मेरा कुछ सामान ...
गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन? की नंतर नंतर त्यांचे शब्द म्हणजे फक्त त्यांच्या-माझ्यातलाच संवाद आहे असं वाटायला लागलं म्हणुन..?
जेव्हापासून कवितेतलं काही विशेष कळत नव्हतं तेव्हापासुन गुलजारचे शब्द सोबतीला आहेत. याचं श्रेय जितकं त्या संगीतातील आर्ततेला आहे तितकंच ते गुलजारच्या शब्दांच्या नेमकेपणाला आहे. मला आपलं कायम असं वाटत रहातं की गुलजारकडे छान लयीत मुरवत घातलेल्या शब्दांची एक बरणी असली पाहिजे, त्यामुळे त्यांचे सगळेच शब्द कसे गाण्याच्या धून मध्ये विरघळुन जातात.
पुढे जेव्हा गुलजारचं रावीपार, त्रिवेणी वै वाचनात आलं तेव्हा त्याच्या अजुन बर्‍याचशा रुपांचा परिचय झाला. पण आजही गुलजार म्हटलं की, "दिल ढूंढता है फिर वोही" च आठवतं.. अतिशय नॉस्टॅल्जिक मूड मध्ये नेणारी ही रचना पण मला मात्र कायमच एक परफेक्ट रोमँटिक चित्र वाटत आलिये. "बर्फिली सर्दियोंमे, किसी भी पहाडसे, वादिमें गुंजती हुयी खामोशियां सुने" म्हटलं की आजही सर्रकन् काटा येतो अंगावर..
आणि मग वेळोवेळी भेटत गेलेला गुलजारचा चांद, त्याचे वेगवेगळे ऋतू.. मोरा गोर अंग लै ले पासुन सुरु झालेली ही जादू अजुनही, दिल तो बच्चा है जी म्हणतेच आहे.. बुलबूलोको अभी इंतजार करने दो म्हणतेच आहे. माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षणांना गुलजारच्या शब्दांच्या सोबतीने अविस्मरणीय करुन ठेवलं आहे.
गुलजारकडून प्रेमाचे धडे गिरवता गिरवता मी गुलजारच्या प्रेमाच्याच प्रेमात पडत होते. गुलजारच्या शब्दांची वेडी होत होते. त्यांचे शब्द म्हणजे नशा नव्हते.. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर,"जादु है जो सर चढेगा, और जो उतरेगी शराब है" ती जादू होती.. ती जादू आहे.. आणि त्यामुळेच ती कधी कमी नाही होणार.. ती कायम तेवढीच गूढ रहाणार आहे.
गुलजार हे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सगळ्या उत्कट भावनांच्या क्षणांचे साथीदार आहेत. अजुनही ह्रूदयात एक अनामिक, उचंबळुन टाकणारी लाट उमटते गुलजारचं नाव ऐकलं की, त्यांना पाहिलं की.. आणि ते कायमच तसं रहाणार आहे. एका रंगीत, सुगंधी धुक्यात हरवलेली असते मी गुलजारच्या शब्दांसोबत असताना. फक्त मलाच कळु शकेल असं काहितरी, मलाच दिसु शकेल असं काहितरी ते लिहितायेत असं वाटतं मला. "जिना तो सिखा है मरके, मरना सिखादो तुम" हे मागणं मागायला शिकवलं पण गुलजारने आणि पुरवलं पण गुलजारने..
