मेरा कुछ सामान ...
मस्त भुरभूर पाऊस चालु होता. आता शहरापासुन थोडं बाहेर आल्यावर ड्रायविंग पण संथ, एका लयीत चालु होतं. गाडितली म्युझिक सिस्टिम शांत होती पण मनात बडे गुलाम अली घुमत होते.. "आये ना बालम.. का करु सजनी.." शहराबाहेर कुठेतरी शिफ्टिंगचं सामान घेवुन चाललेला ट्रक दिसला तिला गाडीपुढे..

कितव्या शहरातलं कितवं शिफ्टिंग होतं हे काय माहिती..त्या न मोजता येणार्‍या पसार्‍यात तशाच न मोजता येण्यासारख्या आठवणी.. त्यांचे फोटोग्राफीचे प्रयोग...
"अर्रे हळू....!!!"
"काय?"
"आठवणींची कुपी अलगद उघडायची असते.. सांडुन गेली अत्तरासारखी तर दरवळ राहिल फक्त.. आणि तोही पकडता यायचा नाही मग..!"
"धसमुसळी तू आहेस, मी नाही.."
"अ‍ॅहॅहॅ...!"

अचानक वाजणार्‍या हॉर्नने तंद्री भंगली तिची. संध्याकाळ आताशी चाहुल देत होती. पावसाळ्याच्या शेवटाला मावळतीचा सुर्य आकाशात जसे रंग उधळतो तशीच आजची पण वेळ. पण काही मनात उतरत नव्हतं..

दाटुन आलेली निळी संध्याकाळ असते. गडद गार, चिंब ओली, दिवसभर पावसात हुंदडुन येवुन गपगार झालेले असतात दोघेही..
"स्कॉच?"
"स्कॉच..!"
"चिअर्स..!"
काही न बोलता अचानक व्हायोलिन आणुन हातात ठेवते त्याच्या.
"काय वाजवु?"
"काहीही.."
बीथोवेन ची धून निघायला लागते.. हेच का वाजवायचं असतं याला नेहमी..(किंवा मला हेच ऐकायचं असतं हे कसं कळतं याला?) भरुन आलेल्या डोळ्यांसोबत मन भरुन जातं, सूर ऐकु येईनासे होतात तेव्हा ती म्हणते,
"काय होईल रे तुझं किंवा माझं आपण वेगळे झालो तर?"

तिच्या असल्या प्रश्नांना व्यावहारिक उत्तरं दिली की तिचा नूर भावनिक होतो आणि भावनिक दिली की व्यावहारीक होतो हे त्याला चांगलच कळुन चुकलेलं. या आईवेगळ्या मुलीची आई आणि तिच्यातल्या आईचं मूल पण होण्याची जबाबदारी याचीच असायची. तिला अजुन एक दुरावा किती असह्य आहे याची कल्पना होती त्याला... तिचं डोकं मांडीवर घेवुन थोपटत रहायचा मग तो शांतपणे..

त्यांच्या नेहमीच्या जागी गाडी पार्क करुन ती निघाली हातातलं सामान घेवुन. मस्त दाटलेली कच्च हिरवळ. उमलेली रानफुलं.. आणि त्यांच्या सौंदर्याशी स्पर्धा करणारी फुलपाखरं.. अगदी अशीच स्थिती. नुकत्याच सरुन गेलेल्या पावसानंतर जंगलात, झाडाझुडपात भटकुन आल्यावरचा त्याच्या अंगाला येणारा एक मिश्र वास असायचा, कडवट हिरवा.. ओलसरसा.. तिला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडायचा तो वास. त्याला आवरुही न देता त्याच्या कॉलरमध्ये नाक खुपसून मिठीत पडुन रहायची त्याच्या..

गडद निळी किनार असलेलं मोरपंखी रंगाचं फुलपाखरु, लाल ठिपके मिरवणारं.. तिच्या मते त्या फुलपाखराचे रंग तिला मिळालेत आज. सकाळपासुन त्या रंगांचं वेड घेवुन फिरत असते सगळ्या शहरातून. मग कधीतरी मनासारखे रंग मिळाल्यावर तो ड्रेस घालुन आलेली असते ती...
"ए, मी कशी दिसतेय?"
"अं..."
"सांग ना, कशी दिसतेय मी?"
"अंघोळ केली नाही वाटतं आज?"
"अरसिक कुठला..दुष्ट..!"


ठेच लागल्यामुळे भानावर आली ती.. त्यांचा तो नेहमीचा पॉइंट.. टेकडीवर सगळयात उंच.. थोडा वेगळासा.. दुसर्‍या बाजुला असलेला. खरतर तिला खूप भीती होती अशा उंचीची पण त्याच्यामुळे यायला लागली. एकदिवस अचानक त्याने असाच तिला नको नको म्हणत असताना अक्षरशः भाग पाडलं होतं पॅराग्लायडिंग करायला..
"चल.."
"कुठे?"
"आपण पॅराग्लायडिंग करतोय.."
"वेडा आहेस का तू? तुला माहिती आहे ना मला भीती वाटते.."
"चल गं.. मी आहे ना..."
त्याच्या आग्रहाखातर आणि त्याच्यावर विश्वास ठेवुन झोकुन दिलं तिने स्वतःला. डोळे किलकिले करुन पहाता पहाता तिला स्वतःच्याच चित्रात उतरल्यासारखं व्हायला लागलं.. आणि मग तिने घेतलेला धरतीवर बरसण्याच्या वेडाचा आकाशाचा छंद..

आपण खरच किती बदललो त्याच्यामुळे.. पण तो काहीच बदलला नाही का? आत्ता जाणवतय हे. त्याने कधीच आपला आग्रह म्हणुन पत्र लिहिली नाहित की मी बोल म्हटले म्हणुन बोलला नाही. किती वेळा.. किती वेळा...
"ढॅन्टॅणॅन...!!"
"हे काय नविन?"
"हा घे कागद.. पत्र लिही मला.."
"कोण मी?"
"नाही. तुझा व्हायोलीन..! अर्थात तूच"
"काय वेड्-बिड लागलं की काय तुला? मला नाही लिहिता येत तुझ्यासारखं.."
"ते काही नाही. लिहिलंच पाहिजे.."
"हे बघ! एक काम करु, तू लिही. मी तुला बघत बसतो.."
"काही गरज नाहिये.. लिही.. लिही.. लिही..."
आणि मग चक्क तासभर बसुनही तिने कुठूनतरी शोधुन काढलेल्या त्या पिवळसर, जीर्ण, तिला जपुन ठेवायच्या असलेल्या पानावर त्याने फक्त I love you लिहुन दिलं होतं...

किती वेड्यासारखे हट्ट असायचे ना आपले आणि वेड्यासारखे प्रश्न पण. त्याला त्रास होत असेल का या सगळ्याचा? Individuality, Individuality म्हणता म्हणता किती अवलंबत गेलो आपण त्याच्यावर नकळत. माझे प्रश्न खरच होते की त्याला समोर बघुनच पडायचे...
"सगळ्या रंगांवर चंद्र सांडला तर काय होईल?"
"..."
"सांग ना.. तुझ्या व्हायोलिनवर जसा सांडतो तसा माझ्या रंगांवर सांडला तर?"
"चंदेरी होऊन जातिल तुझे रंग आणि पर्यायाने तुझी स्वप्नं.. कॅनव्हास कायम चांदीचा वर्ख लागल्यासारखा होऊन जाईल आणि तुझ्या नव्या खरपुस कॅनव्हासवर गर्द हिरवा डोंगर काढताना तुला रानात गेल्यासारखं नाही वाटायचं मग..!"
"..."
प्रश्न अजुनही पडतायेत रे.. मला अजूनही उत्तरं हवियेत. कुठे आहेस तू?

