सकाळी रात्री थंडी आणि दिवसभर उकाडा अशा वातावरणातून जेव्हा दिवसभर उकाड्याच्या स्थितीत ॠतू येतो तेव्हा कधी अचानक गाडीवरुन फिरताना / बस मधुन जाताना पांढर्या शुभ्र सुगंधाची एक झुळूक अंगावरुन वाहुन जाते.. आणि मनात स्पष्ट स्पष्ट मोगरा उमटुन जातो. सिझन मधली पहिली मोगर्याची खरेदी हा माझा एक स्वतंत्र सोहळा असतो. अशी चाहुल लागल्यानंतर लगेचच येणारा वीकेंड यासाठी निवडते मी.. सकाळी सगळं आवरुन बाहेर पडते.. ऊन चांगलं डोक्यावर तापेपर्यंत सगळी कामं, एखाद्या छानशा पुस्तकाची खरेदी आवरुन अंगातुन घामाचे ओघळ वाहत असताना आणि ऊन मी म्हणत असताना, चौकातल्या एखाद्या म्हातार्या आजीबाईंसमोर उभी रहाते आणि अगदी मुहमांगी किमत देवुन (हो! कारण त्या क्षणी त्या मोगर्याच्या बदल्यात मी माझा स्वर्ग लुटायला पण तयार असते..) मी ओंजळभर मोगरा विकत घेते आणि खोल खोल श्वास घेवुन तो वास माझ्या रंध्रारंध्रात झिरपू देते. मला आठवतय तेव्हापासुन अनेक वर्षे हा मोगरा माझ्या उन्हाळ्याची साथ करत आलाय. त्याच्या सुगंधात अनेक सण-समारंभ साजरे केलेत, अनेक मैफिली रंगवल्यात.. त्या चांदणभरल्या ओंजळीचं सुगंधाचं देणं फेडायच्या मागे न लागता मी त्याच्या ॠणातच रहाणं पसंत करत आलेय. ही मोगर्याची खरेदी झाल्याशिवाय खर्या अर्थाने माझा उन्हाळा सुरु होत नाही. आणि आज हे लिहिण्याचं कारण? आज मी या सिझन मधली पहिली मोगर्याची खरेदी केलीय..
तुझी मोगर्याच्या चांदण्यांची ओंजळ अगदीच जीवाला गोंजारून गेली बघ..
खरंच, मोगरा श्वासांत भरून घेणं यासारखा रोमँटीक प्रकार नसावा दुसरा.. (खरंतर romanticism-चीच इयत्ता वाढते तिथे) .. भलताच जीवाला भुरळ पाडणारा वास आहे हा.. श्वासच भारावल्यासारखे वाटतात.. आहाहा.. जीवलगाचा सुगंध यावा तसा मोगर्याचा वास.. आपण फिदा आहे त्यावर! :-)