"शायद किसी नदियापर चलता हुवा तू मिले" मधल्या अल्लड वयातल्या भावनांपासून "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही" पर्यंतचा प्रेमाचा प्रवास गुलजारच्या कल्पनाविलासांवर/ त्यांच्या शब्दांवरच तर चालत आलाय. आणि मग 'त्या' वयातुन बाहेर आल्यावर गुलजारच्या बाकीच्या रुपांचा शोध सुरु झाला. तसं त्यांच्या, "तुझसे नाराज नही जिंदगी.." किंवा "ए जिंदगी गले लगा ले"ची जादु नव्हती असं नाही. पण "आदतन जिये जाते है, जिये जाते है.. ये आदते भी अजीब होती है" किंवा "फिर ना मांगेगे जिंदगी यारब तुझसे, ये गुनाह हमने एक बार कर लिया" हे म्हणणारा गुलजार जेव्हा भेटला तेव्हापासुन तर आता कोणतीच भावना गुलजारशिवाय पुर्ण होत नाही. "दर्द ने कभी लोरिया सुनायी तो, दर्द ने कभी नींदसे जगाया रे" या ओळी ऐकुन त्यांच्या प्रेमात अधिकाधिक रुतत जाण्यापासून नाही रोखू शकले मी स्वतःला. तशी इच्छा पण नाहीये म्हणा.. मी गुलजारचं प्रेम पाहिलं आणि मग प्रेम जगले. मी माझं आयुष्य जगले आणि मग गुलजारची कविता पाहिली. अगदी अगदी माझ्यासाठीच असलेली. माझ्या आयुष्यातले अनेक क्षण गुलजारच्या शब्दांचे ऋणी आहेत.
त्यांच्या शब्दांचं शहारुन येणं असं आहे की लाजाळुनेही चकित व्हावं.. उत्कटता अशी की, क्षणभर पतंगाला प्रश्न पडावा.. औदासिन्य असं की शिशिर पण फिका वाटावा.. आणि दु:ख असं की अग्नि सुसह्य भासावा..
"तेरी इक हंसीके बदले, मेरी ये जमीन ले ले.. मेरा आसमान ले ले" ही म्हणजे अगदी "कुबेर होवुन तुझ्यात यावे, होवुन जावे पुरे भिकारी" च्या पण पुढची पायरी आहे. कारण कुबेराच्या त्या लुटून जाण्याला पण अट आहे तुझा बधीर ओठ गिळण्याची, पण इथे मात्र एका हास्याच्या बदल्यातच सगळा सौदा आहे.
गुलजारच्या काव्यातील प्रेमाला भारावुन सुरु झालेला हा प्रवास कधी आयुष्याच्या सगळ्या अंगप्रत्यंगाचा भाग बनुन गेला तो क्षण आठवणं अशक्य आहे. गुलजारचे अनेक कल्पनाविलास, अनेक रुपकं अशी आहेत की ज्यांच्यावर बोलावं तितकं थोडंच वाटेल. अशा किती किती कल्पना सांगाव्या? नुसता गुलजारचा चंद्र म्हटला तरी डोळ्यास्मोर उभी रहाणारी त्याची अनंत रुपं, "चांद की भी आहट ना हो बादल के पीछे चले" मधला उत्कटतेच्या चरम सीमेवर आलेला चंद्र असो किंवा "रात को खिडकीसे चोरी चोरी नंगे पॉव" येणारा खट्याळ चंद्र असो किंवा "नीली नदी के परे गीला स चांद खिल गया" मधला शांत, धीरगंभीर तरी अधीरसा वाटणारा चंद्र असो किंवा"चांद निगल गयी दैया रे, अंग पे ऐसे छाले पडे" मधला आग लावणारा, वणवा भडकवणारा चंद्र असो किंवा "उस रात नही फिर घर जाता वो चांद यही सो जाता है" मधला तारे जमीनपर बघुन मोहरलेला चंद्र असो "तेरे बिना चांदका सोणा खोटा रे.." मधला त्याच्याशिवाय निष्प्रभ वाटणारा चंद्र असो.. त्यांच्या कवितांत डोकावुन जाणारा "लॉनके सुखे पत्ते सा चांद" असो किंवा "एक चांदकी कश्ती मे चल पार उतरना है" म्हणत रात्रीचा नावाडी झालेला चंद्र.. तर सगळ्यात पहिला, "बदरी हटाके चंदा, चुपकेसे झांके चंदा" मधला एका अधीर प्रेयसीची बोलणी खाणारा चंद्र.. आणि या चंद्रासोबत आलेली लसलसणारी वेदना.. "ओ मोरे चंद्रमा, तेरी चांदनी अंग जलाये
