५५, १० ऑक्टोंबरच्या रात्री दारुच्या नशेत झोपेच्या अतिरिक्त गोळ्या खाऊन एकटा जावा?"गमसे अब घबराना कैसा, गम सौ बार मिला" असं का नाही म्हटला तो त्याच्या खर्‍या आयुष्यात? का नाही स्वतःची अशी समजूत काढू शकला?
आपल्या मुलांना एकदा भेटू द्यावं म्हणुन गीता दत्त सोबत झालेलं भांडण पुरं पण करता येऊ नये? आपल्या मुलांना भेटता पण येऊ नये त्याला? 'ये इन्सां के दुष्मन समाजो की दुनिया' ही दुनिया कदाचित तुझ्यासाठी नव्हतीच रे कधी.. पण तरी तू आल्यासारखं थोडं थांबायला पहिजे होतंस... त्याचं या जगात येणं आणि जाणं चटका लावुन जाणारं होतं खरं.. त्याच्याविषयी विचार करताना The Shawshank Redemption मधलं एक वाक्य कायम मनात घोळत रहातं,"Andy being gone. I have to remind myself that some birds aren't meant to be caged. Their feathers are just too bright. And when they fly away, the part of you that knows it was a sin to lock them up DOES rejoice. But still, the place you live in is that much more drab and empty that they're gone." जगातून निघुन गेलेल्या गुरुदत्तच्या संदर्भात जग असंच दिसलंय मला कायम..!
मेरा कुछ सामान ...
Love is as contagious as a cold. It eats away at your strength, morale... If everything is imperfect in this world, love is perfect in its imperfection असं तो म्हटला खरं पण चित्रपटांवर प्रेम करुनही ते अतिशय perfect बनवले त्याने. कुठेही काही imperfect राहिलं नाही त्या प्रेमात.
चित्रपट तसं पाहिलं तर मनोरंजनाच्या क्षेत्रातलं अगदी नवं माध्यम. अगदी दिड दोनशे वर्षांचा हा प्रवास. पण हे कथा मांडण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. किंबहुना सर्वात प्रभावी म्हटलं तरी वावगं ठरू नये. सूरांमधली आर्तता, चित्राच्या रंग-रेषांचे अर्थ, कवितेची गूढता समजाऊन घ्यायला रसिकाला स्वतःची एक क्षमता लागते, शक्ती-बुद्धी खर्च करावी लागते. पण बहुतांशी चित्रपटात 'ये हृदयीचे ते हृदयी घालणं बरच सोपं असतं. समोर दिसणारी माणसं समजावुन घेणं हे एखाद्या पुस्तकातील व्यक्तीरेखा वाचून, तिचं चित्र डोक्यात तयार करुन मग समजावुन घेण्यापेक्षा सहज करण्यासारखं आणि कमी कटकटीचं काम असतं. (अर्थात हे फक्त खराखुरा अभिनय करणार्‍यांविषयी.. अभिनयाच्या नावाखाली जमलेल्य बाजरगर्दीविषयी नाही..) तर असं हे माध्यम. पण तरीही कल्पनाविलास, खूप सारी अ‍ॅक्शन, हॉरर, थ्रिलर यापेक्षा माणसच्या खोल मनात दडलेल्या भावना, नात्यांचे पैलु, रंग, भावभावना दाखवणार्‍या कलाकृती माझ्या जास्त जिव्हाळ्याच्या. आणि कदाचित त्यामुळेच stanley kubrick पेक्षा Ingmar Bergman आणि Nolan पेक्षा Alejandro Inarittu जास्त जवळचा. आवडते, प्रतिभावान सगळेच पण Bergman जास्त जिव्हाळ्याचा.
इन्गमार बर्गमन- एक जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक. अनेक महान दिग्दर्शकांसाठी आयडॉल ठरलेला आणि रसिकांसाठी पर्वणी. १४ जुलै १९१८ ला स्वीडनमध्ये एका नर्सच्या आणि धर्मगुरुच्या पोटी जन्माला आलेला 'इन्गमार'ने बर्‍याच कडक म्हणावं अशा वातावरणात बालपण घालवलं. त्याच्या चुकांबद्दल बंद, अंधार्‍या कपाटात वेळ पण घालवला. त्यानंतर १६व्या वर्षी बर्गमनने हिटलरच्या सेनेत रीतसर ५-५ महिन्यांचे दोन कंपल्सरी सेशन पण पूर्ण केले. आणि १९३७ मध्ये त्याचा खरा प्रवास सुरु झाला. स्टॉक्लोहोममध्ये ड्रामा स्कूलमध्ये नाव घातलं त्याने कला आणि वाड्मयाच्या अभ्यासासाठी.