आज पुन्हा त्याच कड्यावर उभी आहे ती.. आज पुन्हा पाऊस आहे. वारं असं भणाणलय की पाऊस उलटा ढकलला जातोय त्या उंचीवर. तिच्यासोबत आहे त्याचा व्हायोलिन, तिचा कॅनव्हास, तिचे प्राणप्रिय रंग, त्यांचे फोटोग्राफिचे प्रयोग आणि कुठून कुठून तंगडतोड करुन जमवलेल्या रेकॉर्डस्.. आज तिला उंचीची भीती वाटत नाहिये. पाय पुढे टाकुन बघतेय ती. पॅराशुटशिवाय मारु का उडी तुझ्या आठवणींसोबत? मला पण पहायचाय कसा त्रास होतो, कशा असतात खर्‍या-खुर्‍या शारिरीक प्राणांतिक वेदना... तुला पण अशाच वेदना झालेल्या का त्या अपघातानंतर? आणि काय सांगायचं होतं तुला अंधुकशा त्या नजरेतुन? एकदा तरी डोळे टक्क उघडले असतेस तर वाचलं असतं मी नक्की.. तू कायम हेच कारण सांगायचास ना तुझ्या कमी बोलण्याचं?
"ए.. बोल ना काहितरी.."
"काय बोलु? मला बोलण्यासारखं काही ठेवतेस का तू? सगळंच तर समजतं तुला माझ्याकडे बघतानाच. वेगळं काय बोलणार?"
"काहीही बोल.. मी कधी विचारते का तुला काय बोलु म्हणुन. वटवटत तर असते सारखी.. आज तू बोल. मी फक्त ऐकणार.."
आणि तो बोलण्याची वाट बघताना त्याच्याकडे बघत बघत वेळ जायचा निघुन. तो बोलायचाच नाही शेवटी. आणि त्याच्या त्या गूढ तरी खोडकर चेहर्‍यावरचे रेषांचे आणि रंगांचे अर्थ लावताना हरवुनच जायची ती, विसरुन जायची की तिला ऐकायचय.. काय काय ऐकु यायचं तिला, काय काय बोलायचा तो मुक्यानेच..

कायमची शांतता भरुन राहिलेली आता. सगळ्या सामानाकडे एका निष्क्रिय तटस्थपणे पाहुन घेतलं तिने एकदा. हल्ली त्याच्या फोटोकडेही तशीच बघायची ती.. त्याच्या बोलण्याचे, हसण्याचे, असण्याचे.. सगळेच भास आता असह्य होत होते तिला.. आणि त्याच्या खुणा पुसून टाकायच्या होत्या आता. मनातुन कसं जाणार होतं सगळं? पण असले विचार येत नव्हते. मुर्खपणा असला तरी तेच करावसं वाटत होतं. बॅग धरली तिने कड्यावर. परत मागे घेतली. आता याच तर आठवणी आहेत. यांच्यासोबत तर जगायचय. याच काढुन टाकल्या तर काय राहिलं मग तुझ्या नसण्याच्या भकास पोकळीशिवाय? पण तसही यांच्या सोबतीने ती पोकळी कुठे भरुन निघणार आहे? पण मिटवुन टाकण्याचा अट्टहास का? कारण असण्याचा फायदा नाही. फायद्या-तोट्याची गणितं कधीपासून मांडायला लागले मी आपल्या नात्यात?

मनातल्या या आंदोलनांपुढे टिकणं अवघड झालं तशी तिथल्या खडकावर पुन्हा बसुन घेतलं तिने. ह्म्म... अशक्य.. अशक्य... त्याच्याइतकच अशक्य आहे त्याचा स्पर्श झालेल्या कुठल्याही गोष्टीला दूर ढकलणं.. आणि का हट्ट करा? अजुनही मिळतेच आहे की त्याची सोबत.. त्याचा अबोलपणाच वाटतो अजुनही त्याचं नसणं म्हणजे. आणि जोवर हे वाटतं तोवर हे सगळं जीवापाड सांभाळेन मी. त्याच्या सगळ्या खुणा सांभाळेन.. एक मोठ्ठा उसासा सोडला तिने. अंधार चांगला दाटु लागला तशी परत फिरली मग.. सगळ्या आठवणींसकट.. सगळ्या समानासकट...
मेरा कुछ सामान ...
स्वतःच्या मनात दाटलेल्या अमावस्येला
लाखोली वाहत असताना एकदातरी पहायचा होतास

माझ्या नजरेत उतरलेला चंद्र...
**********************************

जग नसतं दीपलं पण
वाट दाखवण्यापुरतं चांदणं नक्की होतं

माझ्या चंद्रमौळी आकाशात...
**********************************

भैरवी बरीच रेंगाळली होती,
तरी तू आला नाहिस..

