मी जरा जास्तच उशीरा जन्म घेतला याची प्रामाणिक खंत ज्या लोकांकडे बघुन मला वाटते त्यातलं एक ठळक नाव म्हणजे किशोर कुमार.. आभास कुमार गांगुली.. मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाने आणि त्याबरोबरच वेळोवेळी कळत गेलेल्या विक्षिप्तपणाच्या कथांमुळे. (कारण जगाने वल्ली ठरवलेल्या लोकांबद्दल आकर्षण तर आहेच पण त्यांच्यासोबत माझं सूत जरा लवकरच जमतं असा माझा अनुभव आहे.. असो..)
"कुणी विचारायला येवु नये, नाहीतर खूप चिडचिड होईल" असं वाटतं आणि "कोणी विचारायला का येत नाहीये?" असं वाटुन पण त्रागा होत असतो अशा वेळी किशोरचा आवाज पांघरुन बसणे हा कायमच एक सोयिस्कर मार्ग असतो.
शब्दांकडे अतिरीक्त लक्ष देण्याची खोड म्हणजे माझ्या आठवणींपलीकडची. मला आठवतय तेव्हापासून गाण्यातील शब्दांकडे जरा जास्तच चिकित्सकपणे लक्ष देत आलिये मी. अगदी सूरप्रधान शास्त्रिय गायकी ऐकतानापण ती चीज सगळी समजत नाही तोवर अस्वस्थ वाटत रहातं. पण शब्दांकडे लक्षच जाऊ नये किंवा त्यांना दुय्यम स्थान मिळावं अशी काही जादू आपल्या आवाजाने करुन, त्याच्या सूरांनीच तो मला ओढुन, बांधुन ठेवायला लागला तेव्हा मात्र त्याच्यापुढे हात टेकले मी.
किशोरच्या गाण्यातल्या या गद्यात घेतलेल्या छटा, म्हणजे एखादं उपहासात्मक हास्य, एखादा उसासा या गोष्टी जितक्या खल्लास करतात तितक्या कोणाच्याच नाही असा माझा तरी अनुभव आहे. "कैसे कहे हम, प्यारने हमको" या गाण्यात तो जे ऊपहासाने हसलाय ना की प्रत्यक्ष त्या सिच्युअशनला असं हास्य कोणी दिलं तर संबंधित व्यक्तीने तिथेच शरमेनं मरुन जावं.
त्याच्याविषयीच्या सगळ्या कथा म्हणजे एकेक आश्चर्यच वाटायच्या ऐकताना. आणि नंतर नंतर त्याच्याविषयी काहीही ऐकल्याचं आश्चर्य वाटलं तर त्या आश्चर्य वाटण्याचं आश्चर्य वाटावं इतकं त्याचं विक्षिप्तपण अंगवळणी पडलं. निर्माते पैसे वेळेवर न देण्याच्या भीतीने म्हणे त्याला कायम ग्रासलेलं असायचं. त्यातून त्या वाटण्यापोटी त्याने केलेले सत्राशे साठ प्रकार तर त्याहून अजब. कुठे अर्धाच मेकअप कर, कुठे शुटींगमधून पळुनच जा, कुठे निर्मात्याच्या घराबाहेर रोज सकाळी जाऊन ओरड, घराबाहेर "beware of kishore" अशी पाटीच लाव.. एक ना दोन, हजार कथा. विक्षिप्त वाटायला लावणार्या.. पण त्याचबरोबर त्याचं स्वत:च्याच परसदारच्या वृक्षराजीशी गप्पा मारणं, त्यांना मित्र मानणं, मधुबालासाठी इस्लाम स्विकारणं, शेवटपर्यंत तिची सोबत करणं याही काही गोष्टी त्याचा विचार करुन करुन हैराण करायला लावणार्या. आणि "आ चलके तुझे मै लेके चलुं" मधल्या हळुवार भावना लिहिणारा हाच झुमरु आहे हे कळलं तेव्हापासून तर मनाला चटका लावुन गेलाय तो. तो नक्की कसा होता, काय होता याचा विचार करणं हा रिकाम्या वेळेचा छंदच बनून गेला मग..
