मेरा कुछ सामान ...
पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..



ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
6 Responses


  1. hats off to this one.. kharach bhidate shewatachi ool



  2. Anil Says:

    जीवाच्या आरपार गेलं हे पत्र.. मनाची पहिल्या पावसाआधीची भिरभिरी आणि अताशा असलेली सुन्न.. अशा अवस्थांची सरमिसळ झालीय.. आणि आता काहीच सुचत नाहिये..


  3. राऊळ साऊल, :-) इतका उत्कटतेने लिहिलेला प्रतिसाद वाचून तुम्हालाही हा अनुभव आलेल्याची खात्रीच पटली आता मला.. धन्यवाद..!