मेरा कुछ सामान ...
सावित्री.. पु.शि.रेगेंची एक सुंदर कलाकृती.. ३-४ वर्षांपुर्वी मी पहिल्यांदा वाचलं हे पुस्तक आणि मग वाचतच राहिले अनेकदा. कधी उत्कट प्रीतीभावना मनात असताना, कधी विरहाचं दु:ख गोंजारताना तर कधी सन्यस्त, उन्मन अवस्थेत.. प्रत्येक वेळेस मला नवीच साऊ भेटली. नव्याने कळली. तरी प्रत्येक वेळी तितकीच भावली. कधी माझंच एक रूप माझ्यासमोर बसुन माझ्याशी बोलतंय असं वाटलं तर कधी आकाशाएवढी मोठी साऊ माझ्याचसाठी म्हणुन शब्दातुन बरसतेय असं वाटलं.
आज साऊची आठवण येण्याचं तसं काही कारण नाही. खरं पहाता ती सततच माझ्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी असते, तिची वेगळ्याने काय आठवण काढणार म्हणा.. पण आयुष्यात अगदी सहजच कधीतरी भेटलेली माणसं, कविता, पुस्तकं किंवा काही व्यक्तिरेखा इतक्या आपल्या बनुन जातात आणि आपण कधी फारसं बोलतही नाही त्यांविषयी. पण आज असं वाटतय की सांगावं साऊला.. कदाचित तिला सांगता सांगता ती मला आणि मी पण स्वतःला अधिक उमगुन जाईन.
एक म्हातारी आणि तिची एक छोटी नात- लच्छी गावाबाहेर दूर रानापाशी रहात होती. एकदा म्हातारीच्या झोपडीपाशी एक मोर आला. मोराला पाहुन लच्छी नाचु लागली. मोरही नाचु लागला.. लच्छीने हट्ट घेतला की मोराला अंगणातच बांधुन ठेवावं. म्हातारी म्हणाली, "ते कसं होणार? आपल्यापाशी त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठे आहे?" दोघींचा काही निर्णय होईना. तेव्हा मोरच म्हणाला, "मी इथेच जवळपास राहीन. मला दाणागोटा काही नको. रान तर सारं भोवतालीच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हा लच्छीनं आधी नाचलं पाहिजे. ती जेव्हा नाचायची थांबेल तेव्हापासुन मीहि येणार नाही. अट साधी होती. लच्छी लगेच कबुल झाली. म्हातारीचंहि काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं तर मनहि तसंच हवं. लच्छी तेव्हापासुन सतत आनंदीच राहु लागली. मोर कधी, केव्हा येईल याचा काही नेम नसे. पुढं पुढं मोर येवुन गेला की काय याचंही तिला भान रहात नसे.
पहिल्या पानावरच्या या पहिल्या कथेपासुन हे पुस्तक सरळ काळजाला भिडतं ते थेट शेवटच्या ओळीपर्यंत.. किती किती आणि कसं सांगायचं? साऊविषयी लिहायचं तर तेही तिच्यासारखंच सुरेख आणि सुरेल हवं ना. मनात फुटणार्‍या उत्कटतेच्या अनिवार लाटांना आवर घालत संयतपणे उभ्या असलेल्या तिच्या मनाच्या किनार्‍यासारखं.. पण त्याचवेळी त्या लाटांचा पुर्णपणे आदर करणारं.. त्यांच्या सामर्थ्याची जाणिव असणारं.. उत्कट पण संयत.. उत्तुंग पण अलवार.. कणखर पण लोभस असं काहीतरी..