बर्गमनने त्याच्या एका मुलाखतीत म्हटलेलं की त्याला एक अख्खा सिनेमा close up मध्ये करायला आवडेल. कलाकारांच्या चेहर्‍याचा अशक्य सुंदर उपयोग करुन घेतला त्याने भावना, प्रसंग, त्यांची तीव्रता लोकांपर्यंत पोहचवायला. आणि यासाठी कायम त्याच्या कंपूत अतिशय चांगल्या कलाकारांचा संच राहिला. Liv Ullmann, Bibi Andersson, Erland Josephson, Ingrid Thulin, Max von Sydow हे त्याच्या चित्रपटातून कायमच समोर येत राहिलेले काही कलाकार. Persona मध्ये तर एकही वाक्य न बोलता Liv ने जे काही चेहर्‍यावर दाखवलय, त्या भावना, ती गूढता आपल्या मनावर कायमची छाप पाडून जाते. आणि तिच्यावरच चित्रित झालेला दुसर प्रसंग म्हणजे Cries and Whispers मध्ये तो तिच्या म्हातारं होत जाण्याचं वर्णन करत असताना तिच्या चेहर्‍यावर एकटक खिळुन राहिलेला कॅमेरा. तिने जे काही दाखवलय त्या चेहर्‍यावर ती म्हणजे कविताच आहे एक. ग्रेसची कविता. त्याच्या सगळ्या सिनेमांची खासियत म्हणजे हे प्रचंड ताकदीचे कलाकार, त्यांचे भले मोठे close ups आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे अप्रतिम भाव. मुद्राभिनय किती जास्त प्रेक्षणिय असू शकतो, किती परिणाम करु शकतो हे पहायचं असेल तर बर्गमनचा सिनेमा पहावा.
I write sripts to serve as skeletons awaiting the flesh and sinew of images असं तो स्वत:च म्हटलाय अणि नंतर तर त्याच्या कलाकारांमध्य आणि त्याच्यामध्ये इतका छान सूर जुळला होता की तो आपल्या सिनेमाचे संवाद वगैरे लिहायचा नाही, कलाकारांना प्रसंग आणि व्यक्तिरेखा समजावुन दिली की त्या प्रसंगी ती व्यक्ती कशी वागेल, काय बोलेल हे तुम्हीच म्हणा असं तो सांगायचा. The more you become personal, the more it becomes universal हे वाक्य बर्गमनच्या सिनेमाला अगदी १००% लागु होतं. त्याचे सगळेच विषय, प्रेम, राग, भीती, द्वेष, वेडेपणा, आजारपण, विश्वासघात असे.. माणसाच्या मनाच्या अशा काही अवस्था ज्यात माणुस सर्वांत जास्त अस्थिर, चंचल, स्फोटक असतो. माणसाच्या मनात खोलवर दडलेले सगळे विकार उफाळुन आलेले असतात. स्वतः बर्गमनने त्याच्या २ सर्वोत्कृष्ट कलाकृती त्याच्या आजरपणाच्या काळात लिहिल्यात ज्यावेळी तो मानसिकरीत्यापण खचलेला होता, nervous breakdown च्या अवस्थेला पोहचलेला होता.