तेरी उंची है अटारी, मैने पंख लिये कटवाये.."
काय बोलावं? शब्द खुंटतात माझे तरी.. गुलजारनी सिनेमामधल्या प्रसंगाला अनुसरुनच गाणी लिहिली पण ते लिहिताना त्या भावनेच्या इतक्या गाभ्यापर्यंत गेले की ती गाणी त्या प्रसंगापेक्षाही खूप जास्त बनून गेली. जसं की,"एक छोटा लम्हा है जो खत्म नही होता, मै लाख जलाता हू ये भस्म नही होता"मधला प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारा असा एक क्षण किंवा "उम्र लगी कहते हुये, दो लब्ज थे इक बात थी" मधली प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारी अशी एक गोष्ट..
त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक मात्रेत, प्रत्येक रिकाम्या जागेत जी नजाकत आहे ती अगदी रेशमाच्या लडीसारखी आपली आपल्यालाच उलगडावी लागते. गुलजारच्या भाषेत बोलायचं तर अगदी "एकही लट सुलझानेमें सारी रात गुजारी.." मधल्या सारखं.. त्या रंगीत धुक्यात आपणच हरवुन जाता जाता नविन काहीतरी शोधायचं असतं.. त्यांच्या त्या अनंत कल्पना आणि प्रत्येक कल्पनेची अनंत रुपं.. एखादी "खत मे लिपटी रात.." एखादी, "फिर वोही रात है" मधली "रातभर ख्वाब मे देखा करेंगे तुम्हे" म्हणत स्वप्नांची खात्री देणारी रात.. एखादी, सीली सीली जलनेवाली बिरहाकी रात तर कुठे, नैना धुंवा धुंवा करणारी धीरे धीरे जलनेवाली रैना
त्यांची ही उत्कट लेखणी हलकीफुलकी होते तेव्हा पण सहज म्हणुन जाते, "चांदका टिका मथ्थे लगाके रात दिन तारोंमे जिना विना इझी नही" किंवा "चांद से होकर सडक जाती है उसिसे आगे जाके अपना मकान होगा...", "जो सरमे सोच आयेगी, तो पॉवमे मोच आयेगी" अशी मजा करता करता हळुन कुठे सांगुनही जाते, "दुनियासे भागे दुनियामें.. दुनियाको हुयी हैरानी.."
ह्म्म.. गुलजारची भाव व्यक्त करायची पद्धत पण त्या भावनांइतकीच अनवट. त्यामुळे या इतक्या मोठ्या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी त्या शब्दांचा, रुपकांचा एक वेगळाच अर्थ लागतो. आणि तो इतका परफेक्ट असतो की प्रत्येक वेळी "युरेका....." म्हणुन ओरडावसं वाटतं. मला आवडणारी गुलजारची गाणी तीच आहेत. त्यात भर पडतेय पण जुनी अजुनही तितकीच प्रिय. पण मी जशी मोठी होत चाललेय तसे त्या शब्दांचे निराळेच अर्थ उमजू लागलेत मला. आणि गुलजारच असं हे उलगडत जाणं मला फार फार फार प्रिय आहे.......

