मेरा कुछ सामान ...
काल कुठल्यातरी रानात
कोकिळेमागे फिरताना,
मला तू पाठवलेला ढग भेटला होता..
तुझा पाऊस घेवुन आलेला..
माझ्यासाठी..
चला..!
शेवटी तुझा पाऊस माझ्याचसाठी होता तर..
मला कित्ती आनंद झाला म्हणुन सांगु..
त्या आनंदात आम्ही खूप गप्पा मारल्या..
काय काय दाखवलं मी त्याला..
माझी फुलपाखरांची शेती,
नुकतच अंकुरु लागलेलं चांदणं..
मावळतीच्या किरणांना अडकवलेला झुला..
खास तुला द्यायला म्हणुन ठेवलेला, पिकुन भोपळ्यासारखा झालेला
पिवळाधम्मक चंद्र...
आणि मग तिथेच त्यातला थोडा पाऊस शिंपुन
आम्ही इंद्रधनुष्य पण बनवलं..
त्याच्यावरच गप्पा मारत बसलेलो आम्ही..
कितीच्या किती वेळ..
त्याला म्हटलं,
"ए, सांग ना.. काय काय बोलतो तो माझ्याबद्दल?"
तोही रंगात येवुन बरसु लागला,
मीही तल्लीन होवुन भिजू लागले..
तुझ्या आठवणी सांगु लागले..
आणि अशाच गप्पा रंगात आलेल्या असताना
अचानकच काहीतरी चमकल्यासारखा निघुन गेला तोंड फिरवुन..
ह्म्म...
तरी नशीब! आम्ही सगळा पाऊस संपवला नव्हता..
तुझा ढग म्हणे पत्ता चुकला होता..
मेरा कुछ सामान ...
आभाळात चंद्र,
क्षितिजावर लाली,
फुलांच्यात गुलाब
आणि ॠतुंमध्ये वसंत
खरच इतका महत्वाचा असतो का..
की त्यांच्याशिवाय बाकी सगळंच बिनमहत्वाचं ठरावं?
तशी जगत होतेच की मी माझी पोकळी घेवुन..
मग कोणत्या एका क्षणी हसता हसता डोळे भरुन आले..
सुर्यास्त पहाताना माझ्या नजरेतल्या भावनांचं प्रतिबिंब
तुझ्या नजरेत मला दिसलं..
आणि तुझ्या माझ्याही नकळत त्या मनातल्या पोकळीचे दरवाजे
उघडले मी तुझ्यासाठी...
तुला डोकावु दिलं माझ्या खोल आत..
आणि तसंच सामावुनही घेतलं त्यात..
खरं सांगु का,
तू येण्याआधी ती पोकळी इतकी भयानक खरच नव्हती..
उलट तीच मला सोबत करत होती..
तिच्या भरुन रिकामं होण्याने,
ते रिकामपण जास्तच जाणवायला लागलय..
आता मुद्दाम पहावं लागतं,
स्वतःला जाणिव करुन द्यावी लागते की,
चंद्राशिवाय पण आभाळ आहे..
क्षितिजावर अजुनही रंग आहेत..
इतरही फुलं आहेत..
इतरही ऋतू आहेत..
पण आधीच्या स्वाभाविक गोष्टी
आता समजुत घातल्यासारख्या वाटतात..
मला या पोकळीची जाणिव झाली
यात काही चूक झाली का...
तुला माझ्यात डोकावु देणं
ही खरच चूक होती.. (?)
मेरा कुछ सामान ...