हे पुस्तक तसं अगदीच छोटं. शंभर एक पानांचं. ग्रीटिंगच्या आकाराचं आणि त्यातल्या संदेशाइतकाच मजकुर प्रत्येक पानावर असलेलं. पण माझ्यासाठी एखाद्या अखंड कवितेसारखंच आहे ते.. एखाद्या मुक्तकासारखं.. साऊ ने लिहिलेल्या प्रेमपत्रांचा (नुसतं पत्रांचा म्हणु वाटल्यास) हा प्रवास.. दुसर्‍या महायुद्धातल्या काळातला.. त्या पार्श्वभुमीवर तिची आणि त्याची पत्रातुनच उलगडत जाणारी ही कथा. तीसुद्धा फक्त सावित्रीच्याच पत्रातुन मांडलेली.
तिचं माणुस म्हणुन हळु हळु प्रकट होत जाणारं रुप जितकं लोभस, तितकाच खिळवुन ठेवणारा तिचा प्रवास.. या काळात तिला आलेले अनुभव, भेटलेली माणसं हे सगळं तिच्या नजरेतुन पहाताना आपण आपल्याही नकळत अंतर्मुख होवुन जातो. पण तरिही तिच्याविषयी उत्सुकता रहातेच. हा प्रवास फार फार सुरेख मांडलाय पु.शि. रेगेंनी. तात्विक गोष्टी पण अशा काही खुबीने पेरल्यात की जणु एखाद्या भावगीतात लागलेला लखलखता शुद्ध पंचम.
साऊचं आपल्याला भेटणारं हे रूप म्हणजे एखाद्या सुंदर चित्राच्या एखाद्या भागासारखं आहे.. जे दिसलेलं असतं ते सुंदर असतच पण जे दिसु शकत नाही ते किती रंगीबेरंगी असेल हे कुतुहल दाटतंच मनात आणि तरिही हे अपुर्णत्व टोचत रहात नाही. एखादा सुखावणारा सल असावा तशी ही कळ!
त्या पुस्तकाची कथा सांगणं हा काही उद्देश नाहीये इथे. कारण हे पुस्तक अनुभवायचं पुस्तक आहे. कवितेविषयी प्रेम असणार्‍यांनी तर आवर्जुन वाचावं असं. तिच्या लिखाणातली आर्तता जशी जाणवते तसं आपणही उत्कट होत जातो. "पण तिला सोसत नाहीत शब्दांच्या बंदिषी" असं ती म्हणते तेव्हा तिच्याइतकेच हळवे होतो. बालपणातील कोमलता, हळवेपणा आपल्याच नकळत हळुच निसटुन जाऊन जेव्हा बोथट झालेल्या भावना 'स्थितप्रज्ञ'तेच्या नावाने आयुष्यात आल्याची जाणिव होते तेव्हा काळजात येणारी कळ ही ज्याची त्यानेच अनुभवुन बघायला हवी. एखाद्याच्या समर्पणाची जाणिव, त्याची तीव्रता आपल्या डोळ्यात जे अश्रु आणते त्याची चव आपणच चाखायला हवी. "मला माझं मन समजुन घ्यायचं आहे. माझं समजलं की मग तुमचं पण समजेल.." हे वाक्य वाचुन यातल्या आपल्याला भावलेल्या सगळ्या छटा आपणच निरखुन पहायला हव्या. पण तिच्या सुख-दु:खांशी एकरुप होत चाललेला आपला हा प्रवास आपल्याला खूप काही देवुन जातो हे मात्र नक्की.
शेवटी विश्लेषणात अडकुन तरी काय मिळणार आहे? साऊ म्हणते त्याप्रमाणे,"विश्लेषणाने काहीच साध्य होत नाही. आपण आपल्यालाच पारखे होतो." साऊ ही अशीच विश्लेषण न करता अनुभवणार्‍याला भेटु शकते.. म्हणुनच पुस्तकाचं 'साहित्यिक रसग्रहण' किंवा 'परिक्षण' वगैरे न करता आज मीही तुमच्यासमोर ठेवलिये मला भेटलेली, भावलेली साऊ.
2 Responses
  1. भानस Says:

    साऊला वाचलेय मी. अप्रतिम! आता हे भारावून केलेलं छानसं रसग्रहण वाचून पुन्हा एकदा साऊशी जवळिक साधायची अनावर उर्मी निर्माण झाली बघ. धन्यू गं.

    पुढच्या मायदेशाच्या भेटीत साऊ हाती लागले की तुझीही आठवण होईल. :)


  2. धन्यवाद भानसजी.. :-) खरय.. साऊला एकदा भेटल्यावर विसरणं शक्यच नाही... :-)