गुलजारसाठी...

न जाने किस दिन ये सफर शुरु किया था मैने..
न जाने कबसे आपके लफ्ज मेरी सांस बन गये..

न जाने कबसे,
अक्सर बुझती हुयी रातो मे मिला किया है
आपका चांद पहाडोंके परे..
बादलोकी सिलवटोंमे आपके खयाल ढुंढता हुवा..
हमेशा बेच जाता है मुझे सपने
चंद आसुंओके बदले..
(सुना है चांदनी नाराज रहती है उससे आज कल..
कह रही थी,
आपके खयालोंमे आकर बडा मगरुर हो गया है..)

न जाने कब एक बार,
खुशबूका एक झोका जिंदगी लेके आया था...
कहां, गुलजारसे मिलकर आ रहा हु..
इससे पहलेकी इत्र बनाके रखती उसका
निकल गया देखतेही देखते
जिंदगी की तरह...

न जाने कबसे,
मेरी हमसफर बनी है आपकी कल्पनाये..
एक कोहरासा बना रहता है,
गुजरती हुं जिस किसी रास्तेसे..
छुनेकी कोशिश की थी एक बार,
तो पिघल गया..
गीली उंगलीयोपे डुबते हुये सुरज की किरने
चमकती रही बस्स...

न जाने कितनी बार,
आपकी कहांनिया लोरी सुनाती रही..
जब दिन खत्म हो जाता था कुछ पलोंमे,
और एक पल रातभर
इन्कार करता रहता था गुजरनेसे...

ह्म्म...
अब तो लगता है जैसे,
सदिया बीत गयी हो ये सफर शुरु किये..
पर ना जाने कबसे,
आपकी नज्मोंका सजदा करतीं आयी हुं
मै हर पल..
के कभी मेरी जिंदगीभी एक दिन,
आपकी कोई नज्म बन जाये...!
----------------------------------------------------------------------------------------------------------
खरतर लिहायला सुरुवात करण्याआधी गुलजारशी संबंधित माझ्या आठवणी लिहायचं ठरवलं होतं मी. पण मग लिहिता लिहिता स्वतःला विसरुनच गेले. गुलजार तेवढे राहिले शिल्लक.. स्मित
13 Responses
  1. हाय!
    तुझ्या कविता वगैरे ओ.के. आहेत पण तु गद्य चांगलं लिहितियेस.
    हा लेख तर विशेष आवडला.
    प्रतिक्रिया म्हणुन मी गुलझार वर काहितरी कधितरी खरडलेलं ते पाठवायचा विचार करत होतो, पण तिथे जाऊन पाहिलं तर तो लेख गुलझार वर नव्हता.
    पण त्यात गुलझार होता.
    आणि मग वाटत गेलं कि च्यायला - प्रत्येक लेखात तो आहेच, मग कुठली वेगळी लिंक द्या!

    परवा माझ्या एका आवडत्या लेखकाला हा किस्सा (म्हणजे पुढे सांगेल तो) सांगितला - त्याची आठवण झाली.
    एकेकाळी - म्हणजे १० एक वर्षांपुर्वी - गुलझार कुठल्यातरी वेबसाईटवर ’पब्लिक चॅटींग’ साठी येणार होता.
    (हो मी त्याला अरे तुरे करतो.
    तसा मी सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर या लोकांनाही अरे तुरेच करतो आणि मला च्यायला - कुठे चुकुन गुलझार भेटलाच तर त्याला अहो जाहो म्हणायला कसलं सॉलिड ऑकवर्ड वाटेल असंही वाटतं.
    मला कुठल्यातरी एअरपोर्टवर वगैरे गुलझार अचानक भेटेल - अशी स्वप्नंही (ते ही दिवसा) वारंवार पडतात).
    तर गुलझार चॅटिंगला येणार होता.
    म्हणुन त्यांनी आगावु प्रश्न मागवले होते.
    आगावु म्हणजे - आधी मागवलेले.
    बहुतेक.
    तर त्यावेळेस मित्रांबरोबर चर्चा झालेली - कि कुठले प्रश्न पाठवावेत वगैरे.
    मी स्वत:ला थोर गुलझार भक्त वगैरे मानतो, त्यामुळे मी कुठलातरी ’हट के’ प्रश्न शोधायच्या नादात होतो.
    तेव्हा एक चुलत मित्र (मित्राचा मित्र) म्हणाला:

    ’माझी को माझी न रेहने दिया तो....’
    या वाक्यावर सुधा महेनला थांबवुन ’माझी....मतलब?’ - विचारते.
    महेन म्हणतो - ’माझी मतलब पास्ट....’