त्याचा सिनेमा बघायला जाणार असाल तर मात्र अतिशय सावध! आपलं सगळं लक्ष त्या दिड-दोन तासात कुठेच विचलित न होऊ देता, त्याच्या प्रत्येक सेकंदावर लक्ष देऊनच सिनेमा पहावा लागतो. कारण बहुतेकदा तो चित्रपट पहाण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ असते. तो चित्रपट पहाण्याचं धाडस आपल्याकडून परत होईलच याची काहीच खात्री देता येत नाही. आणि त्यामुळेच त्या चित्रपटातलं कोणतही वाक्य, कोणतंही expression चुकवणं पण मुळीच परवडणारं नसतं! त्याच्या चित्रपटातली बरीचशी वाक्यं अशी असतात की आपण स्तब्ध व्हायलाच पाहिजे. एखादं पुस्तक वाचता वाचता मध्येच एखादी ओळ अशी येते की की तशीच ओलांडून आपण पुढे नाही जाऊ शकत तसेच. थांबावच लागतं तिथे. विचार करावा वाटतो, मुरवुन घ्यावं वाटतं ते.. आणि असे प्रसंग खूपदा येतात बर्गमनचा सिनेमा बघताना. त्याच्या भाषेत सांगायचं तर, "no form of art goes beyond ordinary consciousness as film does. Straight to our emotions, deep into the twilight room of the soul!" आणि त्याने माणसाच्या मनातल्या या संधीप्रकाशाच्या वेळा अशक्य समर्थपणे उभ्या केल्यात. 'संधीप्रकाश' किती नेमका शब्द वापरलाय! दिवसाचा सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारा, हुरहुर लावणारा, कावरंबावरं करणारा हा काळ. एक दिवस सोडून चाललेला असतो कधीच परत न येण्यासाठी, रात्रही पटकन कुशीत घेत नसते. दिवस ठीक असतो, रात्र पण, संध्याकाळ चढत जाणं हे मात्र जीवघेणं असतं. अशा जीवघेण्या कालखंडांची मालिका मनात घेवुन माणुस वावरत असतो कुठेतरी. या सगळ्या अंतरीच्या कळांचं त्या उत्कटतेने चित्रण करणारा एक बर्गमनच!
Wild Strawberries मधला तो खडूस वाटणारा म्हातारा आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळुन बघताना त्याला झालेल्या जाणिवा, घडलेल्या गोष्टी, घडाव्याशा वाटणार्‍या पण न घडलेल्या गोष्टी, आठवणी, मृत्यूची भीती या सगळ्याच्या भोवर्‍यांत त्याचं अडकणं, उलगडत जाणं अत्यंत प्रेक्षणिय असतं. Me and my wife are dependent on each other. It is out of selfish reasons we haven't beaten each other to death a long time ago. असं एखादं मध्येच येवुन जाणारं वाक्य आजुबाजूच्या अनेक नात्यांचं अपरिहार्य वास्तव मांडतात समोर. आणि When your were little you belived in Santa Claus, now you belive in God हे वाक्य माणसाच्या आगतिकतेचं.
त्याच्या Persona विषयी बोलायला तर शब्दच नाहीत माझ्याकडे. नि:संशय ती त्याची सर्वोत्तम कलाकृती आहे. Persona आणि Hour of the Wolf हे त्याचे माझ्यावर सर्वात जास्त स्वार झालेले चित्रपट आहेत. त्यांच्या प्रभावातून बाहेर यायला तुम्हाला किती वेळ लागेल हे तुम्ही खरच नाही सांगु शकत. Hour of the Wolf हा त्याचा एकमेव हॉरर सिनेमा. हा चित्रपट नेहमी वास्तव आणि आभास (स्वप्न) यांच्या सीमेवर चालत रहातो. अशाच एका प्रसंगावर येऊन संपतो. ते नक्की काय होतं, कशाचं रुपक, काय म्हणायचय हे सगळे घोर आपल्या जीवाला लावुन सिनेमा संपून जातो. आणि परत 'You see what you want to see!' म्हणत सत्य आणि आभास यातलं खरं खोट ठरवायची जबाबदारी पण घेत नाहीत त्या व्यक्तीरेखा. असाच एक प्रसंग Cries and Whispers मध्ये पण आहे. सत्य की स्वप्न याची जबाबदारी प्रे़क्षकांवर सोडूनदेखिल मनावर कायमचा ठसा आणि विचार करायला लावतील अशा कल्पना मनात सोडून जातात हे प्रसंग. Hour of the Wolf मधली growing old together ची संकल्पना अशीच पकड घेणारी. केवळ अफाट. हा चित्रपट कित्येक दिवस मनातून जात नव्हता. वातावरणनिर्मितीचा अभ्यास करावा हा चित्रपट पाहुन एखाद्याने. तीच गोष्ट नात्यांची. The Silence मधलं दोन बहिणींचं नातं असो की Persona मधलं नर्स, पेशंटचं नातं असो. नाती वरवर काय, कशी असतात आणि त्याच्या मागे किती खोलवर दडलेल्या कोणकोणत्या गोष्टी असतात याची जाणीव कदाचित त्या नात्यातील माणसांना होणं पण अवघड असतं. अशा या गोंधळाच्या जागांतील नेमक्या ठिकाणी बोट ठेवतो तो. त्या व्यक्तीरेखा मग आपल्यातूनच बाहेर आल्यासारख्या वाटायला लागतात. Smiles of a Summer Night मधली I am tired of people, but it cant stop me from loving them म्हणणारी म्हातारी Mrs. Armfeldt माझ्यातूनच बाहेर आल्यासारखी वाटायला लागली मला. हे वाक्य ऐकलं तेव्हा मुव्ही पॉज करुन बसलेले मी. कित्ती कित्ती जास्त नेमक्या भावना आहेत या.! तीच पुढे म्हणते Beware of good deeds. They cost far too much and leave a nasty smell..!