किशोर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो त्याचा मिष्किल, खट्याळ चेहरा पण कदाचित त्याच्या इच्छेप्रमाणे तो रिटायर्ड होऊन खांडव्याला जाऊन राहिला असता तर या खट्याळ चेहर्यामागे लपलेला "आ चलके.." लिहिणार्या कवीने त्याच्याकडून नक्कीच काहीतरी लिहुन घेतलं असतं.. तो थोडा अजून उलगडायला मदत झाली असती कदाचित..
कॉलेजच्या काळात असताना लागलेलं किशोरच वेड मात्र पुरं झपाटून टाकणारं होतं. तेव्हा त्याच्या बर्याच पैलुंचा वेड्यासारखा शोध घेतला मग. मधुबालाच्या जिवंतपणाला आणि खळखळत्या उत्साहाला तितकीच समर्थ साथ देऊ शकणारा एक किशोरच वाटायचा मला. बाकी एखादा गुरुदत्त सोडला तर सगळेच तिच्यासमोर पानी कम वाटायचे. अगदी कधी कधी देवानंदसुद्धा... ती सुद्धा त्याच्यासोबत बालिशपणा करताना फुलून आल्यासारखी वाटायची कायम मलातरी. "चांद रात, तुम हो साथ" असो, "आंखोमे तुम दिल मे तुम" असो नाहीतर "हाल कैसा है" किंवा "पांच रुपय्या बारा आना".. माहित नाही नक्की काय ते, पण त्याचं अस्तित्वच मोहून टाकणारं होतं. आजही ही सगळी गाणी दोनशे अठराव्यांदा ऐकतानादेखिल मी नाचत असते एवढं मात्र खरं.. आणि त्याची दु:खी गाणी ऐकणं हा तर सोहळाच असतो. नको नको म्हणताना ओढत नेतोच तो आपल्याला त्या मनस्थितीत.. क्षणात तोडुन टाकतो सगळ्या जगापासून..
त्याला सगळ्यात समर्पक विशेषण द्यायचं झालं तर मला एवढच सुचतं की त्याचा आवाज उमदा होता. म्हणजे खरच त्याची गाणी ऐकताना कायम असं वाटायचं की एखादं देखणं, भारदस्त व्यक्तिमत्व गातय. त्यामुळे प्रत्यक्षात त्याची बरीच गाणी पाहिली तेव्हा प्रचंड मोठा भ्रमनिरास झालेला माझा.
त्याची आवर्जुन बोलावी, उल्लेख करावी अशी गाणी भरपूर आहेत आणि एखाद्या गाण्यातल्या एखाद्या ओळीत त्याने केलेल्या करामती सांगायच्या म्हटलं तर तेच लिहित बसावं लागेल मला. पण मला वाटतं त्याचा असा शोध घेत रहाणं हेच जास्त छान आहे. एखादं गाणं शंभरवेळा ऐकुन झालेलं असतानासुद्धा अचानक नंतर त्याने एखाद्या शब्दांत केलेली गंमत जाणवते तेव्हा आपल्याही नकळत आपण त्याला दाद देवुन जातो.
तसं आज त्याच्याविषयी बोलायचं काही खास कारण नाही पण त्याच्याविषयीचं हे सगळं वाटणं मांडायचं होतं कुठेतरी.. त्याचा सूर सच्चा होता, लकबी वेड्या.. काळजाला सुगंधी जखमा करुन गेलेला मोगरा होता तो.. किशोर.. त्याच्या नावाप्रमाणेच - आभास.. त्याच्या सूरांनी वार करुन छळणारा. आणि या जखमांसाठीच कायम त्याच्या मागे मागे जायला भाग पाडणारा..