    पुढे कतरा कतरा वगैरे सुरु होतं.
    (माझी एक मैत्रीण कतरा कतरा वर हमखास रडायची - का ते कधी कळलं नाही).
    तर चुलत मित्राचा प्रश्न सोड - मागणी अशी कि ’बाबा रे - ते वाक्य पूर्ण कर ना! कारण त्या उरलेल्या वाक्याचा अर्थ शोधण्यात माझा जन्म चाललाय!’

    तर असं.

    गुलझार मला कुठल्यातरी एअरपोर्ट वर भेटल्यावर मी ताबडतोब त्याला हा प्रश्न विचारणारे.
    पाहिजे तर चंद्र घे बाबा - पण उत्तर दे.



  2. Unsui Says:

    पुन्हा सुन्दर पोस्ट. गुलजार साहेब आठवतात ते लहानपणी "लेट नाईट" सदरात दाखवलेल्या इजाजत मूळे. वय वर्षे १३-१४, पण काहीतरी विलक्षण पाहतोय याची जाणीव होत होती. आणि नंतर गुलजार यांच्या आणखी कविता, चित्रपट पाहत गेलो, कविता विशेष आवडत नसताना देखील गुलजार आणि मर्ढेकर नेहमीच अपवाद राहिले.
    दिग्दर्शक गुलजार यांचे मेरे अपने, किनारा, अचानक इ. चित्रपट पाहताना एक विचित्र उपरोध नेहमीच छळत राहतो तो हा, ज्या गुलजारजींनी जितेंद्र, विनोद खन्ना या सारख्या "ठोकळेबाज" नटांना अभिनयाची संधी दिली तेच गुलजार बंदिनीच्या सेट वर नवोदित धर्मेंद्रची कुचेष्टा करायचे हे खरे वाटेल, मनुष्य स्वभाव दुसरे काय...


  3. :-) खरय.. मनुष्यस्वभाव. अंगूर चित्रपट गुलजारचा आहे हे मला चित्रपट पाहिला तेव्हा माहितीच नव्हतं.. गुलजारविषयी अजून खूप खूप लिहिण्या-बोलण्यासारखं आहे मात्र.. :-)


  4. Pooja Says:

    dainaandin diwsat sahaj virghalalela guljarcha chandra surekh utarlay...aawadala peksha..barachsa saman aahe in thoughts!


  5. Thanks a lot Pooja.. :-) Its good to meet like minded people..



  6. >>पण मी जशी मोठी होत चाललेय तसे त्या शब्दांचे निराळेच अर्थ उमजू लागलेत मला.
    :) खूप सुंदर लिहिलंय... बाकी गुलजार साहेबांविषयी आम्ही काय बोलणार....


  7. खूप खूप आभार गायत्री, इंद्रधनू.. :-)
    आणि गुलजारवर ज्यांचं प्रेम आहे ते सगळेच गुलजारवर बोलू शकतात. नाही का इंद्रधनू?


  8. Anil Says:

    छान लिहिलंय खूप. आणि खरंच, गुलजासाठी जे लिहिलयंस तेही किती गुलजारमय झालंय.. तू म्हणतेस तसंच होतं गुलजारच्या बाबतीत, आपण स्वतःला विसरून पुर्णपणे गुलजारमय होऊन जातो..

