मेरा कुछ सामान ...
या आयुष्याचं काय करायचं असतं? म्हणजे नेमका उद्देश काय असतो? मी खरच सांगते मी महत्वाकांक्षी नाही. low aim is crime वगैरे वाक्य ज्यांना आवडतात त्यांना आवडो आणि ज्यांना अशी महत्वाकांक्षा आहे त्यांना असो. पण सगळ्याच लोकांवर महत्वाकांक्षी असण्याचं आणि स्पर्धा करण्याचं बंधन का? कशासाठी? मला सामाजिक बांधिलकीची वगैरे फार चाड नाही. दुरुन तमाशा बघणार्‍यांतला पिंड म्हणा हवंतर. कारण सगळंच निरर्थक वाटतं. जन्म निरर्थक.. जगणं निरर्थक.. निरर्थकाचाच खेळ वाटतो सगळा मला तरी. महित नसलेल्या वाटेवरुन माहित नसलेल्या गावाकडे जाणारा हा प्रवास. गाव कुठलं आहे हे माहित नाही त्यामुळे कुठे थांबूही शकत नाही. हा प्रवास मुक्कामाला न पोहचताच संपणार आहे. हा प्रवास माझ्यासोबत संपणार आहे की प्रवासासोबत मी संपणार आहे. आणि मी च संपून गेले तर काय गाव आणि काय मुक्काम? मेल्यानंतरचं कोणी बघितलंय? मला नाही फरक पडत मी मेल्यावर कोण किती रडेल याचा? कोणी रडेल की नाही याचा तरी.. मला नाही वाटत फार लोकप्रियता असावी आयुष्यात.. किंवा पैसा, सुखं वगैरे... घर, गाडी, विमानप्रवास वगैरे नसतानाही सुख असतंच की. मेल्यावर घर कुठे नेणार आहे मी.? या इतक्या इतक्याश्या मुक्कामात टीचभर जागेसाठी नाही आटापिटा करावा वाटत मला तर माझं काय चुकलं? 
एखादं माणूस फकिर असू नये का? असूच शकत नाही का? काही माणसं असतात ना (म्हणजे खरंतर पुरुष कारण माझ्यातरी बघण्यात आजवर एकही अशी बाई नाही..) बापजाद्यांनी कमवून ठेवलेल्या किंवा स्वत:च कमवलेल्या पैशावर मनमौजी रहाणारी.. त्यांना कुटुंबिय असतात किंवा नसतात. असले तरी ते त्यांना बांधून ठेवू शकत नाही कारण ते पुरुष असतात. नावं ठेवतील कदाचित पण फकिर आहे म्हणुन त्यांचा जगण्याच हक्क कोणी नाकारत बसत नाही. मग माझा पण नाकारला जाऊ नये असं मला वाटलं तर माझं काय चुकलं? मला माझं आयुष्य जगायला कोणाची परवानगी का लागावी? माझा जन्म होवुन अनेक वर्षे लोटली. मला एक हाडामांसाचं शरीर आहे आणि ते जगवायला जे जागतं ते मिळवायची, कमवायची ता़कद, कौशल्य, बुद्धी इ. गोष्टीही आहेत आणि ते मी कमवतेय देखिल. मग तरीही मला स्वत:वर अधिकार मिळवायला माझं अस्तित्व सिद्ध का करावं लागावं. 'मी आहे' एवढ्या गोष्टीने ते का सिद्ध होत नाही. माझं होत नाही तर मग पुरुषांचं कसं होतं? का होतं? आधी मला स्त्री मुक्ती फॅसिनेटींग वाटायची.. मग दांभिक वाटायला लागली. आता काहीच वाटत नाही. काही प्रश्न जेन्युइन आहेत पण मला फक्त माझ्यापुरतं उत्तर हवय. कोणी स्वार्थी म्हटलं तर म्हणो. स्वतः काहीतरी भव्यदिव्य मिळवा, काहीतरी करुन दाखवा (म्हणजे काय?) आणि मग तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल हे साटंलोटं का? अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा.. हे सगळं अधिक अधिक मिळवायच्या अपेक्षा का? सामान्यपणे लोकांना वाटतं तसं (लोक म्हणतेय मी बायका नाही) घर-संसार ही स्वप्न नाही आली कधी मनात पण मग म्हणून समाजप्रवर्तक, द्र्ष्टा नेता वगैरे होण्याची स्वप्न पाहिली पाहिजेत असं का? उदात्त हेतूला वाहिलेलं आयुष्य अर्थपूर्ण वगैरे असा काही समज असेल.. तर असू दे ना. मी कुठे नाही म्हटलं? पण तो समज मला पटलाच पाहिजे का?  नेतृत्वगुण, समजूतदारपणा, बाणेदार वृत्ती, सोशिकपणा, सात्विकता वगैरे वगैरे चं गुणगाण इतकं ऐकत आलेय मी की अशीच आहे असं मला वाटायला लागलेलं एके काळी. वास्तविक माझ्यात कोणतेही नेतृत्वगुण वगैरे नाहीत. मी कोणालाही दिशा वगैरे दाखवु शकत नाही, समजून घेऊ शकत नाही, ज्याला मी धडाडी, बाणेदारपणा समजत वगैरे समजत होते तो निव्वळ आक्रस्ताळेपणा आहे. आणि हे सगळं उमजलं तेव्हा निराशेच्या खोल गर्तेत जाण्याचा पण अनुभव घेवुन झालाय माझा. पण मी अशी आहे तर मी काय करु? आपल्या खर्‍या भावना दडपून उगीच सोशिकतेचा किंवा प्रेमळपणाचा आव मला नाही आणावासा वाटत. आणि मला महान महान स्वप्नही नाही पडत.. यात माझं काय चुकलं?
कुठलं बंधन नाही.. बेड्या नाहीत.. अपेक्षा नाही.. अपेक्षापूर्ती नाही. जगण्यापुरतं कमवावं..मनमोकळं हसावं. बोलावसं वाटेल त्याच्याशी बोलावं. कधी पंडीतजींच्या मियां मल्हारात तर कधी गुर्टूबाईंच्या ठुमरीत बुडून जावं... मोत्झार्ट चालू असताना व्हॅन गॉग अजून वेगळा समजतो का हे शोधण्यात तासन तास घालवावे.. बर्गमन पाहताना फुटून जावं.. पाठीवारच्या सॅकमध्ये २ कपडे आणि पायात चपला एवढ्या भांडवलावर वाट फुटेल तिकडे चालत रहावं. कुठल्यातरी गावात रात्र कुडकुडावी.. कुठल्यातरी पर्वतावर दिवस तळपावा.. माहित नसलेल्या तळ्यात सुर्य बुडावा.. हात लाऊन पाहता येईल एतका चंद्र जवळ भासावा... कुठल्या आडवाटेने न समजलेल्या भाषेतलं गाणं कानी यावं आणि सोबत रहाता येणार नाही हे माहित असूनही जीव ओवाळून टाकणारे प्रियजन भेटावेत.... बस्स.. जगणं जाणून घेत रहावं आणि जाणून घेत रहावं.. रोज कळतय वाटेपर्यंत नव्याने अडकावं.. अडकलय असं वाटेपर्यंत सुटून जावं.. मला असं जगावसं वाटलं तर काय चुकलं? आयुष्याचा प्रवास खर्‍या अर्थाने प्रवासच व्हावा.. आणि हिमालयाच्या किंवा आल्पस् च्या कुशीत किंवा अ‍ॅमेझॉनच्या खोर्‍यात, किंवा नाईल च्या काठी किंवा पॅसिफिकच्या मध्यावर.. कुठेही संपून जावं कसलाही मागमूस न ठेवता..मातीचा देह मातीत मिसळून जावा.. मला असं मरावसं वाटलं तर माझं काय चुकलं?
20 Responses
  1. Prajakta Says:

    superlike..!!
    shewtcha para...jamun gelay... :-)


  2. Anonymous Says:

    Khoop saundar lihilays...
    Agdi mazya manatl..!!!
    :)



  3. गायत्री... :-)
    Best compliment.. हे असं वाटणारं कोणीतरी आहे आणि मला भेटलं ही काही कमी आनंदाची गोष्ट नाही...:-)


  4. अगदी मनातलं. मलाही सेम असंच वाटतं....



  5. Dk Says:

    वाचलेलं आवडलं :) ह्यापेक्षा अधिक लिहू का?


    इथं?


  6. अर्थातच लिहा.. :-) मनापासून वाटलेलं काहीही.. किंवा merakuchhsaman@gmail.com वर लिहा..


  7. Anonymous Says:

    "स्वतः काहीतरी भव्यदिव्य मिळवा, काहीतरी करुन दाखवा (म्हणजे काय?) आणि मग तुम्हाला तुमच्या मनासारखं वागता येईल हे साटंलोटं का?"

    कर्रेक्ट! ह्यातल्या सगळ्या वाक्यांची क्रियापदं पुल्लिंगी करा की हे माझं मनोगत होईल.:)

    " कुठल्या आडवाटेने न समजलेल्या भाषेतलं गाणं कानी यावं आणि सोबत रहाता येणार नाही हे माहित असूनही जीव ओवाळून टाकणारे प्रियजन भेटावेत.... बस्स.. "

    बास बास बास... ह्याउप्पर कायपण नको...


  8. alhadmahabal,
    कर्रेक्ट! ह्यातल्या सगळ्या वाक्यांची क्रियापदं पुल्लिंगी करा की हे माझं मनोगत होईल.:)
    बास बास बास... ह्याउप्पर कायपण नको...,>>
    अगदी जेन्युईन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आलेत.. :-) :-) धन्यवाद..! :-)


  9. Tejali Says:

    mazya maniche shabd tuzya lekhanitun utarle.. khar ter mich kaay..manus mhanun jagu pahanarya pratyek muliche hech shabd astil:)


  10. Tejali,
    अगदी तुझ्यासारखीच प्रतिक्रिया काही लोकांकडून आली.. वर वाचलं असशीलच.. :-) आपण सारे एकाच माळेचे मणी..


  11. एक मन हेच सांगत असत ओरडून ओरडून, पण अजून एक मन असत ना जे नाही जगू देत ह्याला त्याच्या मनाप्रमाणे... खर तर प्रत्येक कलाकाराच्या मनातला बोललीस... जे जोडू पाहता आहेत दोन टोक आणि मधेच आठवतात की खरच काय करायचा आहे आपल्याला...



  12. Unknown Says:

    Agadi khara.. khup usfurt lihilays.. manat exact asech vichar yetat.. khup avdla.



  13. Anil Says:

    just amazing!.. while reading, at first i felt like listening to a rap.. quite rhythmic recitation of meaninglessness of this materialistic world! .. आता मात्रं खरंच फॅन झालोय मी मॅडम तुमच्या लिखानाचा!

    ..aims, achievements, competition, success and failures.. या सगळ्यांचा खेळ आणि त्यातून मिळणारी सुखदुःखं ज्यांना जवळची वाटतात त्यांनी या सगळ्या गोष्टींचं काडीचं कौतुक नसणार्‍यांचं अस्तित्वं नाकारण्याचा किंवा त्यांच्यावर त्या गोष्टी लादण्याचा खरंतर काही प्रश्नच येत नाही, मग ती स्त्री असो कि पुरुष. समाजामधे आणि संस्कारांमधे रुजलेल्या कर्मठ संकल्पना इतक्या दुर्बल आणि जगण्याशी इतक्या असंबंध आहेत कि त्यातून निर्माण झालेले स्त्री-स्वातंत्र्याचे प्रश्न हास्यास्पद वाटतात कधी कधी. अरे! म्हणजे? हा काय प्रश्न आहे का? इतकी बेगडी संस्कृती तुमची कि त्यातून असले बेसलेस प्रश्न जन्माला येऊन ते इतके मोठे व्हावेत? आणि वरून तुम्ही त्याच प्रश्नांचा फायदा तुमच्या किळसवाण्या राजकारणात आणि समाजकारणात करून घ्यावा? मुलभूत माणूसपणाचा काही मागमूसच नाही राव या सगळ्या गोंधळात. आणि वरून असले संस्कार घडवताना निसर्गाकडे बघण्याची दृष्टीसुद्धा मिळाली नाही कधी या समाजाला. जाऊ द्या.. हा विषय आता दुसरीकडे वळायच्या आत मी आवरता घेतो. कारण त्यात अजून बर्‍याच पोसिटिव्ह-निगेटीव्ह बाजूही आहेतच आणि दुसरं म्हणजे जास्त काही सामाजिक बांधीलकी नसणार्‍यांनी त्यावर टिपण्णी करू नये म्हणूनही. :-P