काल माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. ते म्हणतात ना, big day of my life. (अचूक भाव व्यक्त करेल असं मराठी भाषांतर काय आहे याचं? असो..) काल दि. २६ फेब्रु. २०११ पुण्यात संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज, दोन श्रेष्ठी, उस्ताद झाकिर हुसैन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा कार्यक्रम होता. गणेश कला क्रिडा मंच. संध्याकाळी ६.३०. माझी अक्षरशः युगानुयुगांची इच्छा होती या दोघांनाही ऐकायची. कारण तालवाद्यात तबला आणि सूरवाद्यात बासरी हे आधीच माझ्या जिव्हाळ्याचे विषय. त्यात या दोन विभुती म्हणजे संगीतक्षेत्रातल्या दंतकथा. एकत्र.. एका व्यासपीठावर आणि त्यात त्यांची जुगलबंदी म्हणजे मी चितेवरुन उठुनही गेले असते. या वीकेन्डला घरी जायच्या प्लॅनला लगेचच काट मारली. मला या कार्यक्रमाविषयी कळलं ते पण अगदी अचानकच. गुरुवारी रात्री सगळा पेपर वाचुन संपला म्हणुन कार्यक्रमांच्या, चित्रपटांच्या जाहिराती वाचत होते. त्यात मला अचानक हे दिसलं. ३ ताड नाही तरी दिड ताड उडालेच मी नक्की. बरं, पासेस घ्यायचे तर फक्त शुक्रवारचाच दिवस होता. दिवसभर ऑफिसमध्ये मी देवाच्या इतक्याच धावा करत होते की पासेस संपु नये. संध्याकाळी ६ च्या ठोक्याला ऑफिस सोडुन पळाले मी. पण बालगंधर्वला पोहचेपर्यंत ७.३० वाजुन गेलेले कारण आपल्या घाईच्या वेळी बस लवकर मिळु नये आणि ट्रॅफिक जाम असलच पाहिजे या योगावरच आमच्या नशिबाचा भर आहे. बरं पासेस घ्यायची वेळ होती ८ पर्यत. तिथे जाउन विचारलं तिकीट खिडकीवर तर ते कार्ड घेत नाहीत हा नविन सा़क्षात्कार झाला आणि इतके पैसे तर माझ्याकडे नव्हते. बरं त्या खिडकीवर बालगंधर्वांना मांडिवर खेळवलं असेल या वयाचे आजोबा बसलेले त्यामुळे "मी पैसे घेवुन येते, पास तेवढा ठेवा" हे दोनदोनदा सांगुन पण त्यांना कळालय की नाही हे मला नीटसं समजायला मार्ग नव्हता. ते फक्त मला जा..जा ची खूण करत होते. मी मनातल्या मनात स्वतःला शिव्या घालत बालगंधर्व मधल्या खोदलेल्या खड्ड्यांवरुन पळायला लागले. बाहेर आले. अर्थात संध्याकाळी ७.३० वाजता जंगली महाराज रोड ओलांडायला जेवढा वेळ लागतो तेवढाच (?) वेळ आताही लागला. मग ATM च्या बाहेर रांग मग पुन्हा रस्ता ओलांडायचा सोपस्कार, खड्ड्यांतली अडथळ्यांची शर्यत पार करुन मी त्या खिडकीपाशी पोचले. आजोबा म्हणाले,"पास संपले." "क्क्का..य???" मी म्हणजे आता फक्त रडायची बाकी होते. तोवर परत ते "थांब थांब, हा शेवटचा आहे" म्हणुन पास ठेवला त्यानी हातावर. बस्स.. माझ्या हाती स्वर्ग लागला होता. आता प्रतिक्षा होती ती शनिवार संध्याकाळची..
कोण म्हणतं पुणे कोस्मोपॉलिटन झालय? पुणेरी संस्कृती अशी राहिली नाही? ज्यांना असं वाटतं त्यांनी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना भेटी द्याव्यात. अस्सल पुणेरीपणाचे नमुने झाडुन हजर असतात. आणि त्यांचा इंगा पण चांगलाच अनुभवायला येतो. आमच्याकडे राजकारणापासुन लावणीपर्यंत, कार्यक्रम कोणताही असो, बाहेर उभे असणार्‍या लोकांचे बोलण्याचे विषय तेच. "च्यामारी, साहेबाला कसा चुना लावला?" किंवा, "ते बेनं कसं बारा....." हेच विषय.. असो, पण इथे नविन कार्यक्रम कोणते पाहिले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक भविष्य, गेला बाजार अगदीच काही नाही तर आमच्या कोणीतरी अर्णव्/प्रद्युम्न असल्या फॅन्सी नावाच्या मुलाला संगीतात कसा रस आणि गती आहे असले विषय चालु होते. अनेक वर्षांनी भेटलेली लोकं कोणी कितीचं तिकीट काढलंय या विवंचनेत होती आणि हे सगळे नमुने (अस्मादिकांना धरुन) कोणत्या एका प्रेरणेने त्या जागी जमलेले याचा विचार करुन मला खरच मनातल्या मनात संगीताच्या किमयेचं कौतुक वाटत होतं.