    माझंही वर्षानुवर्षें सगळंच गुलजारच्या सोबतीने खूप हळवं आणि समृद्ध होत गेलंय.. तडफड, हूरहूर, प्रेम, फकिरी, उदासी.. या कशालाही गुलजारचा स्पर्श झाला कि धन्य होऊन जातं ते. त्यामुळे मला तर गुलजारलाच म्हणावसं वाटतं कि, 'तेरा छुँआ लागे.. मेरी सुखी डाल हरियायें..' :-)

    तुझा हा लेख वाचून खुप काही आठवतंय.. किती भरून आलेलं 'The Blue Umbrella' मधलं हे गाणं ऐकलं त्यावेळी.. 'दिन छोंटे छोंटे हो गयें बचपन कि चोली जैसें.. उधड़ा हीं उधड़ा जाये रे... रातें भी लंबी लागे.. तेरी जुदाईयों में जान का टुकड़ा जायें रे..' आणि मी तर imagine पण नव्हतं केलं कि हे तिच्या छत्रीसाठी लिहिलं असेल.. खरंच सगळे संदर्भ, सगळ्या चौकटी पार करून मनाला भिडतात गुलजारच्या ओळी.. आणि वरून.. 'चंदा का जंतर देके रातों से मांगा तुझको..' .. आह! .. आणि पावसाबद्दल तर इतका जिव्हाळा कि.. 'बारीश से जो रिश्ता हैं.. पाणी पे मन खिंचता हैं.. पिछली कोई पहचान हैं रे..'

    मग 'खामोश सा अफसाना..' आठवून एक जगच परत समोरून सरकून गेल्यासारखं वाटलं.. आणि चाची ४२०-मधलं, ..'कोई आता हैं पलकों पे चलता हुआ.. एक आँसू सुनहरी जलता हुआ..' .. हे तर जीवाच्या खूपच जवळच.. यात पुढे गुलजारच्या या एका ओळीने तर आयुष्यभरासाठीच हादरून गेलोय मी... 'वक्त सालों की धुँध से गुजर जायेगा.. '.. ओह्, अंगावर येतं हे धुकं. .. आणि रेखाने खूपच जीवातून म्हटलंय यार हे गाणं.

    मग गुलजार जावेळी म्हणतो कि.. 'हयात फूँक दे, हवास फूँक दे.. के साँस से सीला हुँआ लिबाज फूँक दे..' ..त्यावेळी खरंच तसं करावं वाटत.. आणि वरून हेही आहेच कि.. 'बरस बरस सब बह जावें.. सब बह जावें रे.. जी ले जितनी मानी..'

    'लिखतें रहे हैं तुम्हें रोज ही मगर.. ख्वांहिशों के खत कभी भेजे ही नहीं..' मधली ओढ.. 'तेरे इश्क़ में..' मधली आर्तता.. 'एक ही ख्वाँब कई बार देखा है मैंने..' मधलं स्वप्नाळू घर.. 'मास्टरजी कि आ गयी चिठ्ठी..' मधली अफाट पोरं.. गुलजारचं सगळंच amazing..!

    पण आज सारखं एक गाणं खूप आठवतंय मला, ज्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्दच संपून जातात..

    'फिरसे आईयों बदरा बिदेसी,
    तेरे पंखों पे मोती जडुंगी..'

    'तेरे जाने कि ऋत मैं जानती हूँ,
    मुडके आने कि रीत हैं के नहीं?..
    काली दर्गा से पुछूंगी जाके,
    तेरे मन में भी प्रीत हैं के नहीं..'

    .. हे ऐकून खरंच जीवच जायची वेळ येते...


  9. गुलजारविषयी जितकं बोलावं, लिहावं तितकं कमीच.. :-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!


  10. चंद्राच्या मोहक रूपाविषयी चर्चा करत असताना एका मैत्रिणीने या लेखाची लिंक पाठवली. वाचायला जशी सुरूवात केली तसं या लेखातल्या प्रत्येक शब्दात गुरफटत गेलो. गुलजार आणि त्यांच्या कविता/गाण्यांविषयीच्या भावना केवळ अप्रतिम!

    Hats off to you!!


  11. धन्यवाद किसन.. तुमच्या मैत्रीणीला आणि तुम्हालाही.. पण गुलजारचा चंद्र आहेच असा सुंदर की कोणच्या साध्या लिखाणालाही चार चाँद लावेल.. :-)