Winter Light मध्ये पण त्याच्याकडे प्रेम व्यक्त करायला आलेली ती तिच्या कष्टाने धरुन ठेवलेल्या स्वाभिमानामागे असलेली समर्पणाची तीव्र ओढ व्यक्त करते तेव्हा पण असचं स्तब्ध व्हायला होतं.
मी कोणाच्यातरी मुलाखतीत वाचलं की पाहिलं होतं, माणुस तेच चांगल्याप्रकारे मांडू शकतो जे तो स्वत: जगलाय. तेच लोकांना भिडू शकेल असं पोहचवु शकतो तो. कदाचित नात्यातली गुंतागुंत, माणसाच्या अशा सगळ्या भावना लोकांपर्यत इतक्या समर्थपणे पोहचवु शकण्यामागे त्याचं स्वतःचं आयुष्य आहे कुठेतरी. चार अयशस्वी आणि पाचव्या २५ वर्ष टिकलेल्या संसारासोबत त्याची अनेक अफेअर्स पण झाली. सगळी मिळुन ९ मुलं. या सगळ्या गुंतागुंतीच्या नात्यांच्या छटा त्याच्या सिनेमांमध्ये नक्कीच पडल्या असणार. किंबहुना त्याच्या सगळ्याच विचारांच्या. वयाच्या ८व्या वर्षीपासून त्याचा देवावरचा विश्वास उडाला होता म्हणे. आणि The Silence मध्येच हा शोध संपलेला त्याच्यामते. पण त्याही आधी The Seventh Seal मध्ये 'We must make an idol of our fear, and call it god.' हे म्हणुन गेलाच आहे तो.
शेवटी ६० वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द.. ६३ चित्रपटांचे, टिव्ही सिरीअलचे दिग्दर्शन, ६३ च्या कथा, निर्मिती आणि अनेक कामं.. ३ ऑस्कर अशी भरघोस कामगिरी केल्यावर त्याचं एकुणच मत असं होतं की, "My basic view of things is not to have any basic view of things. From having been so dogmatic, my views on life have been dissolved. They dont exist anymore." इतका अशक्य माणुस त्याच्या कलाकृतीतून अनुभवणं हे खूप भारी असतं. खरतर त्याच्यावर लिहायची पन योग्यता नाही माझी पण रहावलं नाही. कायम शोध घेत रहावं अशी व्यक्ती आहे बर्गमन माझ्यासाठी. प्रचंड आदर्, आकर्षण आणि गूढतेचं वलय असतं कायम त्याचा विचार करताना. आणि कितीही नाही म्हटलं, अशक्यता माहिती असली तरी वाटून जातं, "अगदी आता आता पर्यंत पण होता तो. ३० जुलै २००७ पर्यंत.. एकदा, फक्त एकदा भेटता आलं असतं तर..."
मेरा कुछ सामान ...
पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..



ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
मेरा कुछ सामान ...