एकदाचे आत जाउन आम्ही स्थानपन्न झालो. ५ मि.च घोषणा झाली की उस्ताद झाकिर हुसैन साहेबांची तब्येत बरी नाही. ते कार्यक्रम करणार आहेत पण थोडा उशीर लागेल. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य यातला जो काही थोडासा अंतराल होता त्यावेळेत तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचा जीव जावुन परत आला. आता उशीर झालाच आहे तर जरा एक चहा मारुन यावा असा विचार करुन खाली गेले. अर्थातच खाण्याच्या स्टॉलला नेहमी कोणत्याही प्रसिद्ध पुणेरी ठिकाणी जशी गर्दी असते तशीच गर्दी होती. त्या गर्दीत खायला मिळवायचा प्रयत्न करताना चुकून माझा पाय मागे असलेल्या कोण की खडुस टकल्याच्या पायावर पडला तर जणू काही मी मुद्दाम त्याच्या पायावर पाय द्यायला म्हणुनच मी ४०० रु. आणि माझा वेळ खर्च करुन तिथे आल्यासारखा किंचाळला तो. (तरी बरं मी सो कॉल्ड हील्स वै. प्रकार वापरत नाही) पण त्याचा तो आविर्भाव बघुन मला खरच मी हील्स का वापरत नाही, म्हणजे आता मुद्दाम मी त्याच्या दुसर्‍या पायावर कचकचित पाय दिला असता असा विचार मनात चमकुन गेला. काय तर म्हणे "अहो बाई, जरा सांभाळुन.." सांभाळुन ठिक आहे पण बाई???? मला मान्य आहे अगदीच मुली वै. म्हणण्याइतकी मी लहान दिसत नसले तरी बाई म्हणण्याइतकी मी खरच मोठी नाही आणि तशी दिसत पण नाही. सॉरी म्हटलं तरी त्याचं आश्चर्य काही संपेना. मग मी पुन्हा चहा मिळवण्याच्या तपश्चर्येत लागले. ५ मि. च्या अथक मारामारीनंतर चहा मिळाला. तो घेवुन मागच्या गर्दीला मी म्हटलं हातात चहा आहे, जरा वाट द्या. तर तोच शुंभ म्हणाला, "हो! नाहीतर अंगावर पडला तर जास्त लक्षात राहिल" मग तेवढ्याच पुणेरीपणे मी म्हणाले, "मग लक्षात ठेवायचा नसेल तर बाजुला सरका" आता जसा देश तसा वेष ठेवणं आलंच ना ओघाने.. असो.. तर तो १५ मि.चा उशीर म्हणता म्हणता ४० मि. झाला..
आणि तो क्षण आला.. श्वास रोखलेले.. पंचप्राण डोळ्यात गोळा झालेले.. पडदा बाजुला सरकला आणि... आह... झाकिर हुसैन साहेब तबल्यावर बसले होते. सगळ्यांनी उभं राहुन टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यांनीही उभं राहुन अगदी कमरेत वाकुन सर्व रसिकांना अभिवादन केलं. त्यांची ती उपस्थितीच इतकी प्रसन्न होती की कोणत्यातरी अनामिक आनंदाने मन भरुन वाहतय असं वाटत होतं. त्यांची तब्येत खरच बरी नव्हती कारण तबला वाजवतानादेखिल ते खोकत वै. होते. पण कार्यक्रम जसा सुरु झाला तसा सर्व उपस्थितांना आणि कदाचित त्यांनाही सर्व स्थळाकाळाचा विसर पडला. मंद लयीतुन हळु हळु द्रुत लयीकडे जाताना त्या तबल्यातुन किती प्रकारचे नाद निघतात हे बघुन स्तब्ध व्हायला होत होतं. त्या तबल्यातुन निघणारे आवाज जास्त मुग्ध करणारे होते की त्यांची लागलेली गानसमाधी अधिक मोहक होती हे मला तरी सांगता येणार नाही. हळु हळु ती झिंग चढत जाताना त्यांनी प्रेक्षकांना मधुनच कधी तबल्याचे बोल सांगत तर कधी एखादा तुकडा उलगडुन दाखवत खिळवुन ठेवलं. सुर्यमालेचा तुकडा सादर करताना, एक पटीतुन सहापटीपर्यंत सहज फिरवुन आणलं. तर उडान सादर करताना खरच आपल्यासमोरुन एखादम हरीण उड्या मारत चाललय असं चित्र डोळ्यांसमोर उभं केलं. देणारा हजार करांनी देत असताना घेशील किती दोन करांनी हे अक्षरशः खरं आहे. खरच किती घेवु आणि किती नको असं झालेलं. सगळ्या शरीराला फक्त डोळे आणि कान असावेत असं वाटत होतं. त्याहीपेक्षा इतर कशाची जाणिवच नष्ट झालेली. समोर ते तबला वाजवत होते आणि मी ऐकत होते. त्या बोलांनी मला वेढलं