गालावर सुकून गेलं चंद्रपाणी..
**********************************

डोळे गच्च मिटुन
सगळी कवाडं बंद करुन बसले

तरी श्वासात दरवळत होताच चंद्र...
**********************************

चंद्राळलेलं आभाळ नाही मिळालं तुला
पण तोवर माझ्यात रुजला होता

तुझा चंद्राचा हट्ट...
**********************************

निघुन जातात तुझ्यासारख्याच
नि:शब्द शांततेत

हल्ली चाहुली उठवत नाहीत चंदेरी वादळं...
मेरा कुछ सामान ...
simone de beauvior चं 'द सेकंड सेक्स' चा करुणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचनात आला हल्लीच. ५५० पानाचं हे पुस्तक वाचायला मी तब्बल १० दिवस घेतले. कारण मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणावर, संदर्भांवर विचार करतच पुढे जाणं गरजेचं होतं. हे पुस्तक तसं पहाता स्त्रीवादावरचं बायबल समजलं जातं पण आजच्या काळात, आजच्या पिढीचा आणि त्यांच्या जडणघडणीचा विचार करता त्याला आपण स्त्री घडणीचा इतिहास म्हणु शकतो. किंवा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळंच. कारण स्त्रीविषयीची जीवशास्त्रीय सत्यं, तिचा इतिहास, मिथ्यके, जडणघडण, तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचा तिचा वावर, त्या भुमिका आणि तिच्या मानसिक अवस्था या सगळ्याच गोष्टींचा तर्कसंगत आणि सविस्तर उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
आता, इथे हा लेख वाचणार्‍या बर्‍याच स्त्रिया खर्‍या अर्थाने स्वतंत्र व्यक्ती म्हणुन जगत/वावरत असल्या आणि पुरुष स्त्रियांनी माणुस म्हणुन जगण्याच्या संकल्पनेचे पुरस्कर्ते असले तरी या सर्वांची सुरुवात कुठे झाली? काय, कसे व कधी? या सर्वांची उत्तरं मिळवायला, घडणार्‍या परिस्थितीचे मानसशास्त्रीय विश्लेषण करायला हे पुस्तक वाचण अपरिहार्य आहे.
'Woman is not born but made' पुस्तकातील अर्पणपत्रिकेच्या जागी असलेलं हे वाक्य. या वाक्यावरच थांबुन आपण विचार करु लागतो आणि त्यानंतर मांडलेल्या प्रत्येक सिद्धांतावर, स्पष्टीकरणवर थांबुन, विचार करुन, स्वतःचं परिक्षण करुन मगच पुढे जाणं ह क्रम बनुन जातो.
माझ्याविषयीच बोलायचं झालं तर, आमच्या घरात कधीच मुलगा-मुलगी असा भेद नाही केला गेला आम्हा भावंडांमध्ये, परंतु पितृसत्ताक पद्धती नक्की पाहिली. कुटुंबप्रमुख म्हणुन वडिलांची ठेवली जाणारी बडदास्त लक्षात येण्याइतकी उघड होती.. हे असं का, ही परिस्थिती का घडली याचं विश्लेषण करण्यात मी माझ्या बालपणाचा बराच काळ खर्ची केला. पण ही परिस्थिती घडण्यामागची मानसशास्त्रची एक धूसरशी कल्पना जी मनात येत होती ती धडधडीतपणे, सुर्यप्र्काशासारखी लख्ख समोर आली या पुस्तकाच्या निमित्ताने. आणि पुन्हा एकदा वैश्विक सत्याचा सा़क्षात्कार झाला म्हणायला हरकत नाही.
घरात मुलं वाढवताना तरी समानता असल्यामुळे यातल्या बर्‍याच गोष्टी वाचताना अपरिचित वाटल्या पण थोडाच वेळ. लगेचच आपल्या आजुबाजूला, ऐकिव आणि माहितीतल्या गोष्टी आठवतात आणि सहजपणे दिलेल्या स्पष्टीकरणाचं समर्थन करतात.
पुस्तकाचं एवढं कौतुक ऐकुनही खरतर वाचायला घेताना मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी धाकधुक होतीच की परदेशी स्पष्टीकरणं, तिथल्या सामाजिक परिस्थितीच्या आणि सुधारणवादी कल्पनांच्या अनुषंगाने केलेला उहापोह भारतीय समाजाला कितपत लागु होईल? पण स्त्रीचा हा धांडोळा वैश्विक आहे. बर्‍याचशा गोष्टी वाचताना तर ती भारतीय समाजाविषयीच बोलतेय किंवा भारतीय सामाजिक परिस्थितीची पुर्ण जाणिव असलेल्या माणसाचंच हे लिखाण आहे असं वाटतं.
मला आठवत नाही नक्की केव्हापासून पण १२-१३ वर्षांची असल्यापासून, जेव्हापासून स्त्री-पुरुष भेदाची सामाजिक जाणिव व्हायला लागली तेव्हापासून स्वत:ला माणुस म्हणुनच वागणुक मिळावी या बाबतीत मी आग्रही आहे माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकच व्यक्तीकडून. गेलं एक तप स्वतःचं हे भान जाणिवपुर्वक सांभाळलय मी आणि इतरांनाही सांगितलय. हो, जाणिवपुर्वकच. कारण तुम्ही जरा बेसावध राहिलात तरी लगेच हे फरक, ही विषमता आग्रही/मोठी होऊन बसते. स्त्रियांवर केले जाणारे टिपिकल विनोद जेव्हापासून ऐकले तेव्हापासुन आपल्याला असं व्हायचं नाही हे पक्कं ठरवलेलं मनाशी. कारण त्या विनोदांत अतिशयोक्तीचा भाग असला तरी त्याची थोडी थोडी झलक मी आजुबाजूच्या बायका-मुलींच्यात बघतच होते. पण त्यावेळी स्त्री-पुरुष समानतेपेक्षापण आपल्याला दोन्हीचे चांगले गुण घेवुन जास्तीत जास्त चांगलं, पुर्ण आणि स्वतंत्र व्हायचं आहे हे ठरवलं होतं. त्यामुळे समारंभ असो की ऑफिस, ५-७ मिनिटात तयार होवुन बाहेर पडणं किंवा खरेदीचा कंटाळा, तिसर्‍या व्यक्तीविषयी चर्चा चाललेली असते अशा ग्रूपमध्ये न जाणं या गोष्टी माझ्या नैसर्गिक आहेत की त्या ऐकलेल्या, वाचलेल्या विनोदांवर प्रतिक्रिया म्हणुन आल्यात याचा शोध घेणं अवघड आहे.
पुस्तकातल्या बर्‍याचशा गोष्टी तर मला अशा वाटल्या की अगदी माझ्यावरुनच लिहिल्यात की काय? निसर्गाकडे लहानपणीपासूनच ओढा होता पण निसर्गाच्या प्रेमात पडावं, त्याच्याशी एकरुप होण्याची ओढ वाटावी याचं माझ्यापुरतं कारण मी १५व्या वर्षी शोधलेलं की ते एक असं ठिकाण आहे जिथे मला माझ्या स्त्री असण्याची बंधनं किंवा वेगळेपणा भोगावा लागणार नाही.. एक असं ठिकाण जिथे माझं स्त्री असणं आड येत नाही. जिथे माझी ओळख स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन फक्त एक माणुस म्हणुन असेल. आता १५ वर्षांच वय म्हणजे स्त्री म्हणुन मिळणारी वेगळी वागणुक लक्षात येण्याचं आणि त्याचा अतीव राग, चीड मनात दाटण्याचं वय. आणि स्त्रियांच्या निसर्गाकडे असण्याच्या ओढ्याचं स्पष्टीकरण पुस्तकात पाहिलम तेव्हा स्वतःविषयीच नविन शोध लागल्यासारखं वाटलं मला. आणि अशा शोध लागण्याच्या आणि अचंबित होण्याच्या वेळा पुस्तक वाचताना अनेकदा येतात.
अजुनही मला माझ्या आयुष्यातले काही क्षण अगदी प्रकर्षाने आठवतात ज्या क्षणी मी विचार केला होता की,"बर्‍याच मुली इतकही नाही करत", किंवा "बर्‍याच मुली इतकाही विचार नाही करत, मी तरी बरी!" आणि पुढच्याच क्षणी पाल अंगावर पडल्यासारखी सटपटले होते. मुली?? माझं स्त्री असणं माझ्यात इतकं भिनलय का? माझा स्वतःवरचा ताबा किंवा स्वतःला जाणिवपुर्वक लावलेलं वळण इतक दुबळं आहे का? की एका क्षणासाठी का होईना पण असा विचार माझ्या मनात यावा? कितीही नाही म्हटलं तरी सामाजिक परिस्थितीमुळे आपल्या अंतर्मनावर होणारे संस्कार, परिणाम दूर ठेवणं जड जातं. अष्टोप्रहर जागृत रहावं लागतं त्यासाठी, कारण मोठं झाल्यावर क्वचित का होईना पण माझ्या सातमजली हसण्याबद्दल किंवा मोकळ्या वागण्याबद्दल भुवया वर गेलेल्या पाहिल्यात मी.
