मेरा कुछ सामान ...
स्टॅटेस्टिक्स... स्टॅटेस्टिक्स... जगात रोज इतकी लोकं उपाशी झोपतात.. इतकी मुलं कुपोषित आहेत.. इतक्या स्त्रिया अन्यायाला बळी पडतात.. हे आकडे माहितीतले. रोजच्या वाचनातले. रोजच्या विचारातले. त्यासाठी कधी हळहळणे तर कधी पेटून उठणे आणि कधी त्यावरच्या उपायांत खारीचा वाटा उचलणे हे ही नित्याचे.
तसाच तो ही एक दिवस होता. नेहमीप्रमाणेच. सकाळची घाई. ठरलेली बस. बस मध्ये जागा मिळाली की पुढच्या तासाभराची निश्चिंती. भल्या गर्दीत सुखावणारं एकटेपण आणि अगदी स्वतःचा असा वेळ. कुठलाही विचार निवांतपणे करण्याची हक्काची संधी. वाटलं तर विचार करा नाहीतरे निरीक्षण करत बसा. त्यादिवशीही असंच लोकांकडे बघत बसलेले. चेहरा बघून त्या माणसाच्या आयुष्याचा, मानसिकतेचा अंदाज बांधत.. रस्त्यावरुन दिसणारी दृश्यही रोजचीच होती. काही गरीब माणसं, रस्त्यावर फिरणारी मुलं.. पण तो दिवस अगदीच काही रोजचा नसावा. त्या सगळ्यांकडे बघता बघता अशी काही तंद्री लागली त्या दिवशी की त्याचं नीटसं वर्णन आजही नाही करता यायचं मला. बघता बघता जाणवायला लागलं की ती 'मी'च आहे. आजूबाजूची प्रत्येक जिवंत गोष्ट 'मी' आहे. जी 'मी' आहे, तेच सगळीकडे आहे. सगळी माझीच रुपं आहेत. सगळ्यांत 'मी' आहे. आधी हे जाणवत होतं की यावर खूप विचार करुन झालाय. त्याचाच पुढचा भाग चालू झाला असेल डोक्यात. पण नंतर जाणवायला लागलं की डोकं बंद झालंय कधीच आणि आता जे दिसतय हे समोर घडतय. माझ्या डोळ्यांदेखत. हे विचार नाहीत. ही अनुभूती आहे.
दिव्य दृष्टी मिळूनही अर्जुनाला विश्वरुपदर्शन का झेपलं नसेल? उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांमधला हा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्या आयुष्यात. महाभारत वाचलं तेव्हा आणि भगवद्गीता वाचली तेव्हाही या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. म्हणजे अर्जुनाला कृष्णाने दिव्य दॄष्टी दिली आणि तरीही ते विश्वरुप सहन न झाल्याने अर्जुनाने त्याला विनंती केली की 'हे रुप आवरा' हे कायमच वाचत आलेय. पण अर्जुनाला नक्की काय वाटलं? त्याच्या मनात काय विचार आले? का सहन झालं नसावं त्याला? मनाच्या तळात पडून रहाणार्‍या आणि विचारांच्या भोवर्‍यात पुन्हा पुन्हा वर येणार्‍या प्रश्नांतला हा एक. असं वाटलं की त्या एका क्षणात या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सगळ्या जगाला व्यापून उरणारं एकच तत्व आहे हा विचार अध्यात्मिकदृष्ट्या कितीही उदात्त वाटत असला तरी त्याची प्रचिती सहन करण्याची ताकद निर्माण कशी करायची? ही 'मी' आहे.. ती ही 'मी' च.. तो ही 'मी' च.. चराचरात सर्वत्र 'मी' च.. प्रत्येक अन्याय करणार्‍यात 'मी', प्रत्येक अन्याय सहन करणार्‍यात 'मी', त्यासाठी लढणार्‍यांत 'मी', त्याला मारणार्‍यात 'मी'.. क्षुद्र, कातडीबचावू, कोत्या मानसिकतेचं रुप मी आणि महान, उदात्त विचारांचा उगमही 'मी' च.. पिढ्यांन् पिढ्या नासलेल्या अनेक आयुष्यांत 'मी' आणि त्यांना नासवणार्‍या कारणांतही 'मी' च.. प्रत्येक उपाशी झोपणार्‍यांत, औषधावाचून मरणार्‍यांत, कचरा वेचणार्‍यांत.. आणि ह्या सगळ्याला जबाबदार असणार्‍यांत.. हे सगळं बदलायची ताकद असूनही षंढपणे जगणार्‍यांत.. माझा घसा कोरडा पडला, क्षण भर काही जाणवेच ना. असं वाटलं की दु:ख दु:ख दु:ख भरुन आहे सगळीकडे, असं वाटलं की आता माझ्या सगळ्या शरीराचं पाणी होऊन हे सगळं दु:ख डोळ्यांवाटे वाहून जाणार आहे. एका क्षणाने भानावर आले. पाणी प्यायला गेले तर लक्षात आलं, डोळ्यांतून पाणी वाहत होतं. स्टॉप आलाच होता. कसबसं भान एकवटत खाली उतरले.
तो क्षण असह्य होता. माझा अहं कितीही मोठा असला तरी त्याचं असं व्यापक होणं नाहीच झेपलं. कदाचित त्यामुळेच नाही झेपलं. पण अहं मोठा नसता तरी झेपलं असतं की नाही शंकाच आहे. माझ्या लेखी 'मी' फक्त 'मी'च असू शकते. माझ्याइतकीच चांगली, माझ्याइतकीच वाईट. मी अजून कोणी कशी असू शकते? ना मी इतकी चांगली असू शकत, ना इतकी वाईट. आपण किती लक्ष देतो स्वतःकडे? मी किती लक्ष देते. मी अशी आहे, तशी नाही, हे आवडतं, अशी वागते.. पण शेवटी या सगळ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही? आयाम नाही? 'सोSहम्' या एका शब्दांत सगळी उत्तरं एकवटतात हे मान्य करणं अपेक्षेपेक्षा फारच जड होतं. लहानपणापासून जे ऐकत आले त्याची अनुभूती एक क्षणही सहन करु शकले नाही. स्वतःच्या मर्यादांची जाणिव होणं, आणि मुख्यतः त्या मर्यादा इत़क्यातच आल्या हे स्विकारणं अजूनही शक्य नाही झालं. एक क्षणही नाही टिकू शकले मी त्या अनुभूतीपुढे? इतकीही ताकद माझ्यात नाहीये?
आणि नंतर अशाच एका निवांत वेळी या गोष्टीचा विचार करताना आठवला बुद्ध.! बुद्धालाही दु:खाचा साक्षात्कार झाला होता. असं वाटलं की, साक्षात्काराला एक क्षण पुरतो. बाकीचा काळ लागतो तो साक्षात्कार पचवण्याची ताकद मिळवायला. त्यावेळेपर्यंत बुद्ध माहिती होता. आर्यसत्य.. सम्यक जीवन, अष्टांग मार्ग.. पण बुद्ध खरा महान या दु:खामुळे झाला असं वाटलं. या दु:खाची काळीज फाटून टाकणारी जाणिव प्रत्येक क्षणी सोबत घेऊन त्याचं जगणं त्याला बुद्ध बनवत गेलं.
मला बुद्ध होणं शक्य नाही. जे एक क्षण सहन नाही करु शकले त्यासोबत जन्म कसा काढायचा? माझ्या आयुष्यातली सत्य दोनच.. 'अर्जुन'पण असह्य आहे, पण त्यातून सुटका नाही.. आणि 'बुद्ध'पण तर अप्राप्य आहे..
7 Responses
  1. Anonymous Says:

    अनुभूतींनी माणूसपण बदलतं, सफल आणि सुटसुटीत होत जातं
    अर्जुनाची असाह्यता आणि बुद्धाची दुःखाचे अथांग रूप पाहून सैरभैर होऊन शेवटी मार्गाशी पोहोचलेली विद्वत्ता
    दोन्ही अध्यात्म रुपात आयुष्य शिकवणारी माणसाचीच रूपं!

    जगाला व्यापून उरणारं एकच तत्व आहे हा विचार अध्यात्मिकदृष्ट्या कितीही उदात्त वाटत असला तरी त्याची प्रचिती सहन करण्याची ताकद निर्माण कशी करायची?
    याचं उत्तर एकचं
    साक्षात्काराच्या अश्रूत माणसाचं अर्धे अस्तित्व बदलते, मुळात ताकद लागते ते हे नवीन अस्तित्व स्वीकारण्याची...

    दिव्य दृष्टी मिळूनही अर्जुनाला विश्वरुपदर्शन का झेपलं नसेल?
    कारण माणूस म्हणून जन्माला आलेल्या कुणालाही त्या देवपणाशी पोहोचण्याची सफलता मिळाली नाहीये, म्हणूनच देवपण हे महानतेपेक्षा मोठं आहे!
    ती व्यापकता झेपणे तुम्हा आम्हा हाडामासाच्या पुतळ्या मध्ये नाही!
    आपण कदाचित निपुण होऊ शकुही, पण संपूर्ण नाही.
    म्हणूनच सोSहम्' या एका शब्दांत सगळी उत्तरं एकवटतात हे मान्य करणं जड जातं , कारण हा माणूस पणाचा ढाचाच या मनुष्यरूपी अवस्था आणि अस्वस्थतांमध्ये बांधला गेलाय.
    माणूसपण सोपं आहे, त्याला म्हटलं तर व्याखांची बंधनं नाहीत आणि म्हटलं तर मर्यादांचे बांध आहेत.