होतं आणि मी माझी उरले नव्हते एवढंच आठवतं आता. त्या तबल्यावरची, डग्ग्यावरची कोणतिही जागा वापरायची ठेवली नव्हती त्यांनी. पुढचा एक तास कसा गेला काहीच कळलं नाही. त्या समाधीतून जाग आली ते डायरेक्ट मध्यंतर झाला तेव्हा. त्या मध्यंतरात कसलेतरी मान्-सन्मान आणि सत्काराचे कार्यक्रम चालु होते. त्यावेळी या इतक्या मोठ्या कलाकारात असलेल्या तितक्याच मोठ्या मनाचं दर्शन झालं. त्या वागण्यातल्या साधेपणाने आणि नम्रतेने उपस्थितांची मने अजुनच जिंकली त्यांनी यात वादच नाही. सत्कार संपल्यावर स्वतःची खुर्ची स्वतःच उचलुन नेत होते ते आत. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत आता. त्यांचं अस्तित्वच अत्यंत आनंददायक होतं याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येत होता. मध्यंतरानंतर पंडित हरिप्रसादजींच्या बासरीवादनाला सुरुवात झाली. त्या स्वरसागरात बुडुन गेले परत एकदा सगळे. साधारण अर्धा तास त्यांनी बासरी सादर केल्यानंतर मग उस्ताद त्यांच्या साथीला आले. आणि मग तर कार्यक्रम असा रंगला, असा रंगला की बास्स... पंडितजींचे सूर उस्तादजींच्या तबल्यातुन निघत होते. आणि प्रत्येक ठेक्यासरशी टाळयांचा कडकडात होत होता. शेवटची १५ मि. तर सर्वजण स्वर्गात होते. ती फक्त जादु होती. बाकी काही असुच शकत नाही. जादुगार माणसाला गायब करतो. त्यांनी 'मी'पणाला गायब केलं होतं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या! १० वाजले. त्यांनी सादरीकरण थांबवलं पण पेक्षकांचं मन अजुन भरलं नव्हतं. जास्तच आग्रह झाला तेव्हा पंडितजी म्हणाले "अभी रुकेंगे नही तो पकडके ले जायेंगे हमे" पण लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे होते? आग्रह होतच राहिला. मग अजुन दहा एक मि त्यांनी परत सादर केली तबला-बासरी. आणि मग मात्र खरच कार्यक्रम संपला होता. पडदा पडत होता आणि मी खरच अनिमिष नेत्रांनी त्या पडद्यापलीकडे जाणार्‍या त्या आकृती बघत होते. जमेल तितक्या साठवुन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी घरी कशी आले आणि अजुनपर्यत काय करत होते हे मला खरच नाही सांगता येणार. त्या नाद्ब्रम्हात मी हरवलेय आणि त्यातुन बाहेर यायची माझी इच्छादेखिल नाही. ते सूर, नाद अजुन कानात आहेत, त्या आकृती नजरेसमोर आहेत आणि मी स्वत:पासुन दूर कुठेतरी त्यात हरवलेय. मला तसच हरवलेलं रहायचय.. कायमचं...
मेरा कुछ सामान ...
बघेन र्‍हास कौतुके, गुमान एकदा तरी
ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

करेल कुठवरी तमा, अशीच लोटली युगे
रचेल मूक क्रंदने, तुफान एकदा तरी..

जरी असेल शांत आज सूर या गळ्यातला
भिडेल उंच अंबरास, तान एकदा तरी..
मेरा कुछ सामान ...
तुझ्या एका चंद्रासाठी
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..
आणि तोसुद्धा मला तुझ्याचसोबत वाटून घ्यायला हवा असायचा..
त्याला पूर्णत्व यायचंच नाही त्याच्याशिवाय माझ्यालेखी..
पण आता असं राहिलं नाही..
आधी मुद्दाम आणि आता सवयीनेच हे टाळतेय..
हल्ली माझ्या आभाळातली छोटी मोठी चांदणी पण
अपार कौतुकाने न्याहाळत असते मी..
शांतपणे त्यांचे कवडसे मुरवून घेत असते स्वतःमध्येच..
आणि हे सगळं होताना स्वतःमधले बदल पहात रहाते
त्रयस्थपणे...
आता तर हे इतकं सराईतपणे होतय की
कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..
पण आता सवय झालीये..
खरच सवय झालीये..
मान्य आहे तुझ्यासोबत असताना कवडसे जसे लखलखायचे
तसे आता नाही चमकत..