मी एक प्रवास सुरु केलाय आणि मला नक्की माहित आहे की त्यात सुख, सोय फारशी नसली तरी स्वातंत्र्य आणि समाधान नक्कीच आहे. या टप्यावर मला हे पुस्तक वाचायला मिळालं ही व्यक्तिशः माझ्या फायद्याची गोष्ट वाटते मला. या पुस्तकाने माझ्या संकल्पना अधिक सुस्पष्ट आणि स्वच्छ झाल्या आहेत, घटनांच्या, सवयींच्या कारणमीमांसा अधिक आशयघन झाल्यात हे नक्की. प्रत्येक स्त्री-पुरुषाने नक्की वाचावं असं पुस्तक आहे हे. त्या निमित्ताने आपल्या वागण्याचं आणि आपल्या आजुबाजूच्या सर्वच व्यक्तींच्या वागण्याचं परिक्षण अधिक चांगल्या प्रकारे करु शकू आपण.
पुस्तकाच्या सुरुवातीला सिमोनचा परिचय आणि अल्पचरित्र दिलय. त्यातल्या मतमतांतरात काही पटतं, काही नाही पटत. अगदीच उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तिच्यावर झालेला आरोप की 'ती वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत हॉटेलात राहिली. पुरुषांसारखं सडेफटींग रहाणं म्हणजेच चांगलं असा चुकीचा आदर्श तिने घालुन दिला' पण मला वाटतम की अशा intellectual किंवा philosophical पातळीच्या माणसाचं ते लक्षन असु शकतं. त्या उंचीला तिचं स्त्री असणं किंवा पुरुष असणं याचा काही फरक पडत नाही. ही गोष्ट सगळ्यात कमी महत्वाची असते अशा ठिकाणी. त्यामुळे तिचं तसं वागणं हा तिच्या त्य स्वभावाचा भाग झाला, पुरुषी अनुकरणाचा नाही. असो.. अशा अनेक गोष्टी आहेत. तिथेच पुस्तकाच्या गुणदोषांचीपण समीक्षा केली आहे. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की या सगळ्या गुणदोषांसह हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरेल.
याहीपुढे जाऊन 'द सेकंड सेक्स'च्या निमित्ताने "Man is not born but made" म्हणत पुरुष जर त्यांच्या घडणीचा विचार आणि विवेचन करु शकले तर खूप चांगलं होईल.
मेरा कुछ सामान ...
जगात सगळीकडेच अर्धा अधिक अर्धा एक होतो..
तसा प्रत्येक अर्ध्याला शोध असतोच स्वतःच्या पुर्णत्वाचा..
आणि पर्यायाने पुर्णत्वासाठी लागणार्‍या दुसर्‍या अर्ध्याचा..
क्वचितच कोणीतरी पुर्ण एक असतो
आणि आपलं गणित जरा वेगळं ठरलेलं ना..
ठरवलेलं आपण,
आपला एक अधिक एक पण एक..
आणि एक वजा एक पण एकच असेल..
पण वजाबाकीच करायची होती का?
मेरा कुछ सामान ...
आपल्या भिंगाच्या चष्म्यातून,
तुझी ती अतिचिकित्सक नजर माझ्यावर खिळवत तू म्हणालास,
लिखाणात आता तोचतोचपणा यायला लागलाय...
मग म्हटलं आता पुरेच झालं नाहीतरी..
माझ्याकडे काही गुलजा़रसारखा चिरतरुण चंद्र नाही
किंवा साहिरसारखी चिरतरुण वेदना पण नाही..
सतत तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
मग बाहेर काही भेटतय का ते बघावं म्हटलं..
बाहेर पडतच होते,
तर सगळ्यात आधी ऋतूच रुसले..
आतले सगळेच फुरंगटुन बसले..
त्यांची समजुन घालणं तसं अवघडच..
कारण ग्रीष्माचा दाह, शिशिराची वेदना, वर्षेची उत्कटता..
सगळं एकाच वेळी कसं बाजुला सारायचं..?
पुढे जावं तर स्वप्नं होती..
चांगली क्षितिजापर्यंत पसरलेली...
कित्येक तपं मनात मुरल्यावर,
आता कुठे अंकुरु लागलेली..
सूरांकडे तरी किती कानाडोळा करावा...
कितीही दाट असलं धुकं तरी,
कानात घुमत रहातातच की कायम..
ह्म्म...
मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यातून
माझा चंद्र बघत होता हे सगळं..
इतकी युगं सोबत काढल्यामुळे,
आपण फक्त शांतपणे वाट बघायची असते हे समजलेलं त्याला
अनुभवातुन..
त्याच्या पौर्णिमेची मात्र अमावस्या झाली माझ्या या फसलेल्या प्रयत्नात..
तो म्हणालाच शेवटी न रहावुन,
"बाई गं.. पुरे आता..!
किती त्रागा करशील..?"
मीही सुखावले..
स्वतःल सोडून बाहेर पडणं कदाचित जमणारच नाही आपल्याला..
मग पुन्हा तिच चुकार-मुकार किरणं..
फुलांचे रंग..
पौर्णिमेचा समुद्र..
श्रावणातला पाऊस...
स्वप्नांचे प्रदेश वगैरे...
जाऊ दे...
आपण आपले असेच बरे...
तुझे प्रश्न तुझ्याजवळ...
शेवटी माझ्या चंद्रालातरी कोण आहे म्हणा माझ्याशिवाय...!
मेरा कुछ सामान ...
सृष्टीचं कौतुक जितक करावं तितकं कमीच असं वाटण्याला निसर्ग कायमच नवनविन बहाणे देत असतो मला. दरवर्षी वसंतात फुलून फुलून येणारी आणि भरभरुन वहाणारी फुलझाडं हे त्यातलच एक कारण. शिशिर सरुन गेला की झाडांना फुटणारी पालवी बघण्यात, त्यांचा तो हिरवट कडू गंध अनुभवण्यात, त्या तुकतुकीत कोवळ्या पानांना स्पर्श करुन पहाण्यात महिनाभर आरामात निघुन जातो. पण त्याच वेळी निष्पर्ण होवुन कळ्या मिरवणार्‍या, कुठे कुठे तुरळक फुलू लागलेल्या फुलांच्या तुर्‍यांनी अजुन लक्ष वेधुन घ्यायला सुरुवात केलेली नसते. हा एक्-दिड महिना सरता सरता बर्‍यापैकी पानं पोपटीतून हिरव्या रंगात जायला लागतात. तो गर्द हिरवा रंग त्यांचं संथ,एकसुरी आयुष्य वाटतो मला.. त्यातलं अ‍ॅडव्हेंचर आता संपलेलं असतं किंवा कदाचित बाहेर तरी दिसून यायचं बंद झालेलं असतं. संथ, शांत, मुलाबाळांत रमलेल्या मध्यमवयीन गरत्या जोडप्यासारखी वाटायला लागतात झाडं बघता बघता.. आणि मग अचानक एके दिवशी डोळ्यात भरण्याइतका फुलोरा दिसतो कुठेतरी.. वसंताची चांगली घमघमीत आणि घवघवीत चाहुल लागते.
थोड थोडा म्हणता म्हणता फुलांचा पसारा चांगलाच वाढायला लागतो. तसा वर्षातला प्रत्येक ऋतू कोणत्या ना कोणत्या फुलांच्या अस्तित्वाने, त्यांच्या परिसरात असण्याने काही खास असा लक्षात राहतो (जसा पावसाळा बुचाच्या फुलांसाठी, मग चांगला जानेवारी उगवेपर्यंत झेंडुसारखी दिसणारी ती पिवळी/नारिंगी रानफुलं- मला त्यांचं नाव नाही माहिती.. अरेरे ) पण वसंताची बातच और आहे. उगीच नाही त्याला वसंत म्हणत..!
हल्ली पुणे स्टेशनकडून जहांगिरला जाणार्‍या पुलावरुन पलीकडे उतू जाणारा पांढरा-गुलाबी कॅशिया (हॉर्स कॅशिया) हिरव्यागर्द झाडांच्या पार्श्वभूमीवर अगदी उठुन दिसायला लागलाय. कितीही नाही म्हटलं तरी त्याच्याकडे बघितल्यावर पुसटसं हसु येतच चेहर्‍यावर. बस मधली शेजारची व्यक्ती हमखास संशयाने बघते त्यावेळी पण सोडा who cares? त्यावेळी ते झाड मला तोंडभर हसुन good morning म्हणत असतं आणि मी त्याला लवकर लवकर ऑफिस संपवुन मावळत्या सुर्यकिरणांना झेलणारं तुझं रूप बघायला परत येईन असं सांगत असते.
कॉलेजला असताना इंजिनीरिंगचं सबमिशन असायचं या दिवसांत. ती सगळी आदल्या रात्री जागुन केलेली कारागिरी भर उन्हाची कॉलेजला घेवुन जायच्या वेळेस ज्जाम चिडचिड झालेली असायची पण त्या तसल्या उन्हात कॉलेजच्या रस्त्यावर पिवळ्याधम्मक अमलताश उभा असायचा.. अर्थातच माझ्यासाठी.. "जाऊ दे गं.. चालायचंच." असं काहीतरी म्हणायचा. तो अमलताश ओलांडून पुढे जाताना हमखास माझा मूड बदललेला असायचा.. स्मित कॉजेलची सगळी सबमिशन्स त्याला दाखवुनच केलीयेत मी. अजुनही तिथुन जाताना तो तसाच उभा असतो. त्याच्या आजुबाजुला कसलसं बांधकामाचं सामान आणुन टाकलय. उदास वाटतो हल्ली.. अशा वेळी गुलजारचा अमलताश नाही आठवतो मग..