    खरंतर, मला खूप भावलं ते तुझं मुक्त जीवन-प्रवासाचं सुतोवाच. कलावंतांनी घडवत आणलेल्या मुक्तानुभूतीच्या जगाबद्दलची कृतज्ञता आणि त्यात बुडून विरघळून जाणारं मन.. a Golden Heart! .. जन्मजातच असलेली अशा प्रवासाची ओढ.. या प्रवासात भेटणारे कधी निखळ सुंदर क्षण, कधी भयाण काळोख तर कधी या दोन्हींमधलं नजर स्वप्नाळू नाहीतर अंधुक करणारं असं धुकं.. कधी माळंभर पसरलेलं अमावस्येच्या रात्रीचं दैवी चांदणं तसंच मनभरंही पसरत जावं.. आणि चंद्राच्या उजेडाने कधी दाह व्हावा तर तोच चंद्र कधी गुलजारचा ओला चंद्र होऊन निळ्या नदीच्या काठी उगवावा.. और फिर.. भुरें भुरें बादलों के भालूं, लोरीयां सुनायें ला~रा~रा~रूं.. तारों के कंचों से रातभर खेलेंगे, सपनों मे चंदा और तू.. आहाहा.. गुलजार-साहेब असेच सोबतीला आहेत या प्रवासात ही खूपच जिव्हाळ्याची गोष्ट. ज्ञात-अज्ञाताच्या पलिकडे क्षणाक्षणांना कधी जोडत तर कधी तुटत हा प्रवास असाच चालू रहावा.. कधी बर्फधुळींचे कण थेट हाडांना जाणवावेत, तर कधी तार्‍यांच्या अनावर धुळीने बेभान होऊन जावं.. आणि मधुनच पाऊसथेंबांची घुंगुरमाळंही निनादावी. .. अब बस्स्, खुद को खुद से ही ये वादा करने दो.. दिल को दिल ही रहने दो. और, अश्कों के मोती भी कभी सीपी से खुलने दो.. कतरा कतरा गिरने दो.. कतरा कतरा चुनने दो.. कतरा कतरा रखना हैं ना?.. कतरा कतरा रखने दो.. ऐ जिंदगी, लम्हा लम्हा लम्हें दो.. लम्हा लम्हा जीने दो.. कह भी दो ना आंखों से.. लम्हा लम्हा पीने दो..

    मॅडम, काय केलं बघा तुमच्या या पोस्टने.. आमचं आजकाल धिम्या गतीने वाहणारं पाणी आता पुन्हा पहिल्यासारखं खळाळून वहायला लागलंय.. आणि तुम्ही म्हटलात तसं ते शेवटी खरंच तिकडेच जाऊ पाहतंय.. हिमालयाच्या कुशीतल्या निळ्या सरोवराकाठी.. नाहीतर अॅमेझॉनच्या गर्द खोर्‍यात.. मातीचा देह मातीत..

    .. आणि यासाठी, तुला धन्यवाद देऊनही ऋणातच राहणं आवडेल मला! :-)



  14. Ajit Says:

    "सोबत रहाता येणार नाही हे माहित असूनही जीव ओवाळून टाकणारे प्रियजन भेटावेत.... "
    कातिल होते हे.....