पण आता येणारा काळोखही फारसा अंधारा नसतो..
ते लखलखणं आणि त्या काळोखी गर्तांतले हेलकावे झेपेनासे झालेत..
माझ्या चुकार चांदण्यांचे किरण घेवून चालत असते मी आता..
खरंच..
तुझ्या एका चंद्रासाठी
अख्खं आभाळ गहाण टाकायचं वय मागे पडलंय आता...
मेरा कुछ सामान ...
आयुष्यात काही क्षण सुखाचे असतात, काही दु:खाचे, काही रागाचे, लोभाचे.. पण काही क्षण मात्र असे येतात की त्यावेळी त्या भावनेपेक्षा काळिज हलवुन टाकणारी त्या भावनेची तीव्रताच मनात घर करुन रहाते.. अगदी कित्येक वर्षांनी जरी आठवले ते क्षण तरी ते तितकेच तीव्र असतात. असं म्हणतात की काळाबरोबर सगळे रंग फिकट होत जातात. पण काही रंगांचे फटकारे मात्र सूर घोटुन अधिक अस्सल व्हावे तसे अधिकच चमकदार होत रहातात....
--------------------------------------------------------------------------------
३रीत असताना शहिद भगतसिंग चित्रपट पाहिला तेव्हा त्यांच्या फाशीच्या वेळेस अक्षरशः धाय मोकलुन रडलेली ती. आणि आईने कितीही समजावलं तरी इंग्रज हा देश सोडुन गेलेत आता यावर कितीतरी दिवस तिचा विश्वास बसत नव्हता.
-------------------------------------------------------------------------------
ती बाबांची वाट बघत शाळेबाहेर उभी होती. समोरुन एक गाडी चाललेली. त्यावरचं बाळ तिच्याकडे आणि ती त्या बाळाकडे बराच वेळची पहात होते. आणि नजरेआड जायची वेळ आली तेव्हा अचानकच ते बाळ खूप गोड हसलं आणि तिला बाय्-बाय करायला हात हलवले त्याने. आज इतक्या वर्षांनंतरही ते बाळ जसंच्या तसं नजरेसमोर येतं तिच्या.
--------------------------------------------------------------------------------
१३-१४ वर्षांची असताना कधीतरी एका हिवाळी रात्री कोणत्यातरी नातेवाइकाकडे सुट्टी घालवताना "दिल ढूंढता है फिर वोही.." ऐकलं होतं. काय समजलं त्यातलं? माहित नाही. पण एक प्रश्नही न विचारता ती आता आयुष्यभरासाठी ते लिहिणार्‍या माणसाच्या प्रेमात पडली होती.
---------------------------------------------------------------------------------
८-९ त असताना तिच्या बिल्डींगमधल्या बांधकामाच्या इथे मांजरीची २ पिल्लं आलेली. ती तासन् तास त्यांच्याशी बोलत बसायची. त्यांना तिची भाषा सगळीच्या सगळी समजते यावर विश्वास होता तिचा. खरतर, त्यावेळेला सगळं जगच गप्पा मारायचं तिच्याशी. हल्ली खूप शांतता असते. तिनेच ऐकायचं बंद केलय का?
---------------------------------------------------------------------------------
हॉस्टेलवर तशी शांतताच होती सेमिस्टर संपल्यामुळे. तिला अजुन घरी जायला २ दिवस होते.
रात्री वळवाचा पाऊस आला. आता असह्य होतं हे म्हणजे. रात्री २ ला पावसात चिंब चिंब भिजत उभी होती ती. आणि त्या धुवांधार पावसात तिला स्पष्ट ऐकु आले सूर. आये ना बालम, का करु सजनी..
----------------------------------------------------------------------------------
फुलवेडीच ती.. सह्याद्रीच्या कुठल्यातरी घाटात हुंदडताना तिने अशीच खूप सारी फुलं गोळा केली होती. त्या गुच्छावर एक फुलपाखरु येवुन बसलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तरी स्तब्धपणे बघत राहिली त्याच्याकडे ते उडुन जाईपर्यंत..
----------------------------------------------------------------------------------
त्यांच्या दाटलेल्या आठवणीने कित्येकदा ती उशीत तोंड खूपसुन रडली होती. आज खूप वर्षांनी ते सगळे चॅटवर एकत्र भेटले. तिला खूप काही बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही सगळे खूप खूप काही आहात माझ्यासाठी. मी कधीही व्यक्त करु शकेन त्याहीपेक्षा जास्त. पण नाही बोलु शकली काहीच. त्या रात्री रडताना पहिल्यांदा परकेपणा दाटलेला.
