मेरा कुछ सामान ...
"मुद्दते गुजरी तेरी याद भी न आई हमें, और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं" माहितेय का हा शेर? तुला कुठून माहिती असणार म्हणा, पाषाणहृदयी आहेस तू. पण तुझ्या पाषाणहृदयाला पाझर फुटताना पाहत आलेय मी आठवतंय तेव्हापासून. मला खात्री आहे तुला हे सगळं माहिती असणार, कळत असणार. कसला भारी आहे ना हा शेर.! तसं पहायला गेलं तर तुझी आवर्जुन आठवण काढल्याला काळ लोटला. पण तुला विसरुन गेलेय असंही नाहीये. इतकी तुझ्या अस्तित्वाची माझ्या जगण्यात एकरुप व्हावी. तुझं माझं नातं असंच आहे. आणि माझंही तुझ्यावर असंच प्रेम आहे. प्रेम, कदाचित प्रेम नाही म्हणता येणार. पण प्रेमासारखं काहीतरी... उत्कट आकर्षण, अनिवार ओढ, खोल आत्मियता आणि तुझ्या माझ्या सहवासाच्या असंख्य आठवणी.. यातून निर्माण होणारं नातं कोणतं? प्रेमाचंच ना? मग प्रेमच म्हणूया. माझं तुझ्यावर खूप खूप खूप अगदी खूप प्रेम आहे. आणि तुझ्यावर अनेकानेक प्रकारे प्रेम करता येतं हे तर मला फारच प्रिय आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या भावनांचा स्पेक्ट्रम फारच मर्यादित असतो. चार पाच चांगल्या आणि चार पाच  वाईट भावनांच्या पलिकडे आपण काही भोगतच नाही. पण हे मर्यादित विश्वाच्या मर्यादित चौकटीसाठी ठिक आहे. तुला कुठं अशी काही चौकट आहे? तुझं असणंच माझ्यासाठी अफाट आहे. आणि मग त्याच प्रमाणात भावनांचा पटही विस्तारतो तुझा विचार करताना. तीन मूळ रंग... त्यांच्या मिश्रणाने तयार होणारे दुय्यम रंग आणि मग त्यांच्याही मिश्रणाने तयार होणाऱ्या अगणित रंगछटा... असा भावनांचा पसारा तयार होतो तुझ्यासाठी मनात... अबिदा परवीन गात असते, "तू मिला भी हैं तू जुदा भी हैं तेरा क्या कहना... तू सनम भी हैँ तू खुदा भी हैं तेरा क्या कहना.." तेव्हा डोळ्यांसमोर तू असतोस. कुसुमाग्रज लिहितात " तव शरिरातून कधी पेटती, लाल किरमिजी हजार ज्योती...
त्यात मिळाया पतंग होतो, परि नसे ते काम वगैरे!"
तेव्हा समोर तू येतोस. "दूरीयां ऐसीभी होंगी कभी सोचा न था, वो मेरे सामने था पर मेरा ना था" हे ऐकलं की तू आठवतोस आणि तरीही बराच काळ तू आठवलेला नसतोस हे खरंय.!
तुला बघुन वेडावलेलं, तुला असं भोगताना मला पिसावलेलं पाहून हसत असशील ना तू मनातल्या मनात? नक्कीच हसत असणार. तुझ्या घनगंभीर मुखवट्यामागे कितीही लपवलंस तरी कळतंच मला ते.
तुला माहितेय तुझ्यासोबत, तुझ्याजवळ असताना मला काय ऐकायला आवडतं? रहमान. रहमानच.. त्याची बरीचशी गाणी ना अशी ओलीचिंब करतात ऐकणार्याला. जणू काही त्या गाण्यांना स्वतःचा असा पाऊस असावा. आणि मग फिरत रहायचं गर्दीत स्वतःलाच फक्त  भिजवणारा, स्वतःपुरता, रहमानच्या सूरांचा पाऊस घेऊन. पण या अशा ओल्याचिंब भिजण्याची खरी मजा फक्त तुझ्यासोबत, तू जवळ असतानाच येते. तुला मला गच्च ओला करणारा आभाळातला पाऊस आणि मनाला चिंब करणारा रहमानचा पाऊस. बस्स! अजून काय मागावं आयुष्याकडे?
आयुष्याकडे मागण्यावरुन आठवलं, तुला माहितेय का गुरूदत्त चा तो प्यासा मधला डायलॉग? तो म्हणतो "मैं यहॉंसे बहोत दूर जा रहा हुं गुलाब." ती विचारते, "कहॉ", तो म्हणतो, " जहांसे मुझे फिर दूर ना जाना पडे." तू माझ्यासाठी ते ठिकाण आहेस. आयुष्याकडे मागावं असं काही उरत नाही तूझ्याजवळ आल्यावर. सगळे प्रश्न विरतात. सगळ्या वाटा थांबतात. थकून जाते रे मी पण बरेचदा. तूही दिसत नाहीस महिनोन् महिने.. आणि मी पण वावरत राहते शहाण्यांच्या जगात.. शोधत असते काहितरी, कधी परमेश्वराला कधी स्वतःला..पळत असते बरेचदा, कधी जगापासून कधी स्वतःपासुन.. काहीच सापडत नाही आणि कुठंच पोहोचत नाही. थकते.. चिडते.. रडते.. पुन्हा वावरते निर्विकार चेहऱ्याने.. आणि मग तू भेटतोस. न ठरवता, न सांगता.. अचानक कोणत्यातरी प्रवासाच्या शीणभरल्या वाटेवर.. अचानक समोर येतोस. खूप काळ भावनांचा स्पर्शही न झालेल्या मला जाणीव होते मन असल्याची. किती बोलू अन् किती नको असं होतं मला. तुला किती बघू डोळेभरुन अन् किती नको असं वाटतं. माझ्या कवेत न मावणार्या तुझ्या भरदार रुपाला घट्ट मिठी मारावीशी वाटते. पण असं कुठं करता येतं कितीही वाटलं तरी? तसं पहायला गेलं तर खूप अंतर आहे तुझ्या माझ्यात. मग उगीच समाधान मानायचं तुझ्या ओझरत्या स्पर्शावर, तू दिसशील तेवढ्या रुपावर.. गोंजारत रहायचं तुला नजरेनं.. अतृप्तच परतायचं तुझ्या प्रत्येक भेटीनंतर..
पण एकदा ना मी अशी येणार आहे की परतणारच नाही तुझ्याकडून! बस्स, एकदा तुला असं भेटायचंय ना, की माझं आस्तित्व वेगळं नको उरायला तुझ्यापासुन. झोकुन द्यायचंय तुझ्या मिठीत स्वतःला.. सामावुन जायचंय तुझ्या रुपात.. विरुन जायचंय तुझ्यात.. मी ना एकदा येणार आहे तुझ्याकडे न परतण्यासाठी.. Mi amor.. सह्याद्री... एकदा येणार आहे मी तुझ्याकडे अशी...!