खिड़की पिछवाड़े को खुलती तो नज़र आता था
वो अमलतास का इक पेड़, ज़रा दूर, अकेला-सा खड़ा था
शाखें पंखों की तरह खोले हुए
एक परिन्दे की तरह
बरगलाते थे उसे रोज़ परिन्दे आकर
सब सुनाते थे वि परवाज़ के क़िस्से उसको
और दिखाते थे उसे उड़ के, क़लाबाज़ियाँ खा के
बदलियाँ छू के बताते थे, मज़े ठंडी हवा के!

आंधी का हाथ पकड़ कर शायद
उसने कल उड़ने की कोशिश की थी
औंधे मुँह बीच-सड़क आके गिरा है!!

मला मात्र माझा तो अमलताश कायम उत्साहाने सळसळणारा वाटायचा पण तो ही हल्ली असाच वाटायला लागलाय.. असो..
वसंतात हमखास भेट द्यावं असं पुण्यातलं ठिकाण म्हणजे डहाणुकर कॉलनी..!! उन्हं ऐन भरात असताना अक्षरशः स्वर्ग अवतरलेला असतो तिथे. बाहेरुन पाहिलं तर खरं वाटणार नाही इतका गोंधळ असतो रस्त्यावर पण एकदा का त्या गल्लीत शिरलं की बास्स...!! तिथल्या त्या बागेच्या भोवती ह्या सगळ्या कॅशिया, गुलमोहर आणि जॅकारंडाचंच कुंपण आहे आणि या सगळ्या फुलांची मिळुन अशी काही रंगपंचमी अवतरलेली असते की भर रस्त्यात गाडी ब्रेक लावुन थांबवलीच पाहिजे.
अशी बरीच ठिकाणं सांगता येतील.. युनिव्हर्सिटीकडून औंधला जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा नुसता गुलमोहर आहे. त्यातला काही लालभडक, काही नारिंगी, तर काही या दोन्हींमधला.. तसा NH4 पण या बाबतीत काही कमी नाही म्हणा. पण औंध रस्त्याच्या शेवटाकडे एक झिपर्‍या गुलमोहर दिसतो (नामकरण अस्मादिकांनीच केलय) तर तो झिपर्‍या माझा खास आवडीचा. तसा त्याचा रंग अगदी लालभडक नाहीये पण फुलं भरुन वाहत असतात नुसती आणि इतर वेळी त्याच्या सगळ्या फांद्या झिपर्‍यासारख्याच दिसतात, त्यामुळे ऐन बहारात फुलांच्या भारामुळे फांदी वाकलिये असा भास होतो. त्यामानाने NCL रोडला गुलमोहर कमी. तिथे जॅकारंडाचं राज्य आहे. अगदी व्यवस्थित जांभळ्या दिसणार्‍या त्या फुलांना ब्लू जॅकारंडा का म्हणतात हे मला तरी न उलगडलेलं कोडं आहे. ( आणि बोलीभाषेतलं नाव कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा) इतक्या नाजुकशा त्या फुलांना "जॅकारंडा" असलं भरगच्च अफ्रिकन आदिवासी जमातीसारखं नाव कोणी ठेवलय?
तसा वसंतातला सुगंधी ठेवा- चाफा, मधुमालती, मोगरा वैगेरेंना वगळुन तर चालणारच नाही. चाफ्याच्या झाडामागुन उगवणारा चंद्र पाहिला की हटकुन "चांद मातला" ची आठवण येते मला.. त्यातल्या मोगर्‍याविषयी तर आधी लिहिलच आहे मी. मधुमालतीविषयीची सगळ्यात पहिली आठवण म्हणजे मी अगदी ६-७ वर्षांची असतानाची. आमच्या त्यावेळच्या घरामागे कमानीवर मधुमालतीची वेल होती. ती इतके दाट होती की त्याखालची कमान दिसायचीच नाही आणि मला बरीच वर्षे इतकं आश्चर्य वाटायचं की कसले भारी वेल आहे.! अशी कशी आलिये..? आणि मग लंपनचं "मधुमाल्ती ग्राऊंड..." डेक्कनच्या आतल्या बाजुच्या बंगल्याच्या कुंपणावर हटकुन आढळणारी ही वेल..
मग हळु हळु पावसाळा येईपर्यंत या फुलांच्या सोबतीने १-२ उन्हाळी सहली नक्कीच होतात. अगदीच नाही तरी पुण्यातून इकडे-तिकडे फिरताना आपण थांबुन त्यांची विचारपूस केलीच पाहिजे असा थाट असतोच त्यांचा. तर असला हा वसंत... आता तुम्ही म्हणाल की यात फॅमिली डे चा काय संबंध आला? तर मला हल्लीच शोध लागलाय की माझ्या वसंतातल्या आठवणीतली ही बरीचशी झाडं "गुलमोहर" फॅमिली मधली तर बरीचशी जॅकारंडा फॅमिली मधली आहेत.. :-)
मेरा कुछ सामान ...
गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन? की नंतर नंतर त्यांचे शब्द म्हणजे फक्त त्यांच्या-माझ्यातलाच संवाद आहे असं वाटायला लागलं म्हणुन..?
जेव्हापासून कवितेतलं काही विशेष कळत नव्हतं तेव्हापासुन गुलजारचे शब्द सोबतीला आहेत. याचं श्रेय जितकं त्या संगीतातील आर्ततेला आहे तितकंच ते गुलजारच्या शब्दांच्या नेमकेपणाला आहे. मला आपलं कायम असं वाटत रहातं की गुलजारकडे छान लयीत मुरवत घातलेल्या शब्दांची एक बरणी असली पाहिजे, त्यामुळे त्यांचे सगळेच शब्द कसे गाण्याच्या धून मध्ये विरघळुन जातात.
पुढे जेव्हा गुलजारचं रावीपार, त्रिवेणी वै वाचनात आलं तेव्हा त्याच्या अजुन बर्‍याचशा रुपांचा परिचय झाला. पण आजही गुलजार म्हटलं की, "दिल ढूंढता है फिर वोही" च आठवतं.. अतिशय नॉस्टॅल्जिक मूड मध्ये नेणारी ही रचना पण मला मात्र कायमच एक परफेक्ट रोमँटिक चित्र वाटत आलिये. "बर्फिली सर्दियोंमे, किसी भी पहाडसे, वादिमें गुंजती हुयी खामोशियां सुने" म्हटलं की आजही सर्रकन् काटा येतो अंगावर..
आणि मग वेळोवेळी भेटत गेलेला गुलजारचा चांद, त्याचे वेगवेगळे ऋतू.. मोरा गोर अंग लै ले पासुन सुरु झालेली ही जादू अजुनही, दिल तो बच्चा है जी म्हणतेच आहे.. बुलबूलोको अभी इंतजार करने दो म्हणतेच आहे. माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षणांना गुलजारच्या शब्दांच्या सोबतीने अविस्मरणीय करुन ठेवलं आहे.
गुलजारकडून प्रेमाचे धडे गिरवता गिरवता मी गुलजारच्या प्रेमाच्याच प्रेमात पडत होते. गुलजारच्या शब्दांची वेडी होत होते. त्यांचे शब्द म्हणजे नशा नव्हते.. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर,"जादु है जो सर चढेगा, और जो उतरेगी शराब है" ती जादू होती.. ती जादू आहे.. आणि त्यामुळेच ती कधी कमी नाही होणार.. ती कायम तेवढीच गूढ रहाणार आहे.
गुलजार हे माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सगळ्या उत्कट भावनांच्या क्षणांचे साथीदार आहेत. अजुनही ह्रूदयात एक अनामिक, उचंबळुन टाकणारी लाट उमटते गुलजारचं नाव ऐकलं की, त्यांना पाहिलं की.. आणि ते कायमच तसं रहाणार आहे. एका रंगीत, सुगंधी धुक्यात हरवलेली असते मी गुलजारच्या शब्दांसोबत असताना. फक्त मलाच कळु शकेल असं काहितरी, मलाच दिसु शकेल असं काहितरी ते लिहितायेत असं वाटतं मला. "जिना तो सिखा है मरके, मरना सिखादो तुम" हे मागणं मागायला शिकवलं पण गुलजारने आणि पुरवलं पण गुलजारने..
"शायद किसी नदियापर चलता हुवा तू मिले" मधल्या अल्लड वयातल्या भावनांपासून "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही" पर्यंतचा प्रेमाचा प्रवास गुलजारच्या कल्पनाविलासांवर/ त्यांच्या शब्दांवरच तर चालत आलाय. आणि मग 'त्या' वयातुन बाहेर आल्यावर गुलजारच्या बाकीच्या रुपांचा शोध सुरु झाला. तसं त्यांच्या, "तुझसे नाराज नही जिंदगी.." किंवा "ए जिंदगी गले लगा ले"ची जादु नव्हती असं नाही. पण "आदतन जिये जाते है, जिये जाते है.. ये आदते भी अजीब होती है" किंवा "फिर ना मांगेगे जिंदगी यारब तुझसे, ये गुनाह हमने एक बार कर लिया" हे म्हणणारा गुलजार जेव्हा भेटला तेव्हापासुन तर आता कोणतीच भावना गुलजारशिवाय पुर्ण होत नाही. "दर्द ने कभी लोरिया सुनायी तो, दर्द ने कभी नींदसे जगाया रे" या ओळी ऐकुन त्यांच्या प्रेमात अधिकाधिक रुतत जाण्यापासून नाही रोखू शकले मी स्वतःला. तशी इच्छा पण नाहीये म्हणा.. मी गुलजारचं प्रेम पाहिलं आणि मग प्रेम जगले. मी माझं आयुष्य जगले आणि मग गुलजारची कविता पाहिली. अगदी अगदी माझ्यासाठीच असलेली. माझ्या आयुष्यातले अनेक क्षण गुलजारच्या शब्दांचे ऋणी आहेत.
त्यांच्या शब्दांचं शहारुन येणं असं आहे की लाजाळुनेही चकित व्हावं.. उत्कटता अशी की, क्षणभर पतंगाला प्रश्न पडावा.. औदासिन्य असं की शिशिर पण फिका वाटावा.. आणि दु:ख असं की अग्नि सुसह्य भासावा..
"तेरी इक हंसीके बदले, मेरी ये जमीन ले ले.. मेरा आसमान ले ले" ही म्हणजे अगदी "कुबेर होवुन तुझ्यात यावे, होवुन जावे पुरे भिकारी" च्या पण पुढची पायरी आहे. कारण कुबेराच्या त्या लुटून जाण्याला पण अट आहे तुझा बधीर ओठ गिळण्याची, पण इथे मात्र एका हास्याच्या बदल्यातच सगळा सौदा आहे.
गुलजारच्या काव्यातील प्रेमाला भारावुन सुरु झालेला हा प्रवास कधी आयुष्याच्या सगळ्या अंगप्रत्यंगाचा भाग बनुन गेला तो क्षण आठवणं अशक्य आहे. गुलजारचे अनेक कल्पनाविलास, अनेक रुपकं अशी आहेत की ज्यांच्यावर बोलावं तितकं थोडंच वाटेल. अशा किती किती कल्पना सांगाव्या? नुसता गुलजारचा चंद्र म्हटला तरी डोळ्यास्मोर उभी रहाणारी त्याची अनंत रुपं, "चांद की भी आहट ना हो बादल के पीछे चले" मधला उत्कटतेच्या चरम सीमेवर आलेला चंद्र असो किंवा "रात को खिडकीसे चोरी चोरी नंगे पॉव" येणारा खट्याळ चंद्र असो किंवा "नीली नदी के परे गीला स चांद खिल गया" मधला शांत, धीरगंभीर तरी अधीरसा वाटणारा चंद्र असो किंवा"चांद निगल गयी दैया रे, अंग पे ऐसे छाले पडे" मधला आग लावणारा, वणवा भडकवणारा चंद्र असो किंवा "उस रात नही फिर घर जाता वो चांद यही सो जाता है" मधला तारे जमीनपर बघुन मोहरलेला चंद्र असो "तेरे बिना चांदका सोणा खोटा रे.." मधला त्याच्याशिवाय निष्प्रभ वाटणारा चंद्र असो.. त्यांच्या कवितांत डोकावुन जाणारा "लॉनके सुखे पत्ते सा चांद" असो किंवा "एक चांदकी कश्ती मे चल पार उतरना है" म्हणत रात्रीचा नावाडी झालेला चंद्र.. तर सगळ्यात पहिला, "बदरी हटाके चंदा, चुपकेसे झांके चंदा" मधला एका अधीर प्रेयसीची बोलणी खाणारा चंद्र.. आणि या चंद्रासोबत आलेली लसलसणारी वेदना.. "ओ मोरे चंद्रमा, तेरी चांदनी अंग जलाये
तेरी उंची है अटारी, मैने पंख लिये कटवाये.."
काय बोलावं? शब्द खुंटतात माझे तरी.. गुलजारनी सिनेमामधल्या प्रसंगाला अनुसरुनच गाणी लिहिली पण ते लिहिताना त्या भावनेच्या इतक्या गाभ्यापर्यंत गेले की ती गाणी त्या प्रसंगापेक्षाही खूप जास्त बनून गेली. जसं की,"एक छोटा लम्हा है जो खत्म नही होता, मै लाख जलाता हू ये भस्म नही होता"मधला प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारा असा एक क्षण किंवा "उम्र लगी कहते हुये, दो लब्ज थे इक बात थी" मधली प्रत्येकाच्याच आयुष्यात नक्की असणारी अशी एक गोष्ट..
त्यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक मात्रेत, प्रत्येक रिकाम्या जागेत जी नजाकत आहे ती अगदी रेशमाच्या लडीसारखी आपली आपल्यालाच उलगडावी लागते. गुलजारच्या भाषेत बोलायचं तर अगदी "एकही लट सुलझानेमें सारी रात गुजारी.." मधल्या सारखं.. त्या रंगीत धुक्यात आपणच हरवुन जाता जाता नविन काहीतरी शोधायचं असतं.. त्यांच्या त्या अनंत कल्पना आणि प्रत्येक कल्पनेची अनंत रुपं.. एखादी "खत मे लिपटी रात.." एखादी, "फिर वोही रात है" मधली "रातभर ख्वाब मे देखा करेंगे तुम्हे" म्हणत स्वप्नांची खात्री देणारी रात.. एखादी, सीली सीली जलनेवाली बिरहाकी रात तर कुठे, नैना धुंवा धुंवा करणारी धीरे धीरे जलनेवाली रैना
त्यांची ही उत्कट लेखणी हलकीफुलकी होते तेव्हा पण सहज म्हणुन जाते, "चांदका टिका मथ्थे लगाके रात दिन तारोंमे जिना विना इझी नही" किंवा "चांद से होकर सडक जाती है उसिसे आगे जाके अपना मकान होगा...", "जो सरमे सोच आयेगी, तो पॉवमे मोच आयेगी" अशी मजा करता करता हळुन कुठे सांगुनही जाते, "दुनियासे भागे दुनियामें.. दुनियाको हुयी हैरानी.."
ह्म्म.. गुलजारची भाव व्यक्त करायची पद्धत पण त्या भावनांइतकीच अनवट. त्यामुळे या इतक्या मोठ्या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी त्या शब्दांचा, रुपकांचा एक वेगळाच अर्थ लागतो. आणि तो इतका परफेक्ट असतो की प्रत्येक वेळी "युरेका....." म्हणुन ओरडावसं वाटतं. मला आवडणारी गुलजारची गाणी तीच आहेत. त्यात भर पडतेय पण जुनी अजुनही तितकीच प्रिय. पण मी जशी मोठी होत चाललेय तसे त्या शब्दांचे निराळेच अर्थ उमजू लागलेत मला. आणि गुलजारच असं हे उलगडत जाणं मला फार फार फार प्रिय आहे.......