-----------------------------------------------------------------------------------
रोज संध्याकाळी ऑफिसमधुन घरी येताना त्या फुलवालीकडुन २ रु. ची फुलं घ्यायची ती देवपुजेला. फुलवाली एकदा म्हणाली, "बाई गं, मी कदी कोनालाच २ रु. ची फुलं देत नाही. पन तुला न्हायी म्हनायला जमतच नाही बघ." कशानेतरी हवेवर तरंगल्यासरखं झालं तिला काही काळ नक्कीच...
मेरा कुछ सामान ...
घालोत वाद नेते, आपण चिडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये..

असतात भास सारे, काही खरे नव्हे
येता सुगी जराशी, कोणी उडू नये..

येईल दु:ख आता, जळता उगाच का?
पण तोवरी सुखाचा, डंका झडू नये..

आहेच अंत याला, सोसायचे किती
रामायणे पुन्हा रे, असली घडू नये..

का आज टोचली रे, मजला मिठी तुझी
पैलूस रे हिर्‍याचे, कोंदण नडू नये..

तो देश चांदण्यांचा अन् वाट दूरची
घालेल घाव नियती, आपण अडू नये..

करुया करार आता नात्यात आपल्या,
तू बोलवू नये अन् मी तडफडू नये..
मेरा कुछ सामान ...
खूप छान धुकं असायचं तेव्हा आपल्यामध्ये..
नाव, गाव, रंग, रुप यातल्या कशाचाच परिचय नसताना
फक्त एकमेकांत सापडलेल्या एकमेकांच्या खुणांमुळे दाटलेलं..
आश्वासक.. हवहवसं.. गुलाबी..
गहिरं, अधीरं.. लोभस..
तुझेपणाच्या, माझेपणाच्या
सगळ्या कक्षा सामावुन घेणारं..
ओळखीचे चकवे दाखवत हळुच,
अनोळखी होवुन जाणारं..
समजतयं असं वाटेपर्यंत,
अवघड होवुन बसणारं..
अज्ञाताच्या सोबतीने सुरु केलेला स्वतःचा शोध,
स्वतःची होत जाणारी नविनच ओळख..
तू त्या शोधात फक्त सोबत होतास..
किंवा निव्वळ तू अस्तित्वात असल्याची जाणिव..
तुही कदाचित नव्याने पाहिलंस स्वतःला
माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेची सोबत घेवुन..
मग कोणत्या क्षणी महत्वाचा झाला तुझा परिचय स्वतःच्या ओळखीपेक्षा?
का जंग जंग पछाडले त्या परिचयासाठी?
ह्म्म...
शेवटी एकदाचा झाला
तुझा माझा परिचय..
पण त्याच क्षणी वितळुन गेलं ते धुकं..
नविन सापडु शकले असते असे काही चेहरे,
पुन्हा हरवुन गेले त्या धुक्यासोबत..
अजुनही वाट चालतोय आपण एकमेकांच्या सोबतीने..
पण आता काही हुरहुर नाही..
कसलंही काहुर नाही..
स्वतःविषयी काही नविन शोधही लागत नाही आताशा..
फक्त तुझ्याकडे बघताना कधी कधी वाटतं,
खूप छान धुकं होतं तेव्हा आपल्यामध्ये.....
मेरा कुछ सामान ...
सावित्री.. पु.शि.रेगेंची एक सुंदर कलाकृती.. ३-४ वर्षांपुर्वी मी पहिल्यांदा वाचलं हे पुस्तक आणि मग वाचतच राहिले अनेकदा. कधी उत्कट प्रीतीभावना मनात असताना, कधी विरहाचं दु:ख गोंजारताना तर कधी सन्यस्त, उन्मन अवस्थेत.. प्रत्येक वेळेस मला नवीच साऊ भेटली. नव्याने कळली. तरी प्रत्येक वेळी तितकीच भावली. कधी माझंच एक रूप माझ्यासमोर बसुन माझ्याशी बोलतंय असं वाटलं तर कधी आकाशाएवढी मोठी साऊ माझ्याचसाठी म्हणुन शब्दातुन बरसतेय असं वाटलं.
