मेरा कुछ सामान ...
तू जाताना वाटलं नव्हतं
इतकी अवाढव्य बनेल तुझ्या नसण्याची पोकळी
माझं सगळं अस्तित्वच मुळापासून ओढून घेऊ पहाणारी..
माझ्या जगण्याच्या सगळ्या वाटा उद्ध्वस्त करणारी..
सगळी स्वप्नं संदर्भहीन झालियेत आता,
वाक्यातून काढून टाकलेल्या अक्षरासारखी..
उरलाय फक्त शक्यतेचा टीचभर परीघ..
आणि त्याबाहेर पसरलेलं अशक्यतेचं अफाट विश्व..
परीघाच्या आत आहे फक्त तुझ्या नसण्याचं सत्यं आणि
माझं केविलवाणं अस्तित्वं..
पोकळीच्या काठाशी कसंबसं तग धरुन उभं राहू पहाणारं..
आणि परीघाबाहेर नजर जाईल तिथवर विखुरलेत,
तुझ्या असण्याचे आभास..
तुझ्या चाहुली, तुझे शब्द
तुझं हास्य, तुझे स्पर्श..
दिवसभर निकराची लढाई चालू असते मनाची
त्या पो़कळीत पडण्यापासून स्वतःला वाचवण्याची..
ती पोकळी भरावी म्हणून
सतत त्यात टाकत राहते मी काही ना काही..
पण ती भरतचं नाही..
ब्लॅकहोलसारखी सगळं काही पचवून पुन्हा आ वासून समोरच..
तुझ्या नसण्याची साक्ष देत..
असं धडपडून धडपडून थकलं मन
की वाटतं आता तरी थकून झोप येईल आपल्याला..
या जीवघेण्या धडपडीतून काही तासाचं मरणं तात्पुरती सुटका करेल आपली..
पण ते ही होत नाही..
दिवसभर मनाला सावरण्यासाठी घातलेले पाश हळूच ढिले पडतात,
आणि निद्रा घेऊन जाते मनाला
अशक्यतेच्या अफाट प्रदेशात..
मग अगदी स्पष्ट कानावर येतो तुझा आवाज.. (दिवसभर ऐकायचा टाळलेला..)
अगदी स्पष्ट दिसतं तुझं रुप (दिवसभर पहायचं टाळलेलं..)
अगदी स्पष्ट जाणवतो तुझा स्पर्श.. (दिवसभर दूर ठेवलेला..)
आणि तुझ्या नेहमीच्या दिलखुलास हसण्याला घाबरतं मग मन..
नक्की मनात काय आहे तुझ्या..?
गेलायेस ना तू? की नाही?
तू आहेस की नाही?
भोवळ आणणार्या या गोंधळाने मनाचा बांध फुटतो..
आणि वाहणारे डोळे स्वप्नातून सत्यात घेऊन येतात..
मग पुन्हा एका जीवघेण्या धडपडीची सुरुवात..
तुझ्या नसण्याच्या पो़कळीत पडण्यापासून,
माझ्या थकलेल्या अस्तित्वाला वाचवण्याची..
कधी संपणार ही तगमग?
की आता अनंत काळापर्यंत असाच चालणार,
हा स्वप्नं-सत्याचा खेळ..?
वास्तव आणि आभासांचा लपंडाव?
थकून थकून गेलंय मन आता..
जागं रहाण्याचं त्राण नाही उरलं..
आणि निद्राधीन होण्याचीही भीती वाटतेय..
या स्वप्नबंबाळ मनाला...
मेरा कुछ सामान ...
Alejandro González Iñárritu ची ओळख २०१० मध्ये झाली तेव्हा त्याचे
triology of death चे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याला पण ३ वर्षे उलटून
गेलेली आणि 'Biutiful' अजून प्रदर्शनाच्या वाटेवर होता. म्हणजे त्याचे
प्रदर्शित झालेले तिन्ही आणि लगेचच प्रदर्शित झालेला 'Biutiful' बघितल्याला
५ वर्षे झाली. आणि खरं सांगायचं तर आता ते चित्रपट नीटसे आठवतही नाहीत.
