मेरा कुछ सामान ...
काल कुठल्यातरी रानात
कोकिळेमागे फिरताना,
मला तू पाठवलेला ढग भेटला होता..
तुझा पाऊस घेवुन आलेला..
माझ्यासाठी..
चला..!
शेवटी तुझा पाऊस माझ्याचसाठी होता तर..
मला कित्ती आनंद झाला म्हणुन सांगु..
त्या आनंदात आम्ही खूप गप्पा मारल्या..
काय काय दाखवलं मी त्याला..
माझी फुलपाखरांची शेती,
नुकतच अंकुरु लागलेलं चांदणं..
मावळतीच्या किरणांना अडकवलेला झुला..
खास तुला द्यायला म्हणुन ठेवलेला, पिकुन भोपळ्यासारखा झालेला
पिवळाधम्मक चंद्र...
आणि मग तिथेच त्यातला थोडा पाऊस शिंपुन
आम्ही इंद्रधनुष्य पण बनवलं..
त्याच्यावरच गप्पा मारत बसलेलो आम्ही..
कितीच्या किती वेळ..
त्याला म्हटलं,
"ए, सांग ना.. काय काय बोलतो तो माझ्याबद्दल?"
तोही रंगात येवुन बरसु लागला,
मीही तल्लीन होवुन भिजू लागले..
तुझ्या आठवणी सांगु लागले..
आणि अशाच गप्पा रंगात आलेल्या असताना
अचानकच काहीतरी चमकल्यासारखा निघुन गेला तोंड फिरवुन..
ह्म्म...
तरी नशीब! आम्ही सगळा पाऊस संपवला नव्हता..
तुझा ढग म्हणे पत्ता चुकला होता..
2 Responses
  1. Anil Says:

    भलताच cute प्रकार आहे हा!.. सगळ्याच छोट्या छोट्या कल्पना अगदी मायेने गोंजारल्यासारख्या वाटताहेत.. जणु नाजुक हळव्या भावनांनी भारलेलं एक जगच उगवून आलंय इथे.. tender and beautiful.. खूप आवडलं! ..रानफुलांच्या देशातून आलेल्या वार्‍याची झुळुक अंगावरून जावी तस्सं वाटतंय बघ मला अगदी! :-)