आज साऊची आठवण येण्याचं तसं काही कारण नाही. खरं पहाता ती सततच माझ्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी असते, तिची वेगळ्याने काय आठवण काढणार म्हणा.. पण आयुष्यात अगदी सहजच कधीतरी भेटलेली माणसं, कविता, पुस्तकं किंवा काही व्यक्तिरेखा इतक्या आपल्या बनुन जातात आणि आपण कधी फारसं बोलतही नाही त्यांविषयी. पण आज असं वाटतय की सांगावं साऊला.. कदाचित तिला सांगता सांगता ती मला आणि मी पण स्वतःला अधिक उमगुन जाईन.
एक म्हातारी आणि तिची एक छोटी नात- लच्छी गावाबाहेर दूर रानापाशी रहात होती. एकदा म्हातारीच्या झोपडीपाशी एक मोर आला. मोराला पाहुन लच्छी नाचु लागली. मोरही नाचु लागला.. लच्छीने हट्ट घेतला की मोराला अंगणातच बांधुन ठेवावं. म्हातारी म्हणाली, "ते कसं होणार? आपल्यापाशी त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठे आहे?" दोघींचा काही निर्णय होईना. तेव्हा मोरच म्हणाला, "मी इथेच जवळपास राहीन. मला दाणागोटा काही नको. रान तर सारं भोवतालीच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हा लच्छीनं आधी नाचलं पाहिजे. ती जेव्हा नाचायची थांबेल तेव्हापासुन मीहि येणार नाही. अट साधी होती. लच्छी लगेच कबुल झाली. म्हातारीचंहि काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं तर मनहि तसंच हवं. लच्छी तेव्हापासुन सतत आनंदीच राहु लागली. मोर कधी, केव्हा येईल याचा काही नेम नसे. पुढं पुढं मोर येवुन गेला की काय याचंही तिला भान रहात नसे.
पहिल्या पानावरच्या या पहिल्या कथेपासुन हे पुस्तक सरळ काळजाला भिडतं ते थेट शेवटच्या ओळीपर्यंत.. किती किती आणि कसं सांगायचं? साऊविषयी लिहायचं तर तेही तिच्यासारखंच सुरेख आणि सुरेल हवं ना. मनात फुटणार्‍या उत्कटतेच्या अनिवार लाटांना आवर घालत संयतपणे उभ्या असलेल्या तिच्या मनाच्या किनार्‍यासारखं.. पण त्याचवेळी त्या लाटांचा पुर्णपणे आदर करणारं.. त्यांच्या सामर्थ्याची जाणिव असणारं.. उत्कट पण संयत.. उत्तुंग पण अलवार.. कणखर पण लोभस असं काहीतरी..
हे पुस्तक तसं अगदीच छोटं. शंभर एक पानांचं. ग्रीटिंगच्या आकाराचं आणि त्यातल्या संदेशाइतकाच मजकुर प्रत्येक पानावर असलेलं. पण माझ्यासाठी एखाद्या अखंड कवितेसारखंच आहे ते.. एखाद्या मुक्तकासारखं.. साऊ ने लिहिलेल्या प्रेमपत्रांचा (नुसतं पत्रांचा म्हणु वाटल्यास) हा प्रवास.. दुसर्‍या महायुद्धातल्या काळातला.. त्या पार्श्वभुमीवर तिची आणि त्याची पत्रातुनच उलगडत जाणारी ही कथा. तीसुद्धा फक्त सावित्रीच्याच पत्रातुन मांडलेली.
तिचं माणुस म्हणुन हळु हळु प्रकट होत जाणारं रुप जितकं लोभस, तितकाच खिळवुन ठेवणारा तिचा प्रवास.. या काळात तिला आलेले अनुभव, भेटलेली माणसं हे सगळं तिच्या नजरेतुन पहाताना आपण आपल्याही नकळत अंतर्मुख होवुन जातो. पण तरिही तिच्याविषयी उत्सुकता रहातेच. हा प्रवास फार फार सुरेख मांडलाय पु.शि. रेगेंनी. तात्विक गोष्टी पण अशा काही खुबीने पेरल्यात की जणु एखाद्या भावगीतात लागलेला लखलखता शुद्ध पंचम.
साऊचं आपल्याला भेटणारं हे रूप म्हणजे एखाद्या सुंदर चित्राच्या एखाद्या भागासारखं आहे.. जे दिसलेलं असतं ते सुंदर असतच पण जे दिसु शकत नाही ते किती रंगीबेरंगी असेल हे कुतुहल दाटतंच मनात आणि तरिही हे अपुर्णत्व टोचत रहात नाही. एखादा सुखावणारा सल असावा तशी ही कळ!