मी जरा जास्तच उशीरा जन्म घेतला याची प्रामाणिक खंत ज्या लोकांकडे बघुन मला वाटते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे किशोर कुमार.. आभास कुमार गांगुली.. मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाने आणि त्याबरोबरच वेळोवेळी कळत गेलेल्या विक्षिप्तपणाच्या कथांमुळे. (कारण जगाने वल्ली ठरवलेल्या लोकांबद्दल आकर्षण तर आहेच पण त्यांच्यासोबत माझं सूत जरा लवकरच जमतं असा माझा अनुभव आहे.. असो..)
"कुणी विचारायला येवु नये, नाहीतर खूप चिडचिड होईल" असं वाटतं आणि "कोणी विचारायला का येत नाहीये?" असं वाटुन पण त्रागा होत असतो अशा वेळी किशोरचा आवाज पांघरुन बसणे हा कायमच एक सोयिस्कर मार्ग असतो.
शब्दांकडे अतिरीक्त लक्ष देण्याची खोड म्हणजे माझ्या आठवणींपलीकडची. मला आठवतय तेव्हापासून गाण्यातील शब्दांकडे जरा जास्तच चिकित्सकपणे लक्ष देत आलिये मी. अगदी सूरप्रधान शास्त्रिय गायकी ऐकतानापण ती चीज सगळी समजत नाही तोवर अस्वस्थ वाटत रहातं. पण शब्दांकडे लक्षच जाऊ नये किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळावं अशी काही जादू आपल्या आवाजाने करुन, त्याच्या सूरांनीच तो मला ओढुन, बांधुन ठेवायला लागला तेव्हा मात्र त्याच्यापुढे हात टेकले मी.
किशोरच्या गाण्यातल्या या गद्यात घेतलेल्या छटा, म्हणजे एखादं उपहासात्मक हास्य, एखादा उसासा या गोष्टी जितक्या खल्लास करतात तितक्या कोणाच्याच नाही असा माझा तरी अनुभव आहे. "कैसे कहे हम, प्यारने हमको" या गाण्यात तो जे ऊपहासाने हसलाय ना की प्रत्यक्ष त्या सिच्युअशनला असं हास्य कोणी दिलं तर संबंधित व्यक्तीने तिथेच शरमेनं मरुन जावं.
त्याच्याविषयीच्या सगळ्या कथा म्हणजे एकेक आश्चर्यच वाटायच्या ऐकताना. आणि नंतर नंतर त्याच्याविषयी काहीही ऐकल्याचं आश्चर्य वाटलं तर त्या आश्चर्य वाटण्याचं आश्चर्य वाटावं इतकं त्याचं विक्षिप्तपण अंगवळणी पडलं. निर्माते पैसे वेळेवर न देण्याच्या भीतीने म्हणे त्याला कायम ग्रासलेलं असायचं. त्यातून त्या वाटण्यापोटी त्याने केलेले सत्राशे साठ प्रकार तर त्याहून अजब. कुठे अर्धाच मेकअप कर, कुठे शुटींगमधून पळुनच जा, कुठे निर्मात्याच्या घराबाहेर रोज सकाळी जाऊन ओरड, घराबाहेर "beware of kishore" अशी पाटीच लाव.. एक ना दोन, हजार कथा. विक्षिप्त वाटायला लावणार्‍या.. पण त्याचबरोबर त्याचं स्वत:च्याच परसदारच्या वृक्षराजीशी गप्पा मारणं, त्यांना मित्र मानणं, मधुबालासाठी इस्लाम स्विकारणं, शेवटपर्यंत तिची सोबत करणं याही काही गोष्टी त्याचा विचार करुन करुन हैराण करायला लावणार्‍या. आणि "आ चलके तुझे मै लेके चलुं" मधल्या हळुवार भावना लिहिणारा हाच झुमरु आहे हे कळलं तेव्हापासून तर मनाला चटका लावुन गेलाय तो. तो नक्की कसा होता, काय होता याचा विचार करणं हा रिकाम्या वेळेचा छंदच बनून गेला मग..
किशोर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो त्याचा मिष्किल, खट्याळ चेहरा पण कदाचित त्याच्या इच्छेप्रमाणे तो रिटायर्ड होऊन खांडव्याला जाऊन राहिला असता तर या खट्याळ चेहर्‍यामागे लपलेला "आ चलके.." लिहिणार्‍या कवीने त्याच्याकडून नक्कीच काहीतरी लिहुन घेतलं असतं.. तो थोडा अजून उलगडायला मदत झाली असती कदाचित..