    अध्यात्म कदाचित याच बंधनांना जाणणे आणि मर्यादांना आपलंसं करत दिव्यत्वाला हळूहळू सामोरं जाण्याचं नाव आहे,
    कारण सूर्याला बघण्याची दिव्यदृष्टी पुरेशी नाही, नंतर येणाऱ्या अंधारीतही ताकदीनिशी उभं राहण्याची सफलता आत्मसात करायला हवी
    अध्यात्म हेच शिकवते.

    विश्व ममरुप आहे हा गर्व आणि मी विश्वरूप आहे हे सार्थ!

    दिव्यत्व असेलही पण माणूसपण हि फार अथांग आहे...असाह्य आणि अप्राप्यतेच्याही पलीकडचे,
    सध्या माणूसपण अनुभूतींनी सुकर करूयात,त्यांची साथ विश्वरूप सहन करण्यास समर्थ करत जाईल.


  2. Unsui Says:

    मेकुसा - इयत्ता १०वी, धडा अभ्यासक्रमात ठेवण्याचा बोर्डाचा हेतू ठाऊक नाही. पालकांचा मुलांकडून हेतू "पाठांतर कर, चांगले मार्क मिळव, चांगल्या कॉलेजात प्रवेशा साठी (चांगल्या भवितव्यासाठी) तेच आवश्यक.
    मुलांचा हेतू "नक्की काय करायचे माहित नाही, पण पालकांची भुणभुण नको म्हणून अभ्यास केला पाहिजे" तर अश्या गोंधळात पाठ्यपुस्तक हिंदी द्वितीय भाषा - धड्याचे नाव "प्रतिक्रिया एक जीवन कसौटी"( लेखकाचे नाव आठवत नाही, पण अजून देखील नेटवर अधून मधून शोध चालू असतो). धडा म्हणजे एक लघुनिबंध, छोट्या छोट्या गोष्टी पेरलेल्या (अजून त्या सगळ्या व्यवस्थित आठवतात, फक्त लेखकाचे नाव...असो) गोष्टींमधला समान दुवा एकाच घटनेवर निरनिराळ्या लोकांची प्रतिक्रिया किती भिन्न असते, आणि त्या प्रतिक्रिये मध्येच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे. इ.इ. त्या निबंधाच्या समारोपात लेखकाने (नाव आठवत...) लिहिले आहे, "मानवी संस्कृतीच्या इतिहासात, कित्येक लोकांनी, आजार, जरा, मरण पाहिल्यात पण हजारो वर्षात किती लोकांची प्रतिक्रिया ह्या दुख:चे मूळ शोधून काढीन अशी होती? प्रतिक्रियाच शेवटी सर्वसामन्य माणसापेक्षा बुद्धाचे बुद्धपण अधोरेखित करते".
    प्रतिक्रियेच्या शृंखलेत पुढचे पाउल कोणते ते काळच ठरवेल, पण सभोवताली घडणाऱ्या घटना टिपता येण्याजोगी संवेदनशिलता आणि योग्य प्रतिक्रिया हि देखील एक चांगली सुरुवात, हजारात एखादीच
    ऋतुवेद - छान लिहिता


  3. ऋतुवेद, Unsui,
    दोघांच्याही प्रतिक्रिया खूप सुरेख आहेत. :-) मला आत्ता आठवत नाहीये की हे मी कुठे वाचलेलं आहे. पण सारांश असा होता की "माणूस हा देव आणि दानवांच्या भांडणातून निर्माण झालाय. म्हणजे देव आणि दानवांच्या भांडणात सैन्य म्हणून माणसाची निर्मिती केली गेली. आणि माणसाला मन असल्यामुळे तो कायम दैत्यांकडे झुकत राहिला" असं काहीतरी होतं. हे आता आठवण्यामागचे हे वाक्य की 'माणूसपण सोपं आहे, त्याला म्हटलं तर व्याखांची बंधनं नाहीत आणि म्हटलं तर मर्यादांचे बांध आहे', आणि मला वाटतं म्हणूनच माणूसपण अवघड आहे कारण त्याची व्याख्या करता येत नाही आणि आपल्यातच अशी दोन्ही टोकं पहाणं आपल्याला झेपत नाही..

    असो.. या विषयावर बोलू तेवढं कमीच आहे.

    Unsui, तुम्ही राशोमॉन चित्रपट पाहिला आहे का. अकिरा कुरासावा चा? पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यात एका घटनेचं वेगवेगळ्या व्यक्तिंच्या नजरेतून घेतलेले व्हूज आहेत. ऑल टाईम क्लासिक आहे. नक्की पहा. :-)


  4. Unsui Says:

    मेकुसा - कुरोसावाचे सगळेच चित्रपट अत्यंत आवडीचे, योगायोगाची गोष्ट कि राशोमान पाहताना सगळ्यात आधी आठवली होती "प्रतिक्रिया एक जीवन कसौटी"


  5. Unsui,
    :-) Either we think alike or its very obvious in given context to link both of them.. :-)


  6. Anonymous Says:

    कवेत घेता मी माझेपण
    हातूनही मग सुटले काठ..similar feeling to swa che vishwarup
    http://www.maayboli.com/node/13103