त्या पुस्तकाची कथा सांगणं हा काही उद्देश नाहीये इथे. कारण हे पुस्तक अनुभवायचं पुस्तक आहे. कवितेविषयी प्रेम असणार्‍यांनी तर आवर्जुन वाचावं असं. तिच्या लिखाणातली आर्तता जशी जाणवते तसं आपणही उत्कट होत जातो. "पण तिला सोसत नाहीत शब्दांच्या बंदिषी" असं ती म्हणते तेव्हा तिच्याइतकेच हळवे होतो. बालपणातील कोमलता, हळवेपणा आपल्याच नकळत हळुच निसटुन जाऊन जेव्हा बोथट झालेल्या भावना 'स्थितप्रज्ञ'तेच्या नावाने आयुष्यात आल्याची जाणिव होते तेव्हा काळजात येणारी कळ ही ज्याची त्यानेच अनुभवुन बघायला हवी. एखाद्याच्या समर्पणाची जाणिव, त्याची तीव्रता आपल्या डोळ्यात जे अश्रु आणते त्याची चव आपणच चाखायला हवी. "मला माझं मन समजुन घ्यायचं आहे. माझं समजलं की मग तुमचं पण समजेल.." हे वाक्य वाचुन यातल्या आपल्याला भावलेल्या सगळ्या छटा आपणच निरखुन पहायला हव्या. पण तिच्या सुख-दु:खांशी एकरुप होत चाललेला आपला हा प्रवास आपल्याला खूप काही देवुन जातो हे मात्र नक्की.
शेवटी विश्लेषणात अडकुन तरी काय मिळणार आहे? साऊ म्हणते त्याप्रमाणे,"विश्लेषणाने काहीच साध्य होत नाही. आपण आपल्यालाच पारखे होतो." साऊ ही अशीच विश्लेषण न करता अनुभवणार्‍याला भेटु शकते.. म्हणुनच पुस्तकाचं 'साहित्यिक रसग्रहण' किंवा 'परिक्षण' वगैरे न करता आज मीही तुमच्यासमोर ठेवलिये मला भेटलेली, भावलेली साऊ.
मेरा कुछ सामान ...
बस्स...!
आज मला तुला सांगायचचं आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे..
अगदी सोबत वाढलो आपण आजवर,
पण हे सांगायची संधीच कधी मिळाली नाही..
किंवा प्रत्येक वेळी तुला समोर पाहिल्यावर तुझ्या रुपात इतकं हरवायला व्हायचं की,
हे सांगायचं भानच राहिलं नाही कधी..
मला तुला सांगायचय की,
उमलणारी कळी बघुन तुझ्या चेहर्‍यावर फुलणारा आनंद
किंवा चुकलेलं पाखरु पाहुन तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू पाहिले नसते तर,
कित्येक क्षणांमधून आयुष्य असच निसटुन गेलं असतं..
अन्याय बघुन चिडलेलं आणि दुसर्‍याच्या दु:खाने पोळलेलं तुझं मन
तू माझ्यासमोर व्यक्त केलं नसतस, तर कदाचित मलाही कधीच समजलं नसतं
आयुष्याचं मर्म..
तू सतत माझ्या सोबतच होतिस,
पण मध्येच कधीतरी जाणवलं गं..
खूप खूप मोठी झालीस तू...
कसं जमवलस हे..?
कधी माझ्या नकळत आकशाएवढा समजुतदारपणा,
सागराएवढं दु:ख आणि
धरणीची सहनशीलता ल्यायलीस तू?
बरं ते नको सांगुस..
पण मी खूप लहान आहे तुझ्यापुढे म्हणुन मला सोडुन जाऊ नकोस गं..
अगदी 'अडगुलं मडगुलं' पासुन
'संधीप्रकाशात अजुन जो सोने' पर्यंतचा आपला प्रवास..
तू या प्रवासाची सच्ची साथीदार आहेस...
माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.!
कविते,
तू माझी व्हेलेंटाईन आहेस...!!!
मेरा कुछ सामान ...
जीवनावर संधिछाया लागल्या पसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..

दात माझे, ओठ माझे, दोष कोणाचा असे
चेहरे माझेच होते, मजसवे भांडायला...

मांडला बाजार ज्यांनी ते पुजारी थोर रे
देव आता मंदिरातुन लागला निसटायला..

श्वास होते रेशमी त्या काळचे काही असे,
चाहुलींनी चांदणे लागायचे पसरायला...

उदर भरता छान होती दशदिशा स्वर्गापरी,
लागते पण भाकरी असली क्षुधा शमवायला..