मेरा कुछ सामान ...

पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...
मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...
छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...
सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...
कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...
4 Responses
  1. Anil Says:

    श्वेता, अंधारसूक्त वाटावी अशी ही कविता.. यात विरलेल्या गाण्यांचं आधीपासूनचंच दुःख तर आहेच, पण त्यानेही आता डोळ्यात पाणी येत नाही हेही एक दुःखच होऊन बसलंय. आणि मग त्याला दिलेली सांजभयाच्या किनारीची एकुलती भुलावणही नंतर विरून गेलीच आभाळकाळोखात. आता खरंतर या काळोखाच्या गाण्याला पुन्हा प्रकाशाच्या एका तिरीपीचाही दिलासा देऊन बोल लावू नये. आणि अशात दरवेळी कसलातरी आधार घ्यावाच असंही काही असू नये. पण तरीही, कधीतरी दिलाशाची गरज भासेलच म्हणून या दोन ओळी राखून ठेवल्यात..

    जिंदगी यूं तो ना बाहों में चली आएगी,
    गम-ए-दौरां के ज़रा नाज़ उठाओ यारों..

    बाकी, कितीही दाटून आलेल्या मोठ्या दुःखाने येत नाही तेच पाणी कधीतरी एखाद्या खूपच छोट्याश्या नाजुक गोष्टीनं पापण्या भिजवून जातं.. कधी डोळे भरून टाकतं.. कधी टच्‌कन्‌ येऊन खळ्‌कन्‌ वाहून जातं.. तर कधी वाहतच राहतं आणि मग आवरतही नाही, ही खरंच कमाल आहे. मला कधी कधी अशा अनावर पाण्याचा एक गुणधर्म चिमटित पकडावा तसा सापडल्यासारखा वाटतो, तो म्हणजे ते कशानेही येवो पण एकदा आलं कि मग आपल्या सगळ्याच दुःखांना, विवंचनांना ते आपल्यात सामावून घेत असावं आणि म्हणूनच अनावर होऊन वाहत जात असावं.. नाही का? बाकी अजूनही काही गुणधर्म असतीलच त्याचे.. ते सापडो अगर नं सापडो, पण अजून थोडंतरी पाणी असावं नशीबात एवढीच काय ती आशा.. ;-)


  2. Anil,
    जिंदगी यूं तो ना बाहों में चली आएगी,
    गम-ए-दौरां के ज़रा नाज़ उठाओ यारों..
    Kya baat hai.. :-)