कॉलेजच्या काळात असताना लागलेलं किशोरच वेड मात्र पुरं झपाटून टाकणारं होतं. तेव्हा त्याच्या बर्‍याच पैलुंचा वेड्यासारखा शोध घेतला मग. मधुबालाच्या जिवंतपणाला आणि खळखळत्या उत्साहाला तितकीच समर्थ साथ देऊ शकणारा एक किशोरच वाटायचा मला. बाकी एखादा गुरुदत्त सोडला तर सगळेच तिच्यासमोर पानी कम वाटायचे. अगदी कधी कधी देवानंदसुद्धा... ती सुद्धा त्याच्यासोबत बालिशपणा करताना फुलून आल्यासारखी वाटायची कायम मलातरी. "चांद रात, तुम हो साथ" असो, "आंखोमे तुम दिल मे तुम" असो नाहीतर "हाल कैसा है" किंवा "पांच रुपय्या बारा आना".. माहित नाही नक्की काय ते, पण त्याचं अस्तित्वच मोहून टाकणारं होतं. आजही ही सगळी गाणी दोनशे अठराव्यांदा ऐकतानादेखिल मी नाचत असते एवढं मात्र खरं.. आणि त्याची दु:खी गाणी ऐकणं हा तर सोहळाच असतो. नको नको म्हणताना ओढत नेतोच तो आपल्याला त्या मनस्थितीत.. क्षणात तोडुन टाकतो सगळ्या जगापासून..
त्याला सगळ्यात समर्पक विशेषण द्यायचं झालं तर मला एवढच सुचतं की त्याचा आवाज उमदा होता. म्हणजे खरच त्याची गाणी ऐकताना कायम असं वाटायचं की एखादं देखणं, भारदस्त व्यक्तिमत्व गातय. त्यामुळे प्रत्यक्षात त्याची बरीच गाणी पाहिली तेव्हा प्रचंड मोठा भ्रमनिरास झालेला माझा.
त्याची आवर्जुन बोलावी, उल्लेख करावी अशी गाणी भरपूर आहेत आणि एखाद्या गाण्यातल्या एखाद्या ओळीत त्याने केलेल्या करामती सांगायच्या म्हटलं तर तेच लिहित बसावं लागेल मला. पण मला वाटतं त्याचा असा शोध घेत रहाणं हेच जास्त छान आहे. एखादं गाणं शंभरवेळा ऐकुन झालेलं असतानासुद्धा अचानक नंतर त्याने एखाद्या शब्दांत केलेली गंमत जाणवते तेव्हा आपल्याही नकळत आपण त्याला दाद देवुन जातो.
तसं आज त्याच्याविषयी बोलायचं काही खास कारण नाही पण त्याच्याविषयीचं हे सगळं वाटणं मांडायचं होतं कुठेतरी.. त्याचा सूर सच्चा होता, लकबी वेड्या.. काळजाला सुगंधी जखमा करुन गेलेला मोगरा होता तो.. किशोर.. त्याच्या नावाप्रमाणेच - आभास.. त्याच्या सूरांनी वार करुन छळणारा. आणि या जखमांसाठीच कायम त्याच्या मागे मागे जायला भाग पाडणारा..
मेरा कुछ सामान ...
म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्‍याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
मेरा कुछ सामान ...
मला समजलिये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातिल मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतिये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....
मेरा कुछ सामान ...
अजून काही मनात दाटे
तुझे हसू पापण्यांत दाटे
तुला पिसे लागता नभाचे
धुके नव्याने वनात दाटे..
==*==*==*==*==*==*==*==*==*==
जगी मानभावी उमाळे असे
मला पोळती हे उन्हाळे असे..
जरा शिंप रे तू तुझे चांदणे
जरी कोरडे पावसाळे असे..
==*==*==*==*==*==*==*==*==*==
चंद्रावरती स्वप्ने आता मिरवत नाही,
बागेश्रीही तार मनाची हलवत नाही,
शिकले मीही हसण्या दुसर्‍यांच्या अश्रुंना,
आता माझे जगणे मजला चकवत नाही..
==*==*==*==*==*==*==*==*==*==