गुलजारसाठी...

न जाने किस दिन ये सफर शुरु किया था मैने..
न जाने कबसे आपके लफ्ज मेरी सांस बन गये..

न जाने कबसे,
अक्सर बुझती हुयी रातो मे मिला किया है
आपका चांद पहाडोंके परे..
बादलोकी सिलवटोंमे आपके खयाल ढुंढता हुवा..
हमेशा बेच जाता है मुझे सपने
चंद आसुंओके बदले..
(सुना है चांदनी नाराज रहती है उससे आज कल..
कह रही थी,
आपके खयालोंमे आकर बडा मगरुर हो गया है..)

न जाने कब एक बार,
खुशबूका एक झोका जिंदगी लेके आया था...
कहां, गुलजारसे मिलकर आ रहा हु..
इससे पहलेकी इत्र बनाके रखती उसका
निकल गया देखतेही देखते
जिंदगी की तरह...

न जाने कबसे,
मेरी हमसफर बनी है आपकी कल्पनाये..
एक कोहरासा बना रहता है,
गुजरती हुं जिस किसी रास्तेसे..
छुनेकी कोशिश की थी एक बार,
तो पिघल गया..
गीली उंगलीयोपे डुबते हुये सुरज की किरने
चमकती रही बस्स...

न जाने कितनी बार,
आपकी कहांनिया लोरी सुनाती रही..
जब दिन खत्म हो जाता था कुछ पलोंमे,
और एक पल रातभर
इन्कार करता रहता था गुजरनेसे...

ह्म्म...
अब तो लगता है जैसे,
सदिया बीत गयी हो ये सफर शुरु किये..
पर ना जाने कबसे,
आपकी नज्मोंका सजदा करतीं आयी हुं
मै हर पल..
के कभी मेरी जिंदगीभी एक दिन,
आपकी कोई नज्म बन जाये...!
----------------------------------------------------------------------------------------------------------
खरतर लिहायला सुरुवात करण्याआधी गुलजारशी संबंधित माझ्या आठवणी लिहायचं ठरवलं होतं मी. पण मग लिहिता लिहिता स्वतःला विसरुनच गेले. गुलजार तेवढे राहिले शिल्लक.. स्मित
मेरा कुछ सामान ...
"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..

बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्‍यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..

आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..

तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा

पुलंच्या विनोदाला, कुसुमाग्रजांच्या शब्दाला
आणि गुलाम अलींच्या सूराला
त्याच उत्कटतेने तुला दाद देताना
अनुभवलं तेव्हा...
........
आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..