नक्की काय संवाद होते, नक्की काय मांडणी होती, पार्श्वसंगीत कितपट
प्रभावशाली होतं, कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग होता, खरंच नीटसं आठवत
नाही. काही गोष्टी अंधुक आठवतात.. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे
हावभाव, स्थळं, एकूणच कथा, चित्रपटाची संकल्पना.. पण काही गोष्टी खूप
व्यवस्थित आठवतात.. Maya angelou चं एक वाक्य आहे..
"People will forget what you said..
People will forget what you did..
But people will never forget how you made them feel.."
And
I remember that movies of Iñárritu made my heart feel so ached.. They
had tremendous hold on my mind and heart. I remember that thing very
clearly.. कोणतीही अस्सल कलाकृती माणसांइतकीच जिवंत असते.. चालत्याबोलत्या
माणसांप्रमाणेच आपल्या आयुष्यावर परिणाम करते.. आणि कदाचित आपण विसरुन
जाऊ, चित्रातली नेमकी रेषा, कॅनव्हासचा नेमका रंग, गाण्यातली नेमकी जागा,
कवितेतला नेमका शब्द किंवा चित्रपटाची नेमकी मांडणी, पण त्या कलाकृतीने
आपल्याला जी अनुभूती दिली, ती विसरणं शक्य नाही.. आणि म्हणूनच Iñárritu चे
चित्रपट ऑल टाईम फेव्हरीट सदरात टाकता येतात.
त्याचा २००० साली आलेला
पहिला चित्रपट 'amores perros', (Love's A bitch) माणसाच्या क्रौर्याची,
एकनिष्ठेची आणि विश्वासघाताची गोष्ट.. चित्रपटाचं इंटरेस्टींग नाव हे
चित्रपट बघण्याचं तात्कालिक कारण ठरलं असलं तरी Iñárritu च्या मांडणीने
मनावर घेतलेली पकड त्याचे इतर चित्रपट शोधण्यास आणि बघण्यास कारणीभूत ठरली.
एकमेकांत गुंतलेली कथानकं, वेगवेगळी माणसं, त्यांच्या वेगळ्या कथा, आणि
कोणत्यातरी घटनेने, प्रसंगाने जोडली गेलेली त्यांची आयुष्य, जी कदाचित एरवी
कधीच जोडली जाणं शक्य नाही. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांत घडलेले
पुढे-मागे मांडणी असलेले प्रसंग.. आणि अतिशय प्रभावी मध्यवर्ती कल्पना.
दिग्दर्शकाला काय पोहचवायचं आहे हे जेव्हा त्याला स्वतःला ५००% स्पष्टपणे
माहित असतं तेव्हाच अशी मांडणी करण्याचं तो धाडस करु शकतो. नंतर आलेले
triology of death मधले२००३ सालचा '21 gram' आणि २००६ मधला, 'Babel', हे
चित्रपटही मांडणीच्या दृष्टीने 'amores perros' सारखे. अर्थात triology
असल्यांमुळे मध्यवर्ती कल्पनेसोबतच मांडणीतील सारखेपणाही गरजेचा ठरला
असावा. पण हे तिन्ही चित्रपट खिळवून ठेवणारे.. हृदयात काहीतरी दाटून आलंय
असं वाटायला लावणारे ठरले हे निश्चित. 'amores perros' मधली डॉग फाइट, '21
gram' मधला गोळीबाराचा प्रसंग, 'Babel' मध्ये वाळवंटात अडकलेल्या नॅनीची
घालमेल.. असे काही प्रसंग आहेत जे अजून मनात घर करुन आहेत.
(मांडणीच्या
दृष्टीने क्लिष्टता असणारे, किंवा सुरीअलिझम वाले चित्रपट खर्या अर्थाने
दिग्दर्शकाचे चित्रपट ठरतात असं मला वाटतं. अशा चित्रपटांमध्ये शक्यतो
कोणाची भूमिका वठली नाही असं होत नाही. म्हणजे अशा चित्रपटांचा
कलाकारांविषयी दृष्टीकोन असा वाटतो की, तुम्ही वाईट अॅक्टींग करुच शकत
नाही. तुम्ही भूमिका ही चांगलीच केली पाहिजे. दिग्दर्शक इतर कोणते
एक्स्क्युजेस मान्यच नाही करणार..आणि Iñárrituचे सगळे चित्रपट "चित्रपट हे
दिग्दर्शकाचं माध्यम आहे" हे दाखवून देणारे आहेत.)
जरी त्याची triology
of death २००६ सालच्या 'Babel' पर्यंतच असली तरी पुढच्या दोन्ही
चित्रपटांमध्ये नायकाचा मृत्यू आणि दु:खाचे विभ्रम (की विभ्रमांचे दु:ख?)
या दोन्ही कल्पना आहेतच. आणि त्याचा यंदा ऑस्कर च्या यादीत सर्वात आघाडीवर
असलेला, "Birdman or (The Unexpected Virtue of Ignorance)" हा चित्रपट..
ज्या चित्रपटामुळे त्याच्याविषयी लिहिलंच पाहिजे यावर शिक्कामोर्तब झालं.
Birdman ही कथा आहे एका सुपरहिरोची.. एकेकाळी सुपरहीरो असलेला नायक,
कालांतराने कामाला पारखा होतो आणि एका नाटकाद्वारे स्वतःला
अभिनेता-दिग्दर्शक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण तुलनेने साधी
वाटणारी ही कथा प्रेक्षकांना पूर्णवेळ खिळवून ठेवते. मोजक्याच मोठ्याच्या
मोठ्या शॉटस् मध्ये केलेलं चित्रिकरण, पार्श्वसंगीतात मुख्यत्वे ड्रमचा
केलेला वापर, नायकाचं त्याच्या भोवतालच्या लोकांच्या नजरेतून जाणवणारं
वास्तव आणि त्याच्या स्वतःच्या मनात असलेली त्याची 'लार्जर दॅन लाईफ'
प्रतिमा, त्याची मुलगी, सहकारी, वेगळी झालेली बायको, अधूनमधून भेटणारे
चाहते, बरे वाईट समिक्षक या सगळ्यांचीच गुंफण इतकी उत्तम झाली आहे की
चित्रपटाला इतकी नामांकनं मिळाली नसती तरच नवल. आणि चित्रपटाचा
सुरीअलिस्टीक शेवट हा माझा वैयक्तिक आवडता भाग. त्याविषयीची वेगवेगळी मतं
नेटवर सर्वत्र वाचता येतीलच.
जरी तो त्याच्या पहिल्या चित्रपटापासून
(म्हणजे पहिल्या फुल्ल लेंग्थ चित्रपटापासून) 'बेस्ट फॉरेन लॅग्युअज फिल्म'
च्या कॅटेगरीत नामांकन मिळवत असला तरी, यंदा त्यांचं नामांकन अमेरीकेतूनच
असल्यामुळे त्याला ऑस्कर मिळण्याची शक्यता वाढली आहे हे नक्की. (या आधीचे
चित्रपट अमेरीकेत बनले असते तर एव्हाना नक्कीच त्याच्या नावावर ऑस्कर जमा
झाला असता.) त्याच्या स्पर्धेत असणारा "The Grand Budapest Hotel" हा
चित्रपटही काही कमी नाहिये. एखादी गोष्ट चांगली कशी सांगावी याचं उत्तम
उदाहरण आहे. पण Iñárritu सोबत इतक्या वर्षांचं असलेलं प्रेक्षकाचं नातं,
त्याच्या सर्वंच चित्रपटांमध्ये त्याने केलेली उत्तम कामगिरी, आणि एकूणच
कॉमेडी पेक्षा माणसाच्या मनातल्या खेळांकडे असलेली ओढ यामुळे माझं पारडं
तरी Iñárritu कडेच झुकतय..
त्याला यंदाचा ऑस्कर मिळाला तर तो नक्कीच The Expected Virtue Of Excellence समजता येईल.. :-)
(With
Iñárritu in leading race, the oscar ceremony this year is a must watch
and with Neil Patrick Harris hosting the show, I wouldnt miss it for the
world.. Countdown has already started.. fingers crossed.. Go
Iñárritu...! Best Wishes...)
मेरा कुछ सामान ...
(Dedicated to the God of small things)
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात..
जातीपातीच्या.. परिस्थितीच्या.. पैशाच्या.. रंगाच्या..
अनेक भिंती आहेत इथे..
आणि काही लक्ष्मणरेषा..
कधीच ओलांडू नयेत अशा..
ओलांडल्या तर जगबुडी होईल अशा..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
प्रेम म्हणजे नक्की काय हे बहुतेकांना माहित नसलं तरीही..
स्वतःच्या स्वतःला लागलेल्या शोधाला कोणी प्रेम मानलं तरीही..
आणि कोणाला सगळ्या व्याख्यांपलीकडे जाऊन प्रेम करता आलं तरीही..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
स्पर्श न करता भेट द्यावी,
की निरागस उत्कटतेने मिठी मारावी...
कोणती माणसं उंबर्याबाहेर ठेवावी,
आणि स्वार्थासाठी कोणाची साथ द्यावी हे ठरलेलं आहे..
कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पण कोणाच्या आत्म्याला कोणाचा स्पर्श व्हावा याचे काही नियम नाहीत..
कोणाची आयुष्य किती गुंतावी एकमेकांच्यात याचे काही शास्त्र नाही..
किती भावविश्वं विरघळावी एकत्र यावर काही बंधनं नाहीत..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
ठरलेले आहेत जगाचे नियम..
प्रत्येकासाठी वेगवेगळे..
आणि तरी प्रत्येकालाच अपरिहार्यपणे सलणारे..
सुखासाठी हावरेपणा केला की दु:ख मिळतं..
पण सुखाच्या प्रतिक्षेत अबोल आयुष्य काढलं तरी कोणाला समजतं..?
जिथे वास्तवाच्या वाट्याला क्वचितच येणारी सुखं,
फक्त स्वप्नांतच भेटतात..
आणि स्वप्नांतली सुखं खर्या आयुष्यात मोजायची का हे कोणालाच माहीत नसतं..
काही चुका त्यांच्या शिक्षा घेऊनच येतात..
पण चुकीच्या प्रमाणातच शिक्षा व्हावी याचं उत्तरयायित्व कोणाचंच नसतं..
मग कधी मोजावं लागतं आयुष्य..
कधी अनेक आयुष्यं..
कधी अनेक पिढ्या..
तरी ठरलेले आहेत जगाचे नियम..
जगाच्या भल्यासाठी केलेले नियम..
अमानुष निर्दयतेने पाळले जाणारे नियम..
कोणी कोणावर कसं आणि किती प्रेम करावं याचे नियम..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
मेरा कुछ सामान ...
तू म्हणालास तू काही विसरत नाहीस..
काही विसरु शकत नाहीस..
माझ्या चुका.. माझा मूर्खपणा.. माझे खुळे हट्ट.. माझ्या अपेक्षा..
तू विसरु शकत नाहीस आपल्यातले बेसिक फरक..
आणि विसरु शकत नाहीस,
माझा त्रागा.. आपली भांडणं.. माझं रडणं...
पण तुला माहितेय का? तू समजतोस तसं नाहीये..
ठरवलंस तर तू विसरु शकतोस..
विसरलायेस तू...
तुझ्या येण्याने उगवणारी माझी सकाळ..
तुझ्या निद्राधीन चेहर्यावर रेंगाळणारी दुपार..
तुझ्या माझ्या गप्पांमध्ये रंगलेला सूर्यास्त..
आणि तुझ्या डोळ्यांत उतरलेली पौर्णिमेची रात्र..
विसरलायेस तू...
आपल्यासोबत प्रवासाला येणारा श्रावण
तुला माझ्यासाठी हळुवार करणारा शिशिर..
गुलमोहराच्या झाडांतून तुझ्या सावळ्या चेहर्यावर वितळलेला अष्टमीचा चंद्र..
आणि आपल्या गप्पां ऐकण्याच्या नादात लाट चुकलेला भरतीचा समुद्र..
विसरलायेस तू...
माझी अठ्ठावीस युगांची प्रतिक्षा..
अनिश्चिततेवर झुलत राहिलेल्या माझ्या अपेक्षा..
तू एकदा दिसावास म्हणून केलेला आटापिटा..
तुझ्यासोबतच्या एका क्षणासाठी तासंतास तुडवलेल्या वाटा...
विसरलायेस तू
माझ्यावर प्रेम करणारा तू
तुझ्यावर प्रेम करणारी मी
आणि आपल्या नात्यावर प्रेम करणारे आपण..
तुझ्या क्षमतांविषयी कधीच शंका नव्हती मला..
माझं ऐक..
तूही नको शंका घेऊ स्वतःवर..
"विसरु शकत नाही" कशाला म्हणतोस
चुका, मूर्खपणा, अपेक्षा, फरक..
भलेही विसरु शकत नाहीस..
पण विसरतोच आहेस की मला आता..
मेरा कुछ सामान ...
किती किती हिरीरीने समर्थन केलं मी माझ्या लहान सहान दु:खांचं..
त्यांची बाजू मांडली.. त्यांच्यासाठी भांडले..
स्वीकार केला तरी आवाज उठवणं सोडलं नाही..
खुलेपणाने मान्य केलं त्यांचं अस्तित्व
आणि कुरवाळत राहिले त्यांना..
एकटेपणी..
सर्वांसमक्षही..
.
पण आता श्वासाश्वासात अलगद वाहत रहावं,
आयुष्यभर तळहातावर जपावं असं दु:ख समोर आलं असताना,
रात्रीच्या नीरव एकांतात
हुंदकाही न फुटू देता गाळलेल्या मूक अश्रुंशिवाय,
त्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे काहीच नाही..
काहीच नाही..
मेरा कुछ सामान ...
मला खात्री होती,
शरीरावरुन नाहीसे होतात स्पर्शांचे ठसे..
त्वचा कात टाकेल तसतसे...
सगळ्या नियमांना अपवाद करुन
मन जसं धरुन बसलय
तुझ्या प्रतिमा..
भरु देत नाहीये जुन्या जखमा..
तसं शरीर नाही करणार..
सृष्टीच्या नियमाप्रमाणे
ते टाकत राहिल कात..
आणि मग माझ्या नव्या त्वचेला नवा वाटेल
तुझ्या कातडीचा पोत..
तुझ्या स्पर्शातली आसोशी..
मला खात्री होती..
या काळात कितीदा कात टाकली असेल,
तुझ्या माझ्या शरीराने..
मोठ्या उत्सुकतेने हात पुढे केला मी,
तुझा अनोळखी स्पर्श अनुभवायला..
तेव्हा जाणवलं..
यावेळी शरीरानेही अपवाद केलाय नियमाला..
इतक्या काळानंतरही,
तुझे ठसे जिवंतच..
तुझा स्पर्श ओळखीचाच..
आता मलाच समजेनासं झालंय..
हा मोहोर,
तुझ्या ओळखीच्या स्पर्शाचा,
की माझं शरीर माझ्या मनाशी एकरुप झाल्याचा?
मेरा कुछ सामान ...
बघ ना कशी भेगाळून गेलीये माती सगळी पाण्याअभावी..
खोल खोल चरे गेलेत..
अगदी आत.. आतपर्यंत..
ओलावा नाही उरला.. नावालाही..
जमीनीपासून आभाळापर्यंत भरुन राहिलाय,
रखरखाट नुसता..
जसा दोष आभाळाचाच...
बरसलाच नसावा जणू तो पुरेसा कधी..
जसा दोष जमीनीचाच..
तिनेच कधी प्रयत्न केला नाही ओलावा धरुन ठेवण्याचा..
खरंतर दोष कोणाचाच नाही..
ना जमिनीचा.. ना आभाळाचा..
वैशाखच लांबला यंदा...
हो ना?
मग बरसून जावं ना आभाळाने आता,
दाटून आल्यासरशी...
उगा ते वादळाचं घोंघावणं नको..
आणि वीजेचं कडाडणं पण नको..
(शेवटी कारणांचे कडकडाट आणि
शब्दांची वादळं कधी सोडवतात कुठले प्रश्न?)
हिरवळ फुलायची ती मनसोक्त बरललेल्या सरींनीच..
भेगाळणं नाहीसं व्हायचं ते समजूतदारपणे कोसळलेल्या थेंबानीच..
मग हा वादळ-वीजांचा टप्पा आता गळूनच जाऊ दे..
या वैशाखाची सांगता थोडी वेगळी होऊ दे..
मेरा कुछ सामान ...
"कोमाचं काही खरं नसतं.. जिवंत मरण.. दिवसामागून दिवस.. वर्षामागून वर्षं
ढकलत रहायची फक्त.. सगळं परत पहिल्यासारखं होईल याची खात्री कोणी देऊ शकत
नाही." सगळ्यांचं हेच मत पडलं.
'पण चमत्कार होतातच की.. आपल्या बघण्यात
नसले म्हणून काय झालं.. वाचण्या-ऐकण्यात असतंच.. अगदी लाखात एक असेल, पण
घडतचं की असंही.' तिच्या मनाच्या कोपर्यात अजूनही कुठेतरी आशा जागी होती..
का कोण जाणे पण तिला त्या आशेवर विश्वास ठेवायचा होता.
पण "बघ, तुला करायचा असेल तर पहा प्रयत्न करुन, मला तर काही खात्री वाटत नाही" तोही असं म्हणाला तेव्हा मात्र तिचा धीर खचला.
असं
कसं म्हणू शकतो तो? आणि का म्हणावं? जे काही झालं ती आपली जबाबदारी नाही
का? आपली दोघांची.. कसे होतात अपघात? कशा होतात जखमा? आणि कोणता घाव
निर्णायक असतो? कोण ठरवणार हे..? प्रश्न बरोबर- चूक चा नसतोच ना, दोन्ही
बाजू हरतात अशा प्रसंगात..
पण आशेला तोड नसते.. कशीही.. कोणत्याही प्रसंगात चिवटपणे तग धरुन राहते.
"काहीही होवो, कोणी साथ देवो-न दोवो.. अगदी त्यानेही नाही दिली तरी मी प्रयत्न करत रहाणारच.." तिने मनाशी निर्धार केला.
"कोमा
कोमा काय आहे, त्यात काहीतरी जिवंत असतंच की. जगाला कळत नसलं तरी मनाचं
मनाला कळतंच की. ती भाषा का कुणाला सांगून कळते? पण त्याइतकी पक्की खूण
कुठली असेल का? आणि तिचं मन तिला सांगत होतं. त्या मनाला कळतंय हे..
पोचतायेत तुझ्या भावना.. आणि त्या नक्की पूर्ण होणार. नक्की जिवंत होणार...
पुन्हा हसू खेळू खळखळू लागणार ते पहिल्यासारखंच.. वेळ जावा लागेल, धीर
धरावा लागेल, प्रयत्न करावे लागतील.. पण होईल.. आत्ता नसेना का त्याच्या
मनात विश्वास उरला..आज ना उद्या तो ही साथ देईलच की माझी तळमळ बघून.." डोळे
पुसत ती स्वतःशीच म्हणाली.." आणि एकदा का त्याची सोबत मिळाली की कोमा काय,
मरणाच्या दारातूनही वाचवून परत आणता येईल हे नातं.. कोमात गेलेल्या असंख्य
नात्यांची ओझी वाहणार्या जगात माझ्या वाट्याला हा चमत्कार नक्की येईल.."
मेरा कुछ सामान ...
"तुला काय वाटतं....?" त्याच्या पालथ्या पाठीवर बोटाने त्याचंच नाव कोरत तिने विचारलं..
"अं..?" कितीही शांत पडून राहिलो तरी आपल्याला जाग आल्याचं तिला नेमकं कसं कळतं या संभ्रमात तो हुंकारला..
"तुला काय वाटतं....? दु:खाविषयी?"
"मला वाटतं तू ड्रामेबाज आहेस.."
"Say something you havent said before.. पण तुला जो ड्रामा वाटतो त्या गोष्टी, त्या भावना, तितक्या उत्कटतेने जगत असते मी, भोगत असते.. It's like schizophrenia. You might think its imaginary but its my reality."
आता मात्र कूस बदलून तिच्याकडे वळला तो. क्षणभर तिच्या डोळ्यात बघितलं, कावर्याबावर्या झालेल्या तिच्या नजरेला बांधून घेतलं स्वतःशी आणि म्हणाला,"बोल.."
"माणसाच्या चिरंतन दु:खाचं प्रतिक म्हणून अश्वत्थामा पटतो का तुला?"
"नाही.."
"का?"
"कारण माणसाचं दु:खच चिरंतन नसतं.. त्याच्यासारखंच तात्कालिक.. अख्खा मानववंश वगैरे सोडून दे. पण वैयक्तिकरित्या प्रत्येकाच्या दु:खाला मर्यादा आहेत. प्रत्येकाच्या जखमेवर धरतेच खपली कधी ना कधी. जखमा कुठे भळभळत राहतात आयुष्यभर? किती जणांच्या राहतात? किती जणं आहेत एक जखम अस्तित्व संपेपर्यंत सोबत वागवणारे?"
"सगळे नाही, पण कोणीतरी असेलच की. आणि मग अहोरात्र त्या जखमेचं जाणवणारं अस्तिव घेऊन फिरत रहायचं अश्वत्थाम्यासारखं. विसावा शोधत.."
"Actually he should move on.."
"म्हणजे..."
"अश्वत्थाम्याने बंद केलं पाहिजे विसावा शोधणं. like John nash.. त्याला ती माणसं दिसत राहिलीच ना. ऐकू येत राहिली, जाणवत राहिली.. but he continued with his work.. मग अश्वत्थामा का नाही? खरंतर आभारच मानायला हवे आयुष्याचे अशी जखम दिल्याबद्दल.. सगळ्या भावभावना, सुखदु:खं इतकी तात्कालिक असणार्या या क्षणभंगुर जगात आपल्या सोबत सरणापर्यंत येणारं एक दु:ख मिळालं म्हणून..."
"ह्म्म.... तू कधी दूर गेलास तर तू सांगितलेलं हे दु:ख मिळेल मला..." त्याच्या नसण्याच्या कल्पनेनेचे डोळ्यांत आलेलं पाणी लपवत ती म्हणाली..
आणि मग तो समजूतदारपणे थोपटत राहिला तिचं वेड्या कल्पनांत हरवणारं डोकं..
मेरा कुछ सामान ...
मी चाललेय आपल्याच तंद्रीत..आपल्याच विचारात गुंग होऊन.. जग वाहतय आपल्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे.. मी ही वाहतेय.. माझ्याही नकळत.. अचानक कोणीतरी मागून येऊन खांद्यावर हात ठेवतं.. स्पर्श ओळखीचा असतो.. खूप जुना.. माझ्याशी कधीकाळी एकरुप झालेला.. एक क्षण थबकल्याशिवाय मागे वळलं पाहिजे हे ही लक्षात येत नाही. आणि मागे वळून पाहताक्षणी झप्पकन चेहर्यावर रंग कोसळतात.. नाका डोळ्यात जातात.. संवेदना बधीर होईपर्यंत.. स्थळाकाळाचं भान नाहीसं होईपर्यंत.. ठसका लावुन गुदमरुन टाकतात तुझी आठवण येईपर्यंत..
तू ही तू.. तू ही तू.. सतरंगी रे...
तू ही तू.. तू ही तू मनरंगी रे....
गवसत नाहीयेस तू मला अजूनही..
तुझं भुलावणारं सौदर्य अजूनही माझ्या आवाक्याबाहेर..
माझ्यासोबत तुझं असणं प्रत्येक क्षणी,
आणि तरीही मधलं अफाट अंतर..
दिल का साया, हमसाया सतरंगी रे, मनरंगी रे
कोई नूर हैं तू , क्यों दूर हैं तू
जब पास हैं तू , एहसास हैं तू
कोई ख्वाब हैं या परछाई है, सतरंगी रे
इस बार बता, मुजोर हवा, ठहरेगी कहाँ...?
As they say there is only one way to love.. Crazily..
इश्क पर ज़ोर नहीं है, ये वो आतिश ग़ालिब
जो लगाये ना लगे, जो बुझाये ना बने..
तुझी ती नजर.. सगळे तट भेदून जाणारी..
अहं उद्धस्त करुन, नवा जन्म देणारी..
आता तुझ्यामुळे मिळालेलं हे तुझं आयुष्य..
माझं काय आहे यात?
तुझा गंध.. तुझा स्पर्श..
तुझं प्रेम.. तुझीच वेदना...
आखों ने कुछ ऐसे छुआ,
हलका हलका उन्स हुआ..
दिल को महसूस हुआ
तू ही तू... तू ही तू... जीने की सारी खुशबू
तू ही तू... तू ही तू... आरजू आरजू
तेरी जिस्म की आँच को छूते ही,
मेरे साँस सुलगने लगते है..
मुझे इश्क दिलासे देता है..
मेरे दर्द बिलगने लगते है..
तुझा गंध.. तुझा स्पर्श..
तुझं प्रेम.. तुझीच वेदना...
कानात रेंगाळणारे तुझे निरोप..
डोळ्यात उरलेली तुझी रुपं..
तुझ्या भासांत सरणारं माझं वास्तव..
की माझ्या वास्तवाला छळणारे माझेच भास?
तू ही तू.. तू ही तू...जीने की सारी खुशबू
तू ही तू... तू ही तू... आरजू आरजू
छूती मुझे सरगोशी से..
आँखो में घूली खामोशी से..
मैं फर्श पे सजदे करता हूँ ..
कुछ होश में कुछ बेहोशी से....
तुझ्याकडे जाणार्या वाटांवर हरवलेय मी आता..
इथे तू ही नाहीस आणि मी ही..
भोवंडून टाकणारा अंतराचा पसारा..
जगण्या- मरण्याचे असंख्य परीघ पचवून बसलेला...
मुक्कामी पोचण्याची सुतराम शक्यता नाही,
पण चालत राहिलं पाहिजे..
कारण वेडेपणा हाच इथे एकमेव न्याय..
अंतर तोडत रहाणं हा एकमेव पर्याय..
तेरी राहों में उलझा उलझा हूँ,
तेरी बाहों में उलझा उलझा..
सुलझाने दे होश मुझे,
तेरी चाहों में उलझा हूँ...
मेरा जीना जुनून, मेरा मरना जुनून...
अब इस के सीवा नहीं कोई सुकून...
इतर काही नाही तरी एक मुक्काम नक्की आहे..
एक शेवटची आशा..
शेवटचा धागा..
ती 'एक इजाजत'..
न मागता मिळू शकणारी..
मुझे मौत की गोद में सोने दे..
तेरी रूह में जिस्म डबो ने दे..
तेरी रूह में जिस्म डबो ने दे..
सतरंगी रे, मनरंगी रे....
---------------------------------------------------------------------------------------------------------------
रहमान-गुलजार जोडींचं सगळ्यात सुंदर गाणं कोणतं यावर मतभेद असतीलही पण सतरंगी रे त्यातल्या कोणत्याही टॉप लिस्ट मध्ये असेल हे नक्की.. शब्द.. सूर.. संगीत... कोणती गोष्ट आहे जी वेड लावत नाही? It literally haunts.. सुरुवातीचा आलाप ओळखीच्या स्पर्शासारखा.. आणि मग सुरु होणारं संगीत थेट ढकलून देतं मनाच्या खोळ तळाशी.. वेदनेचा सोहळा आहे ही रचना.. आर्त.. उत्कट.. वादळी... पुन्हा पुन्हा आणि परत पुन्हा वेडी होत आलेय मी या गाण्याने.. काय लिहिलय माहित नाही.. काय जाणवतय तेच अनुभवतेय फक्त...
मेरा कुछ सामान ...
इतरांच्या मनाचा विचारच न करणारी
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..