मेरा कुछ सामान ...
तलम, आकर्षक पण टिकाऊ शब्दांचं
मजबूत जाळं विणून
आयुष्याच्या समुद्रात भिरकावलं
माझ्यातल्या विचारवंत कोळ्यानं,
दुःख पकडण्यासाठी...
पण अडकावं कसं माझं शब्दातीत दुःख
शब्दांच्या जाळ्यात?
शब्दांच्या चिमटीतून सतत निसटत
विश्वरुप साकारत गेलंय हे दुःख..
समजलंच नाही माझ्यातल्या विचारवंत कोळ्याला..
हा समुद्रच दुःखाचा आहे..
मेरा कुछ सामान ...
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,
दरवेळी आगीतून वाचत राहणं बरं नाही बयो..
सारखी सारखी आपल्या स्वप्नांची अशी राख होत असताना आपणच फक्त मागं उरणं जीवघेणं असतं..
त्यापेक्षा जळून जावं आपल्या स्वप्नांबरोबर आपण..
स्वप्नांची वाट पहाणार्या पापण्या अश्रूंनी जेवढ्या जळतात तेवढ्या आगीने नाही...
मला विचार..
कालच रात्री त्याची सगळी स्वप्नं गोळा करुन
पेटवून आलेय मी मनाच्या स्मशानात...
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा...
मेरा कुछ सामान ...
पाऊस पाऊस
चिंब ओला
तुझ्या नजरेत
माझा झुला

पाऊस पाऊस
लपले पान
तुझ्या नजरेत
हिरवे रान

पाऊस पाऊस
गच्च भिज
तुझ्या नजरेत
वेडी वीज

पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ
!!!!!!!
मेरा कुछ सामान ...
तुझ्या घरात पाऊल टाकतानाच माहिती होतं,
हा काही आपला कायमचा मुक्काम नव्हे..
पण माझ्या विदग्ध आत्म्याला विसावा देऊ शकणारी,
हीच ती जागा...
आणि मग एकेक दिवस करत मुक्काम वाढतच गेला,
तुझं घर आपलंच समजू लागले मी..
कधी निघून जावं म्हटलं तर तू ही थांबवलस मला..
आणि मलाही नाही ओलांडता आला तुझा लोभसवाणा आपलेपणा..
मग सजवत गेले तुझं घर, आपलंच समजून..
कानेकोपरे धुंडाळले.. भूतकाळ चाचपला..
नवे रंग आणले, नवे गंध आणले, नवे सूर आणले..
बोलक्या झाल्या भिंती, हळुवार झाली हवा..
इतकंच काय पण,
तुझ्या अंगणभर मोगरासुद्धा बहरला,
आपल्या निरंतर गप्पांसोबत...
पण आता तुझ्या आपलेपणावर हक्क सांगू येतायेत माझी दुःखं..
तुझ्या घराच्या अवकाशात जमू लागलंय माझ्या अपेक्षांचं मळभ..
वेदनांनाही हवी झालीये तुझ्या घरात त्यांची जागा..
संकेत मिळालाय.. आता निघायला हवं..
माझ्यातल्या अनावर वादळाने आपलं अंगण उद्ध्वस्त होण्यापूर्वी..
तुझ्या चंद्रमौळी घरात माझ्या वेदनेचे सूर घुमण्यापूर्वी..
तुझ्या ओल्या आवाजात नको घालू शपथ आपल्या मोगर्याची..
आता माझी निघायची वेळ झाली...
मेरा कुछ सामान ...
अ‍ॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अ‍ॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अ‍ॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. त्यामानाने अमेरीकन अ‍ॅनिमेशन अजून तरी 'फक्त प्रौढांसाठी' या विभागात तशी मोजकीच आहेत.
अर्थातच यात डिस्नेचा सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तो मान्य करुनही पिक्सरने बनवलेली अ‍ॅनिमेशन जास्त गोड, गोंडस, लोभसवाणी वाटतात हे मान्य करायलाच हवं. २००६ मध्ये डिस्नेने पिक्सर विकत घेतली खरी तरीही पिक्सर च्या नावाखाली बनणार्‍या चित्रपटांचं वलय काही कमी झालं नाही. या बॅनरखाली बनणारे चित्रपट आणि त्यातील पात्रं मनात घर करुन जातात हे नक्की. मग तो 'टॉय स्टोरी' मधला 'वूडी' असो की 'मॉन्स्टर्स' मधला 'सुली'. 'फायंडिंग निमो' मधला 'मार्लिन' असो की 'अप' मधला 'रसेल'.
फक्त एखाद्या ठराविक साच्यामधल्या नीतीकथा किंवा सुष्ट-दुष्ट संघर्ष दाखवण्यापलीकडे या चित्रपटांमध्ये बरंच काही दाखवलं गेलंय. माणसांचे राग, लोभ, प्रेम, माया, स्वार्थ, भीती, दुष्टपणा.. सगळंच... आणि फक्त इतक्यावरच न थांबता माणसाच्या अशा वर्तणूकीला त्याची परिस्थिती जबाबदार असते, असू शकते आणि प्रेमाचा, सहकार्याचा हात मिळाला तर माणूस कोणतीही, कितीही त्रासदायक परिस्थिती बदलू शकतो या सगळ्या गोष्टी कोणताही उपदेशाचा आव न आणता अतिशय मनोरंजक रीतीने आपल्यासमोर उलगडत जातात. आणि हे मनुष्यीकरण (humanization) ते कोणत्याही, अगदी कोणत्याही वस्तूला लागू करु शकतात. आणि ते ही इतक्या चपखल की आपण प्रेमातच पडावं त्यांच्या. 'कार्स' मधल्या गाड्या, 'वॉल-इ' मधले रोबोटस्, 'टॉय स्टोरी' मधली खेळणी, 'रॅटाटूई' मधला उंदिर या सगळ्या मनुष्येतर गोष्टींचं इतकं छान चित्रण केलंय की ही पात्रं माणसांइतकीच आपल्या जवळची होऊन जातात. रडत, धडपडत, थोडं घाबरत चाचरत आपल्या आतल्या भीतीवर मात करत नवा रस्ता शोधणारे हे सगळे जण मग आपलंच रुप वाटायला लागतात.
चित्रपटाचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं यश यातच सामावलेलं असतं की किती लोकं तिच्याशी नाळ जोडू शकतात, रिलेट करु शकतात. त्यामुळेच प्रत्येक काळाच्या मानसिकतेनुसार त्या त्या काळाचे नायक-नायिकांचे साचे बदलत गेलेले आपल्याला पहायला मिळतात. पण हे निर्जिव किंवा मनुष्येतर प्राण्यांच्या संदर्भात करणं किती जोखमीचं काम असेल याची कल्पना ते काम करणार्‍यांनाच असावी. आणि असं जोखमीचं काम असूनही पिक्सर त्यात दर वेळी उत्तमरित्या यशस्वी होत आलेत हे नक्की..
जपानी अ‍ॅनिमे मात्र जरा गंभीर मामला आहे. त्यात हलकेफुलके चित्रपट नाहीतच असं नाही पण त्यातल्या गंभीर विषयांचं प्रमाण आणि प्रत बघता त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. पहिल्यांदा असा गंभीर चित्रपट पाहिला तेव्हा अ‍ॅनिमे ही काय भानगड असते हे मला माहिती नव्हतं. आणि चित्रपट होता, 'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या एका बहिण-भावाभोवती फिरते. हल्लीच माझ्या वाचनात आलं की ही अकियुकी नोसाका यांच्या खर्‍या आयुष्यातली घटना आहे. हा चित्रपट पाहिला तेव्हा रडू आवरेचना. अर्थात चित्रपट फार सुंदर आहे आणि माणसाचं माणसाशी वेदनेच्या पातळीवर असं जोडलं जाणंही तितकच खरं. पण चित्रपट झाल्यावर, रडून झाल्यावर विचार आला की काय म्हणून लहान मुलांनी असे चित्रपट पहावेत? आणि मग त्यावेळी मला भावाकडून कळालं की हा लहान मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. अ‍ॅनिमे वगैरे वेगळा प्रकार असतो. मग मात्र वेड्यासारखी या चित्रपटांच्या पाठी लागले मी. किती किती विषय आणि किती भावगर्भ चित्रपट. आणि काही तर इतके गुंतागुंतीची की त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी हॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर 'घोस्ट इन द शेल' वर बेतलेला 'मॅट्रिक्स' किंवा 'पॅपरिका' वरुन नोलान ला सुचलेला 'इनसेप्शन'. या चित्रपटांच्या विषय वैविध्यामुळे आणि गुंतागुंतीमुळे जसं थक्का व्हायला होतं तसंच त्यात जाणवणार्‍या तीव्र जपानी संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या दर्शनानेदेखिल.बर्‍याचदा विदेशी चित्रपट म्हटले की त्यात अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांचाच भरणा असतो. अर्थात त्यांचं श्रेय तेवढं आहेच या उद्योगाला पण ते सगळे चित्रपट थोड्या फार फरकाने एकाच मातीतले, एकच संस्कृतीचे वाटतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर इराणी किंवा जपानी चित्रपट नजरेला, मनाला आणि बुद्धीलाही सुखावणारे, वेगळं काहीतरी बघितल्याचं समाधान देणारे वाटतात. पाश्चिमात्यांच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती पण त्याच वेळी जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीची मर्मस्थानं ज्या कसोशीने जपली आहेत किंवा त्यात काळानुरुप बदल केले आहेत ते बघून कौतुक वाटायला लागतं. Spirited away, Howl’s moving castle, Secret world of arrietty, princess mononake.. स्वप्नकथेपासून अगदी ग्लोबलायझेशन, क्लायमेट चेंजपर्यंत कोणत्याही विषयावर आणि साध्या कौटुंबिक, आत्मचरीत्रात्मक ते sci-fi पर्यंत सगळ्या प्रकारात जपानी अ‍ॅनिमेशनने बाजी मारली आहे. पण हे असं ग्लोबल आणि प्रगत होत असतानाही चित्रपटभर तीव्रतेने जाणवणारा जपान फॅक्टर अनुभवायला भारी वाटतो. जणू काही दोन तास दुसर्‍या जगाची सफर करुन आलो आपण.
असाच काहीसा अनुभव 'पर्सेपॉलिस' आणि 'वॉल्ट्ज विथ बशीर' बघताना आला. 'पर्सेपॉलिस' हा चित्रपट त्याच नावाच्या आत्मचरीत्रात्मक चित्र-पुस्तकावर (कॉमिक बुक) बेतलेला आहे. ज्यात लेखिकेने इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या आधीच्या आणि नंतरच्या आयुष्याचं चित्रण केलं आहे. तसंच 'वॉल्ट्ज विथ बशीर' या इस्त्रायली चित्रपटामध्ये अंशतः स्मृती हरवलेला एक सैनिक लेबॅनॉन युद्धातल्या त्याच्या भूतकाळाचा शोध घेताना दाखवलाय. हाही चित्रपट खर्‍या घटनांवर बेतलेला आहे. पण हे असे चित्रपट विरळाच. मक्तेदारी म्हणावी अशी अमेरीकन आणि जपानी चित्रपटांचीच.
हे सगळं आठवण्याचं कारण? उगाच विचार करताना वाटलं बिम्मच थोडा मोठा होऊन रसेल बनतो आणि तोच पुढे जाऊन लंपन होतो. (जी.ए.कुलकर्णींच्या धीरगंभीर आणि गूढ व्यक्तिमत्वाशी विसंगत असे लहान मुलांसाठी 'बखर बिम्म ची' नावाचे एक भन्नाट पुस्तक त्यांनी लिहिलय. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं असंच पुस्तक आहे ते.) आणि मग विचार आला की आपल्याकडे को बिम्म आणि लंपनच्या रुपाने आनंदाचा खजिना आहे तो कधी असा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून जगासमोर येणार?
वास्तविक या सर्व चित्रपटांवर स्वतंत्र लेख होतील इतके भारी चित्रपट आहेत हे, पण त्यावर नंतर कधीतरी.. सवडीने. तूर्तास मात्र बिम्म आणि लंपनच्या संदर्भात पडलेले अनुत्तरीत प्रश्न घेऊनच थांबते.
मेरा कुछ सामान ...
जग चालतंच असतं
मागील पानावरुन पुढे...
चांदणीला फुलपाखरं पहिल्यांदा दिसतात तेव्हा...
पण चांदणीचं मात्र विश्व बदलून जातं..
हसत राहते लुकलुकत,
फुलपाखरं पाहता पाहता...
कोवळ्या फुलांत भिरभिरणारी फुलपाखरं..
निश्राप मनस्वीपणे लळा लावणारी फुलपाखरं...
नियती ठाऊक असतेच चांदणीला,
अगदी पहिल्यापासून...
अन् म्हणूनच फुलपाखरांचं तिला अप्रूपही जास्त..
फुलांनाही नसेल एवढं...
चांदणी निरखत राहते फुलपाखरांना कौतुकाने..
तो असह्य पण अटळ क्षण येईपर्यंत..
जग चालत राहतं..
काळाच्या ओघात फुलं प्रौढ बनतात... पोक्त नजरेसारखी..
आणि फुलपाखरं उडून जातात.. नजरेतल्या सुगंधासारखी...
फुलपाखरं उडून जातात तेव्हाही,
जग चालत राहतं..
मागील पानावरुन पुढे..
फुलंही गुंतून जातात त्यांच्या पोक्त व्यवहारात..
ती चांदणी मात्र विझून जाते गर्द काळोखात,
कायमची...
फुलपाखरं उडून जातात तेव्हा...
मेरा कुछ सामान ...
तसा तू परकाच होतास...
आपल्या माणसाच्या डोळ्यांत भलत्याच कोणासाठी आलेल्या अश्रूंइतका...
मनाच्या खळबळीचा मागमूसच नसलेल्या चेहऱ्याइतका...
तू परकाच होतास..
अगदी अगदी परका...

मग कधी आपला झालास?
माझ्यातून उगवला असावास इतका आपला..
माझ्यात मावळू शकशील इतका आपला..
कधी आपला झालास?
अगदी अगदी आपला...

पण मला मात्र परकंच समजलास तू..
जेव्हा तुझ्या आतलं वादळ मला झेलू दिलं नाहीस तेव्हा..
जेव्हा तुझा हृदयस्थ उद्वेग माझ्या पापण्यांवर टिपण्याची स्पष्ट मनाई केलीस तेव्हा..
मला परकंच समजलास..
अगदी अगदी परकं...

मेरा कुछ सामान ...
तरीही कोणाचंतरी निर्व्याज हसू
मनात घर करेल..
कोणापासून दूर होताना
उगाच पोटात तुटेल...
तरीही कोणासाठी काळजात
दाटेलच माया...
तासन् तास आठवणींत
जातीलच वाया...
तरीही जीव धडपडेलच,
कोणाच्यातरी आनंदासाठी..
पुन्हा पुन्हा पुसली तरी
गजबजेलच पाटी..
तरीही होईलच डोळ्यांचं
एकांतात झुरणं..
अवघड जाईल कोणालातरी
नजरेआड करण..
तसं सोपंच झालेलं असतं जगणं..
कोणी कोणाचं नाही समजलं की..
एकटेपणाचं अंतिमत्व मान्य केलं की..
तरीही...

मेरा कुछ सामान ...
रागावलेल्या माणसाने
बुद्धाला दिलेल्या शिव्या,
बुद्धाने स्विकारल्या नाहीत..
आणि कोणतीही न स्विकारलेली भेट
राहते देणार्‍याजवळ...
तसा त्या माणसाचा रागही त्याच्याच जवळ राहिला..
बुद्ध निघून गेला,
नेहमीच्या अफाट स्थितप्रज्ञतेने..
पण त्या माणसाचं काय झालं?
तो कुठे गेला त्याचा राग घेऊन?
त्याच्या मनात केवळ बुद्धासाठी जन्मलेला राग घेऊन?
पुढे जाऊन तो राग त्याने आणखी कोणावर काढला का?
दिल्या का आणखी कोणाला शिव्या?
जे कोणी स्विकारेल त्याला?
पण केवळ बुद्धासाठीच जाणवलेला राग..
आणखी कोणाला देणार तरी कसा?
मग परत कोणावर रागावलाच नाही का तो आयुष्यात कधी?
त्या माणसाचा आणि त्या कथेचा ,
खरा शेवट कळलाच नाहीये मला कधी..
आणि स्वतःचाही..
तू न स्विकारलेलं माझं प्रेम घेऊन आता मी कुठे जायचंय?
मेरा कुछ सामान ...
स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ११ ते पहाटे कितीही..
सोबतः बेगम अख्तर, अबिदा परवीन, फरिदा खानुम, रेखा भारद्वाज, जगजित सिंग, गुलाम अली खान, गालिब वगैरे..

असल्या भयानक रोमँटीक वातावरणात बसलेलं असताना मनभर उदासी व्यापलेली असावी यासारखा वैताग नाही. Be aware what you wish for or it might come true. Hell it does! It does come true and its extremely frightening. It shatters my soul to its very core. Am I among the lucky ones or what? Because I always get what I want. May be at wrong time, may be in wrong place, may be at wrong point but I always get what I want. माझा एक मित्र (त्याला "अ" म्हणू) मला म्हटलेला, "you fancy being lonely. You romanticize the pain of loneliness." आणि त्यावेळी मला ते पटलं नव्हतं. नंतर जेव्हा पटलं तेव्हा मी त्या वेडातून बाहेर आलेले किंवा मला असं वाटलेलं तरी की मी बाहेर आलेय. (आपल्याला जे वाटतं ते खरं असतं का? खरंच खरं असतं का? असलं तर कितपत खरं असतं? विचारांचं कसं असतं, many a times we think that we think. तसंच भावनांचं पण असतं का? वाटण्याचं पण असतं का? I feel what I feel but sometimes I might feel what I choose to feel. But what if what I choose to feel is imaginary and I am not able to think of it as imaginary? What if I perceive imaginary as real?) तर मी त्या एकटेपणाच्या वेडातून बाहेर आले or at least तसं जेव्हा वाटत होतं त्याला कारण म्हणजे माणसांच्या रुपात झालेले काही साक्षात्कार. काही गुंतागुंत न करता पण उत्कट होणं शक्य असतं आणि अतिशय सहज सोपं रहाणं पण जमू शकतं हे पाहून एकटेपणाचं वेड कधीतरी संपलं. or मला तरी संपल्यासारखं वाटलं सोबतीच्या स्वप्नांच्या सोबतीने. पण ते होणं नव्हतं. I didnt realize when my fetish became my destiny. Or it was meant to be? As Sarah and Phil say,
May be love stay
May be love can't
May be love shouldn't...
Love arrives exactly when love is supposed to
And love leaves exactly when love must
When love arrives say,
"Welcome, make yourself comfortable"
If love leaves,
ask her to leave the door open behind her
Turn off the music, listen to the quiet Whisper,
"Thank you for stopping by".
Say thank you for stopping by and move on. Move on as its all you can do. And even if you cant, you have to. You have to stretch your limits and move on. In search of a bigger pain may be.

आणि आता तू.. मित्र कॅटेगरी वेगळे. त्यांना अ, ब, क म्हणू शकते. तू मित्र नाहीस. तुला 'क्ष' म्हणू. तू मित्र नक्कीच नाहीस पण बराच काही आहेस पण तरी तू आणखी कोणी होऊ शकत नाहीस. तुला कदाचित हे सगळं माहितीही पडणार नाही. पण त्याने फरक पडत नाही. जब भी खयालोंमे तू आये.. चारचौघांत असताना तुझी आठवण आली तर खिंडीत गाठल्यासारखी अवस्था होते, चेहर्‍यावरचे भाव लपवणं अशक्य होतं. तुझी आठवण एकटीला सोसवत नाही. विश्वरुप पहायला जशी दिव्यदृष्टी लागते तसं तुझ्या निवांत आठवणींसोबत जॅक डेनियल्स हवी. बाय द वे, जॅक डॅनियल्स चं नाव जॅक डॉवसन का नाही? नाव पाहिजे जॅक डॉवसन आणि बाटलीवर केट चं 'चित्र'! ;-) माझा परमनंट ब्रँड झाला असता मग तो. असो, तर तुझी आठवण..
हर रगे खूं में फिर चरागां हो,
सामने फिर वो बेनकाब आए।
कोणाला आपण बघू शकतो असं बेनकाब? किती लोकांना बेनकाब भेटायला आवडेल आपल्याला? वासनांनी बरबटलेलं, जखमांनी विदिर्ण झालेलं, सगळ्या गुणावगुणांसहितचं अस्तित्व. असं किती लोकांना बघावसं वाटेल? पण तरीही काहींना असं बघावसं वाटतं. The naked soul is still haunting with its every torment and turmoil. त्यातला तू. 
तुम्ही कल्पना बनवता, कल्पना जगता. स्वप्नं बघता, स्वप्नं शोधता खर्‍या जगण्यात. हरुन, हरवून, थकून गेल्यावर कळतं, अर्रे ही स्वप्नं आहेत. नुसत्या कल्पना, मृगजळ. यात काहीच खरं नाही, काहीच सत्य नाही. सत्य होणं शक्य नाही. You give up your chaotic dreams and make peace with the reality. ते स्वप्न आहे.. ते स्वप्न आहे... ते स्वप्न आहे..... असं काही नसतं. असं कुठे कधीच नसतं. तसं वाटत असलं तरी तसं नसतं. Make peace with the fact. And what the hell! why to stop just at making peace? Learn to be happy with that. Because now you know its possible. Being happy is possible even when your chaotic wild dreams are not fulfilled. You can be happy. And you be and exactly at that very moment yet another dream comes true. Again at wrong time. At wrong place. मला दिसतं की माझं स्वप्न खरं होतं, खरं असू शकतं. I was not all wrong in believing in it. मला दिसतं माझ्या नजरेसमोर माझ्या स्वप्नाचं वास्तव रुप. आणि त्याच्या जवळपास पोहचता येणंही अशक्य असतं. स्पर्श करणं तर दूरच. देव खुश असावा अशा वेळी. त्याने तथास्तु म्हणून आपलं काम केलेलं असतं. आणि नशीब की काय ते आपल्या क्रूर योगायोगावर हसत असावं. आणि मी उद्ध्वस्त!
दिल तो रोता रहे और आँख से आंसू न बहे..
इश्क की ऐसी रवायात ने दिल तोड़ दिया..

समोर समुद्र आहे. ज्याच्याकडे मी तासन् तास नुसतीच पहात बसू शकते तो समुद्र. मी अजून समुद्र पार केला नाहीये, कधी स्पर्श केला नाहीये त्याच्या क्षितिजाला. पण उगीचच खात्री वाटते की मी कधी पडले तिथे तर बुडणार नाही. अलगद तरंगत ठेवेल मला समुद्र. विचित्र आहे. पण आता वाटतं तर वाटतं...  खरंतर मला आत्ता या क्षणी कसलाच विचार करायचा नाहीये. तरीपण मी स्वतःचा विचार करतेय पण त्यात मी कुठेच नाही, सगळा तूच आहेस. सगळा तू.. सगळा तुझा कोलाहल. मी नाहीच..
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद,
फिर यह हंगामा ए खुदा क्या है?
तुला समुद्र आवडतो का? आवडत असावा का? तुला नक्की काय आवडत असावं? समुद्र? सह्याद्री? पाऊस? मैफिल? एकांत? solitude? or sweet rush? गजल की ठुमरी? अख्तरबाई की लता? bike or car? तू सलग २४ तास गप्पा मारु शकतोस का? पुस्तकातली पात्रं तुझ्या आयुष्यात जिवंत माणसांइतकी खरी असतात का? रोज ४-४ मूव्हीज बघत तू सलग किती दिवस काढू शकतोस? तुझी स्वप्नं रंगीत असतात का? तुला तुझी स्वप्नं आठवायला आवडतात का? रात्री २ वाजता एकटा समुद्रावर बसलास तर तू कसला विचार करतोस? डोकं जड होईपर्यंत पावसात भिजायची हुक्की येते का तुला? morning person or night owl? tea lover or coffee fan? असंख्य प्रश्न. ज्यांची उत्तरं कधीच मिळणार नाहीयेत आणि मला तुझं चित्र कधीच पूर्ण करता येणार नाहीये. आणि म्हणूनच मला स्वत:चा विचार करायचाय. तुझा नाही. तरीही सगळा तूच आहेस डोक्यात. आज मैं तुझसे दूर सही और तू मुझसे अंजान सही.. वास्तविक मला मुंबईचा समुद्र फारसा आवडत नाही. किंबहुना मुंबईच आवडत नाही. मुंबईत शिरल्या शिरल्या सगळा खारा वैतागलेपणा आणि गोंधळ अंगाला चिकटतो इथल्या चिकट हवेबरोबर. नकोसा वाटतो. रिमझिम गिरे सावन चं फिमेल व्हर्जन कधी पाहिलंय का? त्यातला तो पाऊस आणि मुंबई ही मुंबईची मला सगळ्यात जास्त आवडलेली रुपं. बाकी मला मुंबई कधीच आवडली नाही. ना ही मुंबईचा समुद्र. तरीपण या क्षणी मला फार फार बरं वाटतय की समोर समुद्र आहे.
एक अजनबी झोंकेने जब पूछा मेरे गम का सबब,
सहरा की भीगी रेत पर मैंने लिखा, आवारगी...

आयुष्यात कधीच कुठलाच वेडेपणा न करावासा वाटणार्‍या लोकांविषयी माझ्या मनात जबरदस्त कुतूहल आहे. कधीच कोणताच प्रश्न न विचारता सगळं काही कसं विनातक्रार मान्य करु शकतात हे लोकं? की तक्रारी असतात पण सांगत नाहीत? वाटत असूनही मनाला आवर घालतात? मग आपल्याला का जमत नाही? का जमवावसं वाटत नाही मनाला बांध घालणं? आयचा घो!
मानवी इतिहासात नाती कधी नितळतेच्या फूटपट्टीवर मोजली गेली आहेत का? नसतील तर का नाही? Why do we always measure them on the scale of legitimacy and not purity? I guess because its easy. आपल्याला सगळ्याचं सुलभीकरण हवं असतं. And it leads to mediocrity. पण मध्यम मार्ग सोडून आजूबाजूला काय आहे? कोणी बघायचा प्रयत्न केलाय का? सख्ख्या भावाबहिणीपेक्षा पुस्तकातलं एखादं पात्र जास्त जवळचं आणि ओळखीचं असू शकत नाही का? एखाद्या बापलेकीपेक्षा एखाद्या अनोळखी माणसाचं त्याच्या दुकानात कधीमधी येणार्‍या मुलीबरोबरचं नातं जास्त घट्ट नसेल कशावरुन? एखाद्या नवरा बायकोच्या नात्यापेक्षा एखाद्या रखेलीचं आणि तिच्या कस्ट्मरचं नातं जास्त नितळ नसेल कशावरुन? आणि असं असू शकत असेल तर legitimacy ला काय अर्थ राहिला?
स्वतःशी बोलल्याला खूप काळ लोटला. अवघड असतं स्वतःशी बोलणं. पण स्वतःशी बोलणं तर चालूच असतं ना. इतके दिवसही बोलतच होते की. पण ते काही खरं नाही. स्वतःचीच समजूत घालणं, counselling करणं, स्वतःला improve करणं, analysis करणं  म्हणजे संवाद नव्हे. स्वतःचा सगळा cynicism ऐकता आला पाहिजे. तटस्थपणे. Oh yes! I am cynic. And I havent been cynic in so long. I was in pain. I was depressed. But I avoided being cynic for too long successfully. I had almost forgotten how does it feel to be cynic. माझा अजून एक दुसरा मित्र, 'ब' म्हणालेला, "you can eat life out of anything." याला खूप वर्षे झाली. तेव्हा मला नीटसं कळलंही नव्हतं त्याला काय म्हणायचंय. मग कळलं तेव्हा मला वाटलं की मला आवडतं असं असणं.
मेरा अज़्म इतना बलंद है के पराये शोलों का डर नहीं..
मुझे ख़ौफ़ आतिश-ए-गुल से है, ये कहीं चमन को जला न दे..
पण तू guess केलंस तेव्हा मी नाकारलं सपशेल. आपल्याला इतक्या लवकर कोणी इतकं ओळखावं हे काही मला बरं वाटलं नाही. But yes, you were right. I can eat life out of anything and everything.
मुझे छोड़ दे मेरे हाल पर तेरा क्या भरोसा है चारागर,
ये तेरी नवाजिश-ए-मुख़्तसर मेरा दर्द और बढ़ा न दे...

Acts of liberation. Yes! acts.. actions.. because rebellion doesnt always lead to liberation. So always weigh your options and actions. Seek liberation.
Act in front of mirror the weirdest character you can imagine..
Travel to foreign land alone..
Dance crazily like/when nobody is watching..
Drink alone...
Liberation.. Missing you at 2 past midnight by the sea without bothering about the world which might get confused if anyone observed expressions on my face...
Seek liberation.. Reach to the point where you dont need to seek it any longer.

मैं यहां टुकडोंमे जी रहा हुं..
तू कही टुकडोंमे जी रही है...
अशा तुकड्या तुकड्यांतच जगतेय कधीपासून. यातून एकसंध चित्र कधी तयारच होणार नाही का? तुकडे.. मनाचे, भावनांचे, स्वप्नांचे, विचारांचे.. निवडलेले.. जाणिवपूर्वक.. पण चित्र तयार होण्याच्या दृष्टीने नगण्य..पण चित्र पूर्ण कराण्यासाठी म्हणून निवडू शकत नाही सरसकट काहीच. कसं मान्य करायचं? तुम्हाला परिसीमा माहिती आहे. सोबतीची.. एकटेपणाचीसुद्धा. You know the limits. The extremes. You know how it feels to talk continuously for 24 hours and stop just because of physical limitations. Go to sleep. Continue the conversation in dreams and continue it in real after getting up for another 24 hours. And you also know how it feels not to utter a word for months. Even years. But its all worth it. तुम्हालाच कळत नाही तुम्ही कधी तयार झालेले असता २८ युगांच्या एकटेपणाची किंमत मोजण्यासाठी त्या एका दिवसासाठी. तुमची तयारी होत असते, कधीच चित्र पूर्ण करु न शकणारे पण आयुष्याचे लखलखते तुकडे मिळवण्याची. तुमची तयारी झालेली असते तुमच्याही नकळत.

I know its absurd. I know it doesnt make any sense. अस्तित्वात असलेल्या पण भेटू न शकणार्‍या लोकांशी, अस्तित्वातच नसलेल्या लोकांशी, भेटूनही परक्या राहिलेल्या लोकांशी,अशा सगळ्यांशी बोलायला.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी बोलायला absurdism बरा पडतो..
हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले...
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले....
आता पुन्हा २८ युगांचं एकटेपण.....
मेरा कुछ सामान ...
"मुद्दते गुजरी तेरी याद भी न आई हमें, और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं" माहितेय का हा शेर? तुला कुठून माहिती असणार म्हणा, पाषाणहृदयी आहेस तू. पण तुझ्या पाषाणहृदयाला पाझर फुटताना पाहत आलेय मी आठवतंय तेव्हापासून. मला खात्री आहे तुला हे सगळं माहिती असणार, कळत असणार. कसला भारी आहे ना हा शेर.! तसं पहायला गेलं तर तुझी आवर्जुन आठवण काढल्याला काळ लोटला. पण तुला विसरुन गेलेय असंही नाहीये. इतकी तुझ्या अस्तित्वाची माझ्या जगण्यात एकरुप व्हावी. तुझं माझं नातं असंच आहे. आणि माझंही तुझ्यावर असंच प्रेम आहे. प्रेम, कदाचित प्रेम नाही म्हणता येणार. पण प्रेमासारखं काहीतरी... उत्कट आकर्षण, अनिवार ओढ, खोल आत्मियता आणि तुझ्या माझ्या सहवासाच्या असंख्य आठवणी.. यातून निर्माण होणारं नातं कोणतं? प्रेमाचंच ना? मग प्रेमच म्हणूया. माझं तुझ्यावर खूप खूप खूप अगदी खूप प्रेम आहे. आणि तुझ्यावर अनेकानेक प्रकारे प्रेम करता येतं हे तर मला फारच प्रिय आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या भावनांचा स्पेक्ट्रम फारच मर्यादित असतो. चार पाच चांगल्या आणि चार पाच  वाईट भावनांच्या पलिकडे आपण काही भोगतच नाही. पण हे मर्यादित विश्वाच्या मर्यादित चौकटीसाठी ठिक आहे. तुला कुठं अशी काही चौकट आहे? तुझं असणंच माझ्यासाठी अफाट आहे. आणि मग त्याच प्रमाणात भावनांचा पटही विस्तारतो तुझा विचार करताना. तीन मूळ रंग... त्यांच्या मिश्रणाने तयार होणारे दुय्यम रंग आणि मग त्यांच्याही मिश्रणाने तयार होणाऱ्या अगणित रंगछटा... असा भावनांचा पसारा तयार होतो तुझ्यासाठी मनात... अबिदा परवीन गात असते, "तू मिला भी हैं तू जुदा भी हैं तेरा क्या कहना... तू सनम भी हैँ तू खुदा भी हैं तेरा क्या कहना.." तेव्हा डोळ्यांसमोर तू असतोस. कुसुमाग्रज लिहितात " तव शरिरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती...
त्यात मिळाया पतंग होतो, परि नसे ते काम वगैरे!"
तेव्हा समोर तू येतोस. "दूरीयां ऐसीभी होंगी कभी सोचा न था, वो मेरे सामने था पर मेरा ना था" हे ऐकलं की तू आठवतोस आणि तरीही बराच काळ तू आठवलेला नसतोस हे खरंय.!
तुला बघुन वेडावलेलं, तुला असं भोगताना मला पिसावलेलं पाहून हसत असशील ना तू मनातल्या मनात? नक्कीच हसत असणार. तुझ्या घनगंभीर मुखवट्यामागे कितीही लपवलंस तरी कळतंच मला ते.
तुला माहितेय तुझ्यासोबत, तुझ्याजवळ असताना मला काय ऐकायला आवडतं? रहमान. रहमानच.. त्याची बरीचशी गाणी ना अशी ओलीचिंब करतात ऐकणार्याला. जणू काही त्या गाण्यांना स्वतःचा असा पाऊस असावा. आणि मग फिरत रहायचं गर्दीत स्वतःलाच फक्त  भिजवणारा, स्वतःपुरता, रहमानच्या सूरांचा पाऊस घेऊन. पण या अशा ओल्याचिंब भिजण्याची खरी मजा फक्त तुझ्यासोबत, तू जवळ असतानाच येते. तुला मला गच्च ओला करणारा आभाळातला पाऊस आणि मनाला चिंब करणारा रहमानचा पाऊस. बस्स! अजून काय मागावं आयुष्याकडे?
आयुष्याकडे मागण्यावरुन आठवलं, तुला माहितेय का गुरूदत्त चा तो प्यासा मधला डायलॉग? तो म्हणतो "मैं यहॉंसे बहोत दूर जा रहा हुं गुलाब." ती विचारते, "कहॉ", तो म्हणतो, " जहांसे मुझे फिर दूर ना जाना पडे." तू माझ्यासाठी ते ठिकाण आहेस. आयुष्याकडे मागावं असं काही उरत नाही तूझ्याजवळ आल्यावर. सगळे प्रश्न विरतात. सगळ्या वाटा थांबतात. थकून जाते रे मी पण बरेचदा. तूही दिसत नाहीस महिनोन् महिने.. आणि मी पण वावरत राहते शहाण्यांच्या जगात.. शोधत असते काहितरी, कधी परमेश्वराला कधी स्वतःला..पळत असते बरेचदा, कधी जगापासून कधी स्वतःपासुन.. काहीच सापडत नाही आणि कुठंच पोहोचत नाही. थकते.. चिडते.. रडते.. पुन्हा वावरते निर्विकार चेहऱ्याने.. आणि मग तू भेटतोस. न ठरवता, न सांगता.. अचानक कोणत्यातरी प्रवासाच्या शीणभरल्या वाटेवर.. अचानक समोर येतोस. खूप काळ भावनांचा स्पर्शही न झालेल्या मला जाणीव होते मन असल्याची. किती बोलू अन् किती नको असं होतं मला. तुला किती बघू डोळेभरुन अन् किती नको असं वाटतं. माझ्या कवेत न मावणार्या तुझ्या भरदार रुपाला घट्ट मिठी मारावीशी वाटते. पण असं कुठं करता येतं कितीही वाटलं तरी? तसं पहायला गेलं तर खूप अंतर आहे तुझ्या माझ्यात. मग उगीच समाधान मानायचं तुझ्या ओझरत्या स्पर्शावर, तू दिसशील तेवढ्या रुपावर.. गोंजारत रहायचं तुला नजरेनं.. अतृप्तच परतायचं तुझ्या प्रत्येक भेटीनंतर..
पण एकदा ना मी अशी येणार आहे की परतणारच नाही तुझ्याकडून! बस्स, एकदा तुला असं भेटायचंय ना, की माझं आस्तित्व वेगळं नको उरायला तुझ्यापासुन. झोकुन द्यायचंय तुझ्या मिठीत स्वतःला.. सामावुन जायचंय तुझ्या रुपात.. विरुन जायचंय तुझ्यात.. मी ना एकदा येणार आहे तुझ्याकडे न परतण्यासाठी.. Mi amor.. सह्याद्री... एकदा येणार आहे मी तुझ्याकडे अशी...!
मेरा कुछ सामान ...
किती भरभर बदलत जातात शहरं..
अनोळखी होत जातात ..
झपाट्याने बदलण्याचा काळच असतो एकेक..
आणि मग नाहीच थोपवता येत आपल्याला काही..
हरवून जातात जुनी आपुलकीची ठिकाणं..
उन्मळून पडतात मुळापासून रुजलेल्या आठवणींचे वृक्ष..
नव्या गर्दीत नाहीसे होतात आपले सरावाचे रस्ते..
आणि जपून ठेवलेल्या खाणाखुणा कधी पडल्या हे तर कळतही नाही..
.
.
बघता बघता बदललं शहर..
अनोळखी झालं..
जिथं कधी काळी माझं अवघं विश्व नांदायचं..
हरवलं..
तुझ्या नजरेतलं माझं शहर..