हल्ली हल्ली स्वतःचं म्हणुन निर्माण केलेलं कस्पटासमान अस्तित्व
मिटवुन टाकुन फक्त आईची मुलगी बनुन जावसं वाटतं..
किंवा,
कधीच स्वतःचं अस्तित्व न मिळू शकलेल्या
एका मुलीची आई...!!!
मेरा कुछ सामान ...
सकाळी रात्री थंडी आणि दिवसभर उकाडा अशा वातावरणातून जेव्हा दिवसभर उकाड्याच्या स्थितीत ॠतू येतो तेव्हा कधी अचानक गाडीवरुन फिरताना / बस मधुन जाताना पांढर्‍या शुभ्र सुगंधाची एक झुळूक अंगावरुन वाहुन जाते.. आणि मनात स्पष्ट स्पष्ट मोगरा उमटुन जातो. सिझन मधली पहिली मोगर्‍याची खरेदी हा माझा एक स्वतंत्र सोहळा असतो. अशी चाहुल लागल्यानंतर लगेचच येणारा वीकेंड यासाठी निवडते मी.. सकाळी सगळं आवरुन बाहेर पडते.. ऊन चांगलं डोक्यावर तापेपर्यंत सगळी कामं, एखाद्या छानशा पुस्तकाची खरेदी आवरुन अंगातुन घामाचे ओघळ वाहत असताना आणि ऊन मी म्हणत असताना, चौकातल्या एखाद्या म्हातार्‍या आजीबाईंसमोर उभी रहाते आणि अगदी मुहमांगी किमत देवुन (हो! कारण त्या क्षणी त्या मोगर्‍याच्या बदल्यात मी माझा स्वर्ग लुटायला पण तयार असते..) मी ओंजळभर मोगरा विकत घेते आणि खोल खोल श्वास घेवुन तो वास माझ्या रंध्रारंध्रात झिरपू देते. मला आठवतय तेव्हापासुन अनेक वर्षे हा मोगरा माझ्या उन्हाळ्याची साथ करत आलाय. त्याच्या सुगंधात अनेक सण-समारंभ साजरे केलेत, अनेक मैफिली रंगवल्यात.. त्या चांदणभरल्या ओंजळीचं सुगंधाचं देणं फेडायच्या मागे न लागता मी त्याच्या ॠणातच रहाणं पसंत करत आलेय. ही मोगर्‍याची खरेदी झाल्याशिवाय खर्‍या अर्थाने माझा उन्हाळा सुरु होत नाही. आणि आज हे लिहिण्याचं कारण? आज मी या सिझन मधली पहिली मोगर्‍याची खरेदी केलीय.. स्मित
मेरा कुछ सामान ...
असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक क्षण युनिक असतो. एकमेव्-अद्वितीय. आणि तो तसाच जगला पाहिजे. तरच आपण प्रत्येक अनुभवाचा परिपूर्ण प्रत्यय घेवु शकतो. पण प्रत्येक क्षणाला हा पण पाळणं अवघड आहे. आणि काही क्षण, काही नावांसाठी तर अशक्य. तसं प्रत्येकच गोष्टीला एक रुप असतं, एक रंग असतो, एक गंध असतो..पण काही नावं येतानाच आपल्यासोबत अनेक रुप, रंग, सुगंधांची गाठोडी घेवुन येतात. आजही कोणताही सिनेमा बघताना मी फक्त तो सिनेमा बघत नसते तर लहाणपणापासून सिनेमासोबत जुळलेल्या, भोगलेल्या सगळ्या आठवणी जगत असते. सिनेमाच्या त्या जगाबरोबरच अजुन एका वेगळ्या आठवणींच्या जगात फिरुन येत असते. गुलजार म्हटलं की त्यांची ती सगळी गाणी, वेळोवेळी मी त्यांच्याशी साधलेला संवाद, अनेक उत्कट क्षणांना त्यांच्या शब्दांची झालेली ती सोबत असं सगळं घेवुनच ते नाव माझ्यासमोर उभं रहातं. अशा अनेक गोष्टी आहेत. सिनेमा, गुलजार, चित्रपट संगीत, शाळा, समुद्र, प्रवास.. अशाच काही मनाच्या कोपर्‍यात मंद दरवळत रहाणार्‍या गोष्टींना दिलेला हा उजाळा.. नॉस्टॅल्जिया... साधारणतः १९९४ ते २००९ या काळाच्या मैफिली रंगवणारा. मी ७-८ वर्षांची असल्यापासून ते इंजिनीरींग होईपर्यंतच्या कालखंडातल्या आणि त्या वेळेत बालपण रंगलेल्या सगळ्यांना आठवतील अशा काही गोष्टी. स्मित
------------------------------------------------------------------------------------
सिनेमा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मे च्या सुट्टीत थिअटरला सिनेमा बघायचा कार्यक्रम. त्यावेळी दर आठवड्याला उठुन सिनेमा बघायची पद्धत नव्हती त्यामुळे सिनेमाला जाणं हा वार्षिक किंवा सहामाही कार्यक्रम असायचा. आणि सुट्टीवरुन परत शाळा सुरु गेल्यानंतर कोणता सिनेमा बघितला याच्या चर्चा पुढची चाचणी परीक्षा येईपर्यंत अधूनमधून चविने चघळल्या जायच्या. मे च्या सुट्टीत गावी गेलो की त्या वर्षांतला त्या सुट्टीतला सगळ्यात बिग बजेट सिनेमा गावात कधी येतोय त्याची वाट पाहिली जायची. तो आला की एका दिवशी गावातल्या एकुलत्या एक चांगल्या थिअटर मध्ये त्याची एके रात्री ९ ते १२ च्या शो ची तिकीटं काढली जायची. त्यातल्या त्यात आमचे मधले काका जरा रसिक वै. म्हणता येतील असे होते. त्यामुळे तेच पुढाकार घेवुन तिकीटं काढुन आणायचे. बाकी घरातल्या पुरुषांना सिनेमा बघण्यात काही रस नव्हता आणि तशी पद्धत पण नसावी कदाचित. मग त्या दिवशी सकाळपासुनच घरात फार लगबग असायची. आम्ही सगळी चुलतभावंड त्याच विचारात गुंग. कोणी दंगा केला की लगेच, "तुला नेणार नाही मग संध्याकाळी.." अशी धमकी दिली जायची. रात्रीच्या स्वयंपाकाला दुपारच्या जेवणानंतर लगेचच सुरुवात व्हायची. सगळं आवरुन मग आई, दोन काकु जरा आराम करायच्या. आम्ही पण त्यादिवशी दुपारी त्यांना दंगा न करता झोपु द्यायचो. संध्याकाळी काका स्वतःहुन अंगण झाडणे, सडा-पाणी वै. कामं करायचे घरातल्या बायकांना तेवढीच मदत म्हणुन. पिच्चरला जायचंय, पिच्चरला जायचंय म्हणत लवकरच जेवणं आवरायची. सगळी झाकपाक, भांडीकुंडी होवुन घरातली सगळी महिला मंडळी आणि बच्चे कंपनी निघायची. घरापासुन फक्त १०० मी वर असलेल्या ठिकाणी सगळ्यांना सोडायला काका यायचे सोबत. आणि मग लहान मुलं सोबत असल्यावर जे प्रकार होतात ते सगळे प्रकार साग्रसंगीत पाड पडुन आम्ही तो सिनेमा बघायचो. ते सिनेमागृहाच्या मंतरलेल्या काळ्याभोर अंधारातले जादुई ३ तास म्हणजे पुढच्या ६ महिन्यांची बेगमी असायची. असा पाहिलेला पहिला सिनेमा आठवतो तो म्हणजे, हम आपके है कौन.! रेणुका शहाणे मरते तेव्हा ढसा ढसा रडले होते मी. आणि परत शाळा सुरु झाल्यावर कोण किती रडलं हे सांगायची मुलींच्यात चांगलीच चुरस लागलेली. अशा सुट्टीत बघितलेल्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्यानंतर अशाच प्रकारे बॉम्बे, दिलवाले दुल्हनिया.., कुछ कुछ होता है, राजा हिंदुस्तानी वै. वै. चित्रपट पाहिले.
पण हा म्हणजे अगदीच सठीसामाशी येणारा योग असल्यामुळे चित्रपट बघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टिव्ही..! शुक्रवारी-शनिवारी रात्री आणि रविवारचा मराठी चित्रपट पहायला मिळणं म्हणजे त्या दिड दिवसाच्या सुट्टीतलं एक महत्वाचं काम असायचं. मला चांगलच आठवतंय ते म्हणजे, त्यावेळी शुक्रवारी जरा बर्‍यापैकी जुने आणि शनिवारी त्यातल्या त्यात नवे चित्रपट लागायचे टिव्ही वर. मग शुक्रवारचा सिनेमा जर चांगला असेल तर आई आवर्जुन बघ म्हणुन सांगायची. मग डोळे ताणुन ताणुन, मधल्या जाहिरातींना कंटाळत तो चित्रपट संपवला जायचा. मग दुसर्‍या दिवशी अपुर्‍या झोपेमुळे जे व्हायचं ते व्हायचं. पण असा असायचा तो शुक्रवारचा सिनेमा. आणि शनिवारी तर बघायलाच नको. रविवार म्हणजे उशिरा उठायचा हक्काचा दिवस (अर्थात कुठली स्पर्धा किंवा परिक्षा नसेल तरच्).! त्यामुळे शनिवारी रात्री चांगला सिनेमा लागावा हे माझी अगदी मनापासूनचे इच्छा असायची. लागला तर दुधात साखर.. आणि नाही लागला तर? अहो नाही लगला तर रविवारच्या मराठी चित्रपटाची वाट बघायची. रविवारी घरी अभक्ष भक्षणाचा भरगच्च कार्यक्रम असायचा. दुपारच्या छायागीतसोबत तो संपला की मग दुपारी जडावलेले डोळे घेवुन "दुपारी झोपू नका, नाहीतर रात्री झोप लागायची नाही" ही आईची सुचना ऐकतच झोप लागुन जायची. आणि मग ४ च्या मराठी सिनेमाची सुरुवात व्हायच्या आत घरात एकेक मेंबर जागं व्हायचा. रविवारी दुपारी प्रदेशिक चित्रपट लागायचे. त्यावेळी असं खूप वाटायचं की हे चित्रपट कळायला हवेत. आपण ते पाहिले पाहिजेत. त्यावेळी अशी काहितरी धारणा होती की हे कोणतेतरी भारी चित्रपट आहेत. पण एकदा त्याच प्रादेशिक चित्रपटात जेव्हा मराठी चित्रपट पाहिला तेव्हा मनात म्हटलं, "हात्तिच्या, म्हणजे इतर भाषांतले पण असेच चित्रपट असणार ते, वेगळं नाही काही !" आणि मग एकदम फुग्यातली हवाच काढुन टाकल्यासारखम झालं.
पण बहुतेक वेळेला सिनेमा बघताना खूपच्या खूप हरवुन जायची मी. मग असाच एखादा टाइमपास सिनेमा असला तरी. पण आईच्या आग्रहामुळे असे पांचट चित्रपट फारच कमी बघितले गेले. रविवारी दुपारी बघितलेल्या चित्रपटात अगदी अजुनही आठवतात ते म्हणजे, सामना, वजीर, सरकारनामा, निवडुंग, सगळे विनोदी मराठी सिनेमे, दर दिवाळीला न चुकता लागणारा धुमधडाका! अशोक-लक्षा-सचिन-महेश यांचे बहुतेक सगळे हिट चित्रपट रविवारी ४ लाच पाहिलेले आहेत.
या वीकेंड सिनेमाचे वेध मला तरी बुधवारपासुनच लागायचे. शाळा मनापासुन आवडायची पण तरीही या सिनेमांसाठी शुक्रवारची वाट बघायची मी. रविवारी संध्याकाळचा सिनेमा संपला की अगदी उदास्-उदास, भकास वाटायचं. कोणी बोलवायला आलं तरी जायला नको वाटायचं.. (हल्ली पण असंच होतं, पण ते सोमवारी ऑफिस आहे या कल्पनेने.. अरेरे ) असो..
मधल्या काळात कधीतरी या लोकांनी शनिवारी रात्री ९.३० कोणतंकी सिरिअल सुरु केलेलं त्यामुळे सिनेमा लागायचा १०.३० ला आणि संपायचा १.३० ला. हे म्हणजे आमच्यासाठी अतीच होतं. (हॉस्टेलला राहिल्यापासुन मात्र १.३० म्हणजे किमान वेळ झाली ते सोडा) त्यामुळे अगदीच चांगला सिनेमा असल्याशिवाय शनिवारचा सिनेमा बघणं बंद झालं.
लिहिता लिहिता अचानक आठवलं.. एक चायनीज म्हण आहे, Day by day nothing changes but when you look back, everything is changed...!!
ह्म्म... आणि त्या काळचे ते हिरो-हिरोईन्स.. सगळी खानावळ, अक्षय कुमार, गोविंदा, अजय देवगण, सुनिल शेट्टी, माधुरी, उर्मिला, रविना, काजोल, करिष्मा.. सगळे एकजात गोड गोड चॉकोलेट हिरो असलेले खान्स.. नंबर १, नंबर १ करणारा गोविंदा आणि मला ज्यांचा प्रचंड राग यायचा आणि यांना हिरो कोणी केलं हा प्रश्न ज्यांच्याकडे बघुन पडायचा असे अजय आणि सुनिल. (काजोलने अजयशी लग्न केलं त्याचा सगळ्यात मोठा धक्का मला बसलेला हे मी आजही शपथेवर सांगु शकते..) मराठी मुलगी आणि मिलियन डॉलर स्माईल ने घराघरातील बायका-पुरुषांच्या गळ्यातला ताईत बनलेली धक धक गर्ल माधुरी, मराठी पोरी बोल्ड व्हायला लागल्यात हे वाक्य जिच्यामुळे जास्त वापरलं जाउ लागलं ती उर्मिला, आपल्या अभिनयाने नेहमीच सगळी अ‍ॅवार्डस् घेवुन जाणारी काजोल. (त्यावेळी सगळ्या पेपरमध्ये तिचा उल्लेख गुणी अभिनेत्री असा असायचा. तेव्हा मला खरच असं वाटायचं की पेपरवाले ज्यांना गुणी म्हणतात ते खरच साधे-सुधे, गुणी असतात) मधुनच आपल्या एखाद्या चित्रपटाने वाद्ळ निर्माण करणारे महेश भट, पूजा भट.. त्यावेळी म्हणजे घरचे त्यांना शिव्या घालायचे यथेच्छ! लहान मुलांनी बघु नये म्हणायचे. का ते विचारायचं धाडस आम्ही कधी केलं नाही. पण अंगप्रदर्शन, भारतीय संस्कृती वै. वै. शब्दांची डोक्यात नुसती भेळ व्हायची पेपर वाचुन जे कळायचं त्यावरुन.
पुढे पुढे हे सगळं नकळत कधी मागे पडत गेलं कळलं नाही. दिल चाहता है बघितला तेव्हा असाही सिनेमा असु शकतो हे कळलं. न जाणवेल असं काहीतरी वेगळम वाटत राहिलं. पुढे हॉस्टेलला आल्यावर तर मग काही विचारालाच नको. इंग्लिश सिनेमाच्म खरं वेड हॉस्टेलच्या काळातलं. तिथे IMDB TOP सिनेमांचा फडशा पाडला. तिसर्‍या आणि शेवटच्या वर्षी तर सिनेमाचं वेड अगदी भरात होतं. तेव्हाच पहिल्यांदा PIFFला हजेरी लावली आणि तेव्हापासुन कायन न चुकता लावतेय. पहिल्या वर्षी मी सलग आठवडाभर २-३ सिनेमे रोज पाहत होते. एका शनिवारी तर ५.! संध्याकाळी बाहेर आलेय तेव्हा अक्षरशः ब्लॅंक
झालेले २ तास. हॉस्टेलला परत जाताना मी सिनेमातल्याच कोणत्यातरी रस्त्यावरुन चाललेय असं वाटत होतं. इतका बेक्कार हँगओव्हर परत कधी अनुभवला नाही मी. पहिल्यांदा PIFF पाहिल्यावर मग वर्ल्ड सिनेमाचा काळ सुरु झाला. मग हजार कटकटी करुन कुठून कुठून अशा फिल्म्स, त्यांची माहिती, सबटायटल्स मिळवुन मग असे सिनेमे पहायची मी. त्यातुनच मग सोर्सेसे भेटला, इनारित्तू, वूडी अ‍ॅलन भेटला आणि माझा सिनेमाजगाचा स्वामी, बर्गमन..! बर्गमन पहायचा म्हणजे माझ्यासाठी अगदी साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. सिनेमा आणि इतर सगळी माहिती मिळवणे, सगळं आवरुन आता सिनेमा पाहिल्यानंतर काही कामं करायला लागु नयेत हा हिशोबाने सगळं आवरणं (कारण बर्गमनचा सिनेमा पाहिला की बाकी कशावर विचारही करायची स्थिती रहात नाही), हेड्फोन्स म्हणजे अगदी गरजेचे कारण शब्दन् शब्द साठवुन ठेवायचा असतो (कारण तो सिनेमा दुसर्‍यांदा पहाण्याचं धाडस मी करेन यावर माझाच विश्वास नाही)
असो... सिनेमा म्हटलं की थंडीच्या रात्रीत चादरीत गुरफटून बघितलेले, उन्हाळ्यातल्या दुपारी उकाड्याचा विसर पाडतील असे, गरमागरम चहाच्या वासाची आठवण करुन देणारे, अगदी वणवण फिरुन तिकिटं न मिळालेले, झोपेतुन उठुन ५ मिनिटात थिअटरला पोहचुन पाहिलेले, भिजुन, आतल्या एसी मध्ये कुडकुडत पाहिलेले असे सगळे सिनेमे आठवतात.. एखाद्या पांचट सिनेमाला सगळ्या ग्रुपने मिळुन केलेला दंगा, एखाद चांगला सिनेमा बघुन बदलुन गेलेलं माझं जग.. अशा अनेकानेक आठवणी दाटतात.. मला सिनेमातलं किती कळतं माहित नाही पण एखादी चांगली कलाकृती बघुन वाटणारं समाधान परत परत अनुभवावसं वाटतं.. अनेक रंग, अनेक गंध, अनेक आठवणी घेवुन येणारा हा माझा उत्सव.. कोणत्याही सिनेमाला जाताना आज मी या सगळ्या आठवणींचं गाठोडं घेवुन जात असते, त्या गाठोड्यात जमेल तशी भर टाकत असते..