मेरा कुछ सामान ...
गुलझारच मेरा कुछ सामान ऐकत होते.. 
अगदी तितका आणि तसा दूर नसलास तरीही तुझ्या दूर असण्याची जाणीव पुन्हा एकदा चमकून गेली...

असं काही ऐकलं की सरसरून आठवण येते तुझी, अगदी हृदयाच्या तळापासून, खोलवरून, अतिशय आर्त हाक मारावीशी वाटते तुला अशा वेळी.. किव्वा मारूही नये..कदाचित तुझ्यापर्यंत आधीच पोहचली असेल ती... की तू स्वतःच हाक मारतो आहेस मला?
न संपणारे प्रश्न घेवून, न संपणाऱ्या वाटेवर, न संपणारी तुझी सोबत घेवून मी चालत राहते... रहमान च्या धून मधले शब्द शोधताना किव्वा गुलझार च्या शब्दातली धून शोधताना, Bergman च्या संवादांचे तळ गवसताना किव्वा सह्याद्रीची उंची जोखताना तुझ्या सोबतीने अनोखळी वाटादेखील जन्मांतरीच्या ओळखीने हसल्या होत्या..आणि आज अगदी शहरातली, पायाखालची वाट देखील ओळख दाखवत नाहीये... अर्थात तेही बरंच म्हणा कधी कधी....खूप हट्टाने दूर पाठवलं तुला मी... कशासाठी? काय तपासून पाहण्यासाठी? तू सोबत असताना तुझ्या अस्तित्वाची किनार जाणूनबुजून अमान्य करणारा माझा अहं, आज तू दूर गेल्यावर मात्र तुझा जपून ठेवलेला प्रत्येक श्वास स्वतःवर सजवून पाहतोय... तुझ्या रंगात नटून, निरखून बघतोय स्वतःलाच...तू असताना मुद्दाम तू सांगशील त्या विरुद्ध वागणारी मी माझ्याच नकळत तू सांगायचास तशी वागू लागते... तसा विचार करू लागते..इतकं कि मलाच प्रश्न पडतो, मी तुझी जास्त की माझी जास्त? मी तुझ्यासारखा विचार करते की तू माझ्यासारखा? माझ्यातून तू की तुझ्यातून मी? या वर्तुळाचा आरंभ शोधून थकून जाते मी...मग अशा वेळी पु.शी.रेगेंची "साऊ" येते मदतीला... तिची वाक्यं कानात घुमू लागतात.. "मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंस करून घेतलं आहे... या देवघेवीने आपण अधिक व्हायचं की स्वतःभोवती अजून नवे बांध घालायचे?"शेवटी सगळ कळत असूनही आज तू दूर आहेस हेच खरं...
आज साऊची आठवण येतेय... ती पण माझ्यासारखीच वाट पाहत होती म्हणून की त्याने पण यायला असाच वेळ घेतला म्हणून? या वाटांना मी पूर्णच अनोळखी होण्याआधी परत ये.. वाट पाहतेय...
4 Responses


  1. Unknown Says:

    अप्रतिम मनातले शब्द जणू वाट्ते हे आपलेच शब